अनुदिनी अनुतापे या करुणाष्टकातील मागील श्लोक क्रमांक 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या मनात अचल भजनभक्तीची आकांक्षा उत्पन्न झाली, पण त्या मार्गातील अडचणी आता समोर येत आहेत. भजनमार्गातील ते अडथळे भक्ताने या श्लोकात मांडले आहेत.
चपळमन मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना।
घडिंघडिं विघडे हा निश्चयो अंतरींचा।
म्हणवुनि करुणा हे बोलतों दिन वाचा ॥ 9॥
- (मनाचे चांचल्य मोडून काढून मन शांत करायचे ठरवले, पण ते काही जमत नाही. माझ्या भोवतालच्या स्वजनांच्या, नातलगांच्या मायापाशात मी बांधला गेलो आहे, हे बंधन तोडू म्हटले तरी तुटत नाही, (रामा, तुझ्या शाश्वत चिंतनात राहाण्याचा मी निश्चय करतो, पण) मनातील निश्चय क्षणाक्षणाला सुटून जातो, त्यामुळे मी नम्रपणे तुझी करुणा भाकत आहे. )
भक्ताने यापूर्वीच्या श्लोकातून प्रांजळपणे कबूल केले आहे की, मी या अशाश्वत व्यावहारिक जगात, तेथील आचारविचारांत, प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते व्यर्थ गेले. माझ्यातील अहंकारामुळे आणि देहबुद्धीमुळे मी सुखाऐवजी दुःख अनुभवत राहिलो. सुखाच्या आशेपायी मी अहंभावाचे देहबुद्धीचे अनुभव घेत प्रापंचिक दु:खाचे ओझे सतत शिरावर वाहात आलो. या सर्व धामधुमीत मी शाश्वत अशा रामाला विसरलो आणि त्याच्या भक्तिप्रेमाच्या सुखाला, समाधानाला घालवून बसलो. सतत अशाश्वत वासनातृप्तीचा विचार करणारे माझे चंचल मन बुद्धीतील रामभक्तीचा निश्चय टिकू देत नाही, तेव्हा हे रामा, बुद्धीतील निश्चय डळमळीत न व्हावा आणि तुझे भजन सहज लीलेने व्हावे असे काहीतरी कर... अशा स्वरूपाची विनवणी रामाला केली खरी, पण जेव्हा मी वेगळेपणाने माझ्या मनाकडे आणि भोवतालच्या ऐहिक परिस्थितीकडे, त्यातील आकर्षणांकडे बघतो तेव्हा मला जाणवते की, माझ्या मनाचे चांचल्य कायम आहे. ते काही कमी होत नाही. माझी इंद्रिये सदोदित विषयाचे चिंतन करीत आहेत. इंद्रियांना विषयसुखात गोडी वाटते. चंचल मन या इंद्रियांना आवरु शकत नाही, ज्ञानेश्वर माऊलींनी या इंद्रियांचा स्वभाव पुढील ओवीत यथार्थपणे सांगितला आहे.
या विषयावाचून काही। आणीक सर्वथा रम्य नाही।
ऐसा स्वभावाचि पाही । इंद्रियांचा ॥ (ज्ञानेश्वरी)
विषयसुख हा इंद्रियांचा मूळ स्वभाव असल्याने त्यांना आवरणे हे मनाचे काम आहे, पण मनाच्या चंचलपणामुळे ते शक्य होत नाही. मनाचे चपळपण मोडावे म्हटले तरी मोडता येत नाही. तसेच जन्मापासून ज्या नातेवाईकांच्या, कुटुंबाच्या, आजुबाजूच्या लोकांच्या, स्वजनांच्या सहवासात मी आयुष्य घालवले, त्यांच्या आठवणी पुसून टाकता येत नाहीत. त्या आठवणी, माझ्या मनातून जात नाही. माझ्या सुहृदांच्या मायेत मी गुंतलो आहे, त्यांना कसे सोडून द्यावे, हे मला कळत नाही. मी या देहाने त्यांना सोडून दुसरीकडे गेलो तरी त्यांची माया, त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालवलेला काळ, हे सारे कसे तोडून टाकू मला समजत नाही. ते सारे तुटता तुटत नाही. म्हणून स्वामी म्हणतात की, ’सकळ स्वजनमाया तोडिता तोडवेना.’ वरील सर्व कारणांनी, म्हणजे मनाचे चांचल्य, स्वजनांचा विरह, त्यांची माया यामुळे शाश्वत अशा रामाच्या भक्तीचा मनांत केलेला निश्चय दृढ होत नाही. तो निश्चय क्षणाक्षणाला मोडून पडतो आहे. काय करावे ते सुचत नाही. तुला मी शरण आलो आहे. त्यामुळे हा शरणागत भक्त अतिशय नम्रतेने तुला करुणा भाकत आहे.
रामभेटीची ही तळमळ ज्या शब्दांत समर्थांनी मांडली आहे, ती पाहता ते दुसर्या कोणाचे मनोगत सांगत नसून स्वतःचा अनुभव भावपूर्ण शब्दात आर्ततेने सांगत आहेत असे वाटावे. इतके ते भावकाव्य आत्मनिष्ठ आहे. समर्थांनी पुष्कळ वाङ्मय निर्मिती केली. दासबोध, रामायणाची दोन कांडे या शिवाय अनेक स्फुट रचना त्यांच्या नावावर आहेत. हे सारे ग्रंथरूपी व स्फुट वाङ्मय प्रासादिक व प्रभावी आहे यात शंका नाही. त्यापैकी बरेचसे वाङ्मय वस्तुनिष्ठ व वैचारिक, तात्त्विक स्वरूपाचे आहे. तथापि त्याच्या तुलनेत करुणाष्टकांची रचना हा आत्मनिष्ठ काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. अनुताप, उत्कंठा, तळमळ, उत्कटता इत्यादी विविध भावाविष्कारामुळे आत्मनिष्ठ काव्यात करुणाष्टकांना वरचे स्थान आहे. करुणाष्टकातील काही स्तोत्रेे, स्वामींनी गोदातिरी अनुष्ठान केले त्यावेळची असावीत असे समर्थअभ्यासक कै. ल. रा. पांगारकर यांचे मत आहे. त्या मताच्या आधारे ‘अनुदिनी अनुतापे’ या करुणाष्टकातील हा पाचवा श्लोक स्वामींनी साधकदशेत नाशिक मुक्कामी लिहिला असावा, असे अनुमान करण्यास जागा आहे. कारण नाशिकला येण्यापूर्वीचा समर्थचरित्राचा भाग हे सांगतो.
इसवी सन 1619-20 च्या दरम्यान, जांब गावांहून आपल्याच लग्नमंडपातून रामोपासनेच्या उद्देशाने, भक्तीच्या ओढीने पळालेला बारा वर्षांचा नारायण (पुढील काळातील संत रामदास) पुरश्चरणासाठी नाशिकला येऊन रामसान्निध्यात राहिला. रोज ब्राह्ममुहुर्तावर उठून गायत्री पुरश्चरण, रामनामाचा जप, दुपारी परमार्थ ग्रंथाचे अध्ययन, सायंकाळी विद्वान पंडितांची भाषणे ऐकणे असा कार्यक्रम असला तरी त्यांना जांब गावाच्या, घराच्या, स्वजनांच्या, मित्रांच्या आठवणी येत असणार. नारायणाच्या बालवयाचा विचार करता अशा आठवणी येणे स्वाभाविक म्हणता येईल. भगवान रामाच्या साक्षात्काराची ओढ आणि स्वजनांपासून दूर राहाण्याचे दुःख या संघर्षातून उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना त्यातून मार्ग कसा काढावा हे समजत नव्हते. स्वामींनी प्रांजळपणे कबूल केले आहे की, मनाचे चपळपण मोडता येत नाही, स्वजनमाया तोडू म्हटले तरी तोडता येत नाही, आणि रामाच्या साक्षात्काराला अजून किती तपस्या करावी लागेल याचा अंदाज नसल्याने क्षणाक्षणाला आपला निश्चय विस्कटून जातो. तेव्हा रामाला शरण जाऊन त्याची करुणा भाकणे या शिवाय दुसरा मार्ग नाही. कितीही अडचणी समोर येवोत, आपला राम त्यातून सांभाळून नेईल या विश्वासाने नारायणाने नाशिक गाठले होते.
हृदयात लागलेली ही आग आजची नाही तर ती माझ्या पूर्वजन्मींच्या कोट्यावधी वर्षांची जुनी आहे, असे सांगून समर्थ त्यावरील उपाययोजना या पुढील श्लोकात स्पष्ट करणार आहेत. तो पुढील लेखाचा विषय आहे.