अपहरणनाट्यावर बेतलेल्या नेटफ्लिक्सवरील ’आयसी 814’ या सीरियलच्या निमित्ताने. आमच्या मते ही निरुपद्रवी केवळ मनोरंजन करणारी मालिका नव्हे, तर ही देशद्रोही आणि धर्मद्रोही कथ्य रुजविणारी, विकृत मनोवृत्तीला खतपाणी घालणारी घातक मालिका आहे. विमानाचे अपहरण करून कंदहार विमानतळावर नेऊन ठेवणार्या दहशतवाद्यांची नावे होती - इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काझी, झहीर मिस्त्री आणि शाकीर. ’बस, केवल नाम ही काफी है’ या उक्तीने या अपहरणाच्या कारस्थानात गुंतलेल्यांचा थेट भंडाफोड याने घडून येतोच; पण प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देण्याच्या नादात गुंतलेल्या या मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अपहरणकर्त्यांची नावे बदलून काय ठेवली? तर - भोला, शंकर, बर्गर आणि डॉक्टर... म्हणजे त्यांचा अंत:स्थ हेतू स्पष्टच आहे, या प्रकरणातील सत्य आणि तथ्य झाकून एक वेगळेच कथ्य त्यांना स्थापित करायचे आहे.
संपूर्ण जग नाताळ साजरा करण्याच्या तयारीत असताना 24 वर्षांपूर्वी म्हणजेच 24 डिसेंबर 1999ला एका घटनेने संपूर्ण भारत हादरला होता. काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीला येणार्या आयसी 814 या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे हरकत-उल-मुजाहिद्दीन या कट्टर इस्लामी जिहादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. विमानात एकूण 176 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर्स होते. दहशतवाद्यांनी प्रथम विमान पाकिस्तानात नेले आणि शेवटी विमान कंदहार विमानतळावर उतरवण्यात आले. याआधी हे विमान दुबईलाही नेण्यात आले आणि येथे दहशतवाद्यांनी 27 प्रवाशांना खाली उतरवले, ज्यात बहुतेक महिला आणि मुले होती. अपहरणामुळे भारत सरकारच्या अडचणी वाढत होत्या. प्रवाशांचे कुटुंबीय आणि काही संघटना आंदोलन करत होत्या. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी त्यांच्या दहशतवादी साथीदारांची सुटका आणि खंडणीची मागणी केली होती आणि भारत सरकारने दहशतवाद्यांशी चर्चा सुरू केली होती. भारतीय प्रवाशांशिवाय ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स आणि इटली या देशांचे नागरिकही अपहरण झालेल्या विमानात होते. शेवटी नाइलाजाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तत्कालीन एनडीए सरकारला तीन दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान आणि जसवंत सिंह परराष्ट्रमंत्री होते. मौलाना मसूद अझहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद या अटकेत असणार्या तीन दहशतवाद्यांना खास विमानाने परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह कंदहारला सोडून आले. ओलिसांची सुटका करण्यात आली. ही झाली या अपहरणाची खरीखुरी म्हणजे सत्य हकिकत.
यातील तथ्य काय होते? तर हा निर्णय घेण्याशिवाय सरकारपुढे अन्य पर्याय नव्हता. युनोच्या सुरक्षा समितीलाही यात काही करावे असे वाटले नाही. दहशतवादी लढ्यात भारत एकाकी पडला. आम्ही त्या वेळी आपल्या संपादकीयातून ‘दहशतवाद्यांचे मनोबल वाढविणारा निर्णय’ असे भाष्य यावर केले होते. कारण हे प्रकरण आपल्या राष्ट्रीय धैर्याची कसोटी पाहणारे होते. या कसोटीला देशातील प्रचार यंत्रणा, अपहरण झालेल्यांचे नातेवाईक, यांचे सहानुभूतीदार आणि शासनही उतरले नव्हते. दहशतवाद्यांनी या अपहरणनाट्यात शासनावर भावनिक दबाव टाकण्याचे तंत्र वापरले होते. देशातील प्रसिद्धीमाध्यमे दुर्दैवाने तेव्हा या तंत्राचा वापर होऊ देणारी साधनेच बनली होती. दहशतवाद्यांचा लढा केवळ भारत सरकारशी नव्हता, तर तो सर्व मानवतेच्या विरोधात होता. त्यामुळे सर्व समाजाचे मनोबल अत्यंत प्रभावी राहण्यासाठी तेव्हा सरकारने प्रत्याघाती कृती करण्याची गरज होती. तसे न घडता दहशतवाद्यांपुढे शरण जाऊन ते मनोबल कमी केल्याचे दु:ख आम्ही तेव्हा व्यक्त केले होते. हे सर्व तथ्य विसरून चालणार नाही.
आज हे सर्व पुन्हा सांगण्याची गरज निर्माण झाली आहे ती या अपहरणनाट्यावर बेतलेल्या नेटफ्लिक्सवरील ’आयसी 814’ या सीरियलच्या निमित्ताने. आमच्या मते ही निरुपद्रवी केवळ मनोरंजन करणारी मालिका नव्हे, तर ही देशद्रोही आणि धर्मद्रोही कथ्य रुजविणारी, विकृत मनोवृत्तीला खतपाणी घालणारी घातक मालिका आहे. विमानाचे अपहरण करून कंदहार विमानतळावर नेऊन ठेवणार्या दहशतवाद्यांची नावे होती - इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर सईद, सनी अहमद काझी, झहीर मिस्त्री आणि शाकीर. ’बस, केवल नाम ही काफी है’ या उक्तीने या अपहरणाच्या कारस्थानात गुंतलेल्यांचा थेट भंडाफोड याने घडून येतोच; पण प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देण्याच्या नादात गुंतलेल्या या मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अपहरणकर्त्यांची नावे बदलून काय ठेवली? तर - भोला, शंकर, बर्गर आणि डॉक्टर... म्हणजे त्यांचा अंत:स्थ हेतू स्पष्टच आहे, या प्रकरणातील सत्य आणि तथ्य झाकून एक वेगळेच कथ्य त्यांना स्थापित करायचे आहे. हे कथ्य आहे हिंदू अथवा भगवा दहशतवाद. जणू हिंदू अतिरेक्यांनीच हे सर्व घडवून आणले, असा बनाव उभा करण्याचा हा खटाटोप आहे. हा दिग्दर्शक आणि ही मंडळी खरोखर प्रामाणिक असती, तर या घटनेवर भाष्य करत राष्ट्रभक्तीची ज्योत नव्या पिढीच्या मनात पेटवून दहशतवादाच्या विरोधातील जागतिक लढ्याला तीव्र धार मिळवून देण्याचे विधायक कार्य करण्याची सुवर्णसंधी त्यांना यानिमित्ताने मिळाली होती; पण तिचे मातेरे करण्याचा अनुभवच त्यांनी या मालिकेतून दिला आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली होणारा हा कलात्मक दहशतवाद वेळीच रोखण्याची गरज आज आहे. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने खडसावल्यानंतर, नेटफ्लिक्सने चूक कबूल करत दहशतवाद्यांची खरी नावे दाखविण्याचे तसेच मालिकेच्या आरंभी डिस्क्लेमरमध्ये सुधारणा करण्याचे मान्य केले; पण मुळात त्यांना असे धाडसच कसे झाले? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. संवेदनशील विषयाची हाताळणी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अतिरेक्यांना मानवी चेहरा देणे, त्यांच्याबाबत सहानुभूती निर्माण करणे हे कोणत्या दर्जाचे देशप्रेम आहे हे निर्माता आणि दिग्दर्शकांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. मुळात ही मालिकाच करायची ती कशासाठी? दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी? ते कसे धीरोदात्त पुरुष होते हे सांगण्यासाठी? की जे आतापर्यंत दहशतवादाचे बळी ठरत आलेले आहेत त्या हिंदूंनीच हा अपहरणाचा बनाव रचला हे कथ्य स्थापित करण्यासाठी व आताच्या पिढीची मने कलुषित करण्यासाठी? त्याऐवजी, जर त्या अटीतटीच्या प्रसंगी जागतिक पटलावर भारत दहशतवादी लढ्यात कसा एकाकी पडला होता, जागतिक महासत्ता बिरुद मिरविणारी अमेरिकेसारखी राष्ट्रे कशी हतबल होती, प्रसारमाध्यमांसमोर आपल्या नातेवाईकांच्या सुरक्षित घरवापसीसाठी रडणारे-भेकणारे चेहरे मिरविण्याऐवजी संघटितपणे उभे ठाकून धैर्याने आपल्या सरकारची पाठराखण करण्याची संधी आपल्या घरातील तेव्हाच्या वरिष्ठ मंडळींनी कशी वाया घालविली हे सर्व अधोरेखित करीत दहशतवाद मुळासकट संपविण्याचे सकारात्मक आवाहन करता आले असते; कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होताना याचाही विचार या मंडळींनी केला पाहिजे.