वसमत तालुक्यातील खाजमापूरवाडी येथील उमेश मुके या तरुण शेतकर्याने केळी प्रक्रिया उद्योगातून आर्थिक समृद्धी साधली आहे. मुके यांची आठ एकर शेती आहे. केळी, सोयाबीन, गहू, हरभरा हे त्यांचे मुख्य पीक. केळीची उपलब्धता लक्षात घेऊन सन 2018 साली उमेश यांनी आई अन्नपूर्णा यांच्या मदतीने घरगुती केळी चिप्स बनवायला सुरुवात केली. स्थानिक बाजारपेठेत केळी चिप्सला मागणी मिळाली. कोरोनाकाळात व्यवसायाला फटका बसला. तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातून प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. 2023 साली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेतला. 28 लाखांच्या भांडवलात ‘सिद्ध अन्नपूर्णा फूड्स’ या उद्योगाची उभारणी केली. पुणे येथून पॅकिंग मशीन, तर मुंबई येथून बॉयलर मशीन आणले. 30 ग्रॅमपासून ते 1000 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये चिप्सची विक्री करतात. नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर येथे मालाची विक्री करतात. या माध्यमातून वर्षाकाठी 10 ते 12 लाखांची उलाढाल करतात. या माध्यमातून सहा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यवसायात वडील बाबाराव, आई अन्नपूर्णा व बंधू सोमनाथ यांची साथ लाभली आहे. एका छोट्याशा गावात उपलब्ध कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योग उभा करून उमेश मुके यांनी सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे.
- प्रतिनिधी