संत रामदासांच्या काळात सामाजिक परिस्थिती भयावह होती. तसेच सत्ता परकीयांच्या हातात गेल्याने हिंदू समाजाला न्यायाची अपेक्षा करता येत नव्हती. हिंदू संस्कृती, सभ्यता, नीतिमत्ता टिकते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अंत:करण भीतीने व्यापून टाकले होते. ही राजकीय अनास्था युद्ध करून सावरेल, पण विकारांमुळे मनात निर्माण झालेल्या भयासाठी स्वामींनी ‘कृपासागरे सर्व चिंता हरावी’ अशी भावना व्यक्त केली आहे.
’रघुनायेका मागणे हेचि आता’ या ‘करुणाष्टका’तील आतापर्यंतच्या श्लोकांतून भक्ताने देवाकडे मागणी केली आहे की, तुझी सेवा आदरपूर्वक करण्यासाठी, तुझे प्रेम मिळवण्यासाठी आणि भक्तीसाठी सदैव तुझ्या सहवासाचा योग घडू दे. माझ्या ठिकाणी भौतिक गोष्टींची आवड निर्माण होऊ देऊ नको. मला तुझ्या सगुण रूपाच्या भक्तिपंथाची गोडी लाव. आपले सर्वस्व देवाला अर्पण केल्याशिवाय खर्या अर्थाने देवाची भक्ती करता येत नाही. त्यासाठी मला सगुण भक्तिपंथाला लाव, अशी विनवणी स्वामींनी यापूर्वीच्या श्लोकांतून केली आहे; तथापि या जगातील बाह्य वातावरण माझ्या सगुण उपासनेला अनुकूल नाही, असे भक्त परमेश्वराला सांगत आहे. समर्थांची तत्कालीन परिस्थिती म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वीची सामाजिक-राजकीय स्थिती फार भयावह होती. त्याचे वर्णन स्वामींनी ‘दासबोधा’त व काही स्फुट प्रकरणांतून केले आहे. दुष्ट यवनांनी त्यांच्या पापांनी, दुष्कृत्यांनी ही पवित्र भारतभूमी डागाळली होती. या म्लेंच्छांनी आमची पुण्य तीर्थक्षेत्रे भ्रष्ट केली. मंदिरांतील मूर्तींची तोडफोड केली, स्त्रिया पळवून नेल्या. मुसलमानांच्या या तत्कालीन क्रूर, हिंस्रक आक्रमकतेपुढे एकंदर हिंदू समाज नामोहरम झाला. या भीतीच्या साम्राज्यातून सोडवण्यासाठी स्वामी रामाला विनवणी करीत आहेत की,
भयें व्यापलों प्रीति छाया करावी ।
कृपासागरें सर्व चिंता हरावी ।
मज संकटीं सोडवावें समर्था ।
रघुनायेका मागणे हेचि आतां ॥6॥
सत्ता परकीयांच्या हातात गेल्याने हिंदू समाजाला न्यायाची अपेक्षा करता येत नव्हती. मुकाट्याने अन्याय सहन करण्यापलीकडे सामान्य माणसाला काहीही करता येत नव्हते. हिंदू संस्कृती, सभ्यता, नीतिमत्ता टिकते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अंत:करण भीतीने व्यापून टाकले होते. कदाचित ही राजकीय अनास्था युद्ध करून सावरली जाईल; तथापि विकारांमुळे माझ्या मनात जे भय निर्माण झाले आहे, ते कसे दूर करायचे, ही भक्ताची समस्या स्वामींनी या श्लोकात मांडली आहे. भक्त म्हणतो, माझ्या मनावर माझा ताबा नसल्याने हे विकार मला छळत आहेत. ते माझ्या भक्तिपंथाच्या आड येत आहेत. त्यांच्या भीतीने माझे सर्व मन व्यापून गेले आहे. या भयातून, हे परमेश्वरा, तूच मला बाहेर काढू शकतोस. तू माझ्यावर प्रेमरूपी छायाछत्र धरलेस, तर माझ्या मनाला शांत वाटेल. विकारांनी माझ्या ठिकाणी निर्माण केलेला ताप तुझ्या प्रीतिछायेने कमी होईल म्हणून माझे हे मागणे आहे. तू कृपा केलीस तरच माझे विकारताप कमी होतील. तू करुणेचा सागर आहेस, तेव्हा माझ्या मनात ज्या चिंता, काळज्या निर्माण झालेल्या आहेत, त्या तू नाहीशा कर. विकारांच्या प्रभावाने माझे मन अस्वस्थ आहे आणि त्यात भर टाकणारी माझ्या भोवतालची भयावह सामाजिक-राजकीय स्थिती पाहून माझ्या मनातील चिंता आणखी वाढली आहे. हिंदू संस्कृती, येथील सभ्यता म्लेंच्छांच्या अतिक्रमणाने, धार्मिक उन्मादाने नष्ट होण्याच्या मार्गाला लागली तर माझ्या जगण्यालाही अर्थ उरणार नाही. ही चिंता माझ्या मनात मला त्रास देत आहे. तेव्हा हे कृपासागरा, रामा, माझ्या सर्व चिंता तू हरण कराव्यास, ही मी तुला विनवणी करीत आहे. सभोवतालच्या तसेच मनातील आंतरिक चिंतेच्या भीतीने मी मोठ्या संकटात सापडलो आहे. हे रामा, तू मला या सर्व संकटांपासून सोडव, असे माझे तुला मागणे आहे. या ठिकाणी स्वामी ’मज संकटीं सोडवावे समर्था’ असे म्हणतात. आपण रामदास स्वामींना ‘समर्थ रामदास’ असे म्हणतो; पण समर्थ रामदासांचा समर्थ हा प्रभू रामचंद्र आहे. माझ्या मनात सर्वत्र भीती निर्माण झाली आहे. तेव्हा हे समर्थ रामा, तू मला यातून सोडव, असे माझे मागणे आहे. या भयभीत मनाला सावरण्यासाठी, सर्व आपत्तींतून सोडवून तुझ्या भक्तीला लावण्यासाठी या मनाने काय करायला हवे, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
मनीं कामना कल्पना ते नसावी ।
कुबुद्धी कुडी वासना नीरसावी ।
नको संशयो तोडिं संसारवेथा ।
रघूनायेका मागणें हेंचि आता ॥ 7 ॥
या अस्वस्थ मनाला सावरायचे तर सर्वप्रथम मनातील वासना कमी केल्या पाहिजेत. त्यांना आटोक्यात आणले पाहिजे. त्या कामना, इच्छा मनातून पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्यासंबंधीच्या कल्पनाही करता उपयोगाचे नाही. विकार प्रथम कल्पनेद्वारा मनात प्रवेश मिळवतात. ते विकार नंतर माणसाला कृती करायला लावतात. शरीराला तदनुसार वागायला लावतात. विकारांनी बुद्धीत प्रवेश केल्यावर माणसाची सारासार विचार करण्याची क्षमता मावळते. वासना बुद्धीचा ताबा घेते. विवेक राहात नाही. अशा अविवेकी बुद्धीला कुबुद्धी म्हणजे वाईट आचरणाची बुद्धी म्हटले जाते. ही कुबुद्धी माणसाच्या नाशाला कारणीभूत होते. शरीरातील या कुबुद्धीचा नाश करता आला, तर त्याबरोबर ज्या वासनांनी कुबुद्धी निर्माण झाली, त्या हे शरीर व मन सोडून जातील. अशा रीतीने कुबुद्धी व वासना यांनी एकत्रपणे शरीराचा त्याग करावा. स्वामी म्हणतात, ’कुबुद्धी कुडी वासना नीरसावी’. या ठिकाणी स्वामींनी ’निरसावी’ या शब्दाचा चपखलपणे उपयोग केला आहे. कुबुद्धी, वासना यांचा परिहार करावा, त्यांना सोडून द्यावे, असा साधारणत: ’निरसावी’ यातून अर्थबोध होतो; तथापि माणूस वासनातृप्तीत आनंदाची कल्पना करून वासना सोडायला तयार नसतो. अशा वेळी भक्त परमेश्वराला विनंती करीत आहे, की मला वासना, कुबुद्धी यात रस निर्माण झाला आहे. त्या वासना, कुबुद्धीचे खरे स्वरूप दाखवून मला त्यात गोडी वाटणार नाही, म्हणजे ’नि-रस’ असे कर. देवा, हे तुझ्या कृपेशिवाय होणार नाही. म्हणून तुझ्याकडे तशी मागणी करीत आहे; पण माझ्या मनात उगीचच शंका उत्पन्न होत आहे की, हे परमेश्वरा, तू माझी मागणी पूर्ण करशील ना? मी संशय घेतो याचा अर्थ माझी तुझ्याविषयी श्रद्धा दृढ नाही. जोपर्यंत श्रद्धा दृढ होऊन विश्वास पक्का होत नाही, तोपर्यंत मन संशय घेत राहील. ‘भगवद्गीते’त ‘संशयात्मा विनश्यति’ असे म्हटले आहे. संशय ही एक मानसिक अवस्था आहे. संशय नसावा व श्रद्धा दृढ व्हावी यासाठी भक्ताला आराध्य दैवतालाच विनवणी करावी लागते. संशय आणि सांसारिक व्यथा यामुळे मी तुझ्या भक्तीपासून दूर होत आहे. तेव्हा तूच कृपा करून माझा भक्तिपंथ सुकर कर, मला संशय नको, हे माझे मागणे आहे. तसेच या संसारव्यथा माझ्यापासून तोडून टाक. हे रघुनायका, हे माझे मनापासून मागणे आहे. तू सर्व समर्थ आहेस. या दासाला तुझ्याकडे काय मागावे हे कळेनासे झाले आहे, अशी भावना स्वामींनी बोलून दाखवली आहे. तो भाग आपण पुढील लेखात पाहू.