विवेकेंचि या मानसा आवरावें!

14 Sep 2024 17:44:14
vivek
समर्थ कळवळून सांगत होते, बाबांनो, सावध राहा... एकत्र राहा... कुठे कठोर व्हायचे, कुठे सौम्य याचे भान ठेवा. जनांचा प्रवाह योग्य वाटेने चालत राहिला पाहिजे, तो कुठल्या संकुचित विचारात तुंबून राहणे चांगले नव्हे. आपल्या पूर्वजांनी जे कष्ट करून मिळवले ते राखता आले पाहिजे. त्यासाठी आपसात भांडाल तर तिसर्‍याचे फावेल...
’रघुवीर’ पाहिल्यापासून समर्थांच्या रचना मनात घोळत होत्या. सध्याचा काळ तर समर्थांची घडीघडी आठवण करून देणारा. समाजाचे पुढारपण करणार्‍यांची क्रियाशून्य वाचाळता, समाजाची पार रसातळाला गेलेली संवेदनशीलता, राजकारणातून हद्दपार होऊ घातलेली नीतिमत्ता, मनाला ग्रासून राहिलेली असुरक्षितता, कलियुगाची सर्व लक्षणे मिरवणारा हा काळ अनुभवताना कधी कधी आपले विचारी अन् संवेदनशील मन उदास होऊन जाते.
 
 
कधी कधी अशी स्थिती येते की, व्यक्तिगत जीवनात सांगावे असे काही मोठे दुःख नसते किंवा सामाजिक जीवनात सारेच काही हाताबाहेर गेले आहे असेही नसते; पण कसली तरी हुरहुर, उदासी, चिंता आतून पोखरत असते. आपण करावं असं काही आपल्या हातात नाही; पण चिंता वाटल्यावाचून राहात नाही, या मनोदशेचं नेमकं वर्णन करतात समर्थ सांगतात...
 
 
उदासीन हा काळ जातो गमेना
सदा सर्वदा थोर चिंता शमेना
उठे मानसी सर्व सांडूनि जावें
रघूनायका, काय कैसें करावें!
 
असं उदास, बापुडवाणं होऊन जातं मन. निराशेचा, अनिश्चिततेचा काळ संपता संपत नाहीसं वाटतं. मनावर सतत चिंतेचं सावट. खरंच नको जीव होऊन जातो नि वाटतंच एका दुखर्‍या क्षणाला, की सारं सोडून निघून जावं कुठं तरी. हा ताण, ही घालमेल, सांग रे रामराया, कसं सोसावं हे!
 
जनी बोलता चालता वीट वाटे
नये अंतरी स्वस्थ कोठें न कंठे
घडीनें घडी चित्त किती धरावें
रघूनायका, काय कैसें करावें!
 
कुणाशी बोलणं नको, कुणी काही विचारणं नको नि सांगणं नको. बरं, एकटंच विचार करत बसावं तरी तिथेही स्वस्थ वाटत नाही. हे घडीघडी बिघडणारे चित्त, याला कसं स्थिर करू? तूच सांग राघवा, कसं करु?
 
अवस्था मनी होय नाना परीची
किती काय सांगो गती अंतरीची
विवेकेंचि या मानसा आवरावें
रघूनायका, काय कैसें करावें!
 
आणि या अस्वस्थतेत काय एक का विचार येतो! एकाला लागून एक विचारांची माळच सुरू होते. ते विचार कुठं जाऊन पोचतील सांगता येत नाही. त्यांची धाव, त्यांची गती... खरं तर विवेकानं त्याला आवरावं हे कळतं; पण... तूच सांग रघुनंदना, कसं करू हे!
 
म्हणे दास उदास झालों दयाळा
जनी वेर्थ संसार हा वायचाळा
तुझा मी तुला पूशितो सर्वभावे
रघूनायका, काय कैसें करावें
 
 
हा दास आता फार उदास झाला आहे रे दयाळा! या संसारातले हे सारे प्रश्न, त्या संसारातच त्याची उत्तरं शोधणं व्यर्थ आहे हे मी जाणतो. इथं वेळ वाया घालवणं वायफळ आहे. एक तूच माझा नि मी तुझा. तूच मला आता यातून सुटायचा मार्ग सांग. सांग रे रघूत्तमा, काय कसे करू मी!!
 
समर्थांचं स्वत:चं दु:ख आहे हे. खरंखुरं; पण आपल्यासारखं प्रपंचाच्या काळजीतून आलेलं नाही. समर्थांची काळजी मोठी आहे. राजे गेलेत मिर्झाराजेंसोबत उत्तरेत. त्यांच्या सुरक्षित परत येण्याची चिंता समर्थांच्या मनाला पोखरते आहे, कारण ते देशस्थिती पाहत आहेत, कुणाचाच भरवसा वाटू नये अशी स्थिती आहे.
 
स्वार्थापायी राज्ये गेली
अवघी कर्मे भ्रष्ट झाली
इष्टनिष्टाची पर्वा नुरली
कोण्हा येका...
 
 
अशी अवस्था. एका जागी त्यांचे चित्त लागेना. ते निघाले दक्षिणेकडे. समर्थ दक्षिणेत फिरताहेत. अत्यंत उदास झाले आहेत. त्या उदासीची छाया मनावर सतत आहे. त्यामुळे करुणेने पावलोपावली श्रीरामाचे ध्यान सुरू आहे. सतत पायाला चक्र आहे; पण कुठंच मन लागत नाहीये. प्रात:काळपासून सायंकाळपर्यंत पदयात्रेत एकच ध्यास. एकच चिंता. दिवसा चैन नाही, रात्री निद्रा नाही. एकच विचार. काय झालंय नेमकं? कुठे आहे, कसा आहे माझा राजा?
 
अशा वेळी रामचंद्राविना आधार कुणाचा? मनीची खळबळ त्याच्याविना कुणाला सांगणार? सांग, रघूनायका, काय-कैसे करावे?
कळतं की महाराज उत्तरेत अडकलेत. औरंगजेबाच्या पंज्याखाली सापडलेत.
 
 
एवढे विवेकी, विचारी, विरागी, विरक्त समर्थ अस्वस्थ आहेत. राजाला सुखरूप आणण्याची सारी व्यवस्थाही लावलीय समर्थांनी; पण अजून वार्ता येत नाहीये उत्तरेची काहीच... राजा पुन्हा त्याच्या गडावर दिसेपर्यंत मनाची तगमग शांत होणार नाही. अस्वस्थ होऊन फिरताना समाजस्थिती पाहत आहेत.
 
 
जनी पाहता भेदबुद्धी अनेका
मदे मत्सरे निंदिती येकमेका
घडे त्याग या करणे लागवेगें
उदासीन हे वृत्ती कोठे न लागे...
 
 
असे हे जनलोक. आपले मोठे हित ध्यानात न घेता आपसात भेद निर्माण करून भांडत राहतात.
 
देवमात्र उच्छेदिला
जित्यापरीस मृत्यू भला
आपुला स्वधर्म बुडविला
ऐसे समजावे
 
आपल्या धर्माची कुणी निंदा करतो आहे, आपल्या देवतांना भ्रष्ट करतो आहे याचे कुणालाच काही वाटत नाही? अशा निर्विकार जगण्यापेक्षा मृत्यू बरा! पण हे लोकांना समजत नव्हते. मग समर्थांनी राम वरदायिनीला सांकडे घातले...
 
 
आघात संकटे वारी
निवारी दुष्ट दुर्जनां
संकटी भर्वसा मोठा
तात्काळ काम होतसे
 
 
हिला आवाहन करावं. हिला एकदा जाग आली की तात्काळ कार्यसिद्धी होते.
 
 
दुष्ट संहारिले मागे
ऐसे उदंड देखतो
माऊली रोकडे काही
मूळ सामर्थ्य दाखवीं
 
 
आता वरदायिनीला जागे करायचे आणि तिच्या सामर्थ्याचा प्रत्यय आला. राजा सुखरूप परत आला; पण या सुटकेमागे, या यशामागे होती नेमकी आणि अचूक योजना आणि प्रयत्नांची पराकाष्ठा! अशा परीक्षेच्या वेळी योजना कशी असावी ते समर्थ सांगू लागले-
 
 
अखंड सावधान रे, प्रयोग प्रेत्न मान रे
प्रसंग हा तुफान रे, नकोचि वेवधान रे...
नेमके प्रयत्न करेल त्याला यश येणारच.
 
 
‘करेल प्रेत्न जीतुका, तयासि लाभ तीतुका’ हे ध्यानात ठेवायचे...
 
 
हरिकथा निरूपणाइतकेच राजकारण महत्त्वाचे हे समर्थ जाणत होते, समजावत होते. राजा राजकारण करतो आहे ते समजून घ्यायचे. नुसता सात्त्विक भाव पुरेसा नाही, तर-
 
 
हुंब्यासि हुंबा लावून द्यावा
टोणप्यास टोणपा आणावा
लौंदास पुढे उभा करावा
दुसरा लौंद
धटासि आणावा धट
उद्धटासि उद्धट
खटनटासि खटनट
अगत्य करि... हे करावे लागते
 
 
आणि रयतेने काय करायचे? त्याच्यामागे आपली शक्ती उभी करायची.
 
 
शक्तीने पावती सुखे
शक्ती नसता विटंबना
शक्तीने मिळती राज्ये
युक्तीने यत्न होतसे...
 
 
समर्थ सह्याद्रीच्या कानाकोपर्‍यात फिरत होते, रयतेशी बोलत होते.
 
 
भाताच्या लावण्या सुरू होत्या. काबाडकष्ट करणारी साधीसुधी रयत ती... एक जण निराशेने म्हणाला, ‘राजं आलं खरं, पण आमच्यात काई फरक हाय का? आमी कुचंबतुयाच न्हवं रानात! राजं आलं, पर लोक म्हंत्यात, मोरं ग्येलं नि भोसलं आलं. आमच्या वाकलेल्या पाठी सरळ थोड्याच हुणार?’
 
 
समर्थ म्हणाले, राजा नुसता समर्थ असून उपेगाचे नाही. राजा राजधर्म जाणणारा हवा. हा राजा दुःख जाणणारा आहे. धर्म पाळणारा आहे. त्यांना जरा स्थिरस्थावर होऊ देत, आपला कणा सदैव ताठ राहील याकडे ते खात्रीने लक्ष घालतील!
 
 
माझ्या भावांनो, आता श्रींचे राज्य आहे. राजा त्याचा राजधर्म पाळायचा कसोशीने प्रयत्न करतो आहे. त्याला तुमची साथ द्या. आपण आपला प्रजाधर्म विसरू नका!
 
 
आपला राजा कसा असावा? कसा आहे? कसं ओळखाल? देवाचा अंश कोण? राक्षसाच्या वृत्तीचा कोण? कसे जाणाल?
न्याय तो देव जाणावा, अन्याय राक्षसी क्रिया! सावधू देव जाणावा, उन्मत्तू दैत्य बोलिजे!
 
 
अजून लक्षणे ऐका...
देव सर्वास सांभाळी
तदंश जाणिजे तसा
दैत्य ते पीडिती लोका
तदंश त्याचसारिखे
दंभ दर्प स्वाभिमाने
कर्कशे वचने मुखी
कोपी ते दैत्य जाणावे
निष्ठुर परघातकी
 
 
समर्थ तळमळीने सांगत फिरत होते. राजे स्वराज्य अन् सुराज्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. तवर पुन्हा एकदा घातवेळ आली.
 
 
स्वराज्याचा शिवसूर्य अस्ताला गेला आणि मराठ्यांच्या राजपुत्राची चाल विपरीत वळण घेऊ लागली... समर्थांनी पुन्हा लेखणी उचलली... हा अखेरचा उपदेश अवघ्या मराठी मनांना होता. निमित्त युवराजाचे इतकेच.
 
 
समर्थ कळवळून सांगत होते, बाबांनो, सावध राहा... एकत्र राहा... कुठे कठोर व्हायचे, कुठे सौम्य याचे भान ठेवा. जनांचा प्रवाह योग्य वाटेने चालत राहिला पाहिजे, तो कुठल्या संकुचित विचारात तुंबून राहणे चांगले नव्हे. आपल्या पूर्वजांनी जे कष्ट करून मिळवले ते राखता आले पाहिजे. त्यासाठी आपसात भांडाल तर तिसर्‍याचे फावेल...
 
 
बहुत लोक मेळवावे
एक विचारे भरावे
कष्ट करोनी घसरावे
म्लेन्छांवरी
 
 
आणि हे सारे आपल्याला आपला राजा त्याच्या जगण्यातून दाखवून गेला आहे, त्याला विसरू नका. त्याचे स्मरण करा. कसे त्याचे सलगी देणे, कसे त्याचे चालणे, बोलणे, त्याचे रूप, त्याचा पराक्रम, त्याचा साक्षेप, सारे आदर्श!
 
 
अस्वस्थ होऊन बसू नका. उठा, कामाला लागा. त्याच्या सद्गुणांची, त्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या साक्षेपाची मूर्त सदा तुमच्या मनात उभी असू देत.
 
 
शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे,
 
इहलोकी परलोकी तरावे, कीर्तिरूपे...
 
 
समर्थांच्या अस्वस्थतेसारखीच आताची समाजस्थिती. त्यावर उपायही त्यांनी केला तोच करायचा!
 
 
प्रसंग हा कठीण हो, बहुत पावले मोहो,
परंतु यत्न पाहती, सुखेंची तेच राहती.
विवेक पाहणे बरा, बरा विचार तो करा
उपासकांसी सूचना,
उपासना उपासना!
Powered By Sangraha 9.0