कृतार्थतेचा महाकुंभ - एक अनुभव!

29 Jan 2025 12:07:53
@अभय गोरे 
 

prayagraj kumbh mela 
महाकुंभदरम्यान प्रयागराज इथे मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेली चेंगराचेंगरी आणि त्यात काही भाविकांचे झालेले मृत्यू, ही दुर्दैवी घटना आहे. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला त्याचे दुःखच आहे. हे गालबोट लागायला नको होते. मात्र उत्तर प्रदेशमधील शासन-प्रशासनाने अतिशय शीघ्र गतीने परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. जखमींवर तातडीने योग्य ते उपचार सुरू केले. बहुतांश मृत भाविकांची ओळख पटवून ते त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले आणि त्याच वेळी महाकुंभही व्यवस्थित सुरू राहील याकडे लक्ष दिले. हेदेखील दखलपात्रच. महाकुंभला जाऊन आलेले सर्वसामान्य श्रद्धाळूही तेथील व्यवस्थेविषयी आणि जपलेल्या आस्थेविषयी आवर्जून नमूद करतात, ते या अनुभवांमुळेच. जबलपूरनिवासी अभय गोरे पंधरवड्यापूर्वी प्रयागराजला जाऊन आले. त्यांच्या नजरेतून महाकुंभ पाहू या या लेखात...
आमच्या सर्व आस्था, आमचे आचार-विचार, आमचा धर्म आणि आमचे अध्यात्म सर्व काही मोक्षाशी निगडित असते. म्हणून समर्थ म्हणतात-
 
आधी ते करावे कर्म,
 
कर्म मार्गे उपासना,
 
उपासका सापडे ज्ञान,
 
ज्ञाने मोक्षचि पावणे!
 
 
आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये मरणोत्तर स्वर्गप्राप्तीपेक्षा, मोक्षाची संकल्पना अधिक प्रगल्भ आहे. माउली श्री संत ज्ञानेश्वर महाराजकृत हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात ते म्हणतात, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥’. या चार मुक्ती आहेत- समीपता, सरूपता, सलोकता आणि सायुज्यता. हरिपाठ सांगतो की, व्यक्ती देवाचिये द्वारी क्षणभर उभा राहिला तर चारी मुक्ती मिळतात. त्याचप्रमाणे महाकुंभाच्या पावन पर्वावर प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात ‘हर हर गंगे’ म्हणत एका क्षणाची एक डुबकी मारली की सायुज्यमुक्ती मिळते, असा शास्त्रसंकेत आहे आणि तसा अनुभव येतोही, कारण त्या क्षणी मनात कोणतीही वासना किंवा विकल्प नसतात. व्यष्टी ते समष्टीच्या मीलनाचा अमृतानुभव महाकुंभात घेतला जाऊ शकतो.
 
एका पहाटे मामेभावाचा फोन येतो काय- ’बडे’ चल रहे हो क्या? कुंभ मे! ही आमची मध्य प्रदेशातली प्रेमाची भाषा. क्षणभर विचार केला आणि हो म्हटलं. जबलपुराहून जनता एक्स्प्रेसचेआरक्षण शोधले, ते मिळालेसुद्धा. ‘जनी जाणिजे योग’ हा सुकृताचा असा अनुभव आला. थंडी खूप असल्यामुळे कानटोपी आणि स्वेटर जवळ ठेवले आणि निघालो. प्रयागराज छिवकी या स्थानकावर उतरलो. तिथून आमचा तंबू सेक्टर 18 मध्ये महाकुंभ लोगोद्वारा जवळ होता. ई-रिक्षा बुक केली. प्रचंड गर्दी होतीच. रिक्षावाल्याने 800 रुपये आकारले, आनंदाने दिले. महाकुंभाला जाण्याचा आनंद उतू जात होता, खिशाकडे बघण्याची गरज भासत नव्हती किंबहुना ठरवलेच होते की, सढळ हाताने खर्च करायचा.
 

prayagraj kumbh mela 
नाग वासुकी मंदिर, ओल्ड जीटी रोडमार्गे गंतव्य स्थळी पोहोचलो. आमची कुंभसिटी सेक्टर 18 येथील एका निम्बार्काचार्य कुटीमध्ये व्यवस्था केली होती. व्यवस्थेअंतर्गत अंथरूण-पांघरूण, चहा-नाश्ता-भोजन, स्नानादी-शौचाची कमोडसह गोष्टी समाविष्ट होत्या. विशेष म्हणजे तिथेच भागवतकथा आणि हठयोगावर प्रवचन याचीही व्यवस्था होती आणि एक किलोमीटर अंतरावर गंगास्नानाचीही व्यवस्था होती. रात्री विश्राम केल्यानंतर दुसर्‍या दिवशी भटकंती प्रारंभ झाली. त्यादरम्यान आढळले की, इथे प्रत्येकाचा व्यवहार आत्मीय आहे. सर्वत्र सकारात्मक ऊर्जा व्यापली असून उत्साहाला उधाण आलेलं आहे. विशेषत: गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या चेहर्‍यावर हास्य व कृतज्ञतेचा भाव आहे. प्रशासन व्यवस्था तंदुरुस्त, चोख आणि दक्ष तरीसुद्धा संवेदनशील आहे.
 
वातावरणात गारवा, सगळीकडे आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे! हे पाहू की ते पाहू! अशी स्थिती होत होती. तरीपण फिरण्याची मर्यादा असतेच ना! संपूर्ण टेन्ट-सिटी कुंभमेळा क्षेत्राला 10 झोन, 25 सेक्टर, 56 पोलीस ठाणे आणि 155 पोलीस चौकीमध्येे विभाजित केले गेले आहे. रस्ते रुंद आहेत, कोणतेही वाहन जमिनीत धसू नये म्हणून धातूच्या पट्ट्या टाकलेल्या होत्या. कुठेही घाण किंवा उघडी सांडपाणी व्यवस्था नव्हती. एकंदरीत सर्व व्यवस्था वाखाणण्याजोगी होती.
 

prayagraj kumbh mela 
 
येण्याजाण्यासाठी विशिष्ट स्थानापर्यंत ई-रिक्षा आणि ऑटो रिक्षा माफक दरात उपलब्ध होते. आम्ही संगमस्नानासाठी ऑटो केली आणि पक्का घाटला पोहोचलो. तिथून गर्दीच्या लोंढ्यातून मार्ग काढून एक-दीड किलोमीटर पायी चालत नौकाक्षेत्री पोहोचलो. प्रचंड धुके असल्यामुळे काहीही दिसत नव्हते, तरीही नावाड्यांनी नावा टाकल्या व आम्ही निघालो. समुद्रासारखे गंगेचे विशाल पात्र दिसत होते. अर्ध्या तासात त्रिवेणी संगमात निर्माण केलेल्या माचीवर पोहोचलो. तिथेच संगमात स्नान केले व कृतार्थ झालो. ते वर्णन शब्दातीत आहे. माचीवर स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केलेली आहे. तिथेच आपल्या सांसारिक मनोकामना पूर्ण करण्याच्या संकल्पपूर्तीसाठी उपाध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. त्यासाठी तीन नारळ त्रिवेणीत समर्पित करावे लागतात. दक्षिणा पंधराशे रुपये आकारली गेली.
 

prayagraj kumbh mela 
 
जिवंतपणीचस्वतःचे श्राद्ध करण्याची व्यवस्थासुद्धा आहेच. परमपूज्य गोळवलकर गुरुजींच्या नावाचासुद्धा पेंडॉल लागला आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, त्याचप्रमाणे महाकुंभात गेल्याशिवाय आणि डुबकी मारल्याशिवाय आनंद कळणार नाही! त्यामुळे मनात किंतुपरंतु न ठेवता महाकुंभात अवश्य जा! त्रिवेणी संगमात डुबकी मारा, कारण उपनिषदे सांगतात, जीवन हे आनंदातून निर्माण झाले असून आनंदातच निर्वाण होण्यासाठी आहे. आनंद उपभोगण्यासाठी लौकिक आणि पारलौकिक जीवनाची सांगड आवश्यक असते. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ महाकुंभातील प्रवचनांचे सार आहे. ‘ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते’ हा शांती मंत्र कुंभक्षेत्री गुंजायमान होत होता. हा देश ऋषींची, आचार्यांची आणि संतांची भूमी आहे. ऋषी-मुनींनी या देशाला समृद्ध केले असून, वसुधैव कुटुम्बकम्चा भाव आमच्या देशाचा धर्म आणि हिंदुत्व हीच येथील जीवनसंस्कृती याचा अनुभव महाकुंभासारख्या आयोजनात होतो. महाकुंभाशी निगडित पौराणिक कथेनुसार देव-दानवांमध्ये समुद्रमंथन झाले, त्यातून धन्वंतरी अमृताचा कुंभ घेऊन प्रगटले. अमृतप्राप्तीसाठी देव-दानवांच्या झटापटीत अमृतकुंभातून जे काही अमृताचे थेंब ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे महाकुंभ भरवला जातो. ती स्थाने आहेत प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. प्रयागराज येथील महाकुंभात प्रत्येक सेक्टरमध्ये विभिन्न पंथ आणि संप्रदायाचे पीठ निर्माण करण्यात आलेले आहे. अवधेशानंद गिरी महाराजांचे पीठ अतिशय भव्य आणि रम्य आहे, तिथे वेदांच्या ऋचा म्हटल्या जात आहेत. जुना आखाडा एक दर्शनीय भाग आहे. इथे नागा साधूंचे वास्तव्य असून ते नागा साधू प्रेमळ आणि सर्वसंगपरित्याग केलेले आहेत. श्री दत्तात्रय भगवंताचे अवधूत्व सांगणारे दशनामी आखाडे अलौकिक तत्त्वज्ञान मांडणारे होते. इस्कॉनचे महाप्रसादम आणि प्रसाद व्यवस्था आहे. पंचाग्नी साधन करणारे साधू आहेत. अर्जीवाले हनुमानजी आहेत. इथे असे वाटते की, विश्वच सामावलेले आहे,
 
prayagraj kumbh mela
 
रोषणाई तर अद्भुत आहे. प्रत्येक झांकी सुंदर विद्युतप्रकाशाने खुलून दिसते. रात्रीसुद्धा सहस्रसूर्याचा प्रकाश असतो. इथे मोठमोठे श्रीमंतच नाही, तर गोरगरिबांच्या चेहर्‍यावरसुद्धा हास्य दिसते आहे. आजूबाजूच्या गावांतून रामायण आणि महाभारताचे प्रसंग सादर करण्यासाठी लहान लहान मुलं-मुली आलेले आहेत. त्यांची तेथील बोली भाषेतील नृत्यनाट्य, काव्यशैली आणि प्रस्तुती शैली मनमोहक आहे.
 
 
शैव, वैष्णव, उदासीन, नागा, नाथपंथी, परी आणि किन्नर यांचे स्वतंत्र आखाडे आहेत. त्यामध्ये तंत्र, मंत्र, झाड-फुक, ताबीज, अंगारे-धुपारे, गंडे-दोरे, कथा, कीर्तन आणि प्रवचन सर्व काही दिसते. सर्वधर्मसमतेचा साक्षात्कार होतो. नशामुक्ती केंद्रे आहेत. अष्टांग योगाची शिबिरे लागलेली आहेत. ऐहिक गरजांच्या पूर्तीपासून मोक्षकामनेपर्यंत सर्वांच्या इच्छा तिथे पूर्णत्व पावतील, या आशेने सर्व आलेले आहेत. प्रचंड आर्थिक उलाढाल होत आहे. उदरनिर्वाहासाठी धन कमावण्याच्या इच्छेने अनेक लोक आलेले आहेत. त्यात डोंबार्‍याचा खेळ आहे, सर्पाची माळा घातलेले साधू आहेत. म्हणतात ना, ‘धर्म अर्थ काम मोक्ष अर्थाविना सारे व्यर्थ. धर्मस्य मूलं अर्थः’ हे सूत्र इथे लागू पडते.
 

prayagraj kumbh mela 
 
प्रचंड पैसा उभारला जाऊन देशाचे विदेशी मुद्राभंडार समृद्ध होणार आहे. कुंभस्थळी आठ कोटी रुपयांच्या फक्त पाण्याच्या बाटल्या विकल्या जातील असे अनुमान आहे. सर्व काही अद्भुत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. त्यातून विराट हिंदू राष्ट्राचे दर्शन घडत आहे. लेखणीला विराम देताना सांगावेसे वाटते की, 144 वर्षांनी येणार्‍या या महाकुंभात मोदीजी आणि योगीजी यांची जोडी दुग्धशर्करायोगाचे कार्य करीत आहे. त्यामुळे म्हणावेसे वाटते की, ‘विक्रम वैराग्य एक जागी नांदतीे...धर्म राजकारण समवेत चालती... ’ इतिश्री.
 
Powered By Sangraha 9.0