बडगामची लढाई

20 Jan 2025 12:29:07
 @मल्हार कृष्ण गोखले
 
The Battle of Budgam
 
कथासरित्सागर हा प्राचीन हिंदू साहित्यातील एक नामवंत ग्रंथ आहे. इसवी सनाच्या 11 व्या शतकात सोमदेव या कवीने त्याची रचना केली. कौशांबी नगरीचा प्रख्यात राजा उदयन आणि त्याचा मुलगा नरवाहनदत्त यांच्या व्यक्तिरेखा मध्यवर्ती कल्पून सोमदेवाने असंख्य कथांचे एक भांडारच वाचकांसमोर खुले केले आहे. प्रस्तुत सदरातून आपण स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या रणांगणातल्या मर्दुमकीच्या, शौर्याच्या व पराक्रमाच्या उमदेपणाच्या कथा उलगडणार आहोत. युुद्धांच्या कथा म्हटल्या तरी त्यात राजकीय आणि सामाजिक घटना येणारच आहेत. कारण सैन्य समाजातूनच उभे रहातेे आणि राजकीय नेत्यांच्या चांगल्या-वाईट, योग्य-अयोग्य निर्णयांचे परिणाम समाजावर, सैन्यावर आणि पर्यायाने संपूर्ण देशाच्या भवितव्यावर होत असतात. योगायोग असा आहे की, कथासरित्सागराचा कर्ता सोमदेव हा काश्मिरी पंडित होता आणि स्वतंत्र भारताच्या समरांगण कथेची सुरुवातही काश्मीरपासूनच होते. स्वतंत्र भारताच्या पराक्रमी सैनिकांनी ही पहिली शौर्यगाथा आपल्या रक्ताने लिहिली आहे. काश्मीरच्या भूमीवर रणचंडीला आपल्या गरम रक्ताचा नैवेद्य दाखवणारे पहिले भारतीय वीर होते लेफ्टनंट कर्नल रणजीत राय आणि मेजर सोमनाथ शर्मा.
 चला तर जाणून घेऊ या, या पहिल्या शौर्यगाथेतले नायक, खलनायक आणि पडद्यामागचे सूत्रधार -
 
दिनांक 24 ऑक्टोबर 1947 ची संध्याकाळ. श्रीनगरमधला महाराज हरिसिंग यांचा दरबार पूर्ण भरला होता. या दिवशी विजयादशमी होती. महाराज सश्रद्ध हिंदू अधिपती होते. त्यांनी प्रथम राणीसाहेबांसह देवी शारदेची पूजा केली. ’नमस्ते शारदे देवी, काश्मिरपुरवासिनी’ हे शारदास्तोत्र उच्च स्वरात गायिले गेले. मग महाराज बोलू लागले, “गेली 100 वर्षे आम्ही इंग्रजांचे मांडलिक होतो. पण आता आमचे काश्मीर हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे. पंडित नेहरूंना वाटते की आम्ही भारतात सामील व्हावे, तर बॅरिस्टर जीनांना वाटते की, आम्ही पाकिस्तानात सामील व्हावे. पण आम्ही या दोघांनाही सांगू इच्छितो की, आम्ही स्वतःच एक देश आहोत -“...याच क्षणी वीज गेली. संपूर्ण दरबार सभागृह अंधारात बुडाले. फक्त देवी शारदेसमोरची निरांजने तेवत होती. तेवढ्यात पंतप्रधान मेहेरचंद महाजन पेट्रोमॅक्सची बत्ती घेतलेल्या सेवकासह महाराजांजवळ आले. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता.
 
 
“महाराज...“ आवंढा गिळत तेे म्हणाले, “महाराज, 22 ऑक्टोबरला पठाणी टोळीवाल्यांनी आपल्या राज्यावर आक्रमण केलं आहे. आपल्या संस्थानी सैन्यातल्या मुसलमान सैनिकांनी आपल्या हिंदू सहकार्‍यांना आणि अधिकार्‍यांना गोळ्या घातल्या आहेत व सर्व शस्त्रसामग्रीसह ते या पठाणांना सामील झाले आहेत. आज 24 ऑक्टोबरला बंडखोरांनी संपूर्ण बारामुल्ला शहर लुटून जाळून टाकले आहे. आता या क्षणी यांनी माहूरा वीज उत्पादन केंद्र ताब्यात घेतलं आहे. आणि.... आणि वीज तोडून टाकली आहे. आता थेट श्रीनगर गाठण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नाही.”
 
 
अशा तर्‍हेने काश्मीरचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व घोषित करणारा महाराजा हरिसिंगांचा विजयादशमीचा दरबार परकीय आक्रमणाच्या थरकाप उडवणार्‍या बातमीने संपला. काश्मीरचे संस्थानी सैन्य पठाणांना रोखू शकत नाही, हे महाराजांना कळून चुकले. आता त्यांना भारतात सामील होण्यावाचून गत्यंतरच उरले नाही. दुःखी मनाने 26 ऑक्टोबरला महाराजांनी सामीलनाम्यावर सही केली.
 
 
आता काश्मीर संस्थान त्यांच्या अधिपतीने अधिकृतपणे भारतात विलीन केले. म्हणजे आता काश्मीरचा भूप्रदेश हा स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचा भूप्रदेश झाला, त्याचे कोणत्याही आक्रमणापासून संरक्षण करणे, हे आता भारताच्या सत्ताधार्‍यांचे कर्तव्य ठरले.
 
 
म्हणजेच आता तातडीने काश्मीरमध्ये सैन्य उतरवायला हवे. पण सैन्य हाताशी होते कुठे? फाळणीमुळे सैन्याचे संघटन पार विस्कळित होऊन गेले होते. ’161 इन्फन्ट्री ब्रिगेड’ ही सैन्यतुकडी त्यातल्यात्यात दिल्लीपासून जवळ होती. पण ती सुद्धा एकसंघ नव्हती, तिच्या बटालियन्स सर्वत्र विखुरल्या होत्या. तरी तातडीने ’1 सिख’ ही बटालियन जमेल तशी सज्ज करण्यात आली. तिचे प्रमुख होते लेफ्टनंट कर्नल रणजीत राय.
 
 
एका ब्रिगेडमध्ये सुमारे 3 हजार सैनिक असतात. एका बटालियनमध्ये सुमारे 1 हजार सैनिक असतात, म्हणजेच 3 बटालियन्सची एक ब्रिगेड बनते. ’161 इन्फन्ट्री ब्रिगेड’ ची ’1 सिख’ ही बटालियन सज्ज झाली खरी. पण तिला काश्मीरमध्ये न्यायला भारतीय वायुदलाकडे योग्य नि पुरेशी विमाने होती कुठे?
 
The Battle of Budgam 
 
भारतीय सैनिक अशा अडचणींना थोडाच घाबरणार? डाकोटा या मालवहातूक करणार्‍या विमानात ’1 सिख’ च्या जवानांना चढवण्यात आले नि 27 ऑक्टोबर 1947 च्या सकाळी ठीक साडेनऊ वाजता ते विमान श्रीनगरच्या विमानतळावर उतरलेे. या सैनिकांनी सर्वप्रथम विमानतळाच्या सभोवार पक्के मोर्चे उभारून विमानतळ सुरक्षित केला.
 
 
मग एका पाठोपाठ एक विमानांची उड्डाणे होऊ लागली. ’1 सिख’ ची संपूर्ण बटालियन क्रमाक्रमाने श्रीनगरमध्ये उतरली. परत जाताना हे बहाद्दर वैमानिक श्रीनगरमधल्या बायका-मुले-वयोवृद्ध माणसे यांना सुरक्षितपणे दिल्लीकडे घेऊन जात होते.
 
 
27 ऑक्टोबरच्या सकाळी श्रीनगरमध्ये पहिले विमान उतरवणार्‍या भारतीय वैमानिकाचे नाव होते विंग कमांडर के. एल. भाटिया. याच्या विमानातून लेफ्टनंट कर्नल रणजीत राय यांच्यासह ’1 सिख’चे 17 जवान उतरले. यानंतर जी अनेक उड्डाणे झाली यात बिजयानंद पटनाईक हे ही एक वैमानिक होते. ते पुढे बिजू पटनाईक या नावाने ओडिशाचे मुख्यमंत्री बनले.
 
 
ले. कर्नल राय यांनी श्रीनगर शहराचा बंदोबस्त केला. काश्मीर राज्याच्या जेवढ्या सरकारी गाड्या उपलब्ध झाल्या, तेवढ्या घेऊन ते बारामुल्लाच्या रोखाने पुढे निघाले. शत्रूला श्रीनगरपासून शक्य तितके दूरच रोखायचे होते. श्रीनगरपासून सुमारे 54 कि. मी. अंतर कापल्यावर त्यांना बारामुल्ला शहर दिसू लागले. पण बघायला तिथे काही शिल्लक नव्हते. संपूर्ण शहर उद्धवस्त आणि बेचिराख झाले होते. मग टोळीवाले गेले कुठे? रणजीत राय पथकासह पुढे निघाले आणि तेव्हा लपून बसलेल्या टोळीवाल्यांनी अगदी जवळून मशीनगनचा मारा सुरु केला. रणजीत राय दहा-बारा गोळ्या लागून खाली कोसळले.
 
 
त्यांचे सहायक अधिकारी मेजर संपूर्णसिंह त्यांनी तात्काळ बटालियनची कमांड हाती घेतली आणि माघार घेत पट्टण या गावात येऊन थांबले. तिकडे श्रीनगरमध्ये एका पाठोपाठ एक विमाने उतरत होती आणि सैनिक भराभर उतरून मोर्च्यांवर रवाना होत होते. ’4 कुमाऊँ’ ही बटालियन आली. तिचे प्रमुख मेजर सोमनाथ शर्मा यांना श्रीनगरपासून फक्त 3 कि.मी. अंतरावर असलेल्या बडगामकडे पाठवण्यात आले. कारण घुसखोरांची एक टोळी बडगाममार्गे श्रीनगर विमानतळाकडे येत आहे, अशी खबर स्थानिक रहिवाशांकडून कळली होती. तिकडे पट्टण मधल्या ’1 सिख’च्या मोर्च्यासमोरही मोठ्या संख्येने घुसखोर एकत्र होत असल्याची खबर आली होतीच.
 
 
एव्हाना ’161 इन्फन्ट्री ब्रिगेड’ च्या जवळपास सर्व बटालियन्स श्रीनगरमध्ये पोचून ब्रिगेडियर एल. पी. सेन यांनी मुख्य सेनापती म्हणून सूत्र हाती घेतली होती.
 
 
मेजर सोमनाथ शर्मा यांना बडगाममध्ये काही धोका जाणवला नाही. त्यामुळे 3 नोव्हेंबर 1947 रोजी दुपारी 2 वाजता त्यांनी आपल्या बटालियनमधल्या बर्‍याच जवानांना श्रीनगरकडे पाठवून दिले. त्यांच्यासोबत आता फक्त 100 सैनिक होते. गावाच्या आसमंतात गावकर्‍यांच्या वेषात वावरणार्‍या घुसखोरांना हेच हवे होते. ठीक 2.30 वाजता 700 घुसखोरांनी आपल्या ’फेरेन’ म्हणजे गरम कोटाआड लपवलेल्या बंदुका बाहेर काढल्या आणि मेजर सोमनाथ शमार्ंच्या 100 सैनिकांच्या चौकीवर चारी बाजूंनी गोळ्यांचा पाऊस पडू लागला.
 
 
मेजर शर्मानी शत्रूचा डाव ओळखला. आपण हरलो तर शत्रू सरळ श्रीनगर विमानतळ गाठणार. आता सातशे विरुद्ध शंभर. फारच विषम संख्या होती. पण अशाच प्रसंगी तर सेनापतीची कसोटी असते, मेजर शर्मा आणि त्यांचे जवान तेथे गाडून उभे राहिले. ’कालिका माता की जय’ ही कुमाऊँ पथकाची युद्धघोषणा गर्जवीत दातओठ खाऊन शत्रूवर मारा करू लागले. खरे म्हणजे मेजर शर्मा युद्ध आघाडीवर येणे टाळू शकले असते. त्यांच्या हाताला महिन्याभरापूर्वी फ्रॅक्चर झाले होते. त्यांचा एक हात प्लास्टरमध्ये होता. पण म्हणून घरी बसून राहील, तर तो सैनिक कसला? चहू बाजूंनी दणाणत्या गोळ्यांच्या फैरीत मेजर शर्मा आपल्या गनर्सना प्रोत्साहन देत होते. मशीनगनचे गोळ्यांचे पट्टे पुरवीत होते आणि एका हाताने लाईट मशीनगन चालवत होते. आणि एवढ्यात शत्रूच्या मॉर्टरचा एक गोळा मेजर शर्माच्या अगदी जवळच फुटला आणि हा बहाद्दर अधिकारी तेथेच कोसळला.
 
 
स्वतंत्र देशातील भारतीय सैन्याने लढलेली ही पहिली लढाई. तिला म्हणतात ’बडगामची लढाई!’ मेजर शर्मा ठार झाल्यावर आणि यांच्या पथकाचा दारूगोळा संपल्यावर शत्रूने त्यांची चौकी तुडवून काढली. मेजर शर्माच्या मृतदेहाची ओळख यांच्या चेहर्‍यावरून नव्हे, तर यांच्या कोटात, छातीजवळच्या खिशात असलेल्या भगवद्गीतेच्या छोट्या पुस्तकावरून पटवण्यात आली.
 
 
’जिस के सैनिक समर भूमी में गाया करते गीता है।’ हे फक्त आमचे काव्य नव्हे, ती वस्तुस्थिती आहे.
 
 
या लढाईत शत्रूचेही 200 सैनिक ठार झाले. त्यामुळे त्यांनी मग पुढे श्रीनगरवर चालून न येता थोडी माघारच घेतली. अशा रितीने श्रीनगर बचावले.
Powered By Sangraha 9.0