प्रेरक जीवनचरित्राची झलक रघुवीर

विवेक मराठी    04-Sep-2024   
Total Views |
आपल्या समाजावर अनेक दिशांनी होत असलेल्या घातक आक्रमणांची आपल्याला जाणीव नसल्यामुळे व आपण त्याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे आजही आपले समाजमन निद्रिस्तच असते. अशा सनातन समाजाला जागे करण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत, याची दिशा ‘रघुवीर’ या चित्रपटातून नक्कीच मिळू शकते. समर्थांचे आपल्यावरील ऋण जाणणार्‍या प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा आणि इतरांना पाहायला सांगावा.


Raghuveer Movie Review
 
एखादा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळणेच फार महत्त्वाचे असते. संत रामदास हे आपल्याकडे या ना त्या स्वरूपात घराघरांत परिचित असलेले प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व. ‘भीमरूपी महारुद्रा’ हे हनुमानाचे स्तोत्र असो की त्यांचे ‘मनाचे श्लोक’ असोत; गणपती, शंकर आणि हनुमानाच्या आरतीच्या स्वरूपात ते प्रत्येकाच्या घरात असतातच असतात. आजवर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यावर चित्रपट काढले गेले. मात्र समर्थांच्या कार्याची मांडणी करणारी आजच्या काळात तयार झालेली प्रभावी कलाकृती उपलब्ध नव्हती. यापूर्वी त्यांच्यावर बनलेला चित्रपट होता तो 1949 मधला. अरविंद गोखले यांनी कथा-पटकथा-संवादलेखन केलेल्या आणि राजा नेने यांची निर्मिती असलेल्या ‘संत रामदास’ या तेव्हाच्या चित्रपटाची नोंद मिळते. फार मोठ्या कार्याचा आणि अतिशय महत्त्वाच्या ग्रंथसंपदेचा वारसा आपल्यासाठी मागे सोडून गेलेल्या समर्थांच्या कार्याला अशा स्वरूपात यापूर्वीच उजाळा मिळायला हवा होता. संत नामदेव व संत एकनाथ हे दोघेही तसेच याबाबतीत दुर्लक्षित संत.
 
 
संत रामदासांवर चित्रपट काढला जावा, अशी निर्माते अभिनव पाठक यांची इच्छा असल्याचे ऐकले. केवळ अशी प्रेरणा घेण्याबद्दलच नव्हे; तर हा चित्रपट प्रत्यक्षात आणल्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि अभिनंदन. विविध कारणांमुळे हा चित्रपट काही वर्षे रखडला असे ऐकले. अनेक बाळबोध आणि तद्दन निरर्थक विषयांवरील चित्रपटांवर कोट्यवधी रुपये ओतले जाण्यातून काय निष्पन्न होते हा भाग वेगळाच; मात्र अशा प्रेरणादायक विषयावरील चित्रपटाच्या मार्गात अनेक विघ्ने येणे, हे आजच्या ‘हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा’ काळाशी सुसंगतच आहे.
 
संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा
तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी
@रवींद्र गोळे
* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.
 
  
संत परंपरेमध्ये संत रामदास आणि संत नामदेव अशा संतांचे कार्य वेगळे अशा कारणाने, की ते सतत फिरते होते. हनुमानाला समोर ठेवून बलोपासना (आज दिसतात तशी जिम नव्हेत) केली, तर अन्यायाविरोधात लढण्यासाठीचा समाजातील आत्मविश्वास जागा होईल, ही कल्पना करता येणे हे केवढे विशेष आहे! आजच्या गणेशोत्सवातला धार्मिक व सामाजिक जागृतीचा भाग बव्हंशी हरपल्याचे दिसत असले, तरी ब्रिटिशांनी लादलेल्या पारतंत्र्याविरोधात समाजजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा मार्ग सुचवणार्‍या लोकमान्य टिळकांनी एक प्रकारे समर्थांच्याच पावलावर पाऊल ठेवले होते असे म्हणता येईल. संत रामदास, संत ज्ञानेश्वर आणि बालशिवबा या तिघांकडे अतिशय कोवळ्या वयात असलेली दिव्यत्वाची असामान्य समज हे या तिघांचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. सनातन हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी आदिशंकराचार्यांनी देशाच्या चार भागांमध्ये जे मठ निर्माण केले, त्या धर्तीवरचा प्रयोग समर्थांनी विविध ठिकाणी हनुमानाची उपासनेसाठी मठ स्थापून केला आणि तोदेखील धार्मिक कार्याबरोबरीने धर्मरक्षणाची जाणीव निर्माण होण्यासाठी केला. हे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. आज आपण स्वत:ला स्वतंत्र म्हणवत असलो तरी आपल्या समाजावर अनेक दिशांनी होत असलेल्या घातक आक्रमणांची आपल्या जाणीव नसल्यामुळे व आपण त्याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे आजही आपले समाजमन त्या दृष्टीने निद्रिस्तच आहे. अशा सनातन समाजाला जागे करण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत, याची दिशा यातून मिळू शकते. समर्थांच्या कार्याचे महत्त्व आजच्या काळातही लागू होते ते असे.
 
 

Raghuveer Movie Review
 
स्वत:ला रामभक्तीसाठी वाहून घेतलेल्या समर्थांचा पाखंडाला असलेला विरोध, त्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेणे, त्या काळामध्ये त्यांनी विधवांना आपल्या समाज-धर्मकार्यामध्ये सामावून घेणे आणि शरीराबरोबरच मनाच्या सामर्थ्याचे महत्त्व अधोरेखित करणे असे भाग कथानकातून समर्थपणे आले आहेत. संत वेणाबाई यांचे उपकथानक त्यामुळे महत्त्वाचे ठरते. मनाच्या सामर्थ्यावर भर देण्याची त्यांची शिकवण केवळ भारतवर्षातच नव्हे; तर संपूर्ण जगामध्ये विलक्षण ठरेल इतकी महत्त्वाची आहे. समर्थांच्या नावाने अनेक चमत्कार सांगितले जातात. त्यांना कथानकात थारा न देणे हे स्वागतार्ह आहे.
 
 
सुधीर फडके यांच्या 1986 मधील जाहीर कार्यक्रमादरम्यान त्यांनी ‘झाला महार पंढरीनाथ’ हे गीत म्हणावे, अशी विनंती रसिकांनी केली होती. त्या वेळी ते म्हणाले होते, की आग्रह आहे म्हणून ते हे गीत सादर करतील; मात्र यवन राजाकडून आपल्या सद्गुणी भक्तावर अन्याय होत असेल, तर त्याला शासन करण्याऐवजी हिंदूंचा देव त्याच्या दरबारात हजर होतो, हे दाखवणारी घटना प्रत्यक्षात घडलेली नसेल तर तेच बरे ठरेल, कारण अशी घटना हे खरे तर आपल्यावरचे एक प्रकारचे लांछन समजायला हवे. समर्थांनी एका निरपराध पाटलाला आदिलशहाच्या तावडीतून सोडवले ते गयावया न करता; आपल्या सामर्थ्याची योग्य ती जाणीव करून देत आणि आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर.
 
 

Raghuveer Movie Review 
 
कथानक पुढे नेण्याकरिता सचिन खेडेकर यांच्या आवाजातील निवेदनाचा मधूनमधून योग्य वापर केला आहे. त्यांच्याच निवेदनातून समर्थांचा कार्यविस्तार नकाशाच्या माध्यमातून दाखवला असता तर तो अधिक स्पष्टपणे समजला असता. गणपतीच्या आरतीवर बराच भर दिला आहे. चित्रपट संपतानादेखील आरतीऐवजी सामूहिक ‘मनाचे श्लोक’पठण अधिक प्रभावी ठरले असते. मनाच्या श्लोकांचा पुरेसा खणखणीत उच्चार चित्रपटगृहात व्हायला हवा होता असे वाटले खरे. समर्थ आपल्या मातोश्रींना भेटायला येतात, तो प्रसंग फारच सामान्य वठला आहे. हा प्रसंग खरे तर आग्र्याहून सुटका करून घेतल्यावर शिवाजीराजे आपल्या चिंताग्रस्त मातेची भेट घेतात, त्या हृद्य प्रसंगाचे स्मरण होण्यासारखा प्रभावी व्हायला हवा होता. शिवरायांचा राज्याभिषेक हा उभ्या हिंदुस्थानासाठी एक अभिमानाचा प्रसंग होता. त्यानिमित्ताने ‘बुडाला औरंग्या पापी’ असा उल्लेख असलेल्या समर्थांच्या ‘आनंदवनभुवनी’ या अद्भुत रचनेला चित्रपटात स्थान मिळायला हवे होते. शिवरायांच्या निर्वाणाची बातमीदेखील सपकपणे दाखवली आहे. संभाजीराजांनी लावलेल्या सज्जनगडाच्या व्यवस्थेचा संदर्भ यायला हवा होता. शिवरायांच्या सातारा गादीच्या परंपरेमध्येच नव्हे; तर शहाजीराजांच्या तंजावरमधील वारसांमध्ये समर्थांचे स्थान केवढे मानाचे होते, याबद्दलचे अनेक पुरावे आता उपलब्ध आहेत. असे पुरावे सूचकपणे मांडायला हवे होते. समर्थांची आजच्या उत्तराखंडमधील श्रीनगरमध्ये शीख गुरू हरगोविंद यांच्याशी झालेली भेट, ही एक असामान्य घटना होती. तिला पुरेसा न्याय देता आलेला नाही. एकीकडे नारायणाच्या बालपणावर बराच वेळ खर्च केला जात असताना समर्थांचे कर्तृत्व मांडू शकणार्‍या या अतिशय महत्त्वाच्या भागाला न्याय न मिळण्याचा प्रकार झालेला दिसतो. समर्थांच्या निर्वाणाचा प्रसंग त्यातल्या त्यात प्रभावीपणे घेतला आहे. नारायणाचा बालपणीचा चुणचुणीतपणा अजिबातच नैसर्गिकपणे दिसत नाही. तीच बाब ऋजुता देशमुख यांच्या भूमिकेची. अशा काही ठिकाणी दिग्दर्शकाच्या मर्यादा जाणवल्याशिवाय राहवत नाहीत. अशा प्रकारचे कथानक आपण यापूर्वी हाताळलेले नाही, असे दिग्दर्शकाने सांगितल्याचे ऐकले.
 
 
 
चित्रपटाचे लेखन हा नेहमीच महत्त्वाचा घटक असतो. कोणताही अभिनिवेश न आणता आपला मुद्दा मांडण्यात अभिराम भडकमकर यांची त्यांच्या ‘सीता’ या कादंबरीत दिसणारी हातोटी येथेदेखील दिसते. दुष्प्रचाराला बळी न पडता त्यांनी समर्थ-शिवराय भेटीचा प्रसंग पडद्यावर आणला, यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन. वर उल्लेख केलेल्या सर्व उणिवा विक्रम गायकवाड समर्थांच्या भूमिकेत भरून काढतात. समर्थांच्या वयोमानाप्रमाणे त्यांनी आपल्या अभिनयशैलीत व आवाजात केलेले बदल प्रभावी ठरतात. ही भूमिका स्वीकारल्यानंतर मांसाहार सोडण्याची इच्छा आपोआपच निर्माण झाली, असे ते सांगतात. ओळखू येणार्‍या कलाकारांमध्ये शैलेश दातार आणि राहुल मेहेंदळे आहेत. अजित परब यांचे संगीत आणि मंदार चोळकर यांची गीते असलेल्या या चित्रपटाचा एकूण प्रभाव निश्चितपणे चांगला आहे. रवींद्र साठे यांचा आवाज बर्‍याच काळानंतर ऐकायला मिळाला. दिग्दर्शन नीलेश कुंजीर यांचे आहे.
 
 
अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटगृहांमधील तिकिटांचे दर माफक ठेवायला हवेत. ज्याला आपण पुण्याचे आणि समाजहिताचे काम म्हणतो, असे काम या सर्व मंडळींनी नि:संशयपणे पार पाडले आहे. समर्थांचे आपल्यावरील ऋण जाणणार्‍या प्रत्येकाने हा चित्रपट पाहायला हवा आणि इतरांना पाहायला सांगावा, इतका छान असा हा चित्रपट नक्कीच बनला आहे. शाळांना सुट्या नाहीत हे कारण न देता पालकांनी तो आपल्या मुलांना आवर्जून दाखवायला हवा.