डिजिटल व्यक्तिचित्रांचा विश्वविक्रमवीर प्रणव सातभाई

विवेक मराठी    23-Sep-2024
Total Views |
@अश्विनी विद्या विनय भालेराव
 
सुरुवातीला छंद आणि टाइमपास करण्याचे, नवीन अनुभवाचे साधन म्हणून हाती घेतलेला ‘डिजिटल कुंचला’ ही आज प्रणवची ओळख झाली आहे. स्ट्रगलमधून सुरू झालेला त्याचा हा प्रवास एकामागोमाग एक आनंदाचे, प्रसिद्धीचे, वलयाचे आणि अभिमानाचे क्षण घेऊन येत आहे.
 
photo
 
 
जिटल पोर्ट्रेट्स अर्थातच डिजिटल व्यक्तिचित्र म्हटले की, चटकन डोळ्यासमोर नाशिकच्या प्रणव सातभाईचे नाव येते. प्रणवचा फोटोग्राफीच्या आवडीतून निर्माण झालेला प्रवास हा जागतिक विक्रम प्रस्थापित करणारा डिजिटल व्यक्तिचित्र कलाकार ते मोटिव्हेशनल स्पीकरपर्यंत येऊन पोहोचला आहे.
 
 
प्रणवची जडणघडण नाशिकच्या निफाडमधील ’वनसगाव’ येथे अगदी साध्या आणि ग्रामसंस्कृती लाभलेल्या वातावरणात झाली. प्रणवचे प्राथमिक शिक्षण वनसगाव येथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. लहानपणापासून गावाकडे वाढलेल्या प्रणवला निसर्गाची, निसर्गातील रंगसंगतीची ओढ आणि वेड होते. बुजर्‍या स्वभावामुळे शाळेत असताना त्याला अगदी मोजकेच मित्र होते; पण तो शालेय अभ्यासात बर्‍यापैकी हुशार होता. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थातच त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ शकेल इतपत गुण मिळाले. पुढे त्याने ‘रानवड’च्या कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
 
 
प्रणवचे वडील, आजी-आजोबा तिघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने कुटुंबाला वैद्यकीय वारसा लाभला होता आणि शिवाय त्याची आईदेखील उच्चशिक्षित आहे. साहजिकच आपल्या कुटुंबाचा वारसा प्रणवने पुढे न्यावा, वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारी प्रवेश परीक्षा द्यावी, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्याने घरच्यांच्या इच्छेखातर 11-12 वीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला खरा; पण प्रणवला महाविद्यालयात शिकत असताना करीअरची वेगळी अशी फोटोग्राफीची वाट निवडावीशी वाटत होती. त्याच्या आई-वडिलांनी त्याला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला; पण त्याचे मन मात्र हे मानायला तयार नव्हते. त्यासाठी त्याने त्याच्या आई-वडिलांना समजावण्याचादेखील प्रयत्न केला. अर्थातच त्याच्या आई-वडिलांना मान्य नसले तरी, शेवटी प्रणवने हट्टाने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांकडून संपूर्ण एक वर्ष आणि एक चांगल्यातला कॅमेरा मागून घेतला. या एका वर्षात त्याने एकीकडे निसर्गाची आवड असल्याने वाइल्ड लाइफ फोटोग्राफी सुरू केली. त्याच्या या कॅमेर्‍यातून मोहक असे विविध पशुपक्ष्यांचे,सूर्योदय-सूर्यास्ताचे फोटोज् क्लिक होत होते आणि दुसर्‍या बाजूला घरच्यांच्या इच्छेखातर नाशिकमधील नामांकित इन्स्टिट्यूटमधून वैद्यकीय शिक्षण पूर्वपरीक्षांचा क्लासदेखील लावला.
 
 
Pranav Satbhai Photography
 
 प्रणव सातभाई
 
 
दरम्यान त्याने कुटुंबाचा विरोध पत्करत नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात मास मीडियाच्या पदवीसाठी प्रवेश घेतला आणि त्याच दरम्यान जगभरात कोरोनाचे सावट आले. लॉकडाऊनमुळे प्रणवची फोटोग्राफी बंद झाली. रिकामपणामुळे त्याला नैराश्य येण्यास सुरुवात झाली. या काळात तो मग त्याने काढलेले फोटो, नातेवाईकांचे फोटो एडिट करू लागला. यातून त्याला आनंद तर मिळू लागलाच, शिवाय आणखी वेगवेगळे तंत्र शिकण्याची ऊर्मी निर्माण झाली. यासाठी त्याने यूट्यूब, गूगलसारख्या साधनांचा वापर करत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यात त्याला ’डिजिटल पोर्ट्रेट्स’ या डिजिटल कला प्रकाराची माहिती मिळाली. या लॉकडाऊनच्या काळातच त्याने ही कला आत्मसात करून रोज एकेक पोर्ट्रेट्स फेसबुकच्या सामाजिक माध्यमावर टाकण्यास सुरुवात केली. यात तो मराठीतील अभिनेते-अभिनेत्रींचे पोर्ट्रेट्स बनवून त्यांना टॅगदेखील करत होता. यातील त्याचे प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्यक्तिचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल तर झालेच, शिवाय शरद पोंक्षे यांनी आपल्या सामाजिक माध्यमांवरून हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध केलेच, शिवाय त्याचे भरभरून कौतुकही केले. या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सकाळीच प्रणवला 150-200 फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आल्या. या प्रसंगाने त्याचा हुरूप आणखी वाढला. त्याला हळूहळू रसिकांच्या, मान्यवरांच्या उत्तमोत्तम प्रतिक्रिया यायला लागल्या. त्याने नेहमीप्रमाणे एकदा असेच पहाटेपर्यंत जागून अभिनेते ’नाना पाटेकर’ यांचे व्यक्तिचित्र तयार करून पोस्ट करून दिले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी सात-साडेसातच्या सुमारास त्याचा अचानक फोन वाजला. नुकतीच झोप लागत असलेल्या प्रणवने झोपेतच फोन उचलला. पलीकडून भारदस्त आवाज आला- ‘हा प्रणव सातभाईचा नंबर आहे ना... मी नाना पाटेकर बोलतोय. काल तू तयार केलेले माझे चित्र का.. काय ते पोर्ट्रेट मला फार आवडले आहे. मुंबईत आलास की ये घरी.’ हे ऐकून त्याची झोप खाड्कन उडाली आणि गगन ठेंगणे वाटायला लागले. आपल्या आवडत्या कलाकाराने आपले कौतुक करणे, हा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय आणि सुखदायक ठरला. अनेक दिग्गज कलाकारांनी, व्यक्तिमत्त्वांनी प्रणवच्या डिजिटल कुंचल्यातून साकारलेले व्यक्तिचित्र आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून कौतुकासह शेअर केले आहेत. त्याच्या कौतुकासाठी स्वतःहून वैयक्तिक संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे ही सगळी पोर्ट्रेट्स तो अवघ्या तीन-चार तासांत तयार करतो.
 
 
प्रणवने अवघ्या वर्षभराच्या आतच एक हजार (1000) व्यक्तिचित्रांचा टप्पा गाठला. त्याच्या या कामाची दखल घेत एक दिवस ’वर्ल्ड वाइल्ड बुक रेकॉर्ड’मधून फोन आला. ‘आम्हाला तुमचं काम पाहायचं आहे, ऑनलाइन मीटिंगमध्ये आम्ही जे सांगू तेपोर्ट्रेट काढून दाखवाल का?’ मग काय संबंधित व्यक्ती आणि प्रणव यांची वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रणवने त्यांना हवे तसेपोर्ट्रेट काढून दाखवले. त्यामुळे त्याचे अशा प्रकारचे स्किल वापरून व्यक्तिचित्र करणारे जागतिक रेकॉर्ड त्याच्या नावावर झाले. प्रणव हा जेमतेम 24 वर्षांचा मुलगा आहे. त्यानं ही कलाकारी शिकली त्या वेळी तो वीस वर्षांचादेखील नव्हता. प्रणवच्या पोर्ट्रेट्सची आजवर नाशिक-पुणे-ठाणे येथे एकूण पाच प्रदर्शने झाली आहेत. ‘वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड’ने त्याची नोंद घेतल्याने अवघ्या एकविसाव्या वर्षी तो विक्रमवीर ठरला आहे.
 
 
Pranav Satbhai Photography
 
प्रणवचं वलय निर्माण होत होतं. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं 2022 ला निधन झालं. टीव्हीवर माईंना (सिंधुताई सपकाळ) आणि माईंच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ यांना पाहिलं. त्या दोघींचे विलक्षण मायेचे बंध, नाते त्याला फारच भावले. हे गोड नाते उलगडणारा माई आणि ममताताईंचा फोटो गूगलवरून शोधून त्याचे पोर्ट्रेट बनवले आणि आपल्या परिचितांच्या माध्यमातून ममताताईंपर्यंत पोहोचवले. ताईंनी हे पोर्ट्रेट पाहून त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, पडत्या फळाची आज्ञा समजून प्रणवही लगेचच आश्रमात जायच्या तयारीला लागला. पोर्ट्रेटची फ्रेम तयार करून माईंच्या आश्रमात गेला. ममताताईंच्या हातात फ्रेम देऊन त्याने ती उघडण्यास सांगितली. ताईंनी फ्रेम उघडली; त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि भावना अनावर होत असताना, त्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडले. “प्रणव, तू आज फ्रेम नाही, माझी आई परत आणली आहेस.” प्रणवलाही शब्द सुचेनासे झाले. त्याच्या आयुष्यातील हा प्रसंग फार मोठा अमूल्य ठेवा आहे, असे तो आवर्जून सांगतो. यानिमित्ताने त्याला ममताताईंच्या रूपाने हक्काची ताई मिळाली. पुढे ताईंच्या संकल्पनेतून आणि प्रणवच्या डिजिटल कुंचल्यातून साकारलेले पुण्यात माईंचे व्यक्तिचित्र, त्यांचे आश्रमातील मुलांसमवेतचे फोटो आदींसह फक्त माईंचे ’अभिमुख’ डिजिटल व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन भरवले गेले. या प्रदर्शनाला अतिशय अद्भुत प्रतिसाद लाभला.
 
  
एके दिवशी प्रणवला तुम्ही पोर्ट्रेट कशावरून करतात? असा एकदा फोन आला. प्रणवने आपण फोटोवरून काम करून देतो, असे सांगितले. मात्र या जोडप्याचे एक बाळ जन्मानंतर अवघ्या काही दिवसांत देवाघरी गेले होते आणि त्याचे केवळ एक पेन्सिल स्केच त्या जोडप्यांकडे होते. त्यावरून त्यांच्या बाळाचे डिजिटल पेंटिंग हवे होते. यापूर्वी प्रणवने कधीही स्केचेसवरून पोर्ट्रेट केलेले नव्हते. मात्र या कथेला भावनिक किनार होती. त्या आई-वडिलांनी आपले तान्हे बाळ गमावले होते आणि त्याच्या स्मृती जपण्यासाठी त्यांना त्या स्केचवरून रंगीत पोर्ट्रेट हवे होते. यात कलावंत म्हणून प्रणवसाठी मोठे आव्हान होते. मात्र आव्हान स्वीकारून त्या मातापित्यांना त्यांचे बाळ कलेतून प्रगट करून देण्यासाठी प्रणवने सहा ते सात तास सलग बसून स्केचवरून सुरेख बाळाचे पोर्ट्रेट तयार करून दिले. ते पाहून त्या माता-पित्याच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले. ते म्हणाले, “प्रणव, तू आमचं बाळ जिवंत करून दिलंस..!” जगातून निघून गेलेले निरागस बाळ प्रणवच्या पोर्ट्रेटमधून पुनर्जन्म घेऊन आपल्या आईवडिलांकडे पाहत होते. पालकांनी बाळाला पुन्हा एकदा प्रणवच्या कलेतून जन्म दिला होता!
 
  
सुरुवातीला छंद आणि टाइमपास करण्याचे, नवीन अनुभवाचे साधन म्हणून हाती घेतलेला ‘डिजिटल कुंचला’ ही आज प्रणवची ओळख झाली आहे. स्ट्रगलमधून सुरू झालेला त्याचा हा प्रवास एकामागोमाग एक आनंदाचे, प्रसिद्धीचे, वलयाचे आणि अभिमानाचे क्षण आणत आहे. ज्या शाळेत प्रणवने क्रीडाशिक्षकांच्या हातून पोटर्‍यांवर विविध कारणांनी छड्यांचा मार खाल्ला आहे आज त्याच शाळेत तेव्हाचे त्याचे क्रीडाशिक्षक आणि आताचे शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मांडीला मांडी लावून बसत, त्याने शाळेच्या प्रांगणात प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली आहे. संवादक म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.
 
 
 
आजच्या घडीस प्रणवला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून त्याचा प्रवास मांडण्यासाठी बोलावणे येत आहे. त्यातून कला शिक्षणाचे, कलेतल्या करीअरचे, सोशल मीडियाचे महत्त्व पटवून देत ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणून कार्य करत आहे. ठाण्याच्या एका ताईंनी प्रणवचा प्रवास ‘सह्याद्री वाहिनी’वर पाहिला. भारावून जात त्यांनी प्रणवची आणि त्यांच्या कलासक्त शाळकरी मुलाची खास भेट घडवून आणली. यातून त्यांच्या मुलाला त्यांनी स्वतः कलेसाठी प्रोत्साहन देण्याचा तर निर्धार केलाच, शिवाय त्यांच्या मुलानेही प्रणवकडून प्रेरणा घेतली आहे.
 
 
 
आजवर गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीनिवास खळे, बाबासाहेब पुरंदरे, प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर, माधुरी दीक्षित, चिन्मयी सुमित, अमिताभ बच्चन, स्मिता पाटील, निरूपणकार धनश्रीताई लेले, कवी-गीतकार वैभव जोशी, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे, कलाकार, खेळाडू आणि इतर ऑर्डरचे पोर्ट्रेट यांसह 1600 हून अधिक पोर्ट्रेट्स साकारले आहेत. तसेच त्याने प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या ‘सातवा ऋतू’ या पुस्तकाचे विलोभनीय मुखपृष्ठदेखील साकारले आहे.
 
 
नुकतेच प्रणवला त्याच्या उत्तुंग कामगिरीबद्दल बंगळुरूच्या नामांकित ‘वेयील फाऊंडेशन’ या संस्थेतर्फे 2024 सालचा ‘आशिया आयकॉन 2024’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. प्रणव सांगतो की, आज मी जो काही आहे, तो सोशल मीडियामुळे. मला प्रत्येक गोष्ट तिथून शिकता आली. माझ्या कलेची दाद सोशल मीडियामुळे लोकांनी घेतली. अनेक पोर्ट्रेट्स भारताबाहेर जातात, याचा मला आनंद आहे. सुरुवातीला विरोध करणारे ते आजच्या घडीला माझ्या या वाटचालीचे कौतुक करत गहिवरणारे आई-बाबांचे डोळे पाहताना मला न सांगता येणारा आनंद होतो. त्यामुळेच मी म्हणेन की, जिद्द आणि चिकाटी धरून तुम्हाला हवं ते करा, कामाप्रति समर्पण भावना बाळगा. यश नक्कीच मिळते.