भारतरत्न बहुमानाने सन्मानित पहिली महिला गायिका, संगीतकार
(16 सप्टेंबर 1916 - 11 डिसेंबर 2004 )
सुवर्णशलाकेसारखा आवाज लाभलेल्या सुब्बुलक्ष्मींची 1927 ते 2004 अशी तब्बल 75 हून अधिक वर्षांची कारकीर्द त्यांच्या नावामागे लागलेल्या ‘नायटिंगेल’, ‘कोकिळा’, ‘आठवा स्वर’, ‘स्वरलक्ष्मी’ आणि ‘तपस्विनी’ अशा अनेक बिरुदांनी गाजली. त्यावर कळस चढवला तो ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि ‘भारतरत्न’ या सन्मानांनी आणि अल्लादियाखाँ साहेबांनी. त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांना ‘सुस्वरलक्ष्मी’ ही पदवी बहाल केली.
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 77 वर्षांत ज्या 55 नामवंत भारतीयांना ‘भारतरत्न’ या बहुमानानं सन्मानित करण्यात आलं, त्यात होत्या अवघ्या पाच महिला आणि त्यातही चौथ्या क्रमांकावर होत्या कर्नाटक संगीत शैलीतील श्रेष्ठ गायिका सुब्बुलक्ष्मी. त्यांचं लहानपणचं नाव कुंजम्मा आणि पूर्ण नाव मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी. त्या नावातलं मदुराई हे त्यांचं जन्मगाव, तर षण्मुखवाडिवु हे त्यांच्या आईचं नाव. आई देवदासी परंपरेतली वीणावादक, तर आजी अक्कमल ही व्हायोलिनवादक. त्या दोघींचा संगीताचा वारसा कुंजम्माला मिळाला; परंतु त्यांना कर्नाटक संगीतासाठी गुरू लाभले ते ज्येष्ठ सेमनगुडी श्रीनिवास अय्यंगार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी नारायणराव व्यास, ठुमरी आणि टप्पा गायनासाठी दिलीपकुमार राय आणि सिद्धेश्वरीदेवी, तर नृत्यासाठी बालासरस्वती; पण या गुरूंबरोबरच त्यांना संगीताची खोल आणि सर्वंकष तालीम मिळाली ती के. सांबशिवा अय्यर, एम. एस. भागवतार आणि अरियाकुडी रामानुज अय्यंगार यांच्याकडून.
स्वाभाविकपणानं अत्यंत लवचीक आणि सुवर्णशलाकेसारखा आवाज लाभलेल्या सुब्बुलक्ष्मींची 1927 ते 2004 अशी तब्बल 75 हून अधिक वर्षांची कारकीर्द त्यांच्या नावामागे लागलेल्या ‘नायटिंगेल’, ‘कोकिळा’, ‘आठवा स्वर’, ‘स्वरलक्ष्मी‘ आणि ‘तपस्विनी‘ अशा अनेक बिरुदांनी गाजली. त्यावर कळस चढवला तो ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि ‘भारतरत्न’ या सन्मानांनी आणि अल्लादियाखाँ साहेबांनी. त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांना ‘सुस्वरलक्ष्मी‘ ही पदवी बहाल केली. सुब्बुलक्ष्मी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी पुरस्कार, रेमन मॅगसेसे पुरस्कार, कालिदास सन्मान, इंदिरा गांधी सन्मान अशा आणखीही काही सन्मानांनी गौरवण्यात आलं; पण त्यांच्या या यशामागे खंबीरपणे उभे होते आणखी दोन पुरुष, एक त्यांचे पती स्वातंत्र्यसेनानी त्यागराज सदाशिवम आणि दुसरे कांची मठाचे महास्वामी परमाचार्य.
सुब्बुलक्ष्मी यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली ती त्यांच्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी, म्हणजे 1926 साली. त्या ध्वनिमुद्रिकेलाही 2026 साली शंभर वर्षे पूर्ण होतील. 17 व्या वर्षी मद्रासच्या संगीत अकादमीत गाण्याचा मान मिळण्याबरोबरच तमिळ चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. वयाच्या 22 व्या वर्षी ‘सेवासदनम’ या पहिल्या तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यापाठोपाठ ‘शकुंतला’, ‘सावित्री’ आणि ‘मीरा’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. 1940 साली, वयाच्या 24 व्या वर्षी त्यांचा विवाह मद्रास काँग्रेसमधील आघाडीचे नेते, निर्भीड गांधीवादी सदाशिवम यांच्याशी झाला. पुढच्याच वर्षी त्यांनी पतीसह वर्धा आश्रमात जाऊन महात्मा गांधींची भेट घेतली. सुब्बुलक्ष्मींनी गायलेले ‘वैष्णव जन तो‘ हे भजन आणि काही मीरेची भजनं गांधीजींना विशेष आवडली. सदाशिवम यांची गुणग्राहकता अशी की, आपल्या पत्नीच्या दैवदत्त गुणांचा आणि मेहनतीचा परिचय सार्या जगाला करून देण्यासाठी त्यांनी आपली हयात वेचली.
त्या भजनांना देशभरात मिळालेल्या लोकप्रियतेनं सुब्बुलक्ष्मी प्रसिद्ध झाल्याच; परंतु त्या भजनांनी लाखो रसिकांच्या हृदयात आध्यात्मिकतेची भावना जागी केली. शास्त्रीय संगीतोपासना हेच आपलं जीवितध्येय असलं पाहिजे याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास थांबला. जी भजनं त्यांनी गायली, ज्या रचना त्यांनी सादर केल्या, संतांच्या ज्या काव्याला त्यांनी चाली लावल्या, त्यानं सार्या आध्यात्मिक क्षेत्राला भक्तिरसात चिंब भिजवून टाकलं. सुब्बुलक्ष्मी यांचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी आवाजाबरोबरच शब्दोच्चारावर लक्ष केंद्रित केलं. ज्या भाषेतील रचना गायची, त्या भाषेचे उच्चार अत्यंत काटेकोरपणे न चुकता यावेत यासाठी त्या अपार मेहनत घेत. जी रचना गायची तिचा अर्थ समजून घेत, प्रत्येक शब्दाचा अचूक उच्चार समजून घेत. त्यांनी एकूण दहा भाषांमध्ये गाणी गायली.
सुब्बुलक्ष्मींचं वेगळेपण हे की, आपल्या आयुष्यातील कोणतेही मोठे निर्णय त्या कांची मठाच्या परमाचार्यांच्या अनुमतीनेच घेत. 1965 च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र दिवसाच्या निमित्ताने त्यांना शांती संदेशपर गायनासाठी निमंत्रण मिळाले. कांची पीठाचे महास्वामी चंद्रशेखरानंद सरस्वती यांनी आपल्या या शिष्येला एक काव्य रचून दिले. ‘मैत्रीं भजत‘ हे अष्टक. त्याचबरोबर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी विश्वशांतीची ऋचा अनुवादित करून त्यांना दिली. अतिशय सोप्या शब्दांत संस्कृत भाषेत रचलेल्या या रचनांना वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. 21 ऑक्टोबर 1966 रोजी अमेरिकेतील कार्नेजी हॉलमध्ये त्यांनी हे अष्टक गायले. हे अष्टक हा निव्वळ शांतीचा, विश्वबंधुत्वाचा संदेश नव्हते, तर सुब्बुलक्ष्मींनी दक्षिण आणि उत्तर भारतीय संगीताचा दुवा सांधण्याचे जे काम आयुष्यभर केले, त्याचाच ते सारांश होते. सुब्बुलक्ष्मी गाणे हे ईश्वरप्राप्तीचे साधन मानत.
देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांचा गौरव केला. युनेस्को पुरस्कृत आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेने 1981 साली त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. 1989 साली पाच वर्षांसाठी नॅशनल टीचर्स प्रोफेसर म्हणून नियुक्तही केले. या नियुक्त्या आणि मिळालेले सन्मान याचे मानधन त्यांनी अनेक रुग्णालये, वैद्यकीय संशोधन केंद्रे, वैदिक पाठशाळा यांना देऊ केले. त्यांचे संस्कृत उच्चारण शुद्ध आणि अचूक होते. श्री विष्णुसहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र या रचना त्यांच्या आवाजातील गोडव्यामुळे अजरामर ठरल्या. सुब्बुलक्ष्मी जशा उत्तम गायिका होत्या, तशाच त्या उत्कृष्ट वीणा आणि मृदंगवादकही होत्या. अमेरिकेप्रमाणेच रशिया आणि फ्रान्समध्येही त्यांच्या अनेक मैफली झाल्या. 1982 साली लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांची मैफल झाली, जिला स्वतः राणी एलिझाबेथ उपस्थित होत्या. 2004 साली, वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ शताब्दीच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने पोस्टाचे, तर संयुक्त राष्ट्र संघाने एका स्मृती तिकिटाचे अनावरण 2016 साली केले.
-------------------------------------