नाशिक येथील वैशिष्ट्यपूर्ण गणेश दर्शन

विवेक मराठी    02-Sep-2024
Total Views |
@ अश्विनी भालेराव
ganesh festival
तीर्थस्थळांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक गणपती मंदिरे स्थित आहे. यातील अनेक मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. अनेक वैशिष्ट्यांसह धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय यातील काही गणपती आपली आभूषणे, आपल्या मूर्तिवैशिष्ट्यानेही प्रसिद्ध आहेत.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आपलासा, हवाहवासा वाटणारा देव अर्थात आपला लाडका ‘गणपती बाप्पा’. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे उपासना करतात. आपल्या मनातील गुपिते हक्काने बाप्पाला सांगतात. याच बाप्पाची संपूर्ण जगात अनेक मंदिरे आहेत.
 
 
तीर्थस्थळांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक गणपती मंदिरे स्थित आहे. यातील अनेक मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. अनेक वैशिष्ट्यांसह धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय यातील काही गणपती आपली आभूषणे, आपल्या मूर्तिवैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे नाशिकमधील ‘चांदीचा गणपती’.
 
 
नाशिकचा मानाचा गणपती म्हणून शहराच्या ‘रविवार कारंजा’ या भागात स्थित असलेला ‘चांदीचा गणपती’. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील व रविवार कारंजा परिसरातील काही जागृत देशभक्त नागरिकांनी 1917 सालापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
 
 
बुंदेलखंडातून रविवार पेठेत आलेल्या गंगाप्रसाद हलवाई या व्यापार्‍याची लोकमान्य टिळकांवर असीम श्रद्धा होती. त्यामुळे आपल्याकडे असलेली सर्व संपत्ती त्यांनी या मंडळाला दान केली. या देणगीतून पूर्वी शाडूची मूर्ती येथे बसवली जात असे. साल 1978-79 मध्ये शाडूची मूर्ती विसर्जित करताना अडचण होते, म्हणून मंडळ सदस्यांनी 11 किलोची चांदीची मूर्ती तयार करण्याची सूचना केली. अखेर 2008-09 साली 201 किलो भरीव चांदीच्या मूर्तीसाठी मंदिर बांधून त्यात सिद्धिविनायक गणपती मूर्तीची विधिवत स्थापना केली गेली, तर 2011-12 मध्ये भाविकांनी नवस प्राप्त झाला म्हणून दान केलेल्या सोन्यापासून विविध अलंकार बनविले. 45 तोळे सोन्याचा हिरेजडित हार, 40 तोळे कान आणि कपाळमार्गे सोंडेवरील सुवर्णाने तयार केलेले गंध, 17 तोळे सोन्याची हिरेजडित झालर श्रींसाठी तयार करण्यात आली आहे.
 

ganesh festival  
 
हा गणपती नवसाला पावतो, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे अनेक भाविक वेगवेगळे नवस या गणपतीला करतात. ज्या भाविकांचे नवस पूर्ण होतात, ते भाविक नवसपूर्तीसाठी चांदी गणपतीला अर्पण करतात आणि त्या चांदीची भर मूर्तीमध्ये केली जाते.
 
 
नवसाला पावणारा गणपती म्हणून ‘चांदीचा गणपती’ मंदिराची सर्वश्रुत ख्याती तर आहेच; पण त्याही पलीकडे रत्नजडित चांदीच्या मूर्तीचे विशेष रूप भाविकांना भावणारे आणि भुरळ पाडणारे आहे.
 
 
आपल्या आकर्षक आणि मनोवेधक पगड्यांनी नाशिकमधल्या ‘पगडी गणेश’ गणपतीचे मंदिर सर्वश्रुत आहे. पेशवेकाळात नाशिकचा खर्‍या अर्थाने उत्कर्ष झाला. त्या काळी विशेषत: सरकारी दरबारी मानकरी, वेदशास्त्रनिपुण पंडित, वकील, तत्सम मंडळी प्रामुख्याने पगडी घालीत असत. पगडीनिर्मितीचे उद्योजक व विक्रेते यांचा परिसर म्हणून या गल्लीची ओळख ’पगडबंद लेन’ या नावाने होती. या परिसरात अतिशय कुशल, कसबी कारागीर राहत होते.
 

ganesh festival  
 
साधारणत: 1970-75 सालच्या आसपास सराफ बाजार आणि पगडबंद लेन येथील काही तरुणांच्या मनात आले की, आपल्याही भागात एक आपला हक्काचा गणपती असावा आणि त्यातही आपल्या सराफी व्यवसायाची, सोन्या-चांदीच्या बाजारपेठेची ओळख असणार्‍या आपल्या भागात ’चांदीचीच मूर्ती’ असावी. मग त्या तरुणांनी ’नगरकर लेन’च्या कोपर्‍यावर असलेल्या खेडकर वाड्याच्या ओट्यावर एक गणपती बसवला.
 
 
दरवर्षी थोडी-थोडी चांदी जमा करत काही वर्षांतच एक आकर्षक आणि विलोभनीय चांदीची गणेश मूर्ती तयार झाली. दरवर्षी मंडळाचे कार्यकर्ते मूर्तीसाठी पैसे जमवत आणि शिवाय स्वतःची भर घालत होते. काही वर्षांनी ही बाप्पाची चांदीची मूर्ती तब्बल 51 किलोची झाली होती. 2006 साली नगरकर लेन परिसरात मंदिर बांधून या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
 
 
या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मस्तकावर असंख्य प्रकारच्या वेगवेगळ्या पगड्या आपल्याला पाहायला मिळतात. आजमितीला या मंडळाकडे 100 हून अधिक रंगीबेरंगी, अलंकारजडित आणि विविध कापड प्रकार असलेल्या, विविध जरीकाठांचा वापर केलेल्या पगड्या आहेत. या गणपतीला इतर कोणत्याही प्रकारचे मुकुट किंवा फेटे वगैरे न घालता फक्त पगडीचाच वापर केला जातो. मस्तकी पगडी धारण करणार्‍या गणपतीला मग पुढे राजेशाही थाट देत जानवं, कपाळावर असलेलं गंध यावर शुद्धीकरण सोनं चढवण्यात आलं आहे.
 

ganesh festival  
 
सहसा आपण ज्या गणपतीच्या मूर्ती पाहतो, त्या मूर्तींमध्ये बाप्पाच्या हातात शंख, मोदक किंवा दूर्वा हाती घेतलेले हात आणि आशीर्वाद देतानाचा हात आपण पाहतो; पण नाशिकमध्ये असे एक गणपती मंदिर आहे ज्या मंदिरातील बाप्पाच्या हातात जपमाळ आहे. जणू काही हा बाप्पा जगतकल्याणासाठी तप करत आहे असा भास व्हावा. हे ‘तपस्वी गणेश मंदिर’ नाशिकच्या सोमवार पेठ भागात स्थित आहे.
 
 
महाराष्ट्रात असे मोजके गणपती आहेत ज्या गणपतीच्या हातामध्ये जपमाळ आहे, त्याच्या अंगावर वस्त्र नाही, जो धूम्रवर्ण रूपातील आणि संन्यस्त स्वरूपातील गणेश आहे.
 

ganesh festival  
 
ही तपस्वी गणेशाची अखंड संगमरवरी पाषाणातून बनवलेली सुबक मूर्ती आहे. बाप्पाला बसण्यासाठीदेखील संगमरवरीच अष्टकोनी चौरंग आहे. हातात मोदकांची रास आणि न रहावून त्यातला एक मोदक उचलून सोंडेत धरलेला हा गणपती आहे. हा गणपती म्हणजे जगतकल्याणासाठी तप करत असलेला बाप्पा. जणू दिवस-रात्र अखंडपणे तो जप करतोय. यामुळेच तपस्वी गणेशाचे रूप पाहताना भाविक नकळत समाधी अवस्थेत जातात.
 
 
आपल्या आगळ्यावेगळ्या आकाराने प्रसिद्ध असलेले नाशिकमधील एक मंदिर म्हणजे श्री ‘मोदकेश्वर गणपती मंदिर’. नाशिकचे ग्रामदैवत म्हणून मोदकेश्वर गणपतीस प्रथम मान आहे.
 
 
श्री मोदकेश्वर गणपती स्थानाविषयी पुराणात आख्यायिका आहे की, श्री गणेश अवकाशमार्गातून भ्रमण करीत असताना त्यांच्या हातातील एक मोदक खाली पडला व त्यापासून गणपती निर्माण झाला. त्यानंतर श्री गणेशभक्त ‘विलास सीताराम क्षेमकल्याणी’ यांच्या पूर्वजांना झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी मंदिराची उभारणी केली. नयनमनोहर हुबेहूब मोदकासारखा आकार असल्याने बाप्पास ‘श्री मोदकेश्वर गणपती’ असे नाव प्रचलित झाले.
 
 
गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री मोदकेश्वराला विविध वस्त्रे, अलंकार पूजाधिकारी चढवितात व मंदिराची सजावट केली जाते. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळे असे श्री मोदकेश्वराचे स्वरूप दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येत असतात.
 
 
तीर्थस्थळाची ख्याती असलेल्या नाशिकमध्ये अशी अनेक प्रसिद्ध आणि धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेली मंदिरे आहेत. आपण जर कधी नाशिकमध्ये तीर्थाटन करण्यास गेला, तर आपले आगळेवेगळे वैशिष्ट्य असलेल्या या बाप्पांना आवर्जून भेट द्यावी.