सालगडी बनला कृषी उद्योजक

20 Sep 2024 15:08:22
हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगावातील संतोष प्रल्हाद शिंदे यांनी नर्सरी उद्योग सुरू करून यशाची नवी गाथा लिहिली आहे. दुष्काळग्रस्त भागात राहणार्‍या संतोष यांनी सुमारे वीस वर्षे सालगडी म्हणून काम केले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, मेहनत, प्रयोगशीलता व उद्यमशीलतेच्या जोरावर 10 एकरांवर नर्सरी उद्योग त्यांनी सुरू केला आहे. त्यातून वर्षाकाठी सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल ते करतात. मिळालेल्या नफ्यातून शिवकाळाचे स्मरण करून देणार्‍या विहिरीची निर्मिती केली आहे.

krushivivek
 
महाराष्ट्राच्या शेतीत गेल्या दोन दशकांपासून अनेक बदल घडून येत आहेत. फळबाग, फुलशेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, पोल्ट्री उद्योगाने शेतकर्‍यांना आधार दिला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये नर्सरी उद्योग हा महत्त्वाचा उद्योग म्हणून पुढे येत आहे. शिवाय ‘शेती म्हणजे उद्योग’, ‘शेतकरी म्हणजे उद्योजक’ ही संकल्पना आता रूढ होताना दिसत आहे. दुष्काळ आला, पूर आला, अवेळी पाऊस आला, रोग आला, कीड आली अशा संकटांचा सामना करण्याचे धैर्य असते. शेतकरी जोखमीचे व्यवस्थापन करत असतो. त्यामुळे नावीन्याचा ध्यास, प्रचंड चिकाटी, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, आत्मविश्वास, व्यवस्थापन आदी गुणांचा समावेश शेतकर्‍यांमध्ये होत असतो. इथूनच ‘ग्रामीण उद्योजकता’ ही संकल्पना समोर आली. अशीच एक कृषी उद्योजकीय गाथा मराठवाडा-विदर्भ सीमेवर असलेल्या पानकनेर गावातून समोर आली आहे. येथे सालगडी म्हणून काम करणारा शेतकरी आता कोट्यधीश झाला आहे. या शेतकरी उद्योजकाचे नाव आहे संतोष प्रल्हाद शिंदे.
 
सालगडी ते प्रगतीशील शेतकरी
 
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावात प्रल्हाद व लक्ष्मीबाई या शेतकरी जोडप्याच्या पोटी 31 ऑगस्ट 1976 रोजी संतोष यांचा जन्म झाला. गावातल्या शाळेत संतोष यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. गरिबी म्हणजे काय असते, पोटाला चिमटा काढून कसे जगायचे असते, याचा दाहक अनुभव त्यांनी लहानपणीच घेतला. घरची पंधरा एकर शेती; पण पाण्याअभावी पिकत नव्हती. पोटासाठी शाळा सोडली. घरखर्चासाठी नालाबंडिगर काम केले; पण मार्ग सापडत नव्हता. वयाच्या 18व्या वर्षी दरमहा दोनशे रुपये पगारावर संतोष यांनी रिसोड (जि. वाशिम) येथील काशीराव देशमुख यांच्याकडे सालगडी म्हणून काम करायला सुरुवात केली. पिकांची राखण, शेतीची मशागत, भल्या पहाटे उठून गुराढोरांचा सांभाळ केला. शेतमालकाने सोपवलेली जबाबदारीची कामेइमानदारीने केली. मालकाचा विश्वास संपादन केला. कोणत्याही तर्‍हेच्या शिक्षणाची जोड नसताना अनुभवातून, निरीक्षणातून ते एकेक गोष्टी शिकत होते. 1999 साली संतोष यांच्या शेतकामाला वेगळे वळण मिळाले. शेतमालक देशमुख यांनी नवीन 18 एकरची पडीक शेती घेतली. ही शेती दलदलीची (पावसाळ्यात पाणी साचणारी), झाडे, वेली आणि काटेरी झुडप्यांनी वेढलेली होती. ही शेती लागवडीखाली आणण्यासाठी शेतातील पाण्याला वाट करून देणे गरजेचे होते. त्यासाठी देशमुख यांनी पाणलोट विभागाच्या अभियंत्यास पाचारण केले. दरम्यान आपल्या अनुभवातून संतोष यांनी स्वतःच्या पद्धतीचा वापर करत 1300 फुटांचा उतार काढत पाणी शेताबाहेर काढण्यात यश मिळविले होते. अभियंत्यांनी या कामाची प्रशंसा केली. मालकाचा संतोष यांच्यावरील विश्वास अधिक गाढ झाला. एके काळी नालाबंडिगच्या कामावर केलेली मजुरीची कामे इथे उपयोगाला आली होती. सांडवा आणि उतार याची उपयुक्तता संतोष यांच्या कामी आली. या कामातून त्यांनी श्रमाचे, प्रतिष्ठेचे आगळेवेगळे उदाहारण घालून दिले होते. पुढे कष्टाळू, प्रामाणिक, चाणाक्ष प्रगतीशील शेतकरी आणि कृषी उद्योजकाचा उदय झाला. मालक आणि सालगडी यांच्यात नवी भागीदारी झाली. खर्च मालकाचा आणि मेहनत संतोष यांची, असे या भागीदारीचे सूत्र होते. 2002 ते 2004 या काळात संतोष यांनी शेतीत नवीन प्रयोग घडवून आणले. 2004 मध्ये हळदीची तीन एकरांत लागवड करून वाळवून विक्रमी 33 क्विंटल उत्पादन घेतले. हा हिंगोली जिल्ह्यातला त्या काळचा उच्चांक होता. स्वतः एक सालगडी म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास एका प्रयोगशील शेतकरी उद्योजक होण्याच्या वाटचालीकडे वळला.
 

krushivivek 
 
स्वतःच्या शेेतीत प्रयोग
 
सालगडी म्हणून काम करत असताना त्यांनी आपली पत जपली, चोख काम केले, मालकाचे समाधान केेले. या भावनेतून काम करणारे संतोष हे सालगडीचे काम करत 2001 पासूनच आपल्या स्वतःच्या शेतात लक्ष घालू लागले. पुढचा टप्पा कोणता गाठायचा आहे याचा अभ्यास ते करीत असत. ज्या जमिनीत बाभळीशिवाय दुसरे काही उगवत नव्हते, अशा जमिनीतून उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न संतोष यांच्यासमोर होता. या काळात त्यांनी पत्नी व भावाच्या मदतीने 14 फूट खोल विहीर खोदली. त्यासाठी त्यांना गावातील राहते घर विकावे लागले. त्यानंतर 10 जणांचे कुटुंब शेतात राहू लागले. विहिरीला पाणी लागले. मालकांनी इंजिन दिले. 10 एकर शेती वहिताखाली आणली. फुलशेती हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचे साधन म्हणून त्यांनी जुलै महिन्यात नागपंचमीला झेंडूच्या फुलशेतीचा प्रयोग केला. योग्य नियोजन व व्यवस्थापनातून झेंडूची शेती यशस्वी करून दाखविली. दिवाळी-दसर्‍यात चांगला दर मिळाला. या शेतीने त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. ही त्यांच्या पुढील प्रवासाची नांदी ठरली. यानंतर ते यशस्वी झेंडूच्या शेतीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. त्यांच्या लक्षात आले की, शेतकर्‍यांना उत्तम रोपांची गरज आहे. ही आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी नर्सरी व्यवसाय करायचे ठरवले. सुरुवातीला एक गुंठा शेतीमध्ये नर्सरी व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्यांनी झेंडूच्या रोपांचे उत्पादन घेतले आणि त्यात त्यांना आर्थिक फायदा दिसून आला आणि त्यांनी हाच व्यवसाय पुढे मोठा करायचे ठरवले.
 
दहा एकरांत नर्सरीचा विस्तार
 
घरामध्ये कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना, कोणत्याही तर्‍हेचे भांडवल उपलब्ध नसताना सन 2009 साली दहा गुंठ्यांमध्ये ’आदित्य नर्सरी’ची उभारणी केली. पहिली दोन वर्षे त्यांनी केवळ झेंडू रोपांची निर्मिती केली. या कृषी सेवा क्षेत्रात काम करीत असताना संतोष यांनी शेतकर्‍यांना योग्य सेवा पुरवली. अविरत कष्ट व अखंड अनुभवातून त्यांनी शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला. आता हा नर्सरीचा व्यवसाय तब्बल दहा एकरांमध्ये विस्तारला आहे. यासाठी ग्रीन हाऊस आणि पॉलिहाऊसची उभारणी केली आहे. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी नर्सरी समजली जाते. या नर्सरीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कोकोपीटमध्ये मिरची, टोमॅटो, झेंडू, पपई, टरबूज, खरबूज यांसारख्या अनेक दहा ते बारा प्रजातीच्या रोपांंचे उत्पादन घेतले जाते. या माध्यमातून संतोष यांची महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांशी संपर्क प्रस्थापित केला आहे. नर्सरीचे उत्तम नियोजन, रोपांची गुणवत्ता, दर्जेदार उच्च प्रतीची रोपे, रोपांचे योग्य व्यवस्थापन आणि शेतकर्‍यांसोबत जपलेली विश्वासार्हता या गुणांच्या जोरावर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह शेजारील मध्य प्रदेश व तेलंगणातील शेतकर्‍यांना विविध रोपांचा पुरवठा केला जातो.
 
 
या नर्सरीतून वर्षाला सरासरी आठ कोटींहून अधिक रोपांची निर्मिती केली जाते. यातून तब्बल 10 कोटी रुपयांची उलाढाल केली जाते. या माध्यमातून काम करणार्‍या 100 मजुरांनादेखील कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. रोप वाहतुकीसाठी त्यांनी स्वतःची चार वाहने घेतली आहेत.
 
 
 
शिवकाळाचे स्मरण करून देणारी आधुनिक विहीर
 
महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहेत. त्यातील एक वास्तू म्हणजे शिवकालीन विहीर अथवा बारव होय. शिवकालीन विहिरी म्हणजे उत्तम पाण्याचा स्रोत. याशिवाय शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना. छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या बारव/विहिरीतून आजही जनतेची तहान भागवली जाते, अशा नोंदी सापडतात. संतोष शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वावर या महापुरुषांच्या कार्यशैलीचा प्रभाव आहे. नव्याचे मोकळेपणाने स्वागत करताना ‘जुन्यामधील चांगले ते जतन करा’ हा संतोष यांचा जीवनमंत्र आहे. त्यांची कृतज्ञतेची भावना म्हणजे त्यांनी उभारलेली आधुनिक शिवकालीन विहीर होय.
 
 
2014 सालची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर संतोष यांचे जाणे झाले. शिवरायांचे वास्तव्य स्थान व इतर भव्य बांधकाम पाहिल्यानंतर त्यांचे लक्ष विहिरीकडे गेले. किल्लावरील वाड्यात चार विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीजवळ एक उशीच्या आकाराचा आणि बसण्याच्या आसनाच्या आकाराचा एक दगड आहे. तिथे जिजामाता टेकून बसत आणि शिवराय त्यांच्या पायाशी बसून हितगुज करत असल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून या विहिरीला तकियाची विहीर म्हटले जाते. शिवाय रायगडावर एकूण आठ तलाव आहेत. आजही गडावर स्थानिक लोक पिण्यासाठी हेच पाणी वापरतात. रायगडावरचा हा जलकार्याचा वारसा संतोष यांच्या मनावर बिंबला.
 
 
krushivivek
 
गावी परतल्यानंतर तासन्तास शिवकालीन विहीर/तलावावर विचार करत. मराठवाड्यात शिवकालीन विहीर अथवा तलाव आढळत नाहीत, ही उणीव त्यांना बोचत होती. स्थानिक लोकांना/लहान मुलांना शिवकालीन विहिरीचा नमुना पाहता यावा यासाठी संतोष यांनी आपल्या शेतात ही आधुनिक पद्धतीची शिवकालीन विहीर उभारण्याचा मनोदय कुटुंबाकडे व्यक्त केला. यासाठी घरच्यांचा पाठिंबा मिळाला. गरज होती फक्त पैशाची. तीही दूर केली. नर्सरी व्यवसायातून मिळालेला नफा या ऐतिहासिक कार्यासाठी गुंतवला. स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षातही उतरवले. 2016 साली संतोष यांनी आपल्या स्वतःच्या एक एकर जागेत जगातील पहिली आधुनिक पद्धतीची शिवकालीन विहीर उभारणीच्या कामाला सुरुवात केली.
 
ही विहीर म्हणजे आधुनिक स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. सुमारे 200 फूट लांबी आणि रुंदी आणि 100 फूट खोल अशी विहीर आहे. यासाठी 5 लाख विटा, 2300 ब्रास वाळू/रेती, सहा हजार पोती सिमेंट, तारा खिळे, गजाळी आणि मजुरीसह तब्बल पाच कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. यासाठी कोणत्याही शासकीय अनुदानाची मदत घेतली नाही वा कोणत्याही बँकेचे कर्ज, हे विशेष. स्वखर्चातून ते ही भव्य वास्तू उभारत आहेत. येत्या एक-दोन वर्षांत या विहिरीचे काम पूर्णत्वाला येईल. ही वास्तू उभारणारा स्थापत्य अभियंता म्हणजे आधुनिक हिरोजी इंदुलकर- ज्ञानेश्वर आठवले असे त्याचे नाव. सेनगाव तालुक्यातील वटकळी गावचा. फक्त इयत्ता सातवीपर्यंत शिकलेला. यूट्युबर शिवकालीन बारव व तलाव पाहून आधुनिक शिवकालीन विहिरीची निर्मिती केली आहे. जे अभियंत्याला जमले नसते ते प्राथमिक शिक्षण झालेल्या ज्ञानेश्वरने करून दाखविले आहे.
 
या विहिरीकडे तीन अंगांनी पाहता येते. बाहेरून ही विहीर एखाद्या गडकिल्ल्यासारखी दिसते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एखादी बारव किंवा विहीर वाटते आणि मुख्य स्थळावर गेल्यानंतर पाण्याचा प्रचंड मोठा डोह अथवा तलाव दिसतो. आणखीन मुख्य विशेष म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील शंभर प्रसंगांचे बारकावे थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स स्वरूपात प्रदर्शनाची निर्मिती केली जात आहे. सध्या संतोष थ्रीडी या विषयांत काम करणार्‍या कुशल कलाकाराच्या शोधात आहेत. विहिरीच्या काठावर बुरूज उभारले गेले आहे. या ठिकाणी शिवरायांच्या मावळ्यांचा पुतळाही साकारण्यात येणार आहे.
 
या तलावाची सुमारे दोन कोटी लिटर पाण्याची क्षमता आहे. दोन वर्षे दुष्काळ पडला तर दहा एकरांवरील नर्सरीला पुरेल इतका हा मुबलक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे या विहिरीमुुळे परिसरातील बोअरवेल व विहिरीचे झरे जिवंत झाले आहेत.त्यामुळे संतोष यांच्यासह इतर शेतकर्‍यांना विहिरीचा दुहेरी फायदा होत आहे. या आधुनिक मावळ्याची ही गोष्ट परिपूर्ण नाही. यापलीकडेही त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी शिल्लक आहेत. ही विहीर येत्या काळात हिंगोली जिल्ह्याच्या वैभवात निश्चितच भर घालेल यात यत्किंचितही संदेह वाटत नाही.
 
 
 
  
कुटुंबाची मिळाली समर्थ साथ
 
संतोष यांच्या कुटुंबात 15हून अधिक लोक राहतात. हे सर्व आनंदाने आजही एकत्रित राहतात. कोणतेही काम करताना काम करण्याच्या अगोदर त्या कामांचा कुटुंबातील सदस्य एकत्रित बसून सांगोपांग विचार करतात. कामातील धोके काय आहेत, त्यावर आपण कशी मात करायची याची सारी गणिते संतोष यांच्या मनात पक्की असतात. मात्र केवळ गणितेच पक्की नसतात, तर त्यांची उत्तरेदेखील त्यांनी पाहून ठेवलेली असतात. म्हणून गेल्या वीस वर्षांत त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे परत राखेतून झेप घेतली आहे. संतोष यांच्या नर्सरी व्यवसायाच्या यशस्वितेमध्ये कुटुंबातील सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. आई लक्ष्मीबाई यांनी खडतर काळात हिंमत दिली. दोन लहान बंधू, पत्नी व भावजय यांनी व्यवसायाच्या वाटचालीत खंबीर साथ दिली आहे. रोपांची नोंदी व विक्री, वाहतूक व व्यवस्थापनात लहान बंधूंची मोलाची साथ मिळाली आहे.
 
 
संतोष शिंदे यांनी अपार कष्टाच्या बीजातून हा व्यवसाय उभा केला आहे. काळाच्या एका बीजातून त्यांनी व्यवसायाचा हा वटवृक्ष उभा केला आहे. गेल्या वीस वर्षांत त्याला भरघोस पारंब्या आल्या आहेत. मात्र या उभ्या असलेल्या नर्सरी उद्योगवृक्षाची काही फळे पाहताना संतोष यांनी वृक्ष मोठा होण्यासाठी गाळलेल्या घामाची प्रकर्षाने आठवण होते. त्यामुळे सात्त्विकपणे व्यवसाय करणारे संतोष शिंदे हे कौतुकास आणि अभिनंदास योग्य ठरतात!
 
संपर्क
संतोष प्रल्हाद शिंदे
व्यवस्थापकीय संचालक
आदित्य नर्सरी, पानकनेर,
ता. सेनगाव, जि. हिंगोली.
 8055339604, 9765969828
 
 
 
Powered By Sangraha 9.0