@सतीश भोसले- 9762064141
मिरची हे महत्त्वाचे मसाले पीक. उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी बांधव उन्हाळी मिरचीची लागवड करतात. मिरची लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग - कीड नियंत्रण इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
मिरची ही महत्त्वाचे मसाले पीक आहे. भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडू राज्यांत मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भारतीय मिरची तिखटपणासाठी जगात प्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून अमेरिका, नेपाळ, कॅनडा आदी देशांत भारतीय मिरची निर्यात केली जाते. मिरची संदर्भात नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन केंद्र, तेलंगणातील गुंटूर येथील मिरची संशोधन केंद्र आणि तामिळनाडूतील कोविलपट्टी येथे मिरची संशोधन केंद्र कार्यरत आहे. महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, धाराशिव, नांदेड आदी जिल्ह्यांत मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नागपूरच्या भिवापूर मिरचीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. नंदुरबारची बाजारपेठ मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. मिरची हे पीक पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तीनही हंगामात घेता येते. उन्हाळ्यात मिरचीला हमखास दर मिळत असतो. त्यामुळे शेतकर्यांचा कल मिरचीकडे असतो. मिरचीचा वाण निवडतांना प्रामुख्याने चांगले उत्पादन, उत्तम गुणवत्ता, चांगला आकार व लांबी, गर्द हिरवा किंवा फिकट हिरवा रंग, लाल मिरचीसाठी गर्द लाल रंग, रोग व किडीस प्रतिकारक्षम, तिखटपणा व चांगला बाजारभाव आदी महत्त्वाच्या बाबींचा विचार करुन शेतकरी बंधूंनी योग्य त्या वाणांची निवड करणे गरजेचे आहे.
उष्ण आणि दमट हवामानात पिकाची वाढ चांगली होते. मध्यम व दमट हवामानात मिरची पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले होते. उन्हाळी हंगामात 35 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.
जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणार्या जमिनीत पीक उत्तम येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय किंवा जैविक खते वापरल्यास पीक चांगले येते. उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी. चुनखडीयुक्त जमिनीतही पीक उत्तम येते.
हंगाम
उन्हाळी लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात पूर्ण करावी. बदलत्या हवामान परिस्थितीमुळे एप्रिल ते मे महिन्यातही मिरचीची लागवड केली जाते.
जाती
मिरची पिकामध्ये विविध नवनवीन वाण विकसित केले आहेत. यामध्ये पुसा ज्वाला, पंत सी- 1, संकेश्वरी 32, जी-2, जी-3, जी-4, जी-5, मुसाळवाडी, पुसा सदाबहार, कॅलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल, फुले ज्योती, कोकण क्रांती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी, एनपी- 46 या जाती लागवडीसाठी उपयुक्त आहेत.लागवडीसाठी हेक्टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.
रोपांची लागवड व अंतर
रोपवाटिका मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या जोमदार रोपावर अवलंबून असते. रोप तयार करण्यासाठी 3 x 2 मी. लांबीरुंदीचे आणि 20 से.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. बुटक्या वाणाची लागवड 60 x 45 से.मी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवा. प्रत्येक गादी वाफ्यावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो नत्रयुक्त खत मिसळावे. उगवण झाल्यावर 5 ते 6 दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.
खते आणि पाणी व्यवस्थापन
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी 20 ते 25 टन चांगले कुजलेले खत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावे. शिवाय कोरडवाहूसाठी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि ओलितासाठी हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. रोप लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाशची पूर्ण आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेच पाणी देणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन सुलभ असते.
याशिवाय मिरचीतील तण काढणे, खत देणे आणि मुळांभोवती माती चांगली करणे आवश्यक आहे. प्रारंभीला दर 15 दिवसांनी तण काढणे आवश्यक असते.
रोग व कीड नियंत्रण
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मावा आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. फुलकिडीचे पिले आणि प्रौढ पानाच्या व वरच्या बाजूस राहतात. ही किड पाने खरबडून त्यातून बाहेर नेणारा रस शोषून घेतात. त्यामुळे या कीडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकर्यांनी योग्य कीटकनाशक फवारणी करावी.
काढणी
साधारणतः लागवडीच्या 55 ते 65 दिवसांनंतर काढणी सुरू करता येते आणि पुढे 3 ते 4 महिने तोडे सुरू राहतात. हिरव्या मिरचीचे सरासरी 120 ते 180 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते तर वाळलेल्या मिरचीचे 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. या सर्व गोष्टींचा विचार केला असता शेतकरी बांधवांनी आपापल्या भागामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान मिरचीसाठी पोषक आहे याचा विचार करून वाण निवडावे. याशिवाय कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचा जास्तीत जास्त विचार करावा.