22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण भारत वर्षाला ज्या सोहळ्याची अतीव प्रतीक्षा होती आणि ज्या घटनेसाठी भारतीय जनमानसाने जवळजवळ 500 वर्षांचा अखंड आणि अविरत अशा स्वरूपाचा संघर्ष केला, तो अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे कित्येक पिढ्यांनी केलेल्या संघर्षयज्ञाची सांगता होय. या संघर्षयज्ञात अनेक लोकांनी आपल्या प्राणाचे मोल देऊन हा संघर्षयज्ञ अविरत चालू ठेवला आणि अनेक पातळ्यांवर हा लढा देऊन ‘मंदिर वही बनाएंगे’ ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरवली. 11 जानेवारी 2025 रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच.
22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर साधारण पाच महिन्यांनी भारतातील शैक्षणिक वर्तुळातील एक नामवंत तज्ज्ञ व अभ्यासक अशी ओळख असणारे डॉक्टर अशोक मोडक व डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांनी लिहिलेल्या ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाणे येथे परमपूजनीय श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. अत्यंत हृद्य अशा प्रकारच्या प्रकाशन सोहळ्यात स्वामी गोविंददेव गिरी महाराज, भय्याजी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. पडला आणि मराठी भाषेत या विषयावर लिहिलेल्या एका उत्तम दस्ताऐवजाची भर मराठी साहित्यात पडली. मुळात मागच्या अनेक वर्षांपासून भारतातील अनेक भाषांमध्ये तसेच इंग्रजीतदेखील राम जन्मभूमी आंदोलन व त्यात संघ परिवार तसेच विश्व हिंदू परिषद यांच्या सहभागाची चर्चा करणारे साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले असले तरीदेखील हे पुस्तक अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण आपल्यासमोर मांडते व हीच या पुस्तकाची जमेची बाजू आहे. मुळात या पुस्तकाची विषयवस्तू ही भावनिकतेला आवाहन करणारी असली तरीदेखील लेखकांनी अत्यंत संयत, वास्तववादी व सर्वस्पर्शी अशा प्रकारे विषयवस्तू हाताळली आहे. या पुस्तकाचे संपादन अरुण करमरकर यांनी केलेले असून ठाण्यातील प्रसिद्ध अशा परममित्र प्रकाशन संस्थेतर्फे हे पुस्तक लोकांपर्यंत आणण्यात आले आहे. पुस्तकाच्या बांधणीचा विचार करता साधारण दहा प्रकरणांमध्ये अयोध्या आंदोलनाचा लेखाजोखा यात मांडलेला दिसून येतो. या पुस्तकातील प्रकरणांचा विचार करता राम जन्मभूमी आंदोलनाचा प्रदीर्घ इतिहास, या आंदोलनासंबंधीची न्यायालयीन लढाई त्यादरम्यान देशभर झालेले वैचारिक मंथन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उमटलेल्या सर्व स्तरांतील प्रतिक्रिया अशी साधारण विभागणी केलेली दिसून येते.
आपल्या अस्मितेचा संघर्ष : श्रीराममंदिर
राम मंदिरासंदर्भातल्या अनेक शंकांचे, अनेक प्रश्नांचे समाधान करणारी पुस्तिका. 1990 पासून सुरू झालेला हा मंदिरयज्ञ आता थांबला आहे. या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहेत. त्या सर्वांचे स्मरण करून भव्य मंदिर उभारण्याने या अस्मितायज्ञाची सांगता करायची आहे. त्याचा इतिहास, संघर्ष आणि भावी काळातील करायची कामे याची माहिती घेणारी ही पुस्तिका आहे. ₹50
प्रभू श्रीरामांचे चरित्र हा या भारतभूमीतील जनमानसाचा जीवनरस असून रामजन्मभूमी आंदोलन हा भारत देशाच्या दृष्टीने अस्मितेचा व आत्मप्रतिष्ठेचा विषय का होता आणि त्यासाठी सर्व स्तरांतील लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीने हातभार लावून या आंदोलनाची यशस्वी परिणती कशी घडवून आणली याची सविस्तर मांडणी ‘रामजन्मभूमीचा मुक्तिसंग्राम’ या प्रकरणात दिसून येते. भारत देशातील जनमानस हे रामचरित्राने व्यापलेले असून प्रभू रामाचे चरित्र ही भारत वर्षाच्या अक्षय सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे आणि ती ओळख पुसून टाकण्याचा मनसुबा करणार्या मुघल बादशहा बाबराच्या विध्वंसक कृतीपासून म्हणजे 1528 पासूनचा इतिहास आणि कालपट ‘प्रभू श्रीराम आणि भारत वर्ष’ या प्रकरणात मुद्देसूद पद्धतीने मांडला आहे. मुघलकालीन सांस्कृतिक गळचेपी, ब्रिटिशकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत अशा वेगवेगळ्या कालखंडांत राम जन्मभूमी आंदोलनाचे बदलत गेलेले स्वरूप व विविध पातळ्यांवरती हिंदू समाजाने दिलेला लढा आणि त्याचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी असलेला संबंध अत्यंत वस्तुनिष्ठपणे या पुस्तकात मांडलेला दिसून येतो. हे विवेचन मांडत असताना प्रभू श्रीराम हे या देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत, हे प्रकर्षाने नमूद केलेले असून ‘हजारो वर्षांनंतरही कोणी भारताच्या अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण करण्याचे साहस करू पाहील तर इतिहास त्याला बजावून सांगेल की, क्षत्रिय राम आणि भिल्ल माता शबरी यांनी हे राष्ट्र निर्माण केले आहे’ हे वाक्य वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.
1986 साली झालेल्या मुजफ्फरनगर येथील अधिवेशनानंतर विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमी आंदोलनात घेतलेला सक्रिय सहभाग व त्यासाठी सुरू केलेली सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ आणि तिची परिणामकारकता याचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच विश्व हिंदू परिषदेची आंदोलनामागची स्पष्ट भूमिका आणि त्यावरील इतर समाजघटकांच्या प्रतिक्रिया यावर एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आलेले आहे. अयोध्येच्या बरोबरीनेच काशी, मथुरा आदी तीर्थक्षेत्रांची मुक्ततेची चळवळ आणि देशातील डाव्या पुरोगामी विचारवंतांची त्याबाबतची वैचारिक भूमिका यांचा समाचार घेणारे एक प्रकरण या पुस्तकात असून देशातील सेक्युलर शक्तींनी आजवर या आंदोलनाची केलेली हानी आणि समाजमनाची केलेली दिशाभूल याची सविस्तर मांडणी या प्रकरणात आहे.
अयोध्या आंदोलनाचे राजकीय परिमाण पाहिल्यास या चळवळीची वैचारिक पार्श्वभूमी तयार होत असतानाच्या काळात या चळवळीचे सर्वात जास्त वैचारिक नुकसान हे तथाकथित सेक्युलर म्हणणार्या डाव्या पुरोगाम्यांनी केले असून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरच्या काळात तसेच आंदोलनाच्या न्यायालयीन लढाईदरम्यान या पुरोगामी विचारवंतांचा वैचारिक बुरखा उतरवण्याचे काम करण्यासाठी संघ तसेच विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांसाठी काम करणार्या सज्जनशक्तीने पार पाडले आहे, हे यातून प्रकर्षाने जाणवते. विचारसरणीच्या दृष्टीने हे काम उजव्या शक्तींनी केले आहे असे मानल्यास सांस्कृतिक व न्यायालयीन लढ्यादरम्यान अयोध्या आंदोलनातून भारतात शींहपेलीरलू म्हणजेच संस्कृती तंत्र अथवा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रकर्ष आणि उत्कर्ष झाल्याचे निर्विवादपणे म्हणता येईल. देशातील बहुसंख्य हिंदूंचा नैतिक विजय म्हणजे या आंदोलनाची यशस्विता. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकात अयोध्या आंदोलन आणि काश्मीर प्रश्न, कलम 370, भारताने भूषवलेले जी-20 चे अध्यक्षपद, जगात होत असलेले भूराजकीय संघर्ष, चिनी ड्रॅगनचा विळखा, भारतातील आर्थिक स्थित्यंतरे, बाबरी ढाचा जमीनदोस्त होणे, मुस्लीम बोर्डाचे मंदिराच्या जागेवरील हक्क सांगणारे युक्तिवाद, सुप्रीम कोर्टाची हा विषय हाताळण्याची पद्धत या सर्व सामाजिक आणि राजकीय बदलांचा परामर्श घेतलेला आहे आणि हेच या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. रामजन्मभूमी आंदोलन ही सांस्कृतिक आणि धार्मिक चळवळ या दृष्टीने भारतावर परिणाम करणार्या अंतर्गत तसेच बाह्य घटकांचा सखोल विचार या पुस्तकात घेतला आहे म्हणून हे विश्लेषण सर्वस्पर्शी ठरते.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची ओघवती, प्रवाही आणि संदर्भ संपृक्त भाषा. अयोध्या आंदोलनाच्या संबंधाने वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी केलेले भाष्य, लिखाण, न्यायालयीन लढाईच्या दरम्यान प्रसिद्ध झालेले विविध लेख, अहवाल आणि सरकारी स्पष्टीकरणे या सर्वांचा अंतर्भाव पुस्तकाच्या विविध प्रकरणांत करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे सगळ्यात महत्त्वाचे बलस्थान म्हणजे अयोध्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा धांडोळादेखील यात घेतलेला दिसून येतो. मुस्लीम कट्टरतावाद आणि सुधारणावादी पुरोगामी मुस्लीम गट यांच्यातील टोकाचे अंतर्विरोध आणि त्यातून उमटणार्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रक्रियेवरील प्रतिक्रिया यांचे विवेचन ‘मुक्तिसंग्राम आणि मुस्लीम मानसिकता’ या प्रकरणात विशेषत्वाने केलेले आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आणि भारतीय मुसलमान यांच्यातील बदलते अंतर्प्रवाह यांची कालसुसंगत मांडणी लेखकांनी केलेली असून नव्या भारताच्या निर्माणासाठी सुधारणावादी पुरोगामी मुस्लीम समाज कितपत भूमिका निभावू शकेल, या दृष्टीने हे विवेचन आलेले आहे. या संदर्भात मुस्लीम लेखक सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यांचा अत्यंत खुमारीने समाचार घेतलेला असून इतरही अनेक अस्मितावादी मुस्लीम लेखक व विचारवंतांच्या प्रतिक्रियांचा ऊहापोह या प्रकरणांमध्ये विश्लेषणाच्या ओघात आलेला आहे. मुस्लीम कट्टरतावाद, सेक्युलॅरिझम आणि डावी विचारसरणी व त्यातून होणारी सामाजिक व वैचारिक घुसळण यासंबंधीचा विचार पुस्तकात अनेक ठिकाणी दिसून येतो. राजकीयदृष्ट्या 2014 साली झालेले सत्तांतर, मोदी सरकारची आंदोलनाबाबतची भूमिका व कार्य तसेच उत्तर प्रदेशात आलेले योगी सरकार या सर्वांचा अयोध्या आंदोलनावरील परिणाम याचा विचार एका विशिष्ट प्रकरणात केलेला आहे.
मागच्या पाच शतकांत रामजन्मभूमी आंदोलनाच्या यशस्वितेसाठी प्रतीक्षा करणार्या व्यथित हिंदू समाजाने दिलेला राजकीय, सामाजिक आणि न्यायालयीन लढा व त्याची परिणती, त्यातून हिंदू समाजाने मिळवलेला आत्मविश्वास आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी तसेच 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी अयोध्या आंदोलनातून मिळालेला धडा आणि सकल हिंदूंचा आत्मविश्वास तसेच आत्मप्रतिष्ठा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हे यातून अधोरेखित होते. हिंदू समाजाबद्दल असणार्या तथाकथित समजुती व भ्रामक कल्पना यानिमित्ताने गळून पडल्या असून भारतविरोधी वृत्तींना यापुढे थारा मिळणार नाही, अशी सकल हिंदूंची निर्णायक भूमिका यातून स्पष्ट होते.
प्रस्तुत पुस्तकाचा आवाका लक्षात घेता अत्यंत संयत, शास्त्रशुद्ध आणि काटेकोर मांडणी व अचूक शब्दरचना, संदर्भांची रेलचेल, ही या पुस्तकाची बलस्थाने आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास रामजन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने डाव्या सेक्युलर विचारवंतांची संभावना ‘गिर्हाईक गमावून बसलेले दुकानदार’ या शब्दांत लेखकांनी केली आहे. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ व संयत साहित्य निर्माण होणे आणि विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये ते प्रचलित होणे हे फार मोठे योगदान ठरते. त्या दृष्टीने एक ऐतिहासिक दस्तावेज मराठी भाषेत आणल्याबद्दल प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकांचे आभार आणि राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अशा विषयांवर त्यांच्याकडून अधिकाधिक वैचारिक लेखन घडो, ही अपेक्षा.