वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक चळवळ!

06 Sep 2024 15:22:47

Shri Guruji Hospital
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेतच; परंतु आजच्या काळात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा यासुद्धा महत्त्वाच्या गरजा झाल्या आहेत. आपल्या देशात या दोन्ही गरजा काही ठिकाणी अत्यंत महागड्या दरात भागविल्या जातात किंवा दुर्गम भागात त्या भागविणेच अवघड आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच, दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासी आणि गोरगरिबांची मदत करण्यात आघाडीवर असतो. छ. संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानने सुरू केलेले डॉक्टर हेडगेवार रुग्णालय याचं एक उत्तम उदाहरण आहे. याच संस्थेने नंतर विविध उपक्रम हाती घेतले. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सेवांकुर. या प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याचं काम सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यामुळे फक्त पैसे कमावणे, हा हेतू न ठेवता समाजासाठी व्यवसायाच्या माध्यमातून काही सेवा करावी, असं ज्यांना वाटतं ते डॉक्टर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. अशा काही कार्यक्रमांना नाशिकचे डॉ. विनायक गोविलकर उपस्थित होते. त्यांचा या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क होता. त्यामधल्या काही डॉक्टरांना आपणही डॉ. हेडगेवार रुग्णालयासारखं काम करावं, असं वाटलं. त्या सर्वांचे प्रमुख डॉ. अश्विनीकुमार तुपकरी होते. नाशिक जिल्ह्यामध्ये व आजूबाजूला आदिवासी भाग आहे. त्यामुळे सर्वेक्षण केल्यानंतर नाशिकला रुग्णालय काढण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. आज अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर व सहकार्‍यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरुजी रुग्णालयाची दमदार वाटचाल सुरू आहे.

गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र
@रंगा हरी
गोळवलकर कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.
 
Shri Guruji Hospital
 
सुरुवातीला एका छोट्याशा जागेमध्ये रुग्णालय सुरू केलं. हे काम कायमस्वरूपी होऊ शकेल की नाही, याची चाचपणी केली. गरज व शक्यता आहे हे लक्षात आल्याने मोठ्या जागेचा शोध सुरू झाला. भोसला या संस्थेशी संपर्क केला असता त्यांनी पाच एकर जागा उभारणीसाठी देऊ केली. पहिली तीन वर्षं छोट्या स्वरूपात काम केल्यानंतर ऑक्टोबर 2010 ला गंगापूर रोडवर काम सुरू झालं. हातात फारसा पैसा नसताना, एकही डॉक्टर नाशिकचा नसताना भव्य बांधकामाला सुरुवात केली. चांगलं आणि प्रामाणिक काम असेल तर हजारो हात पुढे येतात. त्याप्रमाणे कोणतेही सरकारी अनुदान न घेता, कर्ज न काढता किंवा कोणतीही आकर्षक योजना जाहीर न करता 18 महिन्यांत रुग्णालय उभं राहिलं. मार्च 2013 पासून 65 खाटांचे श्री गुरुजी रुग्णालय सुरू झाले. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते त्याचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.
 
रुग्ण सेवा सदननिर्मिती
कॅन्सर रुग्णांना केमोथेरपी किंवा रेडिएशन जवळजवळ दररोज करावं लागतं. श्री गुरुजी रुग्णालयात लांबून लांबून असे रुग्ण येत असतात. अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना निवासाची सोय व्हावी या उद्देशाने रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्याची गरज लक्षात आली. त्यानुसार आणखी दीड एकरवर रुग्ण सेवा सदन निर्माण करण्यात आले आहे. कार्डियाक सेंटर आणि कॅन्सर सेवेचा विस्तार झाला आहे. प्रा. महादेवराव गोविलकर यांच्या नावाने ही वास्तू उभी आहे. 
 
 
या ठिकाणी विविध आजार, विकारांवर उपचार केले जातात. कॅन्सरमधील रेडिएशन, केमोथेरपी आणि ऑपरेशन असे सर्व उपचार येथे उपलब्ध आहेत. आता जवळजवळ दररोज शेकडो रुग्णांचे ओपीडीमध्ये उपचार होतात. येथे एकूण 350 इतका कर्मचारी वर्ग आहे. या रुग्णालयाची काही वैशिष्ट्ये आहेत. इथे काहीही विनामूल्य मिळत नाही. तरीही अत्यंत वाजवी दरात, नाशिक शहराच्या दराच्या 40 टक्के कमी दरात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. इथे पूर्णवेळ डॉक्टर्स असून ते इतरत्र प्रॅक्टिस करू शकत नाहीत. बाहेर वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेला बाजार आणि धंदेवाईक साखळी येथे नसल्यामुळे बाजारीकरणाला वाव राहत नाही. या सामाजिक चळवळीला दानशूर व्यक्ती भरघोस देणग्या देतात. मात्र त्यातील एकही पैसा या रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवहारासाठी वापरला जात नाही. नवीन सुविधा, बांधकाम, आधुनिक उपकरणे घेण्यासाठीच त्याचा वापर केला जातो. अनेक जण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रुग्णालयात दैनंदिन आवश्यक ती मदत करतात.
 
 

Shri Guruji Hospital
 
कोविडकाळात 48 खाटा उपलब्ध करून येथे अत्यल्प दरात सेवा देण्यात आली. यापैकी एकाही रुग्णाला बाहेरून रेमडेसिविर, ऑक्सिजन आणा, असे सांगितले गेले नाही. रुग्णालयाने संपूर्ण औषधोपचाराची व्यवस्था केली होती. या कामासाठी रुग्णालयाला पुरस्कारही मिळाले आहेत. रुग्णांना नातेवाईकांशी संपर्क ठेवता येत नसे. हे लक्षात घेऊन एका खास डॉक्टरांची नियुक्ती केली होती. ते दररोज रात्री प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना त्याच्या तब्येतीची माहिती स्वतः फोन करून देत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये अत्यंत विश्वासाचं नातं निर्माण झालं. हे काम पाहून नाशिकमधल्या काही उद्योजकांनी एकत्र येऊन 80 लाख रुपयांचा एक ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिला. रुग्णालय सुरू झाल्यानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय मिळाले; परंतु तांत्रिक, साहाय्यक पदावर माणसं मिळणं कठीण झालेलं होतं. त्यासाठी रुग्णालयाने एक वर्ष मुदतीचे चार अभ्यासक्रम तयार केले. या विद्यार्थ्यांना पाच दिवस रुग्णालयात सेवा अनुभव आणि शनिवार-रविवार प्रशिक्षण मिळते, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रही दिले जातं. त्यातील काही जण याच रुग्णालयात नोकरी करीत आहेत.
 
 
समर्पित सेवायज्ञात समिधा
सुरुवातीच्या संकल्प समूहातील सहा-सात सदस्यांच्या जोडीला हा जगन्नाथाचा रथ ओढण्याकरिता अनेक सेवाभावी सहयोगी येऊ लागले आणि आजमितीला 30 पूर्णवेळ डॉक्टर्स, त्यांना सोबत करण्यासाठी काही अर्धवेळ आणि शहरातील काही मानवसेवी डॉक्टर्स यांच्या माध्यमातून हा अखंड समर्पित सेवायज्ञ सुरू आहे. आज अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभाग, सुसज्ज असा कॅन्सर आणि कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग, स्त्रीरोग, दंतरोग विभाग तसेच सुसज्ज असा आयुर्वेदिक विभाग, ऑक्युपेशनल थेरपी विभाग, फिजिओथेरपी व स्पीच थेरपी आणि सुसज्ज पॅथॉलॉजी, रेडिओलॉजीचे निदान तंत्र विभाग, आय.सी.यू. व डायलिसिस तसेच सेवेसाठी तत्पर असणार्‍या साधारण 400 कार्यकर्त्यांचा समूह असा मोठा विस्तार रुग्णालयाचा अल्पावधीतच झाला आहे.
 
श्री गुरुजी रुग्णालय केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधून ते सोडविण्यासाठी प्रयत्नरत असते. वेगवेगळ्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरांसोबत, तेथील समाजघटकांचे जीवनमान सुधारण्याकडे श्री गुरुजी रुग्णालयाचा कल असतो. असा हा वैद्यकीय व सामाजिक चळवळीचा सेवायज्ञ अखंडपणे सुरू आहे. याचबरोबरीने रुग्णालयाचा कार्डियाक विभागही सप्टेंबर 2023 पासून समाजाच्या सेवेत रुजू झाला आहे.
 
Shri Guruji Hospital  
आगामी विस्ताराच्या विविध योजना!
 आजपर्यंत समाजाने या ध्येयवेड्या डॉक्टरांवर दाखविलेला विश्वास आणि दातृत्व यांच्या जोरावर रुग्णालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अनेक नवनवीन सदस्य या कार्यात सहभागी होत आहेत. समाजाचीदेखील श्री गुरुजी रुग्णालयाकडून अपेक्षा वाढत आहे. त्यामुळे स्वाभाविकच रुग्णालयाचा विस्तार आणि नवीन सुविधांची सुरुवात ही काळाची गरज झाली आहे. भविष्यात 250 खाटांपर्यंत कार्याचा विस्तार करणे, ट्रॉमा विभाग सुरू करणे अशा योजना आहेतच. समाजाच्या सहयोगाने व संघशक्तीच्या पाठबळावर हे कार्य उत्तरोत्तर वाढीस लागेल आणि समाजाच्या उपयोगी पडू शकेल, असा दृढ विश्वास सर्वांच्याच मनात आहे.
 
 
नाशिक जिल्ह्यात काही आदिवासी पाडे आहेत. रुग्णालय सुरू केले; पण अत्यंत दुर्गम भागातील लोकांना शहरात येऊन उपचार घेणे परवडत नाही. त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन सेवा का पुरवू नये? या विचाराने अभ्यास करून पाड्यांवर दररोज गाडी पाठवून उपचार द्यायला सुरुवात झाली. आता नाशिक जिल्ह्यातल्या 26 पाड्यांवर रुग्णालयाची गाडी दररोज जाते. प्रथमोपचार दिले जातात. ज्याला मोठ्या उपचाराची गरज असेल त्याला आणून रुग्णालयात उपचार देण्यापर्यंत सर्व कामे रुग्णालयाचे कर्मचारी करतात. या पाड्यातल्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया याच पद्धतीने त्यांना आणून विनामूल्य करून देण्यात आली आहे. या पाड्यांमध्ये डॉक्टर, नर्ससह स्टाफ दररोज सकाळी साडेआठ वाजता नाशिकहून जाऊन संध्याकाळी 6 वाजता परत येतो. हे काम करत असताना कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, येथे आरोग्याबरोबरच पाण्याची खूप मोठी समस्या आहे. महिलांचे सबलीकरण होण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी 2010 मध्ये सेवा संकल्प समिती सुरू केली आणि त्याअंतर्गत ग्रामीण भागातले सहा आयाम घेऊन त्यावर काम सुरू केलं गेलं. त्याअंतर्गत 15 पाड्यांमध्ये बोअरवेल करून, त्यावर टाकी लावून, त्याला नळ बसवून पाण्याची सोय करून दिली. रुग्णालयातर्फे संपूर्ण साधनसामग्री दिली जाते आणि गावातील लोक श्रमदान करतात. यामुळे आता गावातील महिलांना डोक्यावर कळशा घेऊन लांबून पाणी आणावं लागतं नाही. त्यामुळे त्यांचा वेळ वाचतो, श्रमही वाचू लागले आहेत, आरोग्य सुधारले आहे. काही ठिकाणी महिला बचत गट सुरू करून त्यांना शिलाई मशीन्सही देण्यात आली आहेत. सहा-सात पाड्यांमध्ये मंदिरे बांधून दिली आहेत. त्यामुळे लोक थोडेफार अध्यात्माला लागून दारू, व्यसन सोडण्याची उदाहरणेही दिसून येत आहेत. आदिवासी पाड्यांमध्ये चांगल्या तांदळाची शेती होते. या तांदळाला चांगला भाव मिळावा यासाठी नाशिकमध्ये विक्री केंद्रे उघडून देण्यात आली आहेत. आणखी एक उपक्रम म्हणजे नाशिकपासून वीस किलोमीटर अंतरावर विल्होळी नावाचं एक गाव आहे. तिथे एका दानशूर उद्योजकाने अर्धा एकर जमीन रुग्णालयाला दान केली. आजूबाजूला तेरा खेडी आहेत, जिथे एकही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाही, हे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी एक सेंटर उभारून तिथे पूर्णवेळ ओपीडी सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय वेगवेगळ्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे भरवली जातात. असा हा वैद्यकीय व सामाजिक चळवळीचा सेवायज्ञ अखंडपणे सुरू आहे.
 
 
लेखक नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहेत.
 
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
डॉ. राजेंद्र खैर 9423724051, 253-2343401
Powered By Sangraha 9.0