हिंदू धर्मयोद्धा - विष्णुबुवा ब्रह्मचारी

विवेक मराठी    14-Sep-2024
Total Views |
विष्णू भिकाजी गोखले ऊर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या षड्यंत्रावर आपल्या पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढविला, हिंदूंना आत्मविश्वास दिला, सामाजिक सुधारणांसाठी उभे आयुष्य खर्ची घातले. अशा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष 9 ऑगस्ट 2024 (श्रावण शुद्ध 5) पासून सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख..
vishnubuva
 
आधुनिक भारताच्या उभारणीत अनेक ज्ञात-अज्ञात महापुरुषांचा सहभाग आहे. यातील एक नररत्न म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या निर्भीड, संन्यासी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य अढळ अशा ध्रुव तार्‍यासारखे सर्वांना मार्गदर्शक आहे.
 
 
जातिभेद निर्मूलन, बालविवाह, विधवाविवाह, शिक्षण, कामगार आणि शेतकर्‍यांच्या समस्या अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी हिंदू समाजाचे आग्रहपूर्वक, पोटतिडिकीने प्रबोधन केले. त्यासाठी निंदानालस्ती, उपेक्षा सहन केली. जातिभेदांमुळे आपला समाज विस्कळीत झाल्याने आपण पारतंत्र्यात गेलो, असा वस्तुनिष्ठ विचार मांडला. ख्रिश्चन मिशनर्‍यांनी चालविलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा आपल्या लेखणी आणि वाणीने कठोर प्रतिकार केला. भारताचे उत्थान वेदोक्त धर्माच्या - वेद आणि उपनिषदांनी सांगितलेल्या चिरंतन जीवनमूल्यांच्या आचरणातून होईल, असा त्यांचा विश्वास होता.
 
ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आक्रमणामुळे निर्माण झालेला हिंदूंच्या धर्मांतराचा धोका पावणेदोनशे वर्षांपूर्वी या क्रांतिकारी संन्याशाने ओळखला, ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या षड्यंत्रावर आपल्या पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढविला आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांशी वादविवाद केले, त्यासाठी पुरा भारत पालथा घातला, हिंदूंच्या प्रबोधनासाठी शेकडो भाषणे - सभा - बैठका केल्या, हिंदूंना आत्मविश्वास दिला, सामाजिक सुधारणांसाठी उभे आयुष्य झटले, विपुल ग्रंथलेखन केले, अशा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष 9 ऑगस्ट 2024 (श्रावण शुद्ध 5) पासून सुरू झाले आहे.

पुन्हा अखंड भारत
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल?
त्याची संकल्पना काय?
अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? पुस्तकाची प्रत आजच नोंदवा.
 
 
वेदोक्त मंडन आणि परमत खंडन
 
विष्णुबुवांनी ख्रिश्चनांच्या टीकेचे खंडन करण्यासाठी लहानमोठ्या बैठका घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक शनिवारी गिरगावातील प्रभू सेमिनरीत त्यांची व्याख्याने होत असत. 20 सप्टेंबर 1856 पासून प्रत्येक शनिवारी गिरगावातील प्रभू विद्यालयात (प्रभू सेमिनरी) सभा आयोजित केल्या जात. या सभांना इतकी प्रचंड गर्दी उसळत असे की, सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी एक आणा प्रवेशमूल्य (तिकीट) आकारण्यात आले होते. भारताच्या इतिहासात व्याख्यानासाठी तिकीट आकारण्याची ही पहिलीच घटना असावी. या व्याख्यानमालेच्या व्यवस्थापनात विद्यालयातील सोकर बापूजी त्रिलोकेकर, शामराव मोरोजी त्रिलोकेकर आणि आत्माराम सदानंद या शिक्षकांचा पुढाकार होता. मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती धाकजी दादाजी, सखारामजी यांच्या घरी आणि इतरत्रही चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत असे. या सभांना अनेक जातींचे लोक उपस्थित राहत. अनेक श्रोते वेगवेगळ्या प्रश्नांचा भडिमार करत असत. उत्तरे देताना बुवा त्यांच्या प्रश्नांचा एका फटक्यात फडशा पाडत असत. बुवांकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असे, प्रत्येक शंकेचे समाधान ते करीत. निरुत्तर होण्याचा प्रसंग त्यांच्यावर येत नसे. विष्णुबुवांचे वक्तृत्व आणि वादविवाद कौशल्य अत्यंत प्रभावी होते.
 
विष्णुबुवांचे चरित्रकार रामचंद्र पांडुरंग आजरेकरशास्त्री यांनी या सभांचा वृत्तांत चरित्रात लिहिला आहे. ते लिहितात, ‘वाहव्वा, वाहव्वा असे बोलत सभेतील मंडळी चकित आणि स्तंभित होत. त्यांच्या मुखाकडे टक लावू पाहत. एकाग्रचित्ताने कान लावून ऐकत. कोणास प्रश्न सुचत नसे. तर्क-कुतर्क करण्यास अवकाश मिळत नसे. त्यांच्या वाक्प्रवाहापुढे इतरांची भाषणे व प्रश्न फिके दिसू लागत. कोणी हूं की चूंदेखील करत नसल्याने सभा चित्राप्रमाणे निश्चेष्ट होऊन जात असे.’ अशा एकूण 50 सभा झाल्या. या सभांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत होता. उदंड म्हणजे इतका प्रचंड प्रतिसाद, की त्यामुळे व्याख्यानांसाठी या जागा कमी पडू लागल्या. या सभांमध्ये हिंदू धर्मांतरित मंडळींना प्रवेश नसे. म्हणून विष्णुबुवांनी गिरगाव चौपाटीवर सभा घेण्याचे ठरविले.
 
 
समुद्रकिनारीचा वादविवाद
 
15 जानेवारी 1857 ते 28 मे 1857 या कालावधीत प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 5.00 वा. मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर त्यांच्या ख्रिश्चन मिशनर्‍यांसोबत 20 जाहीर वादविवाद सभा झाल्या. या सभांना अस्पृश्य, ख्रिस्ती आणि इतर सर्व जातीधर्मांच्या लोकांना प्रवेश असे. मोठ्या संख्येने सर्व जातीधर्मांचे लोक विष्णुबुवांना ऐकण्यासाठी येत असत. मुंबईचा पोलीस कमिशनर चार्ल्स फोर्जेंट स्वतः पोलिसांना घेऊन या सभांच्या बंदोबस्तासाठी उपस्थित राहत असे.
 
ख्रिश्चनांच्या बाजूने रेव्ह. जॉर्ज बोवेन, रेव्ह. हेनरी बॅलेन्टाईन, रेव्ह. वॉलेस, रेव्ह. नारायण शेषाद्री, रेव्ह. विल्सन, रेव्ह. दाजी पांडुरंग, हरी केशवजी असत. तर विष्णुबुवांच्या मुंबई येथील कार्यात जगन्नाथ शंकरशेट, शेट मंगळदास नथूभाई, शेट वरजीवनदास, शेट रामलाल, कृष्णशास्त्री साठे, दादाभाई नौरोजी, भवानी विश्वनाथ कानविंदे, रामचंद्र पांडुरंग आजरेकर शास्त्री, आत्माराम बापूजी दळवी, सर जमशेटजी जिजीभाई, पेस्तनजी फ्रामजी कामा आणि कॅप्टन फेल्प्स, खानु बबर्जी, रमता फकीर या महानुभावांनी विष्णुबुवांना सहकार्य केले.
 
विष्णुबुवा वादविवाद सभांमध्ये मिशनर्‍यांना संकटात टाकणार्‍या आणि निरुत्तर करणार्‍या प्रश्नांची सरबत्ती करत. विष्णुबुवांनी मिशनर्‍यांना विचारलेले मर्मभेदी प्रश्न खाली दिले आहेत.
 
 
जुना व नवा करार ईश्वरप्रणीत आहे काय? (5 फेब्रुवारी 1857), येशूस ‘ईश्वरी पुरुष’ संबोधणे कितपत योग्य (12 फेब्रुवारी), ख्रिस्तामध्ये लीनता, सौम्यता होती काय? (19 फेब्रुवारी), येशू चमत्कार करू शकत होता काय? (1 मार्च), मारया ही जोसेफची बायको होती काय? (12 मार्च), येशूला प्रकृतिधर्म, थकवा, विश्रांती होती काय? (19 मार्च), ख्रिस्तधर्म ईश्वरप्रणीत आहे यासाठी प्रमाणे कोणती? येशू आणि लाजरसाची बहीण यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते? (26 मार्च), येशू जोसेफचा पुत्र ठरतो काय? (2 एप्रिल), देवाकडे जाण्यासाठी मध्यस्थाची गरज आहे काय? (16 एप्रिल), पशूस आत्मा आहे किंवा नाही? (23 एप्रिल), मोशा (मोझेस) आणि एलिया सदेह आकाशातून खाली उतरले आणि सदेह आकाशात गेले असे मानले जाते, तर त्यांचे शरीर कसे होते? (7 मे), ख्रिस्ताच्या शरीराचे काय झाले? (21 मे 1857).
 
बायबलमधील ओव्यांचा आधार घेऊन विष्णुबुवा आपले निष्कर्ष मिशनर्‍यांपुढे मांडत - येशू शांतता प्रस्थापित करण्यासाठी नव्हे, तर तलवार चालवण्यासाठी आला होता. येशू देवाचा पुत्र नसून मनुष्याचा पुत्र होता. येशू आणि त्याचे शिष्य खोटे बोलत. येशूने आपले शरीर जगाच्या पापाची क्षमा करण्यासाठी अर्पण केले हे सिद्ध होऊ शकत नाही. जीव वाचवण्यासाठी येशू जिवापाड धावपळ करत होता. असे निष्कर्ष मांडल्यानंतर पुन्हा विष्णुबुवा प्रश्न उपस्थित करतात. ‘शत्रूवर प्रीती करा’ असे म्हणणारा येशू ’वस्त्रे विकून तलवारी विकत घ्या’ असे का म्हणतो? जर ईश्वर इहलोकी आम्हास शिक्षा करतो, तर त्याने परलोकी आमचा न्याय का करावा? आणि जर तो ख्रिस्ती मतानुसार परलोकी न्याय करील, तर त्याने इहलोकी का शिक्षा करावी? जुना करार आणि नवा करार यात विसंगती का आहे? जुना करार खरा की नवा करार?
 
 
देवाला निराकार मानणारे ख्रिस्ती देवाच्या शरीराची कल्पना करतात की नाही? मनुष्यांनी येशूचा तिरस्कार का केला? देव आणि पश्चात्ताप यासंबंधी ख्रिस्ती धर्मग्रंथात संदिग्धता दिसते, तेव्हा नेमके ख्रिस्ती मत कोणते? शिष्यांनी ख्रिस्ताचे शरीर चोरले त्या वेळी लाचलुचपतीचा प्रकार घडला, असा उल्लेख ग्रंथात आला आहे, त्यावर आपण कोणता खुलासा करू शकाल? मात्थी (18:6) ओवीवरून येशूने आपल्या धर्माचा प्रसार जुलमाने केला हे सिद्ध होते की नाही? एलिझाबेथ राणी प्रोटेस्टंट होती की नाही? तिच्या कारकीर्दीत ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी जुलूम झालेत की नाही? वेदोक्त हिंदू धर्माचा नाश करणार्‍या मोशावर येशूने भरवसा ठेवला होता; परंतु मोशा ठक होता हे येशूला का कळले नाही? बायबल हे कल्पनेवर आधारलेले पुस्तक नव्हे काय? चंद्र हा परप्रकाशी आहे याचे ज्ञान येशूला नव्हते, याची मिशनर्‍यांना माहिती आहे काय? असे असंख्य प्रश्न विष्णुबुवांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांना विचारले.
 
 
मिशनर्‍यांचे - 'Bombay Guardian' नावाचे इंग्रजी साप्ताहिक मुंबईतून प्रत्येक शनिवारी प्रकाशित होत असे. रेव्हरंड जॉर्ज बोवेन तेथे संपादक होता. समुद्रकिनारी होणार्‍या वादविवाद सभांचा वृत्तांत बोवेन या साप्ताहिकात प्रसिद्ध करीत असे. त्याने सर्व वादविवाद सभांच्या वृत्तांताचे संकलन 'Discussions By The Seaside' (1857) या पुस्तकात केले आहे. रेव्ह. जॉर्ज बोवेनने त्याच्या आईला आणि बहिणींना लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. 1856 आणि 1857 मध्ये लिहिलेल्या पत्रांमध्ये त्याने विष्णुबुवांचे ‘हिंदुधर्मरक्षक’ म्हणून वर्णन केले आहे. या पत्रांमधील वर्णनातून विष्णुबुवांची विलक्षण बुद्धिमत्ता, अफाट कार्य आणि विजिगीषु वृत्ती प्रकर्षाने दिसून येते.
 
ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालविलेल्या आक्रमक धर्मप्रसारामुळे ख्रिस्तीमताचे स्तोम माजले होते. पांढरपेशा सुशिक्षित समाजालासुद्धा या ख्रिस्तीमताने भुरळ घातली होती. नारायण शेषाद्री, दाजी पांडुरंग, हरी केशवजी, बाबा पदमजी अशा अनेक मंडळींनी ख्रिस्तीमताचा नुसता स्वीकार केला नाही, तर ख्रिस्ती धर्माची भलावण करून सनातन हिंदू धर्मावर गरळ ओकायला सुरुवात केली. विष्णुबुवांच्या विचारप्रवर्तक बैठका, सभा आणि व्याख्यानांच्या प्रभावाने हिंदू आणि पारशी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली आणि त्यांचा धर्माभिमान जागृत झाला. त्यामुळे ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या धर्मप्रचाराला आळा बसला, मिशनर्‍यांचा चौखूर उधळलेला वारू रोखला जाऊन हिंदू आणि पारशी समाजाची धर्मांतरे थांबली. धर्मांतरित समाज आपल्या मूळ हिंदू आणि पारशी धर्मात परतू लागला.
 
 
विष्णुबुवांनी संस्कृतिरक्षणाची गरज ओळखून मुंबई शहर कार्यक्षेत्र म्हणून निवडले होते. हिंदू धर्मीयांसाठी मुंबई हे शहर धर्मभ्रष्टतेचे केंद्र बनलेले आहे. असे असताना मुंबई सोडून जाण्याऐवजी मुंबईत का राहावेसे वाटते, असा प्रश्न विचारणार्‍याला त्यांनी उत्तर दिले - आम्ही वेदप्रतिपाद्य धर्माची माहीतगारी करून देऊन भ्रष्टता दूर करणारे वस्ताद आहोत या कारणामुळे जेथे फार भ्रष्टता असेल तेथेच आमचे आगमन, तेथेच आमचे काम, तेच आमचे स्थळ. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या उठावाचे निमित्त करून विष्णुबुवांच्या सभांवर बंदी घालण्यात आली.
 
 
याच वर्षी विष्णुबुवांनी ‘बोधसागर’ हा ग्रंथ लिहिला. मूळ ‘बोधसागर’ ’नारायणबोवाकृत बोधसागराचे रहस्य’ हा ग्रंथ श्री दत्तात्रेयांचे शिष्य नारायणबोवा साधू यांनी लिहिला आहे. या ग्रंथाचा लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत अर्थ विष्णुबुवांनी लिहिला आहे. त्याचप्रमाणे मुंबई समुद्रकिनार्‍यावर झालेल्या सभांच्या इंग्रजी वृत्तांताचा मराठी अनुवाद ’समुद्रकिनारीचा वादविवाद’ (1872) या नावाने प्रकाशित झाला.
 
 
- सुरेश गोखले