@चंद्रशेखर नेने 8779639059
जस्टीन यांचे सरकार खलिस्तानी शीख जगमितसिंगच्या पाठिंब्यावर टिकलेले असल्यामुळे ते डगमगीत झाललेे आहे. कॅनडामधील भारतीय नागरिक जस्टीनच्या माकडचाळ्यांमुळे त्याला कॅनडाचा पप्पू म्हणायला लागले आहेत. कॅनडा देशाने आता स्वतःला अमेरिकेत एक्कावनावे संस्थान म्हणून सामील करून घ्यावे,असे ट्रम्प यांनी सुतोवाच केले आहे. असे सर्व घटनाक्रम पाहता कॅनडाचे पंतप्रधान‘जस्टीन’ चे लवकरच ‘जस्ट आऊट’ होणार हे निश्चित.
जस्टीन ट्रूडो, कॅनडा या देशाच्या एका अहंमन्य पंतप्रधानाला आता आपल्या पदावरून जावेच लागेल, भारतासारख्या महासत्तेला विनाकारण डिवचणे पडले महागात! काय तो तोरा दाखवत होता हा मनुष्य गेली काही वर्षे, बहुतेक त्याला असे वाटत होते की भारत देश हा त्याच्या बापाच्या वेळेस जसा दुर्बल होता तसाच अजूनही दुर्बल आहे. इथे मी त्याच्या बापाचा मुद्दाम उल्लेख केला कारण त्याचे पिताश्री पियरे ट्रूडो हेदेखील पूर्वी कॅनडाचे पंतप्रधान होते. म्हणजे आपल्यासारखी तिथेही एक वंशपरंपरा आकार घेत होतीच म्हणायची.
हे पियरे महाशय एप्रिल 1968 ते जून 1979 या काळात कॅनडाचे पंतप्रधान होते. त्यानंतर ते निवडणूक हरले, पण परत मार्च 1980 ते जून 1984 या काळात पुनः कॅनडाचे पंतप्रधान होते. त्यांचे पुत्र जस्टीन यांचा जन्म 25 डिसेंबर 1971 चा आहे. म्हणजे जन्मापासूनच ते पंतप्रधानांच्या घरात वाढलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारचा वृथा गर्व त्यांच्यामध्ये आधीपासूनच आहे. त्यांचे पिताश्री पियरे ट्रूडो यांचे पूर्वीपासूनच कॅनडा येथील शीख खलिस्तान समर्थकांच्या सोबत घनिष्ठ संबंध राहिले आहेत. अनेक वर्षांपासून शीख समाज कॅनडात वस्ती करून आहे. कॅनडाच्या बहुसंख्य भागावर बर्फाचे प्रचंड आच्छादन असते. त्यामुळे तेथे शेती करणे हे खूपच कष्टाचे काम आहे.
शीख शेतकरी पूर्वीपासूनच खूप कष्टाळू म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सर्व कॅनडा येथे जाऊन तिथे अपार कष्ट करून एक चांगले जीवन जगतात. आजमितीस ह्यांची लोकसंख्या कॅनडात सुमारे आठ लाख आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या 2 टक्के आहे. त्यातील काही 15 ते 20 हजार खलिस्तान समर्थक आहेत असा अंदाज आहे. 1980 मध्ये भारतात खलिस्तान चळवळीला जोर आलेला असताना भारतीय पोलिस दलाने आपली कारवाई खूप तीव्र केली. तेव्हा तेथील एक दहशतवादी तलविन्दर सिंह परमार, हा इथे दोन पोलिसांना ठार करून कॅनडात पळाला. भारत सरकारने त्याला हाकलून परत भारतात पाठवण्याची विनंती कॅनडा सरकारकडे केली. पण या पियरे ट्रूडोने ती विनंती अमान्य केली आणि त्या दहशतवाद्याला कॅनडा देशात आश्रय दिला. पुढे याच तलविन्दर सिंह याने संपूर्ण योजना आखून आपले एअर इंडियाचे ‘कनिष्क’ हे 747 जंबो जेट विमान इंग्लंडच्या पूर्वेच्या समुद्रात रिमोट कंट्रोल वापरुन उडवून दिले. त्यातील 329 प्रवाश्यांपैकी कोणीही वाचले नाहीत! यामध्ये 80 टक्के प्रवासी हे कॅनडात स्थायिक असलेले मूळ भारतीय वंशाचे कॅनडाचे नागरिक होते! या सर्वांचा मृत्यू या पियरे ट्रूडोच्या मूर्खपणामुळे झाला. परंतु यावरून जस्टीन ट्रूडो यांनी काही धडा शिकला आहे असे वाटत नाही. कारण अजूनदेखील याचे खलिस्तानी दहशतवाद्यांशी घनिष्ठ संबंध आहेतच.
अशा ह्या पियरे ट्रूडोचा जस्टीन हा मुलगा. जस्टीन हे 2015 मध्ये लिबरल पक्षातर्फे निवडून येऊन पंतप्रधान झाले. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या सुमारे दहा वर्षात त्यांनी कॅनडाची अर्थव्यवस्था बिकट करून ठेवली आहे. सध्या कॅनडा येथे महागाईने कहर मांडला आहे. घरांच्या किमतीमध्ये तर सुमारे 40% वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना घर विकत घेणे हे खूपच कठीण होऊन बसले आहे. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅनडाचे परराष्ट्र धोरण! शिवाय या ट्रूडो महाशयांनी आपल्या देशाच्या सीमा बाहेरून येणार्या शरणार्थी गटांना खुल्या करून टाकल्या, त्यामुळे प्रचंड प्रमाणात येथे असे शरणार्थी आलेले आहेत. त्यामुळेच घरे महाग झाली, तसेच अनेक प्रकारची गुन्हेगारीदेखील वाढलेली आहे. या सर्वामुळे जस्टीन यांची लोकप्रियता झपाट्याने खाली घसरली आहे. सध्या केवळ 22 टक्के नागरिकांचाच त्यांना पाठिंबा उरलेला आहे. शिवाय त्यांच्या लिबरल पक्षातूनदेखील त्यांना तीव्र विरोध सुरू झालेला आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष कॉन्झर्वेटिव्ह पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते पोलीवहेरे ह्यांनाच आता कॅनडा येथील बहुसंख्य नागरिक पाठिंबा देत आहेत.
त्यामुळे 6 जानेवारीला जस्टीन यांनी आपल्या लिबरल पक्षाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. एक लक्षात घ्या, अजूनही तेच पंतप्रधान आहेत कारण; त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखा आपल्या सरकारी पदाचा त्याग केलेला नाही! त्यांनी फक्त असे म्हटले आहे की त्यांच्यावर पक्षाचे बहुसंख्य संसद सदस्य नाराज आहेत, आणि आता लगेच या वर्षी संसदेची निवडणूक आहे. त्यात त्यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्ष जिंकू शकेल अशी त्यांनाच खात्री वाटत नाही, म्हणून पक्षाने निवडणूक नव्या नेतृत्वाखाली लढवावी, यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.
हे जस्टीन ट्रूडो 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत. पहिल्या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले होते, पण दुसर्या वेळेस, 2019 मध्ये त्यांचे बहुमत घटले आणि त्यांना दुसर्या एका पक्षाच्या मदतीने सरकार बनवावे लागले. हा दुसरा पक्ष म्हणजेच कॅनडातील खलिस्तानी शीख समाजाच्याबद्दल सहानुभूति असलेला एका शीख नेत्याचा पक्ष न्यू डेमोक्रॅटिक पार्टी. या पक्षाचे अध्यक्ष जगमीतसिंग धालीवाल. हे एक कॅनेडियन शीख आहेत. हे उघडपणे खलिस्तान समर्थक आहेत. सध्या ह्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावरच जस्टीन यांचे सरकार टिकून होते. पण आता यांनीदेखील आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकार चालवणे कठीण आहे. एक गमतीची गोष्ट म्हणजे कॅनडा येथील नियमानुसार जर जस्टीन आणि जगमितसिंग हे आपल्या पदांवर फेब्रुवारी संपेपर्यंत राहिले तर त्यांना वीस लाख कॅनडा डॉलर्स एव्हढी पेन्शन मिळेल! त्यामुळे हे दोघे तोपर्यंत सरकार पडू देणार नाहीत. या जगमितसिंग यांनी नुकतीच एक महागडी मोटर विकत घेतली आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेते पोलियएव्हरे ‘मासेरटी मार्कसिस्ट’ असे म्हणतात!
जस्टीन यांच्या राजीनाम्यामागचे एक अधिक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी अकारण भारत आणि विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुखावले. त्याचे असे झाले की 18 जून 2023 रोजी एका कॅनडा येथील खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याचा अज्ञात हल्लेखोराने खून केला. जस्टीन यांनी असा जाहीर आरोप केला की या खुनाचा कट भारत सरकारने पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरुन रचला आणि तडीस नेला गेला. भारत सरकारने ताबडतोब या आरोपांवर स्पष्ट नकार दिला आणि त्याच्या पुष्ट्यार्थ पुराव्याची मागणी केली. त्यावर या जस्टीन महाशयांनी असे तारे तोडले की, आमच्याकडे खात्रीलायक अफवा पोचलेली आहे की, हा खून भारताच्या सांगण्यावरूनच झाला आहे. अर्थातच अशा बालिश बोलण्याकडे जगाने मुळीच लक्ष दिले नाही. शिवाय भारत सरकारने असेही सांगितले की, हा निज्जर भारतातून गुन्हे करून खोट्या कागदपत्राद्वारा कॅनडात पोचलेला आहे, यास्तव त्याला आमच्या ताब्यात द्या. पण जस्टीन यांचे सरकार जगमितसिंगच्या पाठिंब्यावर टिकलेले असल्यामुळे, त्याने निज्जरला सोडण्यास साफ नकार दिला होता. असा हा दहशतवादी मारला गेल्याबद्दल आनंद मानायचा की त्याच्या नावावर मोदी यांना अडकविण्याचा प्रयत्न करायचा? या असल्या वागण्यामुळेच कॅनडामधील भारतीय नागरिक जस्टीनला कॅनडाचा पप्पू असे म्हणायला लागले आहेत. त्याशिवाय पूर्वी एकदा या जस्टीनने कॅनडाच्या संसदेत स्पीकर त्याची ओळख करून देत असताना त्याच्याकडे बघून त्याला जीभ काढून वेडावून दाखवले होते आणि शिवाय त्याला डोळादेखील मारला होता. आपल्याला कदाचित राहुल गांधींनी भारतीय संसदेत केलेल्या माकडचेष्टा आठवतील. पूर्वी असल्या गोष्टी चालून गेल्या पण आता अमेरिकेत ट्रम्प ह्यांचे राज्य येणार आहे. ट्रम्प यांनी या जस्टीनची संभावना एक राष्ट्रप्रमुख नव्हे तर एखाद्या संस्थानच्या गव्हर्नर याच्याशी केली आहे. ट्रम्प ह्यांनी असे स्वच्छ सांगितले आहे की कॅनडा देशाने आता स्वतःला अमेरिकेत सामील करून घ्यावे, अमेरिकेचे एक्कावनावे संस्थान म्हणून. या सर्व प्रकरणामध्ये जस्टीन आणि पर्यायाने कॅनडा या देशाची आंतरराष्ट्रीय पत खूपच घसरली आहे, त्यामुळेच आता कॅनडा येथे सरकार बदलणे अपरिहार्य आहे. तेथील निवडणूकपूर्व सर्वेक्षण सांगते की लिबरल पार्टी निवडणुकीत हरेल आणि सध्याचे विरोधी नेते हेच पंतप्रधान होतील. बघू या हे कधी घडून येते ते!
--------------------