स्वरयोगिनी अश्विनीताई...

विवेक मराठी    14-Feb-2025
Total Views |
@डॉ. शुभदा कुलकर्णी
  
Dr. Ashwini Bhide Deshpande
डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायिकीत तान चपळ, गमकयुक्त, दाणेदार आणि सफाईदार असून रचनावैविध्यही असते. एकंदर सूक्ष्मता, वैचारिकता, अभिव्यक्ती यांचा मिलाफ त्यांच्या गायकीत बघायला मिळतो. अश्विनीताईंनी सर्व गानप्रकार गायले आहेत. मैफलींमधून आणि ध्वनिमुद्रणांमधूनही त्यांनी भरपूर व्यावसायिक यश कमावले आहे. अशा या स्वरयोगिनीला पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या गायिकीचा सन्मान केला आहे.
डॉ. अश्विनी भिडे देशपांडे या उच्चकोटीच्या गायिकेला नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. अर्थात त्यांना अशा सन्मानाची कधीच फिकीर नव्हती की अभिलाषाही! त्यांचा व्यासंग आणि गायकी हेच त्यांचे खरे धन. अर्थात पुरस्काराचा आनंद त्यांना झाला. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही झाली असणार!
 
डॉ. अश्विनी भिडे देशपांडे या मूळच्या बी.ए.आर.सी.मधील संशोधक शास्त्रज्ञ. पण (गायिका विदुषी माणिक भिडे या त्यांच्या मातोश्री असल्यामुळे) सतत कानावर पडणार्‍या संगीताची आवड वरचढ ठरली. सुरुवातीला त्या पं. नारायणराव दातार (सुप्रसिद्ध व्हायोलीनवादक डी. के. दातार यांचे वडील बंधू) यांजकडे शिकल्या. त्यानंतर गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद पदवी घेतली. ग्वाल्हेरच्या आय.टी.एम. विद्यापीठाकडून त्यांना सन्माननीय डी. लिट. मिळाली. त्यांच्या मातोश्री या गायिका विदुषी माणिक भिडे जयपूर अत्रौली घराण्याच्या( गानसरस्वती किशोरी आमोणकरांच्या शिष्या) होत्या. त्यामुळे त्यानंतर आईकडूनच पुढे त्या शिकल्या. त्याचबरोबर पं. रत्नाकर पै यांजकडूनही ते हयात असेपर्यंत, म्हणजे 2009 सालापर्यंत, त्यांनी शिक्षण घेतले.
 
डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनी देशविदेशात मैफली गाजवल्या आहेत. मी त्यांच्या भरपूर मैफली ऐकल्या आहेत. राग-बंदिशींची नोंद ठेवू शकले नाही. पण ध्वनिमुद्रणातला केदार- पायो पायो, चतर सुघर बलमा हे परत परत ऐकावे असेच आहे. एकदा हीच बंदिश थोडी संथ अशा मध्य लयीत त्या गायल्यात. त्याचा मजा काही औरच! तिलककामोद - सूर संगत, नंद - ढूंडू बारी सैंया, दृत एकताल - सैंया रे मान जाओ ना ( किशोरीताईंनी बांधलेली बंदिश.) झिंझोटी - महादेव, भूप - नट अशी त्यांची कितीतरी ध्वनिमुद्रणे आज उपलब्ध आहेत.
 
 
सुरुवातीला डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांंच्या आवाजावर, गायकीवर विदुषी किशोरीताईं आमोणकरांचा जबरदस्त प्रभाव जाणवतो. कारण त्यांच्या गुरू आई विदुषी माणिक भिडे किशोरीताईंकडेच शिकल्या होत्या. मग मात्र त्यांना आपला आतला आवाज सापडत गेला. त्यांचा आवाज अत्यंत स्वच्छ, सुरेल, मऊ पण दमदार आहे. रागालापात त्या सूक्ष्म स्वरस्थाने वापरतात, हे जयपूर गायकीला साजेसेच आहे. या आवाजात व्हॉइस मॉड्युलेशन्स मात्र नाहीत. बंदिश मात्र अत्यंत वेधकेने आणि चुस्ततेने मांडणे हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य आणि सौंदर्यही! अत्यंत सुरेल आणि मऊ मींड आहे या आवाजात. तसेच कणस्वरांचा वापर वेधक आहे. उदा. त्यांचा तिलककामोद राग ऐकून पाहावा.
 
 
या गायकीत आघात तसे कमीच आहेत. तालाच्या मात्रे- मात्रेचा-त्यातील अवकाशाचा विचार आलापीत आहे, त्यामुळे लयीचा अखंड झोल प्रतीत होतो. समेवर त्या आमद घेऊन येतात. बोलातून लयकारी करतात पण तीही विनाघात आणि डौलदार!
 
 
सा ग ध, ध नी ग, (गंधार कोमल) सारखी रचना भीमपलासमध्ये घेतात - त्यातून कल्पनाविलास दिसतो. तसेच उपज अंगामुळे उत्कंठा-विसर्जनही आहे या गायकीत.
 
 
त्या मध्यलयीला जरा जास्त लय ठेवतात, त्यामुळे बंदिशीतील जागा चांगल्या मांडता येतात. उदा - यासाठी भीमपलासमधील- जा जा रे अपने मंदिरवा ही त्यांनी गायलेली पारंपरिक बंदिश ऐकण्यासारखी आहे. तान चपळ, गमकयुक्त, दाणेदार आणि सफाईदार आहे, त्यात रचनावैविध्यही आहे. एकंदर सूक्ष्मता, वैचारिकता, अभिव्यक्ती यांचा मिलाफ आहे या गायकीत.
 
 
अश्विनीताईंनी सर्व गानप्रकार गायले आहेत. मैफलींमधून आणि ध्वनिमुद्रणांमधूनही त्यांनी भरपूर व्यावसायिक यश कमावले. माध्यमांचा योग्य वापर त्या करतात. त्यांची भरपूर ध्वनिमुद्रणे प्रसिद्ध झाली आहेत. गुरू म्हणून त्यांनी अनेक शिष्या तयार केल्या आहेत.
 
 
त्यांनी बंदिशींची, रागांची रचनाही केली आहे. पुस्तक-रागरचनांजली- भाग 1 आणि 2, मत्ततालाची पुनर्निर्मिती, त्यात बंदिशी आणि त्याचे सादरीकरण हेही एक वैशिष्ट्य.
 
 
त्यांच्यावरील समीक्षण लिखाण फारसे उपलब्ध झाले नाही.
 
'...Does she feel that marriage and babies and the whirpool of anxieties that go with grihasthaashram are a must for every woman, no matter how bright and promising?.." yes " she says without hesitation, " each of these experiences enrich you inspite of the added responsibilities they bring alongside. They add immensly to your life and perception shailajaa gangulee- Femina-feb 1988.
 
(कितीही बुद्धिमान, कर्तबगार स्त्री असली तरी लग्न, मातृत्त्व, संसार करणे, मग त्यातून येणारी काहीशी अस्वस्थता, अथवा व्यग्रता अत्यावश्यक ठरते का?- तत्पर उत्तर- हो. यातून येणारा प्रत्येक अनुभव अत्यंत मोलाचा आणि आपल्याला काहीतरी देणारा असतो, म्हणून हे सर्व अनुभव घेण्यास मी अत्यंत उत्सुक होते...‘) शैलजा गांगुली - फेमिना - उभरता तारा- फेब्रुवारी 1988.
पं. रविशंकर म्हणतात,
 
'Ashwini bhide deshpande is not only a music scholar, but also blessed with a beautiful voice...she has earned the reputation of being one of the top young artists of India...having learnt many old compositions, she has been able to retain the spirit of the tradition through the dialects she has used as well as pay attention to the subject matter!
(अश्विनी भिडे देशपांडे केवळ संगीतज्ञ नाहीयं, तर तिला अत्यंत सुंदर आवाज लाभलाय. आजच्या काळातली ती उच्च दर्जाची, प्रथम श्रेणीतली गायिका आहे. पारंपरिक बंदिशी शिकल्याने तिने पारंपरिक भाषा तर जतन केलीच, पण ते करताना बंदिशीच्या आशयाकडे दुर्लक्ष केले नाही.)
 
या लेखाच्या निमित्ताने मी घेतलेल्या त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतील विचार असे आहेत -
 
 
स्त्री-पुरुष गायकीत शैलीचे फरक आहेत, पण रागरागिणीनुसार! दरबारी कानडा, मल्हार या सारखे राग पुरुषकंठात बरे वाटतात.
 
 
मंद्र, खर्ज साधना, ही पुरुषांनी करायची गोष्ट आहे.
 
 
स्त्री-पुरुष प्रकृतिनुसारही गाण्यात वेगळेपणा येतो. खूप जास्त गमक स्त्रीकंठात शोभून दिसत नाही.
 
त्या सांगतात - मी परंपरेला फटकून काही केले नाही. बंडखोरी केली नाही. भावनिक, बौद्धिक संघर्षातून पार होताना संगीताकडे अल्टिमेट रिसॉर्ट म्हणून पाहिले. व्यवसायात तडजोडी कराव्या लागतात. उदा- मैफलीत ख्याल, ठुमरी, भजन असा क्रम बहुतेक वेळा ठेवावाच लागतो.
 
 
सूर, लय, अभिव्यक्ती सगळं महत्त्वाचं असतं. खरं म्हणजे मन आणि बुद्धी हे दोन इतके स्पष्ट वेगळे भाग नाहीतच, दोन्ही एकाच माणसात असतं ना?
 
 
राग उलगडण्याचे रस्ते बंदिशीत असतात. रागालाप धृपदात असतात, पण ख्यालात रूपकालाप असतात, म्हणून बंदिशीचा विचार गाण्यात येतोच.
 
 
त्यांनी मत्तताल पुन्हा प्रचारात आणला, त्यात बंदिशीही बांधल्या. जुन्या काळात, मोगुबाईंसारखे लोक विविध तालात गात होते, कालौघात ती परंपरा राहिली नाही. ठुमरीविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ठुमरीला रागाशी तत्त्वनिष्ठ असणे गरजेचे नाही, म्हणून फॉर्म म्हणून वेगळेपणा. डॉ. अनिता सेन यांजकडून त्या ठुमरी, दादरा, कजरी, चैती इत्यादी घाट शिकल्या आहेत. त्यातले काव्य त्यांना मोहक वाटते. त्या हे घाटही समरसून गातात. ठुमरी गाणे सोपे नव्हे. त्याला अगदी हलके होऊन जावे लागते. भावना उधळूनही संयम बाळगावा लागतो. विलायत हुसैन खाँ म्हणालेच होते की, जिसको ठुमरी नहीं आती उसको गाना नहीं आता. पण गाण्याच्या क्षेत्रात पुरुषी वर्चस्व नाही, असे त्यांना वाटते. (दिल्ली, कोलकत्यातून वेगळे मत मिळाले.)
 
 
एक महिला म्हणून त्या सांगतात की, माझे सर्व निर्णय मीच घेते. तुम्ही स्वत: आपल्या कामाबाबत गंभीर आणि झोकून देणार्‍या असाल तर कुटुंबातून पाठिंबा मिळतोच. लग्न झाल्यावर अनेक सबबी असतात, पण स्त्रीने स्वत: खंबीर असायला लागतं, इतरांना काय तुम्ही तुमच्या कार्यात मग्न होणं हवंच असतं असं नव्हे. पण स्त्रीने आपली कमिंटमेंट आपल्या कामातूनच दाखवावी. स्त्रीची कुतरओढ होते हे खरे आहे, पण त्यातूनच सामर्थ्य मिळते. आर्थिक, भावनिक किंवा निर्णयात्मक संदर्भात मी कोणावरच अवलंबून नाही. पुरुषप्रधान संस्कृतीत मी गाणे व्यवसाय म्हणून करणार हे स्त्रीला सहज म्हणता येते, अर्थात त्यापाठोपाठ जबाबदारी येतेच! आपल्या समाजात स्त्री वाग्गेयकार कमी आढळतात. कदाचित असतील आणि इतिहासाने दखल घेतली नसेल.
 
 
स्त्री श्रोत्यांची संख्या वाढविण्यात फार मोठी भूमिका माध्यमांनी बजावली. स्त्रीचे सांस्कृतिक पोषण होण्यात माध्यमांचा वाटा मोठा आहे, असे त्या म्हणतात.
 
माझ्या सर्व बौद्धिक, भावनिक गरजा संगीतातून पूर्ण होतात.
 
सामाजिक स्थान, मान, मैफिलीतून, माध्यमांतून प्रसिद्धी हे सगळे आवश्यक वाटते. मी एकटी घरी बसून स्वरांची आराधना करत बसले आहे असे बरे नाही वाटत.
 
विज्ञान-संशोधन क्षेत्रात यश मिळूनही मी गाणे निवडताना परत जायचा पर्याय ठेवला होता, असे त्या म्हणतात तेव्हा विचारांतील लवचीकता जाणवते. इंटरनेटवरील त्यांचे बतिया दौरावत मालिकेतील बंदिश की कहानी आणि राग की तस्वीर यांचे भाग ऐकण्यासारखे आहेत. मीराबाई व कबीर इत्यादींच्या संतरचनांनाही त्यांनी सुरात ओवले आहे. मात्र त्यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून सध्या ते थांबवले आहे. यावरूनही त्यांची वैचारिक प्रगल्भता समजून येते.
 
 
व्यावसायिक यशाबरोबर समाधानही मिळाले पाहिजे असे वाटत होते. हे इतक्या यशस्वी ’स्टार कलाकारने’ म्हणणे महत्त्वाचे आहे.
 
 
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाण्याच्या विचारातही फायदाच होतो. विचारांना वस्तुनिष्ठता येते, विचार एकांगी होत नाहीत. कला आणि शास्त्र याचा संगम साधायला सोपे जाते. एकंदर समजूत, ग्रहणक्षमता यात फरक पडतो. या सगळ्यामुळे असेल त्यांच्या गायकीत रचनेचा विचार प्रबळ दिसतो.
 
 
जयपूर घराण्यात गायिका अधिक का? यावर त्या म्हणाल्या-जयपूरमध्ये योगायोगाने स्त्रीकलाकार जास्त असतील किंवा एकंदर सूक्ष्मता, समर्पण हे स्त्रीमध्ये जास्त असू शकेल.
 
 
या स्वरयोगिनीला माझे मनापासून वंदन आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आगामी आयुष्यात असेच सन्मान त्यांच्या वाट्याला येत राहोत, हीच इच्छा.
 
shubh.sangeet@gmail.com