डोंबिवलीचे श्री गणेश मंदिर संस्कृती संवर्धनाचा ऊर्जास्रोत!

14 Sep 2024 14:56:25

vivek
डोंबिवलीतील फडके रोड येथे 1924 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाची यंदा शतकपूर्ती पार पडली. धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम हे तर गणेश मंदिर संस्थानचे नित्य कार्य आहे. त्याचबरोबर संस्थानाकडून राबवण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम हे नेहमीच देशभरात आदर्शवत मानले गेले आहे. श्री गणेश मंदिराने सुरू केलेली आणि आता महाराष्ट्राचेच नव्हे, तर सार्‍या देशाचे आकर्षण ठरली ती नववर्ष स्वागतयात्रा! या शतकपूर्ती श्री गणेश मंदिर संस्थानाच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
डोंबिवली हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावरचे एक महत्त्वाचे शहर. त्याला इतिहास असा फारसा नाहीच. शोधून शोधून शहराचा उगम शोधायचाच तर तो जेमतेम शे-दोनशे वर्षांपलीकडे जाणारा नाही. या शहराची ओळख महाराष्ट्राच्या नागर जीवनाला झाली तीही खर्‍या अर्थाने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. नेमके सांगायचे तर ठाण्यापर्यंत आलेली रेल्वेलाइन पुढे कल्याणमार्गे खंडाळ्याच्या घाटाला जोडायचा विचार तत्कालीन इंग्रज सरकारने सुरू केला तेव्हा. मुंबईहून पुण्याला जाणार्‍या रस्त्यावर हे शहर तेव्हाही नव्हते आणि आजही नाही; परंतु रेल्वे लाइन मात्र या भागातून जाणार असल्याने तत्कालीन कोपर, ठाकुर्ली, पाथर्ली अशा खेड्यांच्या दरम्यान जी वस्ती निसर्गतः उभी राहत गेली, तिला नाव मिळाले डोंबिवली.
 
 
प्रत्येक शहराला एक सांस्कृतिक इतिहास असतो, एक ऐतिहासिक महत्त्व असते, तसे कसलेही महत्त्व नसलेले असे हे शहर. 1887 सालीच डोंबिवली रेल्वे स्टेशन बांधले गेले. त्याआधी वर्ष-दोन वर्षे लोअर कोपर स्टेशन होते; पण ते प्रामुख्याने होते लोहमार्गाच्या बांधकामासाठी लागणारी खडी वाहून नेण्यासाठी. त्याच वर्षी नारायणराव पाटकरांनी सध्याच्या रामनगरात एक दगडी घर बांधले आणि डोंबिवली गाव वसायला लागले. सुरुवातीची अनेक वर्षं डोंबिवली स्टेशनच्याच परिसरात वाढली, ती प्रामुख्याने पूर्वेच्याच भागात. स्टेशन, त्या शेजारचे सध्याचे भाजी मार्केट, त्यातूनच सुरू होणारा फडके रस्ता आणि त्याच्या दुतर्फा असलेल्या गल्ल्या आणि त्याचा आप्पा दातार चौकात होणारा शेवट. मग थोडेसे तिथून पुढे सध्याच्या पेंडसे नगरच्या दिशेने वाढलेले असे सगळे मिळून शे-दोनशे घरांचे गाव. पश्चिमेला वस्ती होती; पण ती थोडी स्टेशनला लागून आणि सध्याच्या वाटवे बंगल्याच्या आसपास. त्यापलीकडे काही घरे होतीच; परंतु ती तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यांसाठी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी बांधलेली. पश्चिमेकडे बावन चाळ म्हणून असणारी छोटेखानी घरांची वस्ती आणि पूर्वेकडे सध्याच्या ठाकुर्ली परिसरात काहीशी उंचावर बंगलेवजा वसाहत होती ती बारा बंगला नावाने ओळखली जाणारी.
 
 
vivek
 
प्रत्येक गाव, प्रत्येक शहर ओळखले जाते ते त्या-त्या गावच्या महनीय व्यक्तींमुळे. मालगुंड जसे केशवसुतांमुळे, नाशिक जसे कुसुमाग्रजांमुळे, भगूर जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे, पालगड जसे साने गुरुजींमुळे, सासवड जसे आचार्य अत्रे यांच्यामुळे आणि पळसखेडे जसे महानोरांमुळे ओळखले जाते, तसेच डोंबिवली हे गाव अवघ्या सारस्वताला ज्ञात झाले ते पु. भा. भावे, शन्ना नवरे या साहित्यसूर्यांमुळे; कविवर्य मधुकर जोशी, आबा धामणस्कर यांच्यासारख्या राजमान्य कवींमुळे; काही काळ इथे राहिलेल्या विंदा करंदीकरांमुळे; पंडित गजाननराव जोशी, पंडित एस. के. अभ्यंकर, पं. निम्बर्गीबुवा, पंडित सदाशिव पवार आणि संगीतकार दशरथ पुजारी या गानश्रेष्ठींमुळे आणि ज्येष्ठ संपादक गोविंद तळवलकरांमुळे. पुण्यासारखे सांस्कृतिक महानगर तिथे राहून गेलेल्या अनेक महनीय व्यक्तींची स्मृती नीलफलकांद्वारा आजही जपते आहे; परंतु असे काही करावे हे महानगरपालिकेची स्थापना होऊन 40-42 वर्षं होऊनही किंवा मंत्रीपद भूषवलेले तीन तीन लोकप्रतिनिधी शहराला प्राप्त होऊनही अद्याप सुचलेले नाही, हे खरोखरीचे दुर्दैव आहे.
 
 
पण याशिवाय प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य आणखीही काही गुणावगुणांमुळे जगाला माहीत होते. कधी ते वैशिष्ट्य तिथल्या पर्यटनस्थळात असते, इतिहासाच्या वारसास्थळात असते, त्या-त्या गावी मिळणार्‍या आगळ्यावेगळ्या चवीच्या खाद्यपदार्थांत असते, तर कधी ते त्या-त्या गावाच्या प्रथा-परंपरेमध्ये दडलेले असते. डोंबिवलीला असे वैशिष्ट्य, असे वेगळेपण प्राप्त झाले ते इथल्या श्री गणेश मंदिरामुळे आणि त्याच्या अनेकानेक समाजोपयोगी उपक्रमांमुळे. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशका-दोन दशकांत स्थानिक रहिवाशांची गरज म्हणून ज्या दोन-तीन नागरी व्यवस्था उभ्या राहिल्या त्यात होती शाळा, स्मशानभूमी आणि मंदिर.
 
पुस्तक खरेदी करा....
शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक
https://www.vivekprakashan.in/books/book-on-lokmanya-tilak/
लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे.
https://www.vivekprakashan.in/books/book-on-lokmanya-tilak/
 
 
  
फडके रोड हा तत्कालीन डोंबिवलीतला एकमेव मध्यवर्ती मोठा रस्ता. त्या रस्त्याच्या टोकास 1924 मध्ये स्थापन करण्यात आले श्री गणेश मंदिर संस्थान. यंदा त्याची शतकपूर्ती पार पडली. धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम हे तर गणेश मंदिर संस्थानचे नित्य कार्य. त्यात असतात संकल्प अभिषेक, लघुरुद्र, सहस्रावर्तने आणि नामांकित कीर्तनकार-प्रवचनकारांची सेवा. त्याशिवाय ध्यानकक्ष आणि उपासना कक्षाद्वारे साधकांना उपलब्ध सेवा; पण या धार्मिक-आध्यात्मिक उपक्रमांखेरीज मंदिर प्रसिद्ध आहे ते संस्थानतर्फे चालविण्यात येणार्‍या वैद्यकीय उपक्रमांसाठी, सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी. मंदिरातर्फे चालविण्यात येते श्री गणेश अल्ट्रासोनोग्राफी सेंटर आणि मंदिरातर्फे नित्यनेमाने आयोजित केली जातात ती रक्तदान शिबिरे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना जात-धर्म न पाहता केले जाणारे अर्थसाहाय्य हे त्यातच मोडणारे. नुकतेच शतकपूर्ती वर्षात मंदिरानं पश्चिम भागातही प्राथमिक आरोग्य चिकित्सा केंद्र सुरू केले आहे.
 
 
vivek
 
मंदिराच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात बर्‍याच वर्षांपूर्वी झाली. दिलासा व्यसनमुक्ती केंद्र काही काळ मंदिराने चालवले. मंदिरात रोज जमणारे निर्माल्य, त्यातील अ-विघटनशील वस्तू बाजूला काढून टाकून विघटित करता येतात आणि त्यापासून गांडूळ खत बनू शकते याची सुरुवात मंदिराने केली, त्यासाठी औद्योगिक वसाहतीत भूखंड मिळवला आणि आता त्या सेंद्रिय खताचा उपयोग शेकडो भाविक करून घेत आहेत. बागा-नर्सरी यांच्याकडे घरगुती फुलझाडांसाठी वाढती मागणी असल्याने मंदिराने निर्माल्य क्रशर मशीन घेतले आहे. मंदिरालगत महापालिकेकडून मिळालेल्या भूखंडावर गणेशवाटिका उभी करण्यात आली असून तिथे नाना-नानी उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खुल्या व्यायाम उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
गणेश मंदिर केवळ डोंबिवलीकरांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रभरातील गणेशभक्तांसाठीही सेवा पुरवीत आहे. सातारा जिल्ह्याचा काही भाग अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. जाखणगाव-दहिवडी भागात दुष्काळ निवारणार्थ बंधारादुरुस्तीचे आणि ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यासाठी मंदिराने काही लाख रुपये खर्च केले. मंदिराच्या जुन्या इमारतीचे आणि परिसराचे नूतनीकरण करून जी नवी इमारत बांधण्यात आली, तीत शहरातील लहान-मोठ्या सामाजिक- सांस्कृतिक- शैक्षणिक-धार्मिक- आध्यात्मिक- वैद्यकीय संस्थांसही उपस्थितीनुसार आसनक्षमता असणारी सभागृहे मंदिराने उपलब्ध करून दिली आहेत. याखेरीज अशा संस्थांना मंदिरातर्फे अनुदान उपलब्ध करून दिले जाते, रुग्णांना अर्थसाहाय्य केले जाते, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते ती वेगळीच.
 
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे दुर्लक्षित झालेले वाचनालय मंदिराने तीस वर्षांच्या कराराने चालवण्यास घेतले असून तिथे संगणकीकृत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दृष्टिहीन व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकालय जसे चालवण्यात येते तसेच ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींसाठी बेसिक संगणक प्रशिक्षणाचे निःशुल्क वर्गही आयोजित केले जातात. याशिवाय वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी टॅली अकाऊंट्स, जीएसटी प्रशिक्षण सुविधा जशी आहे, तशीच दररोजची 40 वृत्तपत्रे आणि वार्षिक दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जातात.
 

vivek 
 
मंदिराने चालविलेल्या एकेका उपक्रमाची व्याप्ती आता इतकी मोठी झाली आहे की, त्या प्रत्येकाच्या उपलब्धीवर स्वतंत्र लेख होऊ शकतो. दिवाळी-दसरा-एकादशी-चतुर्थी यानिमित्ताने मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी अभूतपूर्व असते. यातूनच एका दिवाळीला एका अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. तो उपक्रम म्हणजे युवक-विद्यार्थ्यांचा युवाभक्ती दिन. दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री गणेशाचे दर्शन घेऊन एकमेकांना शुभेच्छा देणार्‍या हजारो युवक-युवतींचे अनौपचारिक एकत्रीकरण, त्याला जोडून त्यांच्या कलागुणांचा कलाविष्कार असा हा अनोखा उपक्रम. हजारो युवक- युवती जमून, फटाके वाजवूनही गोंधळ-गडबड नाही, त्यासाठी पोलीस बंदोबस्त लावावा लागत नाही, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य. ढोल-लेझीम-झांज पथक आता सर्वच शहरात लोकप्रिय झाले आहे, त्याचे वेगळेपण नाही; परंतु गेली 44-45 वर्षे मंदिरातर्फे ‘रविवारीय संगीत सेवा’ नावाचा उपक्रम विनाखंड सुरू आहे आणि हजारो कलाकारांनी आपली सेवा या उपक्रमाद्वारे श्रीचरणी रुजू केली आहे.
 
 
श्री गणेश मंदिराने सुरू केलेला आणि आता महाराष्ट्राचेच नव्हे, तर सार्‍या देशाचे किंबहुना सार्‍या जगाचे आकर्षण ठरलेला उपक्रम म्हणजे नववर्ष स्वागतयात्रा. 1998 साली या उपक्रमाला डोंबिवलीत प्रारंभ झाला. जगभर 31 डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप दिला जातो आणि नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. स्वागतासाठी रोषणाई होते, हे खरेच; परंतु निरोपाच्या नावाखाली जो मद्यधुंद नंगानाच घातला जातो, तो रोखावा, त्याला सकारात्मक-संस्कारात्मक उपक्रमाची जोड द्यावी, एखादी रेषा पुसून टाकून लहान करण्याऐवजी तिच्या शेजारी वा खाली मोठी रेष मारावी आणि पहिली रेष आपोआप लहान होईलसे पाहावे, या उद्देशातून 1998 सालीच सुरू होत असलेल्या युगाब्द 5001 च्या निमित्ताने ‘स्वागत नववर्षाचे’ असा उपक्रम हाती घेतला गेला.
 
 
इंग्रजी नववर्ष कशाला? पाडव्याला, चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होणार्‍या हिंदू नववर्षाला हा उपक्रम सुरू करावा, तो केवळ मंदिराचा उपक्रम न बनता संपूर्ण गावाचा, सकल हिंदू समाजाचा व्हावा, यासाठी शेकडो संस्था, निवासी सहकारी संस्था यांच्याशी संपर्क करण्यात आला. पाडव्याचा मुहूर्त यासाठी शोधण्यात आला आणि आदल्या रात्री नागरिक-महापालिका यांच्या सहकार्याने शहर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येऊन बिनआवाजाच्या फटाक्यांचे प्रदर्शन, संभाजी महाराज पुण्यतिथी साधून देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले, तर पाडव्याच्या दिवशी भारतीय वेशात हजारो नागरिकांनी एकत्र जमून शहरभर प्रभातफेरीच्या धर्तीवर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
 
 
डोंबिवलीने सुरू केलेल्या आणि गणेश मंदिराने नेतृत्व केलेल्या या उपक्रमाने इतिहास रचला गेला. हा उपक्रम पक्षीय राजकारणापासून दूर राहावा, तो केवळ महाराष्ट्रीय वा मराठी भाषिक समाजापुरता न राहता सर्वभाषिक डोंबिवलीकर त्यात सहभागी व्हावेत, या संपूर्ण उपक्रमासाठी कुणीही प्रायोजक नसावेत, समाजाने-नागरिकांनी-संस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून त्यात सहभागी व्हावे, किंबहुना मंदिराच्या उपक्रमाला हातभार लागेल असे पाहावे, असे ठरवण्यात आणि योजण्यात आले. 2020-21 साली कोविडमुळे स्वागतयात्रांचे आयोजन होऊ शकले नव्हते, त्यामुळे 2024 ची नववर्ष स्वागतयात्रा ही 24 वी स्वागतयात्रा ठरली. स्वाभाविकपणे 2025 ची स्वागतयात्रा ही आता रौप्यमहोत्सवी वर्षाची स्वागतयात्रा ठरणार आहे. स्वागतयात्रेला आलेला वार्षिक सोहळ्याचा भाव काढून टाकून, त्यात आलेला तोचतोपणा वगळून, सामाजिक एकात्मतेच्या, समरसतेच्या, सौहार्दाच्या नव्या उपक्रमांची स्थायी जोड देता आली तर स्वागतयात्रेचा मूळ उद्देश आणि भाव जपला जाईल.
 
 
डोंबिवली हे शहर एके काळी मुंबईतून बाहेर पडून नव्या जागी स्थायिक होण्यासाठीचे सर्वार्थाने सुयोग्य शहर मानले जात होते. इथल्या शाळा, इथले सांस्कृतिक वातावरण, इथली स्वच्छ, निर्मळ, प्रदूषणरहित हवा लोकांना आकर्षित करत होती. नगरे विस्तारत गेली, लोकसंख्या स्फोटागत वाढली; पण त्या तुलनेत जीवनावश्यक नागरी सुविधा मात्र कमी पडत गेल्या आणि डोंबिवली बकाल होऊ लागली. असे बदल हे खरे तर समाज संरचनेमधले अपरिहार्य असे टप्पे मानले जातात; पण ते बदल स्वीकारत स्वीकारत नव्या उत्साहाने जगत जगत शहरावर- परिसरावर- तिथल्या नागरी जीवनावर प्रेम करणार्‍या मंदिरांसारख्या संस्था उभ्या राहण्याची, त्यांची संस्थाने बनू न देता त्यांना नव्या- उमेदीच्या- तरुण-कल्पक नेतृत्वाची जोड देत देश-धर्म-समाज मस्तकी धरण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. शतकपूर्तीनंतरच्या वाटचालीत असे नेतृत्व तो गणराय डोंबिवलीला देवो, या अपेक्षेसह.
Powered By Sangraha 9.0