Sharad Krida and Sanskrutik Pratishthan
@चित्रा नातू
कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, कृषी अशा समाजाच्या विविध क्षेत्रांत ‘शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या माध्यमातून समाजप्रबोधनासाठी भरीव कार्य करणारे उद्योजक लक्ष्मीकांत खाबिया यांचे नाव आज महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित आहे. त्यांच्या ठायी असलेलं समाजभान, क्रियाशीलता, प्रामाणिकपणा, सातत्य या गुणांमुळे त्यांची संस्था आणि कार्य आज नावारूपाला आलेलं आहे. वैयक्तिक जीवनात आणि समाजजीवनात वेळोवेळी आलेल्या लहान-मोठ्या अडचणींवर मात करत खाबिया यांनी आपला समाजसेवेचा घेतला वसा हसतमुखाने जपला आहे.
उद्योग जगतामध्ये स्वतःच्या कामाचा ठसा उमटवतानाच; एकीकडे साहित्य, संस्कृती, क्रीडा प्रचार-प्रसारकार्यात आपण खूप मोठं योगदान देत आहात. याची बीजं नक्कीच आपल्या बालपणात असणार! कसं होतं आपलं बालपण ?
माझा जन्म बारामतीला झाला. घरात धार्मिक वातावरण होतं. माझे आजोबा जैन धर्माचे अभ्यासक होते. माझ्या लहानपणी आजोबांकडे साधुसंतांचं येणं-जाणं असायचं. कळत-नकळत त्यांच्या विचारांचे संस्कार माझ्यावर होत होते. आजोबा जीवदयाचं काम करायचे. सर्वसामान्य लोकांना मदत करताना मी त्यांना पाहिलं आहे. बिहारचा पूर असो, बंगालचा पूर असो किंवा गुजरातमध्ये आलेली आपत्ती असो; आजोबांचा हात नेहमीच मदतीसाठी पुढे असायचा. आपत्तीग्रस्तांना कपडे-धान्य देता यावं, यासाठी ते वेळप्रसंगी स्थानकांमध्ये जाऊन मदतीसाठी चादर पसरून बसलेले मी पाहिलं आहे. अशा वेळी कधीतरी आम्ही त्यांच्याबरोबर जायचो, ते मला आजही आठवतं. ते जसे धार्मिक होते, तसेच ते विज्ञानवादी होते. मरणोत्तर देहदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी बी. जे. मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये ते मला डॉ. मृदुला फडके यांच्याकडे घेऊन गेले होते. देहदानानंतर त्या मृत शरीरावर होणार्या सर्व प्रक्रिया त्यांनी तिथे समजून घेतल्या आणि मग देहदानाच्या इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून त्यांनी माझी सही घेतली. सामाजिक काम करतानाही ते डोळसपणे करण्याचा वस्तुपाठ मला माझ्या आजोबांनीच घालून दिलेला आहे. मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान या दोन गोष्टी त्यांच्या इच्छेनुसार मी पूर्ण केल्या.
माझे पणजोबा राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील कोसाना या गावातून शिरूरला येऊन स्थायिक झालेले होते. शिरूरला येऊन त्यांनी शून्यातून सधन असा संसार उभा केला होता. त्या काळात, माझ्या जन्मापूर्वी शिरूरमध्ये कत्तलखान्यांना गाई पुरवण्याचे काम मुस्लीम समाज करत होता आणि त्याचा म्होरक्या रुस्तम नावाचा दादा होता. माझे आजोबा सुखलाल खाबिया आणि मोठे आजोबा प्रेमराज खाबिया हे तेव्हा कसायांपासून गायी सोडवण्याचं काम करत. त्या रागातून रुस्तम नावाच्या दादाने होळीच्या दिवशी आमचं घर पेटवलं. माझ्या चार नंबरच्या आजोबांसह घरातील इतर काही मंडळी त्यात निवर्तली. त्या धक्क्यातून घर सावरायला बरीच वर्ष गेली. या घटनेनंतर आमची आर्थिक परिस्थितीही बिघडली. इतकं होऊनही माझ्या दोन्ही आजोबांनी आपलं सेवाकार्य काही थांबवलं नाही. माझ्या चार नंबरच्या आजींना जैन धर्माचं शिक्षण दिलं, साधुत्व (दीक्षा) दिली आणि कालांतराने त्या भारतमाता प्रवर्तिनी प्रमोद सुधाजी महाराज या नावाने भारतभर लोकप्रिय झाल्या.

माझं चौथीपर्यंतचं शिक्षण शिरूरला झालं. पुढे पाचवीला मी जुन्नरला जैन बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. तिथे सामाजिक, धार्मिक विषय माझ्या कानावर पडत होते. सहावी, सातवीचं शिक्षण पुन्हा शिरूरमधील विद्याधाममध्ये झालं. तिथे प्राध्यापक सु. ह. जोशी सरांच्या सानिध्यात मी काही काळ संघाच्या शाखेतही गेलो. ते आणि माझे वडील चांगले मित्र होते. आठवी, नववी, दहावी अशी तीन वर्षे मी बालमोहन विद्यामंदिरच्या रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन, तळेगाव दाभाडे इथे शिक्षण घेतलं. दुर्दैवाने दहावीला मराठीसारख्या विषयात मी नापास झालो. पण आज मी खूप चांगल्या प्रकारे मराठी बोलू शकतो, याचा मला अभिमान आहे. पुढे अकरावीपासून एस.वाय.बी.कॉम.पर्यंतचं माझं शिक्षण पुन्हा शिरूरला झालं. त्यानंतर अलीकडे, 2015 साली मी ग्रॅज्युएशन, 2018 साली एम.बी.ए. इन फायनान्स पूर्ण केलं.
तुम्हाला खरं सांगू का! लहानपणापासूनच माझ्यावर समाजसेवेचे संस्कार झालेले आहेत, हे खरं. पण आता मला असं वाटतं की, सामाजिक कामाची ओढ ही जैन समाजामध्ये रक्तातच असते. ‘जिवो जीवस्य जीवनम’ असं एक तत्त्वज्ञान जरी असलं, तरी ‘जगा आणि जगू द्या’ हे भगवान महावीरांचं तत्त्वज्ञान आमच्या घरात पहिल्यापासून पाळलं जातं आणि या तत्त्वानुसारच आमचे दोन्ही आजोबा काम करायचे.
महाविद्यालयीन जीवनात कला-क्रीडा क्षेत्राशी जोडले जाण्याच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या का?
त्या झाल्या होत्या ना! माझ्या वर्गात 154 मुलं होती. सुरुवातीपासूनच माझं सगळ्यांबरोबर मिळून-मिसळून वागणं असल्यामुळे सगळ्यांमध्ये मी लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळेच सी.आर.च्या निवडणुकीत मी जिंकलो. मी सी.आर. झाल्यानंतर शेवटचं युथ फेस्टिवल झालं, ते सिटी बोरा कॉलेजमध्ये. त्या युथ फेस्टिव्हलच्या नियोजन समितीचा मी सदस्य होतो. अशा प्रकारे महाविद्यालयीन काळात मी सांस्कृतिक गोतावळ्यात वावरत होतो. नाटकांत कामं करणं, एकांकिकांमध्ये कामं करणं, एकपात्री प्रयोग करणं हे सगळं मी त्या काळात करायचो.
दरम्यान अकरावीला असतानाच मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) सदस्य झालो. धनंजय कुलकर्णी सर, ए. पी. कुलकर्णी सर हे त्या वेळी आम्हाला गुरू म्हणून लाभले. चंद्रकांतदादा पाटील आमचे मार्गदर्शक होते आणि विनोद तावडे त्या वेळी पुणे जिल्ह्याचे संघटन मंत्री होते. त्या काळात अभाविपचं काम आम्ही खूप जोरात करत होतो. कला आणि संस्कृतीशी माझी नाळ जुळण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि माझे आजोबा यांचा दोघांचा मोठा वाटा आहे. पुढे काही वैचारिक मतभेदामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून मी बाहेर पडलो. अभाविपचं काम थांबवलं; पण कला, संस्कृती या विषयात काम करण्याची सवय मी बंद केली नाही.
1996 साली एन.एस.यु.आय. (National Student Union of India) मध्ये सर्वप्रथम शहराध्यक्ष, पुढे जिल्हाध्यक्ष, मग युवक कॉँग्रेसचा प्रसिद्धी प्रमुख आणि त्यानंतर युवक कॉँग्रेसचा राज्याचा प्रसिद्धी प्रमुख अशा जबाबदार्यांवर मी काम करू लागलो. एन.एस.यु.आय.मध्ये काम करत असताना शरद पवार साहेब आणि त्यांच्या विचारांच्या जवळ जाण्याची संधी मला मिळाली. दरम्यान समाज-संस्कृती क्षेत्रासाठी काम करण्याचे विचार मला काही शांत बसू देत नव्हते. एन.एस.यु.आय.मध्ये काम करत असतानाच आपण साहित्य-कला-सांस्कृतिक विभाग सुरू करावा, अशी मी पक्षाला विनंती केली. या क्षेत्रासाठी काम करण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल वरिष्ठांच्या मनात विश्वास संपादन करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्यानंतर मात्र मा. शरद पवार आणि अजित दादा पवार यांची माझ्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. आनंदाची बाब म्हणजे, त्या विभागाचा राज्याचा पहिला अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली. मग एन.एस.यु.आय.च्या माध्यमातून आम्ही राज्यभरात वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा घ्यायला सुरुवात केली.
त्याच काळात राज्यामध्ये साहित्य, कला, संस्कृती आणि समाजासाठी आणखी काही विधायक काम करता यावं, या हेतूनेच मा. शरद पवार यांच्या नावे ‘शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान’ सुरू केलं. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकात या संस्थेचं मुख्य कार्यालय आहे. 80 टक्के समाजकारण करा आणि 20 टक्के राजकारण करा, ही पवार साहेबांची शिकवण आहे. आम्ही 80 टक्केचा धागा 100 टक्के करण्याचा संकल्प केला. 24 डिसेंबर 1996 रोजी मा. शरद पवार साहेबांच्या शुभहस्ते सुरू झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून होणारं सेवाकार्य आजतागायत अखंडपणे सुरू आहे.
संस्थेच्या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी मिळवण्यासाठी कोणापुढेही हात पसरायचा नाही, हे सुरुवातीलाच निश्चित करण्यात आलं.
वडिलांचा छपाईचा व्यवसाय असताना, आपल्याला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असं का वाटलं?
पारंपरिक प्रिंटिंग प्रेसमध्येही कंपोजिंग, प्रिंटिंग अशी कामं मी करत होतोच. पण माझा धडपड्या स्वभाव ओळखून वडिलांनी मला 16 एम.एम.चा एक प्रोजेक्टर आणून दिला आणि म्हणाले, “हे वापरायला शिक आणि चालव.” प्रोजेक्टर मिळाल्यानंतर गावोगावी यात्रा-जत्रांच्या ठिकाणी सिनेमा दाखवायला जाणं सुरू झालं. त्याकाळी गावागावात यात्रेनिमित्त पडद्यावर सिनेमा दाखवणे त्यामध्येही जुने मराठी चित्रपट जसे की, ‘सामना’, ‘ केला इशारा जाता जाता’, ‘सुशीला’, ‘कसं काय पाटील बरं आहे का?’ ह्या चित्रपटांची लोकांच्या मनावर फार छाप होती. गावोगावी प्रोजेक्टरच्या माध्यमातून हे चित्रपट दाखवता दाखवता पुढे एका प्रोजेक्टरचे माझ्याकडे चार प्रोजेक्टर झाले. पुणे जिल्ह्यातलं असं एकही गाव नाही, जिथे मी गेलो नाही.
दरम्यानच्या काळात मित्रांबरोबर एम.आय.डी.सी.मध्ये गेलेलो असताना, व्हर्लपुल कंपनीतील साहेबांनी बोलता बोलता कंत्राटी मनुष्यबळ पुरवण्याचं काम करण्याविषयी विचारणा केली आणि तिथून व्यवसायाची सुरुवात झाली. पुढे आई रत्नप्रभा आणि वडील मोहनलाल यांच्या नावांवरून ‘रत्नमोहन’ या नावाने कायदेशीररीत्या कंपनीची स्थापना केली. पुण्यातील ‘रोहन बिल्डर्स’ने माझ्यावर विश्वास ठेवून मला पहिलं काम दिलं. पुढील काळात पुण्यातील छोट्या-मोठ्या बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरक्षा; पुण्यात झालेल्या सर्व वर्ल्ड कप मॅचेससाठी सुरक्षा; शाळा, सरकारी संस्था, खासगी कंपन्या अशा ठिकाणी हाऊसकीपिंगसाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्याचा माझा व्यवसाय जोर धरू लागला. बजाजसारख्या कंपनीतून स्क्रॅप चोरीला जाण्याचे प्रसंग घडले, तेव्हा बजाजच्या भंडारी साहेबांशी बोलताना डॉग स्क्वॉडची कल्पना सुचली. मग प्रशिक्षित डॉग स्क्वॉडसुद्धा तयार केलं. या आधीच्या काळात ‘रत्ना पब्लिसिटी’ या नावाने जाहिरात एजन्सी सुरू करून, ती दोन-तीन वर्ष चालवली. तेव्हाही ‘रांका ज्वेलर्स’ यांनी मोठ्या विश्वासाने आमच्या एजन्सीला पहिलं काम दिलं.
वर्षभरापूर्वी विदर्भातील अमरावतीमध्ये नंदू बंडा आणि त्यांच्या सहकार्यांसोबत आम्ही एल.एम.के. फार्मर प्रोड्यूसर कंपनी सुरू केली आहे. तिथल्या सगळ्यांनाच माझ्या नावाने ही कंपनी सुरू करायची होती. पण तसं न करता आद्याक्षरं तीच ठेऊन, ‘लॉजिस्टिक मॅनेजमेंट नॉलेज फॉर फार्मर’ असं या कंपनीचं नामकरण आणि ब्रीदवाक्य मी केलं. या कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेलं पहिलं संत्री प्रक्रियेच्या प्रकल्पाचं काम आज शेवटच्या टप्प्यावर आहे. संत्री ग्रेडिंग, व्हॅक्सीनेशन, सेपरेशन, पॅकिंग असं हे काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. हा साडेचार कोटींचा प्रकल्प शासनाने मंजूर केला आहे.
समाजप्रबोधनाच्या हेतूने विविध स्पर्धाचं आयोजन आपण करता. त्यावर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रभाव दिसून येतो. संत तुकाराम महाराजांचं साहित्य आपल्या वाचनात कधी आलं?
शाळा-कॉलेजमध्ये असताना कधीतरी हातात मिळालेलं एक पुस्तक उचलून मी घरी असाच लोळत पडलो होतो. आई म्हणाली, “अरे, ती गाथा आहे, नीट उठून बस आणि वाच.” ही आई म्हणजे माझी सावत्र आई. तिच्याच संस्कारांमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो.
ती गाथा चाळत असताना,
आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥
या ओळी मी वाचल्या. त्या ओळींनी माझ्या मनात आयुष्यभराची प्रेरणा जागवली. तुकाराम महाराजांचे आणखी अभंग जसजसे वाचनात येत गेले, तसतशी त्यांच्या अभंगांमध्ये असलेली समाजप्रबोधनाची ताकद मला जाणवत राहिली. त्यामुळेच आपण भजन स्पर्धा घ्याव्यात, असं वाटायला लागलं.
2006 ची गोष्ट आहे ही, त्या काळात राज्यपातळीवर भजन स्पर्धा होत नव्हत्या. संत तुकाराम महाराजांच्या नावाने आम्ही पहिली राज्यस्तरीय भजन स्पर्धा घ्यायची ठरवली, तेव्हा एड्सची मोठी भीती समाजात निर्माण झाली होती. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या माध्यमातून समाजमनात असलेली एड्सविषयीची भीती नक्कीच दूर करता येईल, असा विश्वास वाटत होता. ‘शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान’ आणि ‘एड्स कंट्रोल सोसायटी’ अशी संयुक्तपणे आम्ही ही स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेला अजित पवारांनी पहिला पाठिंबा दिला.
त्या पहिल्या स्पर्धेची गंमत अशी की, स्पर्धा घ्यायची ठरवली, तेव्हा स्पर्धेच्या खर्चासाठी नाममात्र निधीही उपलब्ध नव्हता. पण खरं सांगू का, आपण काही करायचं मनापासून ठरवलं की पुढच्या सगळ्या गोष्टी आपोआप जमायला लागतात. तसं ते जमत गेलं आणि या स्पर्धेला ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रतिसाद मिळाला. राज्यातल्या 22 जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. ‘एबीपी माझा’च्या राजीव खांडेकर यांनी या स्पर्धेला मीडिया स्पॉन्सरशिप दिली. स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यामध्ये घेण्यात आली. त्या वेळी 450 मुलं माझ्याकडे मुक्कामी होती. अंतिम स्पर्धेचा खर्च आणि बक्षीस समारंभ यासाठी निधीची आवश्यकता होती. विचार करत बसलेलो असताना प्रकाशजी धारिवाल यांचा फोन आला. त्यांनी मला बोलावून घेतले आणि माझ्या ध्यानीमनी नसताना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती मिळताच, दानशूर रसिकशेठ धारीवाल, प्रकाशजी धारिवाल त्यांनी तत्काळ भरीव आर्थिक साहाय्य केलं आणि स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
दुसर्या वर्षी स्पर्धा घ्यायचं ठरवलं, तेव्हा समाजातील स्त्री-भ्रूणहत्या हा ज्वलंत प्रश्न आमच्यासमोर होता. स्त्री-भ्रूणहत्येविरोधात घेण्यात आलेली ही अभंग स्पर्धा महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये झाली. स्पर्धकांच्या सोयीच्या दृष्टीने आम्ही चार विभागांमध्ये प्राथमिक फेर्या घेतल्या. अंतिम फेरी पुण्यामध्ये झाली. अजितदादा, सुप्रिया सुळे, आर.आर.पाटील, गिरीशजी बापट या मान्यवरांची या स्पर्धेला उपस्थिती होती.
या अभंग स्पर्धांच्या दरम्यान तुकोबांच्या प्रती असलेला माझा आदरभाव दृढ झाला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये ज्या पादुका आजही आहेत, त्यांच्या निर्मितीचा मान संस्थेने आम्हाला दिलेला होता, ही गोष्ट मला आजही मोठं समाधान मिळवून देणारी आहे.
अभंग स्पर्धेचं स्वरूप नेमकं कसं असतं?
स्पर्धकांनी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग सादर करायचा आणि दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने एक स्वरचित रचना सादर करायची, अशी ही स्पर्धा असते. एड्सविषयक स्पर्धेची दखल घेत दूरदर्शनने माझी मुलाखत घेतली. ‘एबीपी माझा’ने या स्पर्धेत सादर झालेली भजनांची एक मालिका आपल्या चॅनलवरून वर्षभर प्रसारित केली. या पहिल्या-वहिल्या राज्यस्तरीय अभंग स्पर्धेला महाराष्ट्रात खूप लोकप्रियता लाभली.
संस्थेने आजवर अनेकविध नवनवीन संकल्पना राबवलेल्या आहेत. या वैविध्यपूर्ण संकल्पनांचा स्रोत काय आहे?
कामांच्या निमित्ताने मला राज्यभर प्रवास करता आला. विविध प्रकारची माणसं अनुभवता आली. माणसांचे स्वभाव कळायला लागले, चेहरे वाचता यायला लागले. ग्रामीण भागाबद्दल एक वेगळी जवळीक निर्माण झाली. ग्रामीण भागातील लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं, असं मनापासून वाटायला लागलं.
त्यातूनच मग समाजातल्या चांगल्या गोष्टी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा समाजातील लहान-मोठे प्रश्न सोडवण्यासाठी संस्था काय करू शकते, असा विचार सुरू होतो आणि विचार करता करता नवनवीन कल्पना सुचत जातात.
उदाहरण सांगायचं झालं, तर ग्रामीण भागात चित्रपट दाखवायचो, तेव्हा अनेक चित्रपट पाहता आले. त्यात ‘सामना’, ‘कसं काय पाटील बरं आहे का’, ‘साधी माणसं’ हे माझे आवडते चित्रपट होते. तमाशाप्रधान चित्रपटांना प्रेक्षकांकडून जास्त मागणी होती. ‘कुण्या गावाचं आलं पाखरू - सुशीला’ अशा चित्रपटांमधली गाणी लोकं मला दोन-तीनदा लावायला सांगायची. त्यातूनच संगीतकार राम कदम यांच्याविषयी मला विलक्षण प्रेम वाटू लागलं आणि ‘राम कदम कलागौरव पुरस्कार’ आम्ही जाहीर केला. पहिला पुरस्कार सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांना देण्यात आला. पुरस्काराची रक्कम काही खूप नव्हती; पण तरीही रामदादांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जगदीश खेबूडकर यांचे डोळे भरून आले. त्या वेळी त्यांच्याशी माझा जवळून परिचय झाला. संस्थेच्या कामाविषयी जाणून घेतल्यानंतर त्यांनी अनेकदा सांगितलं होतं की, “कोल्हापूरला येऊन जा. मी तुला तुझ्या संस्थेवर एक गीत लिहून देतो.” पण माझ्याकडून जाणं झालं नाही आणि ते गीत तसंच राहिलं, याची खंत माझ्या आयुष्यात कायम राहणार आहे.
संपर्क :
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान
दूरध्वनी : 020-25536633
दुसर्या वर्षी हा पुरस्कार, महाराष्ट्राला आणि देशाला पारंपरिक वाद्यांची ओळख करून देणार्या भास्कर चंदावरकर यांना देण्यात आला. अशी ती पुरस्कारांची मालिका सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. या वर्षी संस्थेतर्फे 14 वा ‘राम कदम कलागौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
पवार साहेब कृषिमंत्री होते तेव्हा, तेव्हा सहज डोक्यात विचार आला की, आपल्याला कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा घेता येतील. पवार साहेबांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली. ‘आपली माती, आपला महाराष्ट्र’ या नावाने सलग तीन वर्ष राज्यातल्या चारही कृषी महाविद्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. पथनाट्य, वक्तृत्व, बॅण्ड स्पर्धा, वैयक्तिक गायन, सामूहिक नृत्य, शेतकरी वेषभूषा स्पर्धा असं साधारण स्पर्धेचं स्वरूप असायचं. पहिल्याच वर्षी ‘शेतकरी वेषभूषा स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेच्या सादरीकरणासाठी शेतीला उपयुक्त असणारी कुठलीही गोष्ट घेऊन स्पर्धक व्यासपीठावर येऊ शकणार होते. या स्पर्धेतले अनुभव विलक्षण सुंदर होते.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान या आपल्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण होऊन आता 28व्या वर्षी पदार्पण होतंय. सामाजिक कार्याला वाहिलेली एखादी संस्था सलग 25 वर्षे अखंडपणे कार्यरत असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कालखंडात संस्थेने केलेल्या कामांविषयी सविस्तर सांगा.
संस्था विविध स्तरांवर विविध स्पर्धांचं आणि कार्यक्रमाचं आयोजन करत असते. त्यानिमित्ताने त्या त्या विशिष्ट विषयाला धरून समाजात जाणीव-जागृती होते. स्पर्धांच्या निमित्ताने वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर वाचन-चिंतन, वैचारिक देवाण-घेवाण, परस्पर संबंध दृढ होणे अशा विधायक गोष्टी घडत राहतात आणि समाज एकसंध होण्यात हातभार लागतो.
2015-16ची गोष्ट आहे. येरवडा तुरुंगामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कैद्यांना गोष्टीची व अध्यात्माची पुस्तकं भेट म्हणून देण्यासाठी गेलो असताना, कैद्यांनी सादर केलेली भजनं पाहिली. तेव्हाच कैद्यांची भजन स्पर्धा घेण्याचा विचार मनात आला. कारण तुरुंगात कैदी असणारी बरीचशी मंडळी पश्चातापग्रस्त असतात, त्यांना सुधारण्याची इच्छा असते, मात्र योग्य संधी मिळणे गरजेचे असते. स्पर्धेच्या माध्यमातून एक जरी कैदी सुधारला, तरी ते स्पर्धेचं खूप मोठं यश असेल, असं मला वाटलं. मला भावलेल्या तुकोबांच्या ‘त्या’ ओळी तर कैद्यांच्या जीवनाला चपखल बसणार्या होत्या.
तुरुंग अधिकार्यांनी स्पर्धेला संमती दिली. स्पर्धेच्या संकल्पनेवर काम करत असताना एकाने सुचवलं की, या निमित्ताने तुरुंगाला संस्थेतर्फे काही भेटवस्तू देता येईल. सगळं करता येणं शक्य होतं खरं, पण प्रश्न पैशांचा होता. प्रकाशजी धारिवाल यांनी तोही प्रश्न सोडवला. म्हणूनच मग त्यांच्या आई स्व. कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ पहिल्या स्पर्धेच्या वेळी भजनाचं साहित्य आणि अध्यात्माची 100 पुस्तकं आम्ही स्पर्धेत भाग घेतलेल्या राज्यातील प्रत्येक तुरुंगाला भेट म्हणून दिली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पहिल्या स्पर्धेचा शुभारंभ झाला. या स्पर्धांसाठी संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे, देहू आणि आळंदी संस्थानचे विश्वस्त अशी थोर मंडळी मार्गदर्शक म्हणून लाभली. 2022साली झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 8 संघ उतरले होते, त्यातील विजेत्या तीन संघांतील कैद्यांची 90 दिवसांची शिक्षा तुरुंग व्यवस्थापनाकडून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तेजनार्थ संघातील कैद्यांची 60 दिवसांची शिक्षा माफ झाली, तर ज्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, त्यांची 30 दिवसांची शिक्षा माफ झाली. यंदा विद्यमान गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी स्पर्धा घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. सहभागी तुरुंगांना बक्षीस म्हणून यंदा डिजिटल लायब्ररी देण्याचा आमचा मानस आहे.
संत श्रेष्ठ मंडळाचे श्रीराम साठे यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यानंतर शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने काही काळ संत दर्शन मंडळाच्या सहयोगाने आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी ‘विठू माऊली माझी’ भजन गायनाचे विनामूल्य कार्यक्रम आणि राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. कालांतराने श्रीराम साठे यांच्या निधनानंतर ‘शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या माध्यमातून प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या कार्यक्रमाचं आयोजन आवर्जून करण्यात येतं.
संस्थेतर्फे लावणी महोत्सव, लावणी स्पर्धाही घेण्यात येतात. या स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यावर आमचा कटाक्ष असतो. लावणीसारखा कार्यक्रम असूनही तिथे कोणत्याही गैरप्रकाराला थारा नसल्यामुळे, अनेक ठिकाणाहून प्रेमापोटी सदैव सहकार्य मिळत राहाते आणि लावणी स्पर्धेतील सातत्य टिकून राहण्यास मदत होते.
राज्य बॉक्सिंग चँपियनशीप स्पर्धा, विविध खेळांतील उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार, नवोदित खेळाडूंना आर्थिक मदत असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येतात.
याशिवाय, सर्वच क्षेत्रांतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत संस्थेतर्फे देण्यात येते. ज्यांना ज्यांना आतापर्यंत मदत करण्यात आली, त्या सर्व व्यक्ती आणि त्यांची कुटुंबे माझ्याशी आणि संस्थेशी आजही जोडली गेली आहेत, याचं फार मोठं समाधान आहे.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (JITO) मध्येही आपण सक्रिय आहात. त्या कामाविषयी सांगा.
रसिकशेठ धारिवाल यांच्यामुळे मी जितोचा सदस्य झालो. मागील तीन वर्षांपासून मी जितोमध्ये कार्यरत आहे, तर गेली दोन वर्ष मी डायरेक्टर होतो. आता पुणे जिल्हा चॅप्टरचा सेक्रेटरी म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे.
जितो हे एक बिझनेस नेटवर्क आहे. 1500 कोटींच्या वर भांडवल असणारी, जैन समाजाने जैन समाजातील लोकांच्या हितासाठी चालवलेली अशी ही संस्था आहे. यात चारही सांप्रदायांना सामावून घेण्यात आलं आहे. जैन समाजातील अधिकाधिक मुलांना उच्च शिक्षित करणे, यु.पी.एस.इ., एम.पी.एस.इ., आय.पी.एस. करणार्या मुलांच्या अभ्यासाची व्यवस्था करणे, भारतभर भ्रमण करणार्या गुरुमहाराजांना मोफत औषधोपचार पुरवणे, परदेशात शिक्षण घेणार्या मुलांना कमी व्याजदरामध्ये किंवा बिगर व्याजाने पैसे देणे असे उपक्रम संस्थेतर्फे राबवण्यात येतात. शिवाय, महिलांसाठी, तरुणांसाठी वेगळं व्यासपीठ संस्थेने उभं केलेलं आहे. विशेषत्वाने जैन समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात देणार्या या संस्थेसाठी मी काम करतो आहे, ही खरोखरच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आपण केलेल्या कार्याची सर्व स्तरांवर वेळोवेळी दखल घेण्यात आली आहे. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांविषयी थोडक्यात सांगा.
स्व. विजयराव कापरे स्मृती समरसता सर्वोत्कृष्ट काव्यमैफील फिरता करंडक, कवी विचार मंच शेगाव सन्मानचिन्ह, सकाळ सन्मानपत्र, भव्य भीम फेस्टिवल - 2012 सन्मानचिन्ह, साई श्रद्धा ऑटो कन्सल्टंट पुणे यांच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त जैन भक्ती संगीत एवं नृत्य स्पर्धा 2013 साठी ‘जैन इंटरनॅशनल क्रिएटिव्ह ऑर्गनायझेशन पुणे’ म्हणून सत्कार, लॉकडाऊनच्या काळात सर्वोत्कृष्ट समर्पण कार्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे येरवडा भागासाठी पुरस्कार, रामोशी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य सन्मानपत्र, दादासाहेब फाळके गोल्डन इयर्स ऑफ असोसिएशन ऑफ फिल्म अँड व्हिडिओ एडिटर्सचा गेस्ट ऑफ ऑनर, अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव पश्चिम महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार, सेंट्रल महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे पुरस्कार, श्री बडी साजन ओसवाल युवक संघ सामाजिक संमेलन 2024मध्ये सामाजिक संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय उपस्थिती आणि संयोगासाठी सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान, कलाजथा स्मृतिचिन्ह अशा विविध पुरस्कारांनी माझा उत्साह नक्कीच वाढवला.
त्यापैकी 11 वे साहित्य संमेलन चांदूर बाजार गुळाचे स्व. बापूरावजी तुरखडे उदिम पुरस्कार हा माझ्यासाठी खूप खास आहे. विठ्ठल वाघ यांनी त्या स्मृतिचिन्हावर माझ्यासाठी लिहिलेले “.. आपण आपली चळवळ ग्रामीण भागात पेरलीत; ती उगवली, फळली, फुलली... ” हे शब्द माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहेत. तसंच महाराष्ट्रातल्या प्रवचनकारांचं एक संमेलन झालं, त्यात पवार साहेबांच्या हस्ते मला मिळालेला पुरस्कार, असे काही पुरस्कार माझ्या हृदयाच्या जवळचे आहेत. मुकत्यार पठाण नावाच्या भजन करणारी एक व्यक्ती होती. माझ्या कामाचं कौतुक वाटून त्यांनी मला एक विठ्ठलमूर्ती भेट दिली. ही त्यांची कृती माझ्यासाठी लाखमोलाचा पुरस्कारच ठरली आहे. माझ्या मनातल्या विठोबाला जणू त्यांनी माझ्या कार्यालयातच आणून बसवलं आहे.
उद्योग जगतात नव्याने येऊ पाहणार्या तरुणांसाठी काय संदेश द्याल?
माणसं जोडणं, जपणं हेच माझं जीवन आहे. कारण माझा व्यवसाय, माझं सामाजिक कार्य मानवी भावनांशी जोडलेलं आहे. मी शिवबांचा पाईक आहे. माझ्या कार्यालयात आणि केबिनमध्ये येताना सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विराजमान झालेली आहे. त्यांचे दर्शन घेऊनच रोज माझ्या कामाची सुरुवात होते.
माझ्या आजवरच्या अनुभवांतून मी तरुणांना एवढंच सांगू इच्छितो की, समाजाला आपण काही देणं लागतो, ते जाणीवपूर्वक दिलं पाहिजे. प्रत्येक कृती विश्वासानेच करायची आणि सचोटीच्या मार्गानेच पैसा कमवायचा, असं एकदा ठरवलं की मग आपल्या कामाचं क्षितिज आपोआपच विस्तारत जातं.