मानाचे गणपती

विवेक मराठी    02-Sep-2024
Total Views |
@दिव्या दत्ता शेणवी मावजेकर
पुण्यात आल्यानंतर मानाचे गणपती नावाची जी संकल्पना आहे ती नेमकी काय असते, हा प्रश्न मला पडला आणि मग सुरू झाला तो प्रवास म्हणजे पुण्यातील गणपतींना भेट देण्याचा! या लेखात आपण मानाच्या गणपतींसोबतच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गणपतींबद्दल चर्चा करणार आहोत.
ganesh festival
 
विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची विशेष ओळख आहे. पुण्याला प्राचीन आणि ऐतिहासिक नगरी म्हटलं जातं. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक आणि राजकीय अशा सगळ्याच गोष्टींची रेलचेल असल्याने ‘पुणे तिथे काय उणे’ अशी उक्ती प्रसिद्धीस पावल्याचे आपल्याला दिसते. पुण्यातील अनेक गोष्टी जगप्रसिद्ध आहेत. पुण्यात बाहेरगावाहून येणार्‍या माझ्यासारख्या युवांसाठी ही पर्वणीच आहे.
 
 
पुण्यातील गणेशोत्सवांचा नावलौकिक जगभर आहे. अनेक इतिहासकालीन प्राचीन मंदिरांची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येकामागे असणार्‍या आख्यायिका, इतिहास हा प्रत्येक मंदिराचे महत्त्व विशद करताना दिसतो. पुण्यात गणपतीच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात. महाराष्ट्रात सगळीकडेच गणपती उत्सव जोरदार साजरा केला जातो: पण त्यातही पुण्यात आल्यानंतर मानाचे गणपती नावाची जी संकल्पना आहे ती नेमकी काय असते, हा प्रश्न मला पडला आणि मग सुरू झाला तो प्रवास म्हणजे पुण्यातील गणपतींना भेट देण्याचा!
 
 
ganesh festival
 
मानाच्या गणपतींपैकी पहिला गणपती म्हणजे पुण्याचे प्रमुख दैवत असणारा कसबा गणपती. या गणपतीची स्थापना जरी जिजाऊंनी केली असली तरीही मूर्तिस्वरूप गणेशोत्सवाला 1893 मध्ये मंडळाद्वारे सुरुवात झाली. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, कसबा गणपती हा तांदळा स्वरूपात आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, या गणपतीच्या डोळ्यांत हिरे आणि नाभीस्थानी माणिक बसवलेला आहे. ह्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर अष्टविनायकातील बल्लाळेश्वर मूर्तीचा भास होतो. मूर्तीला चांदीची महिरप केली गेली आहे. गेली 130 वर्षे गणेशोत्सवासाठी घडविल्या जाणार्‍या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन हे चांदीच्या पालखीतून होत असते. नवसाला पावणारा, अशी या स्वयंभू गणेशाची ख्याती आहे.
 
 
यानंतर मान येतो तो तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचा. पुण्याची ग्रामदेवता म्हणून तांबडी जोगेश्वरीला ओळखले जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, याचे श्रीमुख हे आफ्रिकन हत्तीचा चेहरा आहे. आगमनाची मिरवणूक ही रथातून, तर विसर्जन हे पालखीतून केले जाते. सुरुवातीला बाप्पाचा देव्हारा हा पितळेचा होता. काही काळानंतर मंडळाच्या सभासदांनी दिलेल्या देणगीतून चांदीचा देव्हारा बनवून मूर्तिपूजन केले जाते. कमळावर बसलेला सोन्याचांदीच्या आभूषणांनी संपन्न असा हा गणपती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट असले तरीही हिरेजडित असा एक सोन्याचा हार हा कायमच बाप्पाच्या कंठात असतो. बाप्पाला पुणेरी पगडीदेखील घातली जाते. अतिशय सुंदर प्रकारे याला सोवळे नेसवले जाते. विसर्जनाच्या वेळी तर चांदीच्या पालखीसोबतच छत्र चामरे, नक्षत्रमाला, अब्दागिर्‍या हे मिरवणुकीची शोभा वाढवतात. एकूणच बाप्पाचे स्वरूप हे चैतन्यमय असते.
 

ganesh festival  
 
यानंतर येणारा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम मंडळ. 1857 साली स्थापन झालेल्या या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हा मूषकावर विराजमान आहे. पाहायला अतिशय लोभसवाणा हा गणपती कलाकृतीचा उत्तम नमुना असणारे मुकुट, विविध आयुधे, हार ह्यांनी सजलेला आहे. शान वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हिरेमाणिक दागिन्यांमध्ये आहेत. मिरवणुकीच्या काळात तर विविध ढोलताशा, लेझीम पथक गणपतीच्या विसर्जनात एक वेगळा रंग भरतात.
 

ganesh festival  
 
पुण्यातल्या अतिशय प्रसिद्ध जागांपैकी एक तुळशीबाग. येथील गणपतीला मानाचा चौथा गणपती मानले जाते. 1901 मध्ये या गणपतीची स्थापना करण्यात आली. 1975 मध्ये पहिल्यांदा फायबरची मूर्ती स्थापित करणारे हे पहिले मंडळ ठरले. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, ही तेरा फूट उंच असून अनेक सुंदर कल्पक अशा आभूषणांनी सजवली जाते. तुळशीबागेतील ह्या मूर्तीची सजावट डोळ्यांना दिपवणारी असते. ह्या गणपतीला मागे चांदीची महिरप असून सोबतच मुकुट, कान, पाय, हात, आयुध, उंदीर, मोदक, नाग तसेच सोंडपट्टी आणि पाटदेखील चांदीचा आहे. साधारणपणे 200 किलोहून अधिक चांदीचे आभूषणे बाप्पासाठी आहेत. रेशीम तसेच मलमलची सोवळी, उपरणी ही बाप्पासाठी तयार केली जातात. इतकेच नाही तर जगभरातील अनेक भक्तगण सोन्याचांदीचे दूर्वा, मोदक यांसारखी तत्सम आभूषणे देवाला अर्पणदेखील करतात. सगळ्यांचा लाडका असणार्‍या गणपती बाप्पाचे लाड प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार करताना दिसतात. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अन्नदान सेवा त्यांच्याकडून राबवली जाते. दरवर्षी यज्ञ केला जातो.
 

ganesh festival  
 
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात टिळकांचा पुढाकार असल्याने मानाचा पाचवा गणपती म्हणून त्यांनीच स्थापन केलेल्या केसरीवाड्याच्या गणपतीला ओळखले जाते. हे मंडळ अत्यंत उत्साहात, परंपरेचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करतात. गायकवाड यांनी हा वाडा बांधला असून सध्या इथे दोन गणपतींची पूजा केली जाते. त्यापैकी एका मूर्तीची कायमस्वरूपी स्थापना केलेली असून दुसरी मूर्ती ही गणेशोत्सवात दहा दिवस पूजली जाते आणि मग विसर्जित केली जाते. कायमस्वरूपी मूर्ती ही चांदीची आहे जी ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे घडविली आहे. मूर्तीला सहा हात असून हातांत परशू, पाशांकुश, चंद्र आणि हस्तिदंत आहेत. मूर्तीला पगडी घातली जाते. ऐतिहासिक घडामोडींचा वारसा असल्याने केसरीवाड्याला एक महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वसा आजही मंडळ अविरतपणे पुढे सुरू ठेवत असल्याचे पाहायला मिळते.
 
 
मानाच्या गणपतींसोबतच जगप्रसिद्ध असलेल्या गणपतींपैकी एक म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. 1893 मध्ये या गणपतीची स्थापना झाली आणि 1984 मध्ये मूर्तीची स्थापना मंडळाने केली. मूर्तिकार शिल्पींनी ही मूर्ती घडवली ज्यात गणेश यंत्र बसवले. सोन्याचा मुकुट, कान, पाय, विविध आयुधे, रुद्राक्षाचा हार, वैभव हार असे अनेक सोन्याचांदीचे हिरेजडित दागिने हे गणपतीला असून केवळ भौतिक वस्तूंनीच नव्हे, तर सांस्कृतिक- सामाजिक क्षेत्रात स्वतःची असलेली बांधिलकी जाणत काम करणारा आणि अशा प्रकारे श्रीमंत ठरणारा हा दगडूशेठ सगळ्यांचाच लाडका आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर हा भावभक्तीच्या सुगंधाने दरवळणारा असतो. ह्याची ख्याती इतकी आहे की, पुण्यात येणारी व्यक्ती ही प्रथम दगडूशेठचेच दर्शन घेऊन आशीर्वाद घेतो.
 
 
ganesh festival
 
महात्मा फुले मंडई ही पुण्यातील त्यापैकीच एक ऐतिहासिक वारसा असणारी वास्तू आहे. मंडई ही तशी समाजातील सर्व वर्गांतील लोकांनी एकत्र येण्याची जागा. अशाच ठिकाणाचा, मानाचा नसला तरी लोकांना आपलासा वाटणारा गणपती म्हणजेच मंडई मंडळाचा शारदा गजानन. उजव्या सोंडेचा हा गणपती तक्क्याला रेलून आसनस्थ आहे. बाप्पाचा एक पाय शारदेने मांडीवर घेतला असून ती तो चेपत असून पालथी मांडी घातलेल्या शारदेच्या उजव्या खांद्यावर गणपतीने डावा हात ठेवला आहे. या गणपतीच्या बाजूला मूषकाची चांदीची प्रतिमादेखील आहे. दोन्ही मूर्तींचे नक्षीकाम उठावदार आहे. त्यामुळे कानात घातलेला दागिना आपल्याला स्पष्ट दिसतो. अत्यंत बोलकी अशी ही मूर्ती आहे. मूर्तीची महिरप, पाट चांदीचा असून सोबतच सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी हा गणपती सजलेला आहे. गणपती तसेच शारदेस अनेक प्रकारच्या साड्यांनी, उपरण्यांनी सजविले जाते. रेशम, मलमलच्या वस्त्रांचा प्रामुख्याने उपयोग होतो. मंडईच्या लगत असूनही या गणपतीचे मंदिर कमालीचे शांत भासते.
 
 
पुण्यातील मंदिरांची नावेही वैविध्यपूर्ण असतात. जिलब्या मारुती मंडळाचा गणपती हे त्यापैकीच एक उदाहरण. 1954 मध्ये या गणपतीची स्थापना झाली. येथे असणार्‍या मारुतीला पूर्वी जिलब्यांचा नैवेद्य दाखवला जात असतो म्हणून त्याचे नाव जिलब्या मारुती पडले. नंतर मंडळाने गणपतीची स्थापना केल्यावरसुद्धा आजतागायत गणपतीला रोज 21 किलो जिलब्यांचा नैवेद्य दाखवतात. सोन्याचांदीचे विविध आभूषणे,कमळ, रुद्राक्ष हार, ओम सोन्याचे दात, सोनसाखळी अशा अनेक दागिन्यांनी सजलेला हा गणपती आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गेली दहा वर्षे या गणपतीला पुणेरी फेटा बांधला जातो. अत्यंत बोलके डोळे असणार्‍या ह्या गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे.
 
 
ह्यासोबतच भाऊसाहेब रंगारी मंडळाचा जो पहिला सार्वजनिक गणपती आहे तसेच बाबू गेनू मंडळाचा नवसाला पावणारा गणपती, हत्ती गणपती, निंबाळकर तालीम गणपती, माती गणपती, असे गणपती पुण्यातील समाजासाठी विविध प्रकारे काम करीत आहेत. पुण्यात आलात की मानाच्या या गणपतीचे दर्शन आवर्जून घ्या.