विश्व हिंदू परिषदेच्या विविधांगी कार्यांचा हीरकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला धावता आढावा...
1947 साली आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. धर्माच्या आधारावर देश खंडित झाला, मुस्लिमांना पाकिस्तानच्या रूपाने वेगळी भूमी मिळाली. प्रचंड रक्तपात, हिंदू नरसंहार झाला. तरीही हिंदू समाजाने फाळणीचे शल्य पचवत स्वातंत्र्य स्वीकारले. हिंदू समाजाला वाटले, आता तरी उर्वरित हिंदुस्थानात आम्ही आमचा धर्म, संस्कृती आणि संस्कारांचे जतन-संवर्धन करू शकू; पण दुर्दैवाने तो समज खोटा ठरला. फाळणी झाल्यानंतर लोकसंख्येची पूर्णतः अदलाबदल करा. सगळे मुस्लीम पाकिस्तानात जावेत आणि तेथील सर्व हिंदूंना हिंदुस्थानात आणावे, असा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता; पण सद्गुण विकृतीमुळे तत्कालीन पुढार्यांनी हे नाकारले. त्या काळात ख्रिश्चन मिशनरीसुद्धा आपले चंबूगवाळे आवरून देश सोडून जाण्याच्या तयारीत होते. त्यांनाही अभय देऊन बाटवाबाटवीचे उद्योग तसेच पुढे चालू ठेवा, अशी अघोषित परवानगीच तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिली. त्याचा परिणाम नजीकच्या काळात दिसू लागला. मध्य भारतातील संपूर्ण जनजाती क्षेत्रात ख्रिश्चन मिशनर्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाले. पाडेच्या पाडे, गावेच्या गावे ख्रिश्चन झाली. देशभर गदारोळ माजला. मध्य प्रदेश शासनाने नियोजन आयोगाचे निवृत्त अध्यक्ष के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. 1956 मध्ये त्या समितीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हिंदूंचे धर्मांतर होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. त्यानंतरच्या काळात त्रिनिदादचे खासदार डॉक्टर शंभूनाथ कपिल देव हे भारतप्रवासाला आले होते. विदेशात राहणार्या हिंदू समाजाची नवीन पिढी हिंदू संस्कृती, हिंदू जीवनमूल्यांपासून दुरावत आहे, याची खंत मनात घेऊन भारतातील तत्कालीन राज्यकर्त्यांना भेटले; पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तदनंतर कुणाच्या तरी सूचनेवरून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर ऊर्फ पू. श्रीगुरुजी यांना बेळगावला भेटले.
1956 चा नियोगी कमिशनचा अहवाल आणि त्रिनिदादचे डॉ. शंभूनाथ कपिल देव यांनी पू. गुरुजींची घेतलेली भेट या दोन घटनांनी एका विश्वव्यापी हिंदू संघटनेच्या स्थापनेचे बीजारोपण केले असे म्हणता येईल. त्याच काळात रा. स्व. संघाचे प्रचारक दादासाहेब आपटे यांचा देशभर आणि विदेशात प्रवास सुरू होता. त्यांच्या प्रवासात विदेशातील हिंदूंची स्थिती, घोंघावणारे धर्मांतराचे वादळ याचे भीषण स्वरूप त्यांनी अनुभवले. त्या अनुभवावर आधारित त्यांनी ‘केसरी’ वर्तमानपत्रात तीन लेख प्रकाशित केले. त्यात त्यांनी हिंदूंच्या वैश्विक संघटनेची गरज प्रखरपणे मांडली. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांच्यासुद्धा मनात अशा संघटनेच्या स्थापनेचे विचार घोळत होते.
या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला, 29 ऑगस्ट 1964 रोजी मुंबईच्या सांदीपनी साधनालयात झालेली
विश्व हिंदू परिषदेची स्थापना होय. पू. श्रीगुरुजी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यसैनिक कन्हैयालाल मुंशी, संत तुकडोजी महाराज, गोवर्धन पीठाचे पू. शंकराचार्य, डॉक्टर संपूर्णानंद, बाबू जगजीवन राम, जैन मुनी सुशील कुमार, ग्यानी भूपेंद्र सिंग, हनुमान प्रसाद पोद्दार, मास्टर तारासिंग, योग शिरोमणी सीताराम दास महाराज आणि पूज्य चिन्मयानंद स्वामी आदी महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेचा शंखनाद झाला. त्या वेळी हिंदू समाजाचे संघटन, हिंदू संस्कृतीचे रक्षण-संवर्धन, उपेक्षित बंधू-भगिनींची सेवा, सामाजिक समरसता, अन्य धर्मात गेलेल्या हिंदूंची घरवापसी, विदेशातील हिंदूंशी सांस्कृतिक आदानप्रदान, गोरक्षा, गोसंवर्धन याकरिता स्थापन झालेल्या विश्व हिंदू परिषदेची ध्येयपूर्तीच्या दिशेने झालेली वाटचाल आपण समजून घेतली पाहिजे.
हिंदू सारा एक
एके काळी ‘मला गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका,’ तर काही जण म्हणत ‘हिंदू नावाचा प्राणी कधी एकत्र येऊच शकत नाही, चार हिंदू फक्त अशा वेळी एका दिशेने चालतात, ज्या वेळी त्यांच्या खांद्यांवर पाचव्याचे शव असते’. अशा काळात विश्व हिंदू परिषदेने हिंदू संघटनेचे कार्य सुरू केले आणि बघता बघता हिंदुत्व राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी आले. श्रीराम जन्मभूमी लढ्याचे रणशिंग फुंकले, सुप्त हिंदुत्व सिंह जागृत केला आणि त्या सिंहाच्या डरकाळीने देशाच्या माथ्यावरील बाबरी ढाचारूपी कलंक मिटवून टाकला आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेले श्रीराम जन्मभूमी मंदिर दिमाखात उभे राहिले. ‘मी अपघाताने हिंदू म्हणून जन्मलो’ असे म्हणणार्यांच्या विचारधारेला ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ असे म्हणणारी पिढी उभी करून खणखणीत उत्तर दिले. आज विश्व हिंदू परिषदेचे देशभर 72 लाख हितचिंतक आहेत आणि एक लाख गावांमध्ये कार्याचा विस्तार झाला आहे.
धर्मांतर आणि घरवापसी
धर्मांतराच्या समस्येला उत्तर शोधण्याचा प्रयत्न परिषदेने आपल्या स्थापनेपासून सातत्याने केला आहे. एका बाजूला सेवाकार्यांचे मोठे जाळे समाजातील वंचित, कमजोर वर्गांकरिता विणले आहे. शिक्षण, स्वास्थ्य, महिला सबलीकरण, आर्थिक रोजगार, जनजाती विकास, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत 5000 हून अधिक सेवाकार्यांच्या माध्यमातून परिषद समाजाची सेवा करीत आहे. गोव्याचे मातृछाया केंद्र, तलासरीचे वनवासी कल्याण केंद्र, मुंबईतील कर्करुग्णांसाठी वरदान ठरलेले स्वर्गीय अशोकजी सिंहल रुग्ण सेवा सदन ही अशा सेवाकार्याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पूर्वी धर्मांतराचा प्रवाह एकाच दिशेने वाहत होता. ज्यांना आपल्या मूळ धर्मात परतायचे आहे त्यांना कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. विश्व हिंदू परिषदेने या एकमार्गी प्रवाहाची गती कमी तर केलीच; पण दुसर्या बाजूने हिंदू धर्मात स्वेच्छेने घरवापसी करण्याची इच्छा असणार्या चार लाख हिंदूंना पुन्हा आपल्या स्वगृही स्वीकारले.
समरसता जागरण
अस्पृश्यता, जातिभेद अशा विषयांना धर्माची कधीही मान्यता नव्हती. मुस्लीम आक्रमणाच्या काळात ज्यांनी धर्म बदलण्यास नकार दिला अशा धर्मयोद्ध्यांना अपमानित करण्यासाठी घृणास्पद कामे करण्यास भाग पाडले. तदनंतर इंग्रजांनीही भेदनीतीचा वापर करून आपली सत्ता बळकट केली. दुर्दैवाने आपण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडलो आणि आपल्याच बंधू-भगिनींवर अन्याय केला. विश्व हिंदू परिषदेने या दृष्टीने पुढाकार घेत सर्व शंकराचार्य, अनेक महामंडलेश्वर, साधुसंत यांना एकत्र करून अशा भेदभावपूर्ण व्यवहाराला धर्माची मान्यता नाही, असे खणखणीत प्रतिपादन केले.हे प्रतिपादन व्यवहारात उतरवण्यासाठी पू. संतांच्या सहभोजनाचा कार्यक्रम डोमराजाच्या घरी आयोजित केला. एका अर्थाने अशा कार्यक्रमाच्या आयोजनातून, ‘न हिंदू पतितो भवेत्’चा मंत्र चरितार्थ केला.
आक्रमणावर प्रहार
परिषदेच्या स्थापनेपूर्वी हिंदू म्हणजे मार खाणारा, आक्रमण सहन करणारा, अशी प्रतिमा झाली होती. गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलण्यात परिषदेचा युवा विभाग म्हणजेच बजरंग दलाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 2008 साली काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला अतिरेक्यांनी विरोध केला होता. ते आव्हान स्वीकारत अतिरेक्यांच्या धमकीला भीक न घालता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुढा अमरनाथ यात्रा यशस्वी करून दाखवली. लव्ह जिहादला बळी पडणार्या हजारो मुलींना परत आणण्यात
विश्व हिंदू परिषदेचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या प्राणाची पर्वा न करता हजारो गोवंश कसायांच्या हातून वाचवण्यात बजरंग दलाचे वीर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात.
हिंदुत्वाचा विश्वसंचार
देशभरातील कार्यासोबतच परिषदेचे कार्य अनेक देशांमध्ये विस्तारत आहे. आज जगभरातील 33 देशांमध्ये परिषदेच्या शाखांचा विस्तार झाला आहे. यासोबतच वर्ल्ड हिंदू काँग्रेससारख्या व्यासपीठावरून हिंदू चिंतनाच्या आधारावर हिंदू उद्योजकांमध्ये समन्वय, सामंजस्य आणि व्यापारवृद्धीचा दृष्टिकोन विकसित करण्याचा विहिंपचा प्रयत्न आहे.
‘मना घडवी संस्कार’
सध्या देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण, कुटुंबविच्छेदनाच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे तर हवेतच; पण त्याचबरोबर मनपरिवर्तनाची, संस्कारांची नितांत गरज आहे. या दृष्टीने विश्व हिंदू परिषद तीन प्रकल्प राबवीत आहे. साप्ताहिक बाल संस्कारकेंद्रांसाठी देशभरातील सर्व भाषांमध्ये बाल संस्कार पाठ्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यात प्रार्थना, खेळ, देशभक्तीपर गीते, बोधप्रद कथा असे विषय जोडले आहेत. आज अशा प्रकारची देशभरात 5000 संस्कार केंद्रे सुरू आहेत. या साप्ताहिक संस्कार केंद्रांव्यतिरिक्त शहरांमधील सेवावस्त्यांमध्ये शेकडोंच्या संख्येत संस्कार पाठशाला (शिकवणी वर्ग) सुरू आहेत. त्याशिवाय देशातल्या 21 राज्यांमध्ये मूल्यशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद् रामायण, महाभारत, संतांची जीवने, क्रांतिकारकांच्या गाथा शिकविण्याचा उपक्रम सुरू आहे. सध्या देशभरातील दहा हजार शाळांमधील चार लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगू, ओरिया, मल्याळी, कन्नड अशा विविध भाषांमध्ये संस्कारक्षम कथांच्या माध्यमातून संस्कृती आणि जीवनमूल्यांचे शिंपण होत आहे.
गोरक्षा-गोसंवर्धन
स्वातंत्र्यानंतर देशभरात गोरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली. 1966 साली करपात्री महाराजांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन, तदनंतर एक कोटी स्वाक्षर्यांसह केंद्र शासनाला दिलेले निवेदन, प्रत्येक राज्यातील गोभक्तांनी गोरक्षणासाठी उठवलेला आवाज अशा विविध मार्गांनी गोरक्षणाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परिषदेच्या स्थापनेनंतर गोरक्षण आणि गोसंवर्धन या आयामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. कसायांच्या हातून गोवंश वाचविण्याचे अत्यंत कठीण कार्य परिषद करत आहे. बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रसंगी प्राणाचे मोल देऊनही गोरक्षण करतात. विश्व हिंदू परिषद दर वर्षी साधारण दोन लाखांपेक्षा जास्त गोवंशाची सुटका करते. आज देशभरात परिषदेच्या माध्यमातून 400 गोशाळा कार्यरत आहेत. दुसरीकडे गोबरआधारित शेती व्हावी यासाठी शेतकर्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. गोमूत्र आणि शेणापासून अनेक औषधांची निर्मिती करण्याचे कार्य गोशाळांच्या माध्यमातून होत आहे. गोरक्षणासाठी देशात गोरक्षेचा केंद्रीय कायदा व्हावा, अशी परिषदेची आग्रही मागणी आहे.
सरकारी बंधनातून मंदिरांची मुक्तता
मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हटवावे यासाठी पूजनीय संतांच्या मार्गदर्शनाखाली परिषद प्रयत्नशील आहे. याकरिता परिषदेने चिंतन गट निर्माण केला आहे ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे प्रथितयश वकील, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, साधुसंत, सामाजिक कार्यकर्ते अशांचा समावेश आहे. मंदिराच्या संचालनात समाजाच्या सर्व जातीवर्गांचा सहभाग असला पाहिजे, मंदिरात जमा होणारा पैसा हा हिंदूंकरिताच उपयोगात आला पाहिजे, अशा भूमिकेतून एक मॉडेल उभे करण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे.
विविध प्रकारची जिहादी संकटे
स्वातंत्र्यानंतर विविध पद्धतीने लोकसंख्या वाढवत ठीकठिकाणी मिनी पाकिस्तान तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहाद अशा तीन स्तरांवर हे आक्रमण होत आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणींना जाळ्यात ओढायचे, निकाह करायचा आणि अधिकाधिक मुले जन्माला घालायची. एक हिंदू महिला मुसलमान झाली तर अनेक पिढ्यांचे नुकसान होते. आज विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दल अशा फसविल्या गेलेल्या मुलींना स्वगृही परत आणणारे सर्वात मोठे संघटन आहे. दर वर्षी अशा हजारो मुलींचे स्वधर्मात पुनर्वसन करून त्यांना सन्मानाचे जीवन प्रदान करण्याचा प्रयत्न परिषद करीत आहे. लव्ह जिहादप्रमाणे लँड जिहादविरुद्ध न्यायालयीन पातळीवर आणि प्रत्यक्ष मैदानात संघर्ष करण्यासाठी सकल हिंदू समाजाला तयार करण्याचे प्रयत्न होत आहेत. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत मुसलमान समुदायाने एकगठ्ठा मतदान करून हिंदू उमेदवाराला पराभूत केले. हिंदूंचे मतदान जाती, भाषा, पंथ, संप्रदाय आधारावर विभाजित झाल्यामुळे बहुसंख्य असूनसुद्धा हिंदूंचे निवडणुकीत नुकसान होताना दिसले. हे थांबवायचे असेल तर शत प्रतिशत हिंदुहिताकरिता मतदान यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करत आहे. सध्या वक्फ बोर्डबाबत केंद्र शासनाने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. वास्तविक धर्मनिरपेक्ष देशात वक्फ बोर्डाची गरजच काय? ते रद्दच झाले पाहिजे.
हिंदूंची घटती लोकसंख्या
भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये हिंदूंची संख्या आठ टक्क्यांनी कमी झाल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यावर अभ्यास करताना त्याची चार कारणे समोर आली. पहिले म्हणजे, धर्मांतर. हजारो ख्रिश्चन मिशनरी संघटना हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमानांचा एक वर्ग सक्रिय आहे. सीमा भागातून होणारी घुसखोरी हेसुद्धा हिंदू लोकसंख्या कमी होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. यातील सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा म्हणजे हिंदूंचा घटता जन्मदर. आज एक हिंदू महिला आपल्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते याला जन्मदर मानला जातो. जगभरात हा रिप्लेसमेंट रेट 2.1 असला तरच तो समुदाय टिकून राहतो. 2021 मध्ये संपूर्ण भारताचा जन्मदर 1.92% होता. हिंदू समाजाच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे. प्रत्येक हिंदूने याबाबत विचार केलाच पाहिजे. यासाठी परिषद छोट्या छोट्या गटांमध्ये कुटुंब प्रबोधन शिबिरांचे आयोजन करीत आहे. हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचाही विषय आहे हे हिंदूंनी समजून घेतले पाहिजे.
हिंदू समाजासमोरील आव्हाने
सध्या घटस्फोटाची अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल होत आहेत. म्हणूनच हिंदूंनी प्रथम कुटुंब सावरण्याला प्राधान्य दिले पाहिजे. आपले कुटुंब टिकले तरच धर्म आणि संस्कृती टिकेल.त्यासाठी परिवारातील सदस्यांमधील संवाद वाढायला हवा. आज हिंदू समाजाला तोडणार्या शक्ती जाती-जातींत भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी जातिभेदाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण हिंदू समाज माझा आहे, हा भाव वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. देशाला विश्वगुरू म्हणून पाहायचे असेल तर ‘स्व’ची भावना प्रत्येकात जागृत करणे गरजेचे आहे. यासोबतच एक चांगला नागरिक होण्यासाठी नागरी कर्तव्यांकडेही डोळसपणे बघायला हवे. यासाठी व्यक्तिगत चारित्र्यासोबतच राष्ट्रीय चारित्र्य आपण अंगीकारले पाहिजे. एक वेळ स्वतःचे अहित झाले तरी चालेल; पण देव, देश, धर्म आणि समाजाचे अहित आपल्याकडून होऊ नये हे सांभाळले पाहिजे. विश्व हिंदू परिषदेच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्ताने संपूर्ण हिंदू समाजात कर्तव्यभावना जागविण्याचा प्रयत्न परिषद करीत आहे.
लेखक विहिंपचे कोकण प्रांतमंत्री आहेत.