संपू नये अशी गोष्ट

विवेक मराठी    05-Sep-2024
Total Views |
@वैद्य ज्योत्स्ना पेठकर
 
जीवनाची चाकोरीबद्ध मळलेली वाट न चालता अनेक तरुण ऐन उमेदीच्या वयातच जाणीवपूर्वक वेगळा मार्ग स्वीकारतात. क्षेत्र कुठलेही असो... त्यात ते असं योगदान देतात की, त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते, विचारांना नवी दिशा मिळते. ‘आम्ही रवि उद्याचे’ या लेखमालेत तरुणांच्या अशाच प्रेरणादायी गाथा जाणून घेणार आहोत. या लेखमालिकेतला ‘गोष्ट इथे संपत नाही’ हा कथाकथनाचा अभिनव कार्यक्रम करणारे पुण्यातील उच्चशिक्षित, बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असणारे सारंग द्वय - सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांचा परिचय करून देणारा लेख.
 
 
vivek
 
पुण्याचे दोन तरुण. दोघेही उच्चशिक्षित, बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत! आणि गंमत म्हणजे दोघेही सारंग. एक सारंग मांडके, तर दुसरे सारंग भोईरकर ! अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना त्यांच्यात मैत्री होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि आपला संपन्न ऐतिहासिक वारसा याबद्दलचे प्रेम हा दोघांमधील आणि त्यांच्या कट्टा गँगमधील समान धागा!
 
 
भोईरकर बालपणापासूनच ऐतिहासिक वाचनात दंग, तर मांडके एका निमित्त कारणामुळे सखोल आणि संदर्भयुक्त वाचनाशी जोडले गेले. गडांवरची भटकंती होत राहिली आणि सोबत इतिहासातील अनेक घटनांवर सखोल चर्चा! या चर्चेतून एक दिवस एक ’गोष्ट’ सादर झाली. ती कधी संपूच नये असे तिच्या प्रेक्षकांना वाटले आणि ’गोष्ट इथे संपत नाही’चा प्रवास सुरू झाला...
 
 
तू गेल्यापासून कातरवेळी गडावर खिन्न मळभ दाटतं...
वळून पुरंदराकडे पहावं तर आठवणींचं मोहोळ उठतं...
हृदय वज्रासारखं घट्ट आहे असं दाखवतोय खरं फक्त...
हृदयाला न जुमानता आत थैमान घालतंय रक्त...
चिलखतामुळे शरीरावर कदाचित कधीच घाव येणार नाही...
पण आमच्या मनावरचं चिलखत तर तूच होतीस सई...
 
 
सईबाई गेल्यानंतर महाराजांच्या मनातली व्यथा सारंग मांडके मांडत होते. त्यांच्या कवितेतील शब्द न् शब्द मनाला भिडत होता. मनातल्या भावना अश्रू होऊन ओघळत होत्या. अफजल खान वधाच्या काही दिवस आधी महाराजांच्या अर्धांगिनीने त्यांचा निरोप घेतला होता, हे वियोगाचे दुःख मनाच्या तळाशी खोल दाबत आईविना असलेल्या आपल्या अडीच वर्षांच्या शंभू बाळाला कुटुंबीयांवर सोपवून महाराज अफजल खान नावाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज होत होते. त्या क्षणी महाराजांचा एक व्यक्ती म्हणून विचार करताना खूप भरून आले.
 

vivek 
 
सारंग मांडके आणि सारंग भोईरकर गोष्ट सांगत होते आणि सर्व श्रोतृवृंद हुंदका दाबत गोष्ट ऐकत होते. गोष्ट तीच जी लहानपणापासून ऐकली होती; पण ती आता अधिक तपशिलासकट ऐकताना भारावून जायला होत होते. या गोष्टी संपूच नये असे वाटत होते आणि म्हणूनच की काय, या कार्यक्रमाचे शीर्षकसुद्धा अगदी चपखल आहे - ’गोष्ट इथे संपत नाही’.
 
 
‘शिवचरित्र’ तुम्हाआम्हा सगळ्यांचा प्राण आहे. स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून पानिपतच्या अतुलनीय शौर्यापर्यंतचा मराठ्यांचा इतिहास पुनःपुन्हा स्मरावा असाच आहे. मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची शौर्यगाथा वास्तवतेचे भान ठेवून रसाळपणे कथन करणारी गोष्ट इथे संपत नाही. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा नुकताच 125 वा प्रयोग संपन्न झाला. याचे सादरकर्ते होते दोघेही ’सारंग’ आणि दोघेही सॉफ्टवेअर इंजिनीयर!
 
 
हा कार्यक्रम इथपर्यंत पोहोचेल असे कधी वाटले होते का, या प्रश्नाला उत्तर देताना दोघेही म्हणतात, आमच्या आवडीचे रूपांतर असे होईल हे कधीच वाटलं नव्हतं. सात वर्षांपूर्वी मित्राच्या आग्रहाखातर त्याच्या घरात केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा कार्यक्रम आज यशवंतराव, बालगंधर्व, गडकरी रंगायतनसारख्या मोठ्या रंगमंचावर काहिशे प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा होतोय. हे सर्व आई भवानीच्या, शंभू महादेवांच्या आशीर्वादाने, रसिकांच्या प्रेमाने आणि मित्र-मैत्रिणी-कुटुंब यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे घडते आहे.
 
 
कार्यक्रमाचे सादरीकरण अतिशय साधे, दोन मोढे, एक टिपॉय, एक लॅपटॉप आणि ‘गोष्ट...’चा एक बोलका लोगो. बास... दोघे येतात, एकमेकांना पूरक ठरणार्‍या वेगळ्या शैलीत आलटूनपालटून संदर्भासह गोष्टी सांगणे सुरू करतात. ‘गोष्ट इथे संपत नाही मित्रांनो’ असे म्हणत गोष्ट पुढे जात राहते आणि तीन तास आपण खिळून बसलेले असतो.
  
नवी पाक्षिक लेखमाला

आम्ही रवि उद्याचे

 जीवनाची चाकोरीबद्ध मळलेली वाट चालायचं अनेक जण त्यांच्या तरुण वयातच नाकारतात आणि जाणीवपूर्वक वेगळा मार्ग स्वीकारतात. या वाटेत येणारे आव्हानांचे खाचखळगे त्यांच्यातील ध्येयवेड्या वृत्तीला नामोहरम करू शकत नाहीत. जिद्दीने वाटचाल करताना त्यांच्या स्वकर्तृत्वाचे ठसे या वाटेवर उमटतात... यातले काही सामाजिक कार्याचा मार्ग निवडतात, तर काही सामाजिक प्रबोधनाचा. काहींना उद्योग क्षेत्र खुणावतं, तर काही कलासाधनेत रममाण होतात, तर काही हटके करीअर निवडून स्वतःचे एक स्थान निर्माण करतात. एक नक्की, क्षेत्र कुठलेही असो... त्यात ते असं योगदान देतात, की त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते, विचारांना नवी दिशा मिळते.
अशा ‘लक्षवेधी’ युवक/युवतींचा परिचय करून देणारी ‘आम्ही रवि उद्याचे’ ही पाक्षिक लेखमाला ‘साप्ताहिक विवेक’च्या या चालू अंकापासून सुरू करत आहोत. असे तरुण/तरुणी आपल्या परिसरात असल्यास त्यांची थोडक्यात माहिती (मोबाइल नंबरसहित) ‘सा. विवेक’च्या 9594962304/ 8424828560 या संपर्क क्रमांकांवर पाठवावी. त्यातून निवड समिती निवड करेल आणि त्यांच्या कामाचा परिचय करून देणारा लेख ‘सा. विवेक’मध्ये प्रकाशित होईल. नाव नक्की झाल्यावर हा लेख लिहिण्यास आपल्याला रस असेल तर तसेही सांगावे.
  
तारखा, तिथी, व्यक्तींची नावे हे सगळं अचूक सांभाळत रसिकांना खिळवून ठेवणारी ’शैली’ कशी विकसित केली यावर ते दोघे म्हणतात, वेगळे काही प्रयत्न कधीच केले नाहीत. कट्ट्यावर गप्पा मारताना जशा गोष्टी रंगत जायच्या त्याच पद्धतीने गोष्ट सांगत गेलो. कधीही पाठांतर केले नाही, किंबहुना त्याची गरज वाटली नाही. संदर्भ - घटना वारंवार वाचून क्रमवार लक्षात राहतात.
 
 
संपू नये वाटणार्‍या या गोष्टींच्या सादरीकरणाची स्क्रिप्ट लिहिली जात नाही, हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य! मोहीम मांडली असो, दक्षिण दिग्विजय असो, अफजल खान वध असो अथवा बाजीरावांची शौर्यगाथा, गोष्टींचा क्रम फक्त ठरतो आणि दोघेही आपापल्या शैलीत एक एक गोष्ट सांगू लागतात. काही महत्त्वाचे मुद्दे आणि कविता फक्त त्यांच्या समोर असतात.
 
 
सारंग मांडके यांनी याबद्दल खुलासा केला. कुठलीही गोष्ट तयार होण्यासाठी चार गोष्टींचा मेळ लागतो. ठिकाण, घटना, पात्र आणि वेळ... घटना डोक्यात ठेवली, की संदर्भासाठी लागतात ठिकाण, वेळ आणि पात्र याबद्दलचे मुद्दे, तेवढे आम्ही कागदावर मांडतो. गोष्ट लिहून काढत नाही कधीच, किंबहुना त्याची खरंच गरज नसते.
 

vivek 
 
बालपणी दोघेही संघाच्या शाखेत जाणारे, त्याच वेळी शिवाजी महाराजांविषयी आदर, कुतूहल, आत्मीयता याची बीजे नकळत रोवली गेली.
 
 
सारंग भोईरकर यांना इतिहासाची आवड अगदी लहानपणीच लागली. इयत्ता चवथी ते इंजिनीअरिंगपर्यंत पुणे मराठी ग्रंथालयात वाचण्याची आवड जोपासली गेली. अधिक सखोल वाचण्याची ओढ इतिहास संशोधक मंडळात घेऊन गेली आणि संदर्भ ग्रंथ वाचण्याची त्यांना गोडी लागली. इतिहास संशोधक मंडळात बसून वाचन करताना लवाटे सर, बेडेकर सर, मेहेंदळे सर अशा दिग्गजांच्या चर्चा कानावर पडत असत आणि त्यातून सखोल वाचन करण्याची प्रेरणा अधिकच वाढली. इतिहासाच्या या पाऊलखुणा धुंडाळण्यासाठी पाय वारंवार गडांकडे वळू लागले.
 
 
पुढे सारंग मांडके यांच्याशी मैत्री झाली. सॉफ्टवेअर कंपनीत काम करताना महाराष्ट्राबाहेरची, भारताबाहेरची माणसे आली की, ‘पुण्यात काहीही नाही बघण्यासारखे’ असे म्हटले की, उभयतांना वाईट वाटे. आपला संपन्न इतिहास संदर्भासह मांडण्यासाठी सारंग मांडके वाचनाच्या बाबतीत सक्रिय झाले. Bygone times नावाने ब्लॉग सुरू करून दोघेही लिहिते झाले खरे; पण लोकांना वाचण्यापेक्षा ’गोष्ट ऐकणे’ जास्त भावले.
 
 
या गोष्टींमध्ये कविता आणि काही पात्रांचे मनोगत किंवा दोन पात्रांमधला काल्पनिक संवादाचा प्रसंग का घ्यावासा वाटला याचे उत्तर देताना सारंग भोईरकर म्हणाले- गोष्ट सांगताना, त्या कथानकात गुंतलेले असताना कवितेच्या ओळी, काही पात्रांचे मनोगत किंवा जिजाऊ आईसाहेब आणि महाराज यांच्यातला काल्पनिक संवाद या गोष्टी आपोआप सुचत गेल्या. जाणिवांना, भावनांना भिडणार्‍या शब्दांनी गोष्ट अधिकच प्रभावी होत गेली.
 
 
पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटताना महाराजांच्या जागी शिवा काशीद महाराजांचे रूप वठवून बसतात, मृत्यूच्या दारात पोहोचवणार्‍या या साहसाला ते आनंदाने सामोरे जातात, त्या वेळी कदाचित आपल्या आईला ते जे म्हणाले असतील ते भोईरकर त्यांच्या कवितेतून मांडतात.
 
 
आठव दाटून येता बांध नको फोडू अश्रूंचा
तुला ग आई आहे लाभला मान जिजाऊंचा
भरुन पावले तुझे मायपण उद्धार कुळीचा झाला
तुझा पोरगा पहा गे माये शिवबा म्हणोनि मेला
 
 
भोईरकरांचे शब्द अचूक वेध घेतात - क्षणार्धात शिवा काशीद आपल्या डोळ्यांपुढे उभे राहतात. काशीद यांचे, बाजीप्रभूंचेे आणि बांदलांचे बलिदान आठवून हात नकळत जोडले जातात. लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून अशा अनेक ज्ञात-अज्ञात बलिदानांच्या कथा हेही ’गोष्ट...’चे वैशिष्ट्य!
 
 
पानिपतची गोष्ट दोन दिवस रंगते. ही गोष्ट इतकी विस्तृत का, असे विचारल्यावर सारंग मांडके यांनी सांगितले- तुलनात्मकदृष्ट्या सतराव्या शतकापेक्षा अठराव्या शतकातला इतिहास सांगणे खूप अवघड आहे, कारण मराठ्यांच्या इतिहासाची अठराव्या शतकातील व्याप्ती खूप जास्त आहे आणि पानिपत हा त्याचा परमोच्च बिंदू आहे. पानिपतच्या पूर्वार्धाच्या प्रयोगात सगळी पार्श्वभूमी तयार असली की उत्तरार्धाचा पानिपत संग्राम नेमका कळत जातो. शिवाय येणारा प्रेक्षकवर्ग हा इतिहासावर किंवा महाराजांवर प्रेम करणारा असला तरी इतक्या खोलात शिरून त्यांना गोष्टी माहिती असतातच असे नाही. उदाहरणार्थ, गोष्ट सांगताना सय्यद हुसेन अलीचा जर उल्लेख आला, तर ही कोण व्यक्ती होती? तिचा संबंध काय होता? हे सविस्तर आधी मांडावे लागते. त्याशिवाय खरी गोष्ट कळणार नाही. हा संपूर्ण इतिहास जितका सुटा सुटा करून सांगू तितका तो कळणार आहे. फक्त मनोरंजन हा उद्देश नाहीये, इतिहास समजलाही पाहिजे म्हणून तो विस्तृतपणे सांगितलाही गेला पाहिजे.
 
 
‘गोष्ट...’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय. सगळे शो जवळपास हाऊसफुल असतात. यात तरुणांची, किशोरवयीन मुलांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या सुखावणारी आहे. या बाबतीत दोघेही अत्यंत समाधानाने सांगतात, अनेक पालक येऊन जेव्हा सांगतात की, मुलं आधी एकही पुस्तक वाचत नव्हते; पण आता त्यांना आपल्या इतिहासाची पुस्तके वाचायची असतात. मुलूखगिरीला येणारी अनेक मुलं भूषणाचे छंद तोंडपाठ करतात, नवीन काही वाचलं की आवर्जून फोन करतात. हे ऐकलं की काही तरी चांगलं घडतंय याचे समाधान लाभते.
 
 
आपली शौर्यगाथा सांगताना स्फुरण चढलेल्या आवेशात भावनेच्या भरात संदर्भ सोडून बोलले जाऊ शकते; पण इथे स्फुरण चढते, भावना उचंबळून येतात, ‘हर हर महादेव’चा आवेशही असतो; पण तरीही संदर्भ सुटत नाही. हे कसे जमवता, असे विचारल्यावर दोघेही म्हणाले- संदर्भ सोडून बोलण्याची गरजच नाही. आपल्या इतिहासाच्या गोष्टी मुळातच रोचक आहेत, रंजक आहेत, त्यात नको ती ‘लिबर्टी’ घेऊन कथा अधिकच रंजक करण्याची कुठलीही गरज नाही. गोष्ट सांगताना उच्चारल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी असते, उगीच आक्षेप यायला नको म्हणून सगळे संदर्भ वारंवार तपासून घेतले जातात.
 
 
प्रतापराव गुजर यांची गोष्ट सांगताना त्यांच्यासोबत सहा लोक होते हे कशावरून? अशी एका इतिहासप्रेमीकडून विचारणा झाली होती. नारायण शेणवी यांचे दिनांक 5 एप्रिल 1674 चे पत्र उपलब्ध आहे आणि त्यात या घटनेचे सगळे संदर्भ आलेले आहेत- हे पत्र हा ठोस पुरावा संदर्भासाठी कामी आला, आक्षेपाचे खंडन करता आले. शिवा काशीद यांच्याबद्दलदेखील ते नव्हतेच किंवा अशी काही घटना घडली नाही, असा आक्षेप घेतला जातो. या संदर्भी तर डच आणि मुघल यांच्यातला पत्रव्यवहार उपलब्ध आहे आणि त्यात शिवा काशीद, त्यांचे पालखीत बसणे वगैरे सगळे उल्लेख आहेत. असे सगळे अस्सल पुरावे अथवा संदर्भ हाती असल्याशिवाय आम्ही गोष्ट सांगत नाही. शिवाय आपल्याकडच्या मेहेंदळे सरांसारख्या इतिहासातील अनेक तज्ज्ञांनी अनेक संदर्भ लिहून ठेवले आहेत- भरपूर काम करून ठेवले आहे, ते फक्त नीट वाचून अभ्यासले की संदर्भ सोडून बोलले जात नाही.
 
 
समोर 25 लोक असू देत की 700 - प्रत्येकाला असं वाटतं की, हे दोघे मलाच गोष्ट सांगत आहेत. ही भावना पहिल्या प्रयोगापासून आजतागायत जपली गेली आहे आणि म्हणूनच एकच गोष्ट पुनःपुन्हा ऐकण्यासाठी प्रयोग हाऊसफुल होत आहेत. फक्त ’गोष्ट...’च्या माध्यमातूनच नव्हे तर उपलब्ध साहित्याच्या वाचनातून, तज्ज्ञांसोबतच्या चर्चांमधून आपला इतिहास जाणून घेण्याची ओढ प्रत्येकाला असलीच पाहिजे, असे दोघांचेही ठाम मत आहे. याचे कारण विचारले असता सारंग भोईरकर म्हणाले, बाबासाहेबांनी एक खूप छान सांगून ठेवले आहे, की इतिहास वाचताना त्यात राष्ट्राचे शील शोधायचे असते. प्रखर राष्ट्रवाद रुजण्यासाठी, जपला जाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेला संघर्ष माहीत असणे, ही प्रत्येक काळाची, प्रत्येक पिढीची गरज आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या राष्ट्रात कितीही मतप्रवाह असले तरी राष्ट्र म्हणून आपण एक आहोत, ही भावना इतिहासातून उत्तम जपली जाणार आहे.
 
 
सारंग मांडके यांचा अनुभवदेखील अत्यंत बोलका आहे. त्यांना एकदा अमराठी पत्रकाराने विचारले होते की, Why Marathi people are so excited about Maharaj? त्या वेळी त्यांनी दिलेले उत्तर इतिहास का जाणून घ्यायचा याचे उत्तम उत्तर आहे. ते म्हणाले, Yes we are very excited about Shivaji Maharaj but the need of the hour is we should be excited for right reasons.
 
 
हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून चालू असलेला संघर्ष पुढे महाराज गेल्यानंतरही त्यांच्या प्रेरणेने पुढच्या पिढ्यांनी चालूच ठेवला. नर्मदा ओलांडून पुढे अटकेपार मराठे पोहोचले - ही ताकद आहे महाराजांपासून घेतलेल्या प्रेरणेची! प्रत्येकाने ही प्रेरणा घेऊन इतके जरी ठरवले न की - रायगडावर समाधीसमोर उभे राहताना मान खाली घालावी लागेल असे वागायचे नाही - तरी समाजस्वास्थ्य आणि पर्यायाने राष्ट्र जपले जाईल. दोघांनी मांडलेले हे मनोगत अगदीच योग्य आहे.
 
 
‘शिवरायांचा आठवावा साक्षेप’ ही गोष्ट सुरू होती. सारंग भोईरकर राज्याभिषेकाचे वर्णन करीत होते. सर्व प्रेक्षक जणू काही ‘याचि देही याचि डोळा’ तो अविस्मरणीय क्षण अनुभवत होते. सगळे स्तब्ध होते, मनात हर्ष होता, ऊर अभिमानाने भरून आला होता, सुख डोळ्यांतून पाझरत होते, भूमातेच्याच नव्हे तर सगळ्यांच्या भावना भोईरकरांच्या ओघवत्या शब्दांतून व्यक्त होऊ लागल्या-
 
 
‘लेकर अश्रु नयनों में धन्य हो रही भारत माँ
पुनराभिषिक्त होती देख हिंदुस्थान की गरिमा
यादवों का गरुड ध्वज जब देवगिरि से उतरा
हल्दी घाटपर राणा का जो सपना टुटा बिखरा
पृथ्वीराज के शब्द वेध का एक आंखिरी दांव
राय दुर्ग पे आज ये देखो मिट गये सारे घाव’
आपल्या अस्मितेचे स्फुलिंग चेतवत ठेवणार्‍या गोष्टींची ’गोष्ट...’ अशीच निरंतर सुरू राहावी!
‘हर हर महादेव!’