मूर्ती घडविणारा आणि सजविणारा ‘प्रथमेश’

02 Sep 2024 16:05:02
ganesh festival
पूर्वीपासूनच गणेशोत्सवाच्या काळात लालबाग-परळमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून कलेचा वारसा जपला गेला. कलेच्या याच वारशातून या भागातील अनेक कलाकारांनी विविध क्षेत्रांत आपला नावलौकिक केला. असाच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रथमेश घाडगे.
मुंबईतील लालबाग-परळ या विभागांना गणेशोत्सव काळात जत्रेचे स्वरूप येते. पूर्वी मुंबईतील लालबाग-परळ या ठिकाणी बहुतांश गिरणी कामगारांचे वास्तव्य होते. छोट्या छोट्या मंडळांतून गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असे. लालबाग-परळमधील या सांस्कृतिक वारशामुळे या विभागातून विविध क्षेत्रांतील अनेक कलाकार घडत गेले. कुणी नाट्य क्षेत्रात, कुणी चित्रपट क्षेत्रात, कुणी चित्रकला क्षेत्रात, कुणी नृत्य क्षेत्रात, तर कुणी शिल्पकला क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केले. लहानपणापासून मिळालेला हा सांस्कृतिक वारसा त्यांच्या नसानसांत भिनलेला जाणवतो. असाच एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रथमेश घाडगे.
 
 
प्रथमेश हा मूर्तिकार तर आहेच, तसाच तो मेकअप आर्टिस्टही आहे. त्याच्या कलेविषयी त्याला विचारले असता, तो म्हणाला, “लालबागच्या गणेश गल्लीतच मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे येथील कलेच्या वातावरणाचे संस्कार आपसूकच माझ्यात झिरपत गेले. चित्रकला, शिल्पकला, गणपती उत्सवात डेकोरेशन करण्याची आवड मला बालवयापासूनच लागली. या कलासंस्काराच्या ऋणात मी सदैव राहू इच्छितो, कारण कलेनेच मला संघर्षाच्या काळात तारले, ताठ मानेने जगण्याची जिद्द दिली आणि या कलेमुळेच मला नावलौकिक मिळत आहे.
 
 
 
“पाचवीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. या कसोटीच्या काळात आईच्या मेहनतीमुळे आणि मामाच्या पाठिंब्यामुळे आम्ही खंबीर उभे राहिलो. माझे आयुष्य एक नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, ते म्हणजे गणेश गल्लीच्या आमच्या मुंबईच्या राजाचे. राजाने मला आईवडिलांचे प्रेम, माया, दिशादर्शन, आशीर्वाद दिले आणि माझा प्रवास खडतर असला तरी सुसह्य होण्याची वाट दाखवली.” हे सांगताना प्रथमेशचे डोळे कृतार्थ भावनेने पाणावलेले दिसले.
 
 
लहानपणापासूनच सतत गणपतीसोबत वावरणं असायचं. घराच्या बाजूलाच छोट्या मूर्तींचा कारखाना होता. मूर्ती कशी घडवतात, सांधे कसे भरतात, पेंटिंग कशी करतात या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण चालू असायचे. यातूनच आपणही मोठे झाल्यावर अशा मूर्ती घडवू या, हे स्वप्न उराशी बाळगून होतोच. देव असतो आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला संधी देतो आणि आपल्या इच्छा स्वतःच साथ देऊन पूर्ण करून घेतो, हा माझा स्वानुभव आहे.
 

ganesh festival  
 
 
मी आठवीत असणारा शाळकरी मुलगा होतो. तेव्हा करी रोडची जागृत जपाची देवी हिला साडी नेसवणार्‍या गृहस्थांना काही कारणास्तव ती सेवा देणे जमले नाही. धाडस करून मंडळात माझी देवीला साडी नेसवण्याची इच्छा आहे, असं सांगितलं. मंडळातील लोकांनीही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. खरं सांगायचं तर या ड्रेपिंग क्षेत्रातील (वेशभूषा) माझ्या करीअरची सुरुवात जपाच्या देवीच्या चरणापासूनच झाली. या एका प्रसंगाने माझ्या आयुष्याला पूर्णतः कलाटणी मिळाली.
 
 
हौस म्हणून छोटी-मोठी कामं करत गेलो. लोकांना माझी कामं आवडत गेली. माऊथ पब्लिसिटीने (मौखिक प्रसिद्धीने) मोठमोठ्या मंडळांच्या देवीच्या साड्या नेसविण्याची कामे मिळत गेली. बारावीपर्यंत शिक्षणासोबत ही कामेही चालू होतीच. भविष्याचा विचार करून घरच्यांनी आग्रह केला की, कलेची आवड आहे, तर याच क्षेत्रातील कौशल्यपूर्ण शिक्षण घे. नोकरी आणि माझी ड्रेपिंगची कामे करता करता मी रचना संसदमध्ये या विषयाचा कोर्स पूर्ण केला.
 
 
याच दरम्यान माझ्या शाळकरी मित्राने मला 18 फूट उंचीच्या गणेशमूर्तीला पीतांबर नेसवशील का, अशी विचारणा केली. एवढ्या मोठ्या मूर्तीला वस्त्र परिधान करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. माझ्यासाठी हे खूप मोठे आव्हान होते. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणून मी सुरुवात केली आणि यशस्वीरीत्या श्रींच्या कृपेने हे आव्हान पेलले. दुसर्‍या वर्षीही त्या कामासोबत, कारखान्यातील अन्य मूर्तींनाही वस्त्रे परिधान करण्यास सांगितली. या वेळी अधिक बारकाईने आणि आत्मविश्वासाने काम उत्तम पार पाडले. लोकांना माझ्या कामाची माहिती होत गेली, त्यातून मला बरीचशी कामे मिळत गेली. या क्षेत्रात नवखा असतानाही अनेक प्रसिद्ध मंडळांनी मला साथ दिली, माझ्या कामावर विश्वास ठेवला. असे बरेचसे पाठीराखे आहेत. त्यांच्यामुळेच माझा हा प्रवास मी करू शकलो.

ganesh festival
 
गणेश मूर्तींना वस्त्रे नेसवण्याच्या निमित्त माझा कारखान्यातील वावर वाढत गेला. घराशेजारी असलेल्या कारखान्यात मी लहानपणापासून जातच होतो; पण या कामामुळे मूर्तींच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळत गेली. गणेशमूर्ती घडविण्याचे स्वप्न उफाळून येऊ लागले. चार-पाच वर्षे या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून त्यातील बारकावे, घ्यावी लागणारी मेहनत, मनुष्यबळ, व्यवसायासाठी लागणारे भांडवल आणि व्यवसाय म्हटलं की येणारी अनिश्चितता, या सर्व गोष्टींचा विचार केला आणि जगात कोरोनामुळे आधीच अनिश्चिततेचे धुके पसरलेले असताना 2020 साली भागीदारीत का होईना कारखाना उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला.
 
 
सुरुवातीला नुकसान झाले, यामुळे घरच्यांनीही व्यवसाय नको, एखादी नोकरी बघ, असा निगुतीचा सल्ला माझ्या काळजीपोटी दिला. आईचा हा सल्ला शिरसावंद्य मानूनही, जिद्द न हारता मी घराभोवतीच्या छोट्या जागेत एक मूर्ती घडवली, एकाच्या नऊ मूर्ती घडवल्या, त्याच वर्षी देवीच्या मूर्तीही घडवल्या. लोकांकडून छान प्रतिसाद मिळाला, आत्मविश्वास द्विगुणित झाला. कोरोनाचं सावटही हळूहळू ओसरू लागलं होतं आणि मोठ्या मूर्ती घडविण्याची सरकारकडून 2022 मध्ये परवानगीही मिळाली आणि मी नव्या जोमाने घरच्यांच्या पूर्ण पाठिंब्याने स्वतःचा ’शिवाई आर्ट्स’ हा कारखाना उभारला. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असल्यामुळे घरच्या आर्थिक परिस्थितीची मला पूर्ण जाण होती. कामाची सुरुवात करतानाच कमीत कमी गुंतवणुकीवर माझा भर होता. घरातील मंडळींना विश्वासात घेऊन व्यवसाय सुरू केला. घरच्यांनीही काही गोष्टी सहन केल्या, विश्वास व पाठिंबा दिला आणि मुख्य म्हणजे माझ्या साथीला ते खंबीरपणे उभे आहेत.
 
 
“एक मूर्तिकार आणि मेकअप आर्टिस्ट अशा दोन्ही क्षेत्रांत तुझा लीलया वावर असतो, तर मूर्ती घडवताना आणि मूर्ती सजवताना तू कशा प्रकारे या गोष्टींकडे पाहतोस?” याचे उत्तर देताना प्रथमेश म्हणाला, “माझ्या कोणत्याही कामात पर्फेक्शनवर विशेष लक्ष असतं. जिवंत माणसावर काम करणारा मी कलाकार आहे. मेकअप आणि वस्त्र परिधान करताना समोरच्या व्यक्तीच्या मनातील भाव आणि सजवल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हे मी नेहमीच जवळून बघतो. गणेशाचे सगुण साकार रूप घडवतानाही हाच भाव माझ्यात असतो. मूर्तीत अधिकाधिक जिवंतपणा आणण्याचा माझा प्रयत्न असतो. मूर्तीच्या चेहर्‍यावरील भाव, मूर्तीची बैठक, डोळ्यांची लिखाई (डोळ्यांची बुबुळ, भुवया, पापण्या), केस, मूर्तीतच तयार होणारे दागिने, यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून मूर्तीत जिवंतपणा आणण्याकडे कल असतो. शिवाई आर्ट्समध्ये सहा फुटांपासून ते बावीस फुटांपर्यंत मूर्ती घडविल्या जातात. यंदा सार्वजनिक मंडळांच्या जवळजवळ 42 मूर्ती प्रथमेशच्या कारखान्यात साकारण्यात आल्या.
 

 शिवाई आर्ट्स प्रथमेश घाडगे
 
2022 पासून कार्यरत असलेल्या प्रथमेशने थोड्याच कालावधीत या क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे पण त्यामागे त्याची मेहनत, जिद्द, चिकाटी, कामाविषयी असलेली आत्मीयता, व्यवहारातील पारदर्शकता ही पंचसूत्री आहे. व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना थोड्याच कालावधीत प्रामाणिकता, कुशल- दर्जेदार कारागिरी, गुंतवणूक, कामाचे व्यवस्थापन, नियोजन, कामगारांविषयी असलेला बंधुभाव, सार्वजनिक मंडळातील मूर्तीविषयीच्या पन्नास डोक्यांच्या सूचनांना सामोरं जाऊन समन्वय साधणे, आपल्या मृदू वाणीने माणसांना जोडणे, निर्णयक्षमता, ही व्यवसायाची मूल्ये प्रथमेशने आत्मसात केली आहेत. म्हणूनच की काय, एखाद्या मंडळाची मूर्ती त्याच्या कारखान्यातील नसली तरी त्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला, त्याच्याशी हितगुज करायला अनेक जण त्याला भेटतात.
 
 
प्रथमेशच्या ‘शिवाई आर्ट्स’ कारखान्यामधून बाहेर पडलेल्या पहिल्याच गणेशमूर्तीने प्रत्यक्षदर्शींबरोबरच फोन, मेसेज आणि सोशल मीडियावरूनही मूर्तीचे स्वागत आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. यंदाचा मुंबई मोरया, कामाठीपुराचा राजा, नंदीवरील गणेश अशा काही खास मूर्तींची अधिकृत समाजमाध्यमांनीही दखल घेतली. त्याच्या या लौकिकाने महाराष्ट्राबाहेरहून त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्याकडून ही कला शिकण्यासाठी अनेक जण प्रथमेशशी संपर्क साधतात.
 
 
 
आता वळू या प्रथमेशच्या गणेशमूर्तींच्या वस्त्र परिधान (ड्रेपिंग) करण्याच्या कलेकडे. प्रथमेश हा स्वतः मूर्तिकार असल्यामुळे मूर्तीत जिवंतपणा आणण्याकडे त्याचा कल असतो. प्रथमेश निर्मित सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती या वेगवेगळ्या कशा दिसतील आणि सजीव कशा वाटतील यावर भर असतो. प्रत्येक मंडळाचे ठरावीक बजेट असते. त्यानुसारच मूर्ती आणि मूर्तीची सजावट करावी लागते. सर्वप्रथम मूर्तीच्या बैठकीचा (बैठी, उभी की बॅलेन्सिंग) विचार करावा लागतो. दर वर्षी मूर्ती ड्रेपिंगमध्ये वेगवेगळ्या कल्पनांची भर घालत जातो, जेणेकरून एखाद्या मंडळाकडे मूर्तीचे स्वतःचे दागिने नसतील, तर पीतांबर, शेल्याने, एखाद्या फेटा किंवा पगडीने ती मूर्ती उठावदार व आकर्षक कशी दिसेल. तसेच अशा मंडळांना मूर्ती साकार होत असतानाच मूर्तीतच तयार होणार्‍या दागिन्यांत कुंदन, हिरे, जरदोसी कलाकुसर असलेल्या लेसचा शेला, फॅब्रिकचे पॅच लावून त्यावर सुंदर नक्षीकाम करून घेतले जाणारे फेटे घालावेत हे तो सुचवतो. फेटा आणि पीतांबरात वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून मूर्तीचा थाट वाढविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. काही मंडळांच्या मूर्तींना पीतांबर आणि शेल्यासाठी उच्च दर्जाच्या (पैठणी, शालू, काठापदराच्या साड्या, भरजारी साड्या) इत्यादी वापरण्यास सांगतो. या मूर्ती दुरून पाहिल्या तरी लक्ष वेधून घेतात.
 
 
काही मंडळांकडे त्यांच्या मूर्तींचे खास घडवलेले सोन्याचांदीचे दागिने असतात. मूर्तीची रचना पाहून ते सजविले जातात. प्रत्येक मूर्तीचे पीतांबर, शेला परिधान करताना आकर्षक विरोधाभास (कॉन्ट्रास्ट) या गोष्टीकडे प्रथमेशचे विशेष लक्ष असते.
 
 
दर वर्षी मूर्ती ड्रेपिंगमध्ये नवनवीन कल्पनांचा आविष्कार, वैविध्य, कॉन्ट्रास्ट आणण्याचा प्रथमेशचा प्रयत्न असतो. पीतांबराचा काठ हा भरीव व आकर्षक विरोधाभासाचा असल्यास त्याची रंगत वाढते. पीतांबरात ट्रेडिंग साऊथ पॅटर्न, पेशवाई, ब्राह्मणी खोचा, पायघोळ, अशी बरीचशी विविधता पाहायला मिळते. फेट्यात कृष्ण फेटे, पेशवाई फेटे, पगडी तसेच फेट्यांमधील लावले जाणारे तुरे, शेले घालण्याचे विविध प्रकार प्रथमेशच्या गणेशमूर्तींत पाहायला मिळतात. कामाच्या अतिव्यग्रतेमुळे अनेक मंडळांतून श्रीमूर्तींना वस्त्रे परिधान करण्याचे बोलावणे असूनही शक्य होत नाही. मात्र गणेशगल्लीच्या मायबाप मुंबईच्या राजाचे पीतांबर प्रथमेश दर वर्षी नेसवतोच. कामामुळे आलेली व्यग्रता ही त्यानेच दिलेला प्रसाद आहे असे तो समजतो.
 
  श्रींच्या मूर्तींना वस्त्रे परिधान करू न शकणारी खंत आणि अनेक युवा पिढींची ही कला शिकण्याची आवड पाहून प्रथमेशने ’शिवाई आर्ट्स’च्या माध्यमातून ड्रेपिंग आणि मेकअप आर्ट्सचे कोर्स शिकवायला सुरुवात केली आहे.
 
इच्छा असूनही सर्व ठिकाणी श्रींच्या मूर्तींना वस्त्रे परिधान करू न शकणारी खंत आणि अनेक युवा पिढींची ही कला शिकण्याची आवड पाहून प्रथमेशने ’शिवाई आर्ट्स’च्या माध्यमातून ड्रेपिंग आणि मेकअप आर्ट्सचे कोर्स शिकवायला सुरुवात केली आहे. त्याच्या या आणखी एका पैलूमुळे अनेक नववधूंच्या लग्नसोहळ्याचा दिवस संस्मरणीय केला आहेे. येणार्‍या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील वरवरचे ज्ञान न देता सखोल ज्ञान देण्यावर त्याचा भर असतो. फॅब्रिक कोणती निवडावीत, मूर्ती किती फुटांची असेल तर किती कापड लागेल, कापडाचे स्टिचिंग कसे करावे, मूर्तींची रचना पाहता कोणत्या प्रकारचे ड्रेपिंग उपयुक्त राहील, असे बारकावे या कोर्समध्ये शिकवले जाते.
 
 
युवा पिढी म्हटली की ट्रेंड फॉलो करण्याकडे कल दिसतो. मग त्या ट्रेंडमध्ये संस्कृतीचे विकृतीकरण होत आहे यापासून ते अनभिज्ञ असतात. मूर्तीमध्ये देवत्वाचा भाव जपण्यासाठी मूर्ती सजवताना देवाच्या मूळ रूपाशी छेडछाड होता कामा नये. कला हे प्रभावी माध्यम आहे आणि म्हणूनच कलेच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृती-परंपरांचे दर्शन आणि तिच्या संवर्धनाकडे आपला कल असला पाहिजे, असे तो सांगतो. दिवसेंदिवस अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी श्रींची स्थापना करणे वाढत आहे. प्रत्येक जण आपल्या गणरायाचे साजरे रूप अधिक कसे खुलून दिसेल यासाठी उत्सुक आहेत. प्रथमेशला असा विश्वास आहे की, त्याच्या मार्गदर्शनाने तयार झालेले हे विद्यार्थी प्रत्येक गणेशभक्ताची ही गरज पूर्ण करण्यासाठी सज्ज होतील.
 
 
मूर्तींच्या वेशभूषेसाठी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तर प्रथमेशच्या शिवाई आर्ट्सला भेट देतातच त्याबरोबरच सणासुदीला आपणही सुंदर दिसावे, अशी प्रत्येक स्त्री वर्गाची इच्छा असते. मात्र नोकरी, गणेश आगमनाची तयारी यात स्वतःला वेळ देताना तारांबळ उडून जाते. अशाच महिला वर्गासाठी सणाच्या दिवशीस्वतः आकर्षक साडी परिधान करणे प्रथमेशच्या ’साडी ड्रेपिंग कोर्स’मुळे सहज शक्य आहे.
 
 
गणपती ही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता आहे. लालबाग-परळमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रथमेश घाडगे या कलाकाराचा विविध क्षेत्रांतील लीलया वावर म्हणजे गणरायाचा वरदहस्त त्याच्या कलेला लाभला आहे असंच वाटतं. गणरायाबद्दल त्याचा कृतार्थ भाव आणि जिव्हाळा त्याच्या कामातून व्यक्त होत आहे. अशाच सुंदर सुंदर कलाकृती त्याच्या हातातून घडोत, ही श्रीचरणी प्रार्थना!
Powered By Sangraha 9.0