गणेशोत्सवातील ओतारी-सराफी कारागिरी

विवेक मराठी    02-Sep-2024
Total Views |
समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत गणरायाच्या उत्सवासाठी सर्वतोपरी तयारी सुरू आहे. सांगलीच्या लोकजीवनात या उत्सवाचे अनेक पदर आहेत. गणेशोत्सवाच्या सजावटीचा हा पदर वर्षानुवर्षे ज्यांनी जोपासला आहे त्यात इथल्या ओतारी व सराफी व्यावसायिकांचे योगदान खूप मोठे आहे. कालानुरूप या मंडळींच्या कामाचेही स्वरूप बदलत गेले आहे; तथापि आजही या दोन्ही व्यवसायांतील अनेक कारागिरांसाठी गणेशोत्सव कलाकारीची पर्वणी असते. त्याचा हा धावता आढावा.
धातुचे ओतकाम करतात ते ओतारी. सांगलीत ओतारी समाजाची किमान डझनभर घरे आहेत. आजही या कुटुंबांतील अनेक सदस्य याच व्यवसायात आहेत. जवळपास सहा-सात पिढ्या व संस्थानकाळापासून ही मंडळी या कामात आहेत. धातूच्या मूर्ती, मंदिरासाठीच्या पालख्या, चांदीची भांडी, समई, करंडे, तबक, अत्तरदाणी अशा पूर्वापार वापरातील अनेक भांडी-वस्तू तांब्या-पितळेची असायची. त्यांची घडण करणारा हा ओतारी समाज होता. त्यांच्या धातू वितळवण्यासाठीच्या स्वतःच्या भट्ट्या होत्या. त्यांच्याकडे अनेक कारागीर होते. सांगलीत गावभागात, खणभागात, गणपती मंदिराजवळ आजही ओतारी कुटुंबीयांची घरे आहेत. या कुटुंबातील अनेक सदस्य हे काम सोडून अन्य नोकरी-व्यवसायांत गेले आहेत. त्यातूनही अनेकांनी ही कारागिरी जिवंत ठेवली आहे. पूर्वीसारख्या ओतकामाच्या भट्ट्या नसल्या तरी धातू आणून त्यापासूनच्या वस्तू बनवणारे आजही सांगलीत किमान दहा ते बारा कारागीर या व्यवसायात आहेत. काळाबरोबरच ही मंडळी धातुकामाबरोबरच कोनशिला अनावरणासाठीचे फलक तयार करण्यापासून अन्य स्वरूपाच्या कारागिरीत गेली आहेत. मात्र हे काम करण्यात एखाददुसरा नवा तरुण आपला परंपरागत व्यवसाय टिकवून आहे.
 
Otari
 
ही परंपरा किती वर्षांपासूनची याबद्दल या कुटुंबातील आजच्या पिढीला फारशी माहिती नाही. मात्र सहजपणे ते आपण पणजोबापासून आम्ही हे करीत असल्याचे सांगतात. सांगलीत दत्तोपंत आणि भालचंद्र ओतारी, शामराव ओतारी, मिरजेत दादा ओतारी यांचे पन्नास-साठ वर्षांपासूनचे व्यवसाय होते. गावभागातील ओतारी कुटुंबात चेतन, शक्ती, अदित्य, सोमशेखर अशी नवी पिढीही या व्यवसायात आहे.
Otari  
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ओतारी मंडळींची कोणती तयारी आहे याची चौकशी केली असता तुकाराम ओतारी म्हणाले, “गणपतीचे मुखवटे, मूर्तींसाठी प्रभावळी तयार करण्याचे काम सुरू आहे. कुंभार समाजासारखी आमची तयारी उत्सवाच्या तोंडावर नसते. आधीच वर्ष-सहा महिने धातुकामातील सजावटीच्या वस्तूंसाठी विचारणा होत असते. गेल्या काही वर्षांत मूर्तीच्या मागील बाजूची प्रभावळ असावी यासाठी गणेश मंडळे आग्रही असतात. या प्रभावळी पंचधातूच्या, पितळेच्या किंवा चांदीच्याही असतात. स्थानिक परंपरेतील कलाकुसर या प्रभावळीत असते. मातीच्या किंवा प्लास्टरच्या मूर्तीसाठी चांदीचे किरीट करून घेणारे भाविकही असतात. दर वर्षी मूर्ती नवी आणून त्यावर किरीट चढवून पूजा केली जाते.”
 
Otari
 
सांगलीतील गणपती मंदिराजवळ पी.डी. ओतारी, संजय ओतारी, विवेक पंडित ओतारी अशी काही परंपरागत दुकाने आहेत. मंदिराच्या लगतच ही दुकाने असल्याने परगावचा येणारा भाविकही इथे काही काळ सहज डोकावतो. विवेक पंडित ओतारी या दुकानाची धुरा वाहणारे संदीप आणि सुशांत असे दोघेही बंधू दिवसभर इथे मूर्तिकामात व्यस्त असतात. पितळेच्या आणि चांदीच्या गणेशमूर्तीची पूजा करण्याचा कल वाढत असल्याचे निरीक्षण संदीप ओतारी यांनी नोंदवले. ते म्हणाले, “माणसांचे जगणे धावपळीचे झाले आहे. अनेक कुटुंबांतील तरुण मंडळी आता देशपरदेशात गेली आहेत. अशा कुटुंबांत कायमस्वरूपी पितळी मूर्ती पूजली जाते. अगदी अर्धा फुटाच्या मूर्तीपासून दोन-अडीच फुटांच्या पितळी मूर्ती आम्ही करतो. त्यातल्या किमान दर वर्षी चाळीस तरी मूर्ती जातात. दर वर्षी प्राणप्रतिष्ठापना करून पूजन होते. एरवी ती मूर्ती शोकेसमध्ये ठेवली जाते. सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश मंदिरातील मूर्तीची प्रतिकृती मात्र कोणी मागत नाही. त्यामागेही लोकांच्या श्रद्धा आहेत.”
 
Otari  
चांदीपासून बनवलेल्या दूर्वा, जास्वंदी हार, गणपतीसाठी चांदीचे जानवे, मोदक, चांदीची पायनखे, किरीट अशा वस्तू असतात. त्याच्या खरेदीसाठी सांगलीच नव्हे तर अगदी कर्नाटक-कोकणातूनही लोक सांगलीत येतात, असे येथील सराफी कारागीर विजय कडणे यांनी सांगितले. ते म्हणाले, “सांगलीच्या श्री गणेशाला नवस म्हणून सोन्याचांदीचे दागिने अर्पण केले जातात. त्यात चांदीचे पदक, हार, प्रभावळी असतात. सार्वजनिक मंडळांत मात्र हे दागिने इमिटेशनमध्ये वापरले जातात. एक ग्रॅम सोन्याचे म्हणून त्यांची विक्री होते. सोन्याचा दरच एवढा वाढला आहे की, आता गणपतीसाठी म्हणून सोन्याचे दागिने करून घेणारा ग्राहक विरळाच. मात्र घरच्या गणपतीसाठी म्हणून मोत्याची, सोन्याची माळ करून ती केवळ गणेशोत्सवासाठीच वापरली जाते. अनेक कुटुंबांत ही परंपरा आहे.”
- प्रतिनिधी