ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णकमाई

विवेक मराठी    27-Sep-2024   
Total Views |
Chess Olympiad 2024
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
पॅरिस येथे 1924 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याच वेळी बुद्धिबळ खेळाची स्पर्धादेखील खेळवली गेली. खरं तर ऑलिम्पिकमध्ये बुद्धिबळ या खेळाचाही समावेश व्हावा या दृष्टीने हा प्रयत्न होता; मात्र तो अपयशी ठरला. बुद्धिबळ ऑलिम्पियाडची सांगता झाली आणि त्याच दिवशी जागतिक बुद्धिबळ संघटनेची (फिडे) स्थापना करण्यात आली. 1927 मध्ये फिडेने पहिल्यांदाच अधिकृतपणे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केले. 1950 पासून नियमितपणे दर दोन वर्षांनी ही स्पर्धा भरवली जाते. पहिल्या अधिकृत ऑलिम्पियाडमध्ये फक्त 16 संघ सहभागी झाले होते. हाच आकडा 2014 मध्ये संपन्न झालेल्या 41व्या ऑलिम्पियाडमध्ये 172 वर पोहोचला.
 
स्पर्धेचे स्वरूप
 
बुद्धिबळ हा वैयक्तिक प्रकारात मोडणारा खेळ आहे; पण ऑलिम्पियाडमध्ये सांघिक स्वरूपामध्ये हा खेळ खेळला जातो. प्रत्येक संघ आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. प्रत्येक संघामध्ये एकूण पाच खेळाडू असतात. प्रत्येक फेरीत त्यापैकी चार खेळाडू एकाच वेळी वेगवेगळ्या बोर्डवर खेळत असतात. प्रत्येक संघाचा एक कर्णधारही असतो. प्रत्येक फेरीत कोणते चार खेळाडू खेळतील हे ठरवण्याचा अधिकार कर्णधाराकडे असतो. अर्थात हा निर्णय सर्व खेळाडू एकमेकांशी चर्चा करूनच घेत असतात. कर्णधारावर स्पर्धेत खेळण्याची सक्ती नसते. स्पर्धा दोन गटांत खेळली जाते- खुला गट आणि महिला गट. पुरुषांसाठी स्वतंत्र गट नसतो; तर महिला खेळाडू खुल्या गटामध्येही खेळू शकतात.
 
 
स्विस सिस्टीम
 
सहभागी संघांची संख्या पाहता ही स्पर्धा कशी खेळवली जात असेल, हा विचार मनात येणे साहजिकच आहे. स्पर्धेत एकूण 11 फेर्‍या असतात आणि ही स्पर्धा स्विस सिस्टीमने खेळवली जाते. स्विस सिस्टीममध्ये कोणताही संघ बाद होत नाही. पहिल्या फेरीत जास्त रेटिंग असलेले संघ कमी रेटिंग असलेल्या संघांविरुद्ध खेळतात. सामना जिंकल्यास खेळाडूला एक गुण, तर अनिर्णित राहिल्यास अर्धा गुण मिळतो. चारही खेळाडूंच्या गुणांची एकत्रित बेरीज करून विजेता संघ ठरवला जातो आणि विजेत्या संघाला दोन मॅच पॉइंट्स दिले जातात. सामना बरोबरीत संपला असेल तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळतो. दुसर्‍या फेरीपासून समान गुण मिळवलेल्या संघांमध्ये सामने खेळवले जातात. ह्यामुळे सर्वच संघांना जास्तीत जास्त गुण कमावण्याची समान संधी मिळते. मजबूत संघ विरुद्ध कमकुवत संघ असा खेळ इथे होत नाही. 11 फेर्‍यांनंतर सर्वाधिक गुण मिळवणारा संघ स्पर्धेचा विजेता ठरतो.
 
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील
भारताची आत्तापर्यंतची कामगिरी
 
 
2014 मध्ये नॉर्वे येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला पहिल्यांदाच पदक मिळालं होतं. खुल्या गटात भारतीय संघाने कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर थेट 2022 मध्ये भारताला पुन्हा एकदा कांस्यपदक मिळालं. ही स्पर्धा भारतात पार पडली होती. चेन्नईमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या खुल्या गटातील संघाने तसेच महिला संघानेही कांस्यपदक मिळवलं होतं. शिवाय भारताला दोन्ही गटांत मिळून एकूण सात वैयक्तिक पदके मिळाली होती. गुकेश आणि निहाल सरिन हे वैयक्तिक सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. अर्जुन एरिगसीला रौप्य, प्रज्ञानंदला कांस्य तसेच महिला गटात वैशाली, तानिया आणि दिव्याला कांस्यपदक मिळालं होतं. या स्पर्धेनंतर अनेक दिग्गज बुद्धिबळ खेळाडूंनी भारत येणार्‍या भविष्यकाळात या खेळावर आपलं वर्चस्व गाजवणार, हे सूचित केलं होतं. 2024 च्या स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी हा विश्वास सार्थ ठरवला.
 
 
बुडापेस्ट ऑलिम्पियाड 2024
 
 
हंगेरी देशामध्ये पार पडलेल्या स्पर्धेत खुल्या विभागात 193, तर महिला विभागात 181 संघांनी भाग घेतला होता. इतक्या मोठ्या संख्येने संघ सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेत खुल्या गटात अमेरिकेपाठोपाठ भारताला दुसरे मानांकन मिळाले होते, तर महिला गटामध्ये भारताचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. काही मोजके अपवाद वगळता जगातील सर्वच आघाडीचे खेळाडू आपापल्या देशासाठी खेळत होते. भारताच्या संघात गुकेश दोम्माराजू, प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, विदित गुजराथी आणि पेंटला हरिकृष्णा हे पाच खेळाडू होते. श्रीनाथ नारायण या संघाचा कर्णधार होता. महिला गटातील संघामध्ये हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, तानिया सचदेव आणि वंतिका अग्रवाल यांचा समावेश होता. अभिजीत कुंटे संघाचे कर्णधार होते.

Chess Olympiad 2024
 
भारताची कामगिरी
खुला गट
 
भारताच्या खुल्या गटातील संघ अगदी समतोल होता, असं म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांमध्ये झपाट्याने प्रगती करत भारताचा क्रमांक एकचा खेळाडू बनण्याचा मान मिळवलेला अर्जुन, कॅण्डिडेट्स स्पर्धा जिंकून विश्वविजेत्याचा आव्हानवीर ठरलेला गुकेश, विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद यांच्याबरोबरच अनुभवी विदित आणि हरीकृष्णा. अगदी पहिल्या फेरीपासूनच या संघाने आपली आघाडी टिकवून ठेवली. सुरुवातीची आव्हाने अर्थातच अगदी सोपी होती, मात्र सातव्या फेरीत चीन आणि दहाव्या फेरीत अमेरिकेला धक्का देऊन भारतीय खेळाडूंनी सगळ्यांची मने जिंकली. अमेरिकन संघाला स्पर्धेत अग्रमानांकन होतं, तर भारतीय खेळाडू द्वितीय मानांकित होते. पहिल्या बोर्डवर गुकेशचा सामना होता जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या कारूआनाशी. हा सामना चुरशीचा होणार याची सर्वांनाच खात्री होती. या सामन्यात गुकेशने बाजी मारली. चेन्नई ऑलिम्पियाडमध्येदेखील गुकेशने कारूआनाला पराभूत केलं होतं. हंगेरीमध्ये याच निकालाची पुनरावृत्ती दिसून आली. या फेरीत प्रज्ञानंद पराभूत झाला, मात्र अर्जुनचा विजय आणि विदितची सामन्यात बरोबरी ह्यामुळे भारताने अमेरिकेवर मात केली. सातव्या फेरीत चीनच्या खेळाडूविरुद्धही गुकेशने अशाच एका संस्मरणीय विजयाची नोंद केली. सामना बरोबरीत सुटेल असे वाटत असताना गुकेशने जबरदस्त ‘एंडगेम’ करून दाखवला. लवकरच तो चीनच्याच डिंग लिरेनविरुद्ध विश्वविजेतेपदासाठी सामना खेळणार आहे.
 
 
गुकेशबरोबर या स्पर्धेत मोलाचा वाटा उचलला तो अर्जुनने. अर्जुन सर्वच्या सर्व म्हणजे 11 सामने खेळला आणि त्याने त्यात दहा गुण मिळवले. विदित गुजरातीनेदेखील जबाबदारीने खेळ केला. प्रज्ञानंदसाठी स्पर्धा थोडीशी चढउतारांची होती. एका सामन्यात त्याला पराभवही पत्करावा लागला; पण शेवटच्या फेरीत विजय मिळवून त्याने संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ही स्पर्धा सांघिक होती आणि भारतीय खेळाडू संघ म्हणून अतिशय उत्कृष्टपणे खेळले. हे सर्वच खेळाडू एकमेकांबरोबर बराच काळ खेळत असल्यामुळे त्यांच्यातील मैत्रीही दिसून येत होती. वैयक्तिक हितापेक्षा संघहिताला महत्त्व देण्याची वृत्ती प्रत्येकामध्येच दिसून आली आणि या सगळ्या गोष्टींमुळेच भारत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरू शकला.
 
 
महिला गट
 
भारताच्या पाच महिला खेळाडूंमध्ये हरीका आणि वैशाली ह्या दोन ग्रँडमास्टर्स होत्या. सुरुवातीला आपल्या संघाला द्वितीय मानांकन होतं, मात्र चीनच्या आघाडीच्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे भारताचा संघ स्पर्धेत अग्रमानांकित झाला. खुल्या गटापेक्षा महिलांसाठी आव्हान थोडे कठीण होते. कोनेरू हम्पीची अनुपस्थिती हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र आपल्या संघाने जिद्दीने खेळ केला. चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये महत्त्वाच्या क्षणी खराब खेळ झाल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. या वेळीदेखील शेवटच्या फेरीपर्यंत पदकाच्या रंगाची खात्री नव्हती. आठव्या फेरीत पोलंडने भारताला पराभवाचा धक्का दिला; तर नवव्या फेरीत अमेरिकेविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. शेवटच्या फेरीत अझरबैजानविरुद्ध विजय मिळवण्याची गरज होती, शिवाय अमेरिका विरुद्ध कझागिस्तान या सामन्याचा निकालही भारतासाठी महत्त्वाचा ठरणार होता. शेवटी सगळ्या गोष्टी भारताच्या बाजूने घडल्या आणि ह्या गटातही भारताला सुवर्णपदक मिळालं. दिव्या देशमुख आणि वंतिका अग्रवाल या दोघींनी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन केलं.
 
 
पारितोषिके
 
दोन्ही संघांना चषक आणि सुवर्णपदके तर मिळालीच; पण त्याचबरोबर गुकेश, अर्जुन, दिव्या आणि वंतिका ह्या चार खेळाडूंना वैयक्तिक सुवर्णपदकदेखील मिळाले. दोन्ही संघांच्या एकत्रित कामगिरीमुळे भारताला गप्रिंडशविली (Gaprindashvili) चषकही मिळाला. ह्या स्पर्धेने भारतीय खेळाडूंनी संपूर्ण बुद्धिबळविश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.
 
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकाच ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही गटांत सुवर्णपदक मिळवणारा भारत हा केवळ तिसरा देश आहे. ह्याआधी चीन आणि सोव्हिएत युनियनच्या संघांनी अशी कामगिरी केली होती.
 
 
बुद्धिबळ खेळातील भारताची घोडदौड
 
1988 मध्ये विश्वनाथन आनंदच्या रूपात भारताला पहिला चेस ग्रँडमास्टर मिळाला. त्यानंतर अनेक वर्षे भारतीय बुद्धिबळ म्हटलं की, फक्त आनंद हे एकच नाव समोर यायचं. खेळाडू नव्हते असं नाही; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करणारा आनंद एकटाच होता. आज भारताकडे 85 ग्रँडमास्टर्स आहेत. बरेचसे खेळाडू वयाने अगदीच तरुण आहेत. अगदीच विशीच्या आत-बाहेर असणारे हे खेळाडू मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जगातील आघाडीच्या खेळाडूंना चांगली टक्कर देत आहेत. डिसेंबरमध्ये तर गुकेशला विश्वविजेता होण्याची चांगली संधी आहे. ह्याआधी अशी कामगिरी केवळ एकाच भारतीय खेळाडूला करता आली होती, तो आहे अर्थातच विश्वनाथन आनंद. आनंद पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. त्याला बघत मोठी झालेली ही मुलं आज क्रमवारीत त्याला मागे टाकून पुढे गेली आहेत. आनंद आता फारसा खेळत नसला तरी जागतिक बुद्धिबळ संघटनेचा तो उपाध्यक्ष आहे आणि भारतातील खेळाडूंना मार्गदर्शनही करतो. वेस्टब्रिज आनंद चेस अकादमीच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडवण्याचं काम सुरू आहे. ह्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात पोडियमवर सुवर्णपदक विजेता भारतीय संघ उभा होता आणि त्याच वेळी पदक आणि चषक प्रदान करण्यासाठी विश्वनाथन आनंदही उपस्थित होता. हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद प्रसंग होता. ह्या महिन्याच्या अखेरीला फिडेमार्फत जाहीर होणार्‍या अधिकृत जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये अर्जुन आणि गुकेश हे दोन भारतीय खेळाडू दिसतील, अशी आशा आहे. शिवाय ह्या खेळामधील एक मैलाचा दगड म्हणजे 2800 रेटिंग पॉइंट्स मिळवणे, तो टप्पाही आता आपल्या ह्या दोन खेळाडूंच्या अगदी दृष्टिक्षेपात आला आहे.
भारतीयांची ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहो, ह्याच सदिच्छा!!!