पॅरिस पॅरालिम्पिक 2024 - प्रगतीचा चढता आलेख

विवेक मराठी    14-Sep-2024   
Total Views |

olympics 2024 paris
पॅरालिम्पिक स्पर्धांमधील गेल्या चार वर्षांच्या कामगिरीकडे पाहिले तर लक्षात येईल, की भारताच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. भारताने पॅरिसमध्ये 29 पदके मिळवली. सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि तेरा कांस्यपदकांचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेची पात्रता मिळवणार्‍या खेळाडूंची संख्याही वाढत आहे. पॅरिसमधील भारताचे हे यश या सर्व सकारात्मक बदलांची नांदी ठरेल, हीच अपेक्षा आहे. तसेच पदकांची आकडेवारी पाहता 2028 च्या लॉस एंजिलिस पॅरालिम्पिकमध्ये आपण पदकांच्या अर्धशतकापर्यंत मजल मारली तरीही आश्चर्य वाटणार नाही.
8 सप्टेंबरला पॅरिस पॅरालिम्पिकची सांगता झाली. भारतासाठी ही स्पर्धा खूप खास ठरली, कारण आत्तापर्यंतच्या पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वाधिक म्हणजेच 29 पदके भारताने पॅरिसमध्ये मिळवली. सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि तेरा कांस्यपदकांचा यामध्ये समावेश होता. ह्या आधी टोकियोमध्ये भारताने पाच सुवर्णपदकांसह एकूण 19 पदके मिळवली होती. पॅरिसमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकांचा आकडाही वाढला. आधीच्या लेखामध्ये आपण पहिल्या पाच दिवसांतील कामगिरीचा आढावा घेतला होता, आता उर्वरित दिवसांबद्दल पाहू.
 
 
दीप्ती जीवनजी
 
दिवसाची सुरुवात दीप्तीच्या 400 मीटर स्पर्धेतील कांस्यपदकाने झाली. कमी बुद्ध्यांक, संवाद कौशल्याचा अभाव आणि त्यामुळे कमी आकलनशक्ती अशा समस्यांसह एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली दीप्ती योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज सर्वांसाठी एक आदर्श ठरली आहे. टी-20 हे तिच्या दिव्यांगत्वाचं वर्गीकरण आहे. चेहर्‍याचा विचित्र आकार, मोठं नाक आणि ओठ यामुळे लहानपणी तिला शेरे मारून हिणवलं जायचं. दीप्तीने 2024 च्या वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून सर्वांची तोंडे बंद केली आणि आता त्या जोडीला हे पॅरालिम्पिक कांस्यपदक.
 
शरद कुमार आणि मरियप्पन थांगवेलू
 
उंच उडीमध्ये (टी-63) शरद आणि मरियप्पन या दोघांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावलं. शरदला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक होतं. पॅरिसमधील पदकानंतर मरियप्पन सलग तीन पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 2016, रिओ पॅरालिम्पिकमध्ये त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. गेल्या वेळी टोकियोमध्ये त्याने रौप्यपदक पटकावलं होतं आणि पॅरिसमध्ये त्याला कांस्यपदक मिळालं.
 
 
अजित सिंग आणि सुंदरसिंग गुर्जर (क्लास एफ-46)
 
ही दिवसातील दुसरी स्पर्धा, जिथे पुन्हा एकदा दोन भारतीय खेळाडू पोडियमवर दिसले. अजितला रौप्य आणि सुंदर सिंगला कांस्यपदक मिळालं. सुंदर सिंगचं हे सलग दुसरं पॅरालिम्पिक कांस्यपदक आहे.
 
सचिन खिलारी
 
गोळाफेक (एफ-46) खेळामध्ये स्वतःच्याच आशियाई विक्रमामध्ये सुधारणा करत सचिनने रौप्यपदक मिळवलं. सचिनने 2023 आणि 2024 अशी सलग दोन वर्षे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे.
 
 
 
हरविंदर सिंग
 
 
टोकियोमध्ये कांस्यपदक मिळवणार्‍या हरविंदर सिंगने पॅरिसमध्ये मात्र अचूक निशाणा साधत सुवर्णपदकाची कमाई केली. रिकव्हर्र् आर्चरीमधील भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. या सोनेरी कामगिरीमुळे हरविंदर सिंगची पॅरालिम्पिक समारोप सोहळ्यामध्ये भारताचा ध्वजधारी म्हणून निवड करण्यात आली. भारताला ट्रॅक इव्हेंटमधील पहिलं पदक मिळवून देणार्‍या प्रीती पाल हिलादेखील हा मान मिळाला.
 
 
धरमबीर आणि प्रणव सुरमा
 
क्लब थ्रो (एफ-51) खेळामध्ये धरमबीर आणि प्रणवने अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले. या खेळातदेखील भारताला पहिल्यांदाच पदके मिळाली आहेत.
 
 
कपिल परमार
 
भारत पहिल्यांदाच ज्युडो खेळामध्ये भाग घेत होता. कपिल परमार या खेळामध्ये पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 60 किलो वजन गटात जे-1 क्लासमध्ये त्याने कांस्यपदक पटकावलं. हे भारताचं पंचविसावं पदक होतं.
 
 
प्रवीण कुमार
 
उंच उडी (टी-64) खेळात प्रवीणने स्वत:च्याच आशियाई विक्रमामध्ये सुधारणा करत सुवर्णपदक पटकावलं. प्रवीणने टोकियोमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं आणि त्या वेळी पॅरालिम्पिक पदक जिंकणारा सर्वात कमी वयाचा भारतीय होण्याचा मानही त्याला मिळाला होता. पॅरिसमध्ये तिरंदाज शीतल देवीने हा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे.
 
 
होकाटो होतोझे सेमा
 
गोळाफेक एफ-57 गटात होकाटोने कांस्यपदक मिळवलं. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या या जवानाने 2002 मध्ये एका युद्धमोहिमेत डावा पाय गुढघ्यापासून गमावला होता. काही वर्षांनी त्याची ओळख पॅरागेम्सशी झाली. 2021 एशियन पॅरागेम्समध्ये त्याने कांस्यपदक मिळवलं होतं. ह्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो चौथ्या क्रमांकावर राहिला होता आणि आता पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये खेळताना त्याला कांस्यपदक मिळालं आहे. नागालँड राज्यासाठीही हा आनंद आणि अभिमानाचा क्षण होता असं म्हणता येईल.
 
 
सिमरन शर्मा
 
200 मीटर (टी-12) स्पर्धेत सिमरनने कांस्यपदक मिळवलं. सिमरनची कहाणी हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल इतकी प्रेरणादायी आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या गजेंद्र सिंग ह्या प्रशिक्षक पतीच्या मदतीने तिचा क्रीडाप्रवास सुरू आहे. सिमरन 2024 वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे. जन्मापासूनच कमजोर नजर घेऊन आलेली सिमरन स्पर्धेत मार्गदर्शकाची मदत घेऊन धावते. अंध खेळाडूंना धावताना मदतीला मार्गदर्शक घेता येतो. मार्गदर्शक धावपटू आणि स्पर्धक हे एकमेकांशी पट्टीने बांधलेले असतात. ट्रॅकवर धावताना खेळाडूशी संवाद साधून त्याला योग्य मार्गावर ठेवणे हे मार्गदर्शकाचे काम असते. सिमरनला ह्याच स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत पदक मिळवण्यात अपयश आलं; पण ते विसरून ती जिद्दीने 200 मीटरची स्पर्धा खेळली आणि पदक जिंकण्यात यशस्वी झाली.
 
 
नवदीप सिंग
 
भारताचं शेवटचं पदक भालाफेक (एफ-41) खेळात नवदीपने मिळवलं. ही स्पर्धा नाट्यमय प्रकारे संपली. नवदीप दुसर्‍या स्थानी होता आणि त्याला रौप्यपदक मिळणार असंच सर्वांना वाटत होतं. इराणचा खेळाडू अग्रस्थानी होता; पण नियमभंग केल्याच्या कारणावरून त्याला अपात्र ठरवण्यात आलं आणि नवदीपला सुवर्णपदक मिळालं. अपात्रतेच्या कारणाची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार शिस्तभंग हे मुख्य कारण होतं. स्पर्धा संपण्याआधीच मैदानातून बाहेर जाऊन विजय साजरा केल्यामुळे त्याला पिवळं कार्डही दाखवण्यात आलं होतं, शिवाय देशाव्यतिरिक्त अन्य कोणताही झेंडा फडकवण्यास बंदी असताना त्याने अरेबिक अक्षरे असलेला काळा झेंडाही बाहेर काढला होता. ह्या दोन्ही गोष्टी स्पर्धेच्या नियमांमध्ये बसत नसल्यामुळे खेळाडूवर कारवाई होणं अगदीच योग्य होतं.
 
सुवर्णपदक अशा प्रकारे मिळालं असलं तरी नवदीपची कामगिरी त्यामुळे कमी ठरत नाही. टोकियोत चौथ्या क्रमांकावर राहिलेला नवदीप पॅरिसमध्ये सुवर्णपदकापर्यंत पोहोचला. त्याने हा खेळ शिकायला सुरुवात केली तेव्हा जेमतेम चार फुटांच्या त्याच्या उंचीमुळे भाला सांभाळताना फार कसरत करावी लागायची; पण प्रयत्नांती त्याने ह्यातही प्रावीण्य मिळवलं आणि जिद्दीने पुढे जात सोनेरी यश प्राप्त केलं.
 
 
प्रगतीचा चढता आलेख
 
गेल्या चार पॅरालिम्पिक स्पर्धांमधील कामगिरीकडे पाहिलं तर लक्षात येईल, की भारताच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. 2012, 2016, 2020 आणि 2024 या चार वर्षांमध्ये भारताने मिळवलेल्या पदकांची संख्या अनुक्रमे 1, 4, 19 आणि 29 अशी आहे. स्पर्धेची पात्रता मिळवणार्‍या खेळाडूंची संख्याही वाढत आहे. ही आकडेवारी पाहता 2028 च्या लॉस एंजिलिस पॅरालिम्पिकमध्ये आपण पदकांच्या अर्धशतकापर्यंत मजल मारली तरीही आश्चर्य वाटणार नाही. पॅरिसमधील स्पर्धेचा विचार केला तर भारताने सर्वाधिक पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये मिळवली आहेत. याच खेळांमध्ये काही भारतीय खेळाडू चौथ्या-पाचव्या स्थानांवरही राहिले आहेत. नेमबाजी आणि बॅडमिंटन खेळामध्येही चांगली कामगिरी झाली आहे. काही पदके थोडक्यात हुकली आहेत. तिरंदाजीच्या बाबतदेखील हेच म्हणता येईल. जलतरणासारख्या खेळामध्ये भरपूर पदके मिळवण्याची संधी पॅरालिम्पिकमध्ये उपलब्ध आहे, मात्र या खेळामध्ये आपला सहभाग अगदीच नगण्य आहे. 2020 मध्ये दोन खेळाडू, तर या वर्षी केवळ एकच खेळाडू जलतरणासाठी पात्र ठरला होता. येणार्‍या दोन-तीन वर्षांमध्ये हे चित्र बदलण्यासाठी काही तरी विशेष उपाययोजना करावी लागणार आहे. या वर्षी एकूण 22 पैकी केवळ 12 खेळांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. इथून पुढच्या काळात उर्वरित खेळांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या स्पर्धेत चीनने तब्बल 220 पदके मिळवली. त्यापाठोपाठ ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेनेही पदकांची शंभरी ओलांडली. आपल्या देशाची प्रगती योग्य तर्‍हेने होत असली तरी सुधारणेलाही भरपूर वाव आहे. आधी दीपा मलिक आणि आता देवेंद्र झाझरिया अशा सक्षम नेतृत्वाखाली भारतीय पॅरालिम्पिक समिती काम करत आहे. येत्या काळात भारताचे पॅरा खेळाडू आणखी उंच भरारी घेतील यात शंका नाही.
 
 
पॅरा खेळाडूंची माध्यमांकडून घेतलेली दखल
 
‘भारतामध्ये क्रीडासंस्कृती नाही’ हे आपण सतत वाचत असतो; पण यात बदल करण्याच्या दृष्टीने जितके प्रयत्न आवश्यक आहेत तितके होताना दिसत नाहीत. टोकियोच्या तुलनेमध्ये पॅरिसवेळच्या परिस्थितीत सुधारणा दिसून आली; पण तरीही अनेक गोष्टी खटकल्या. दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांनी यास्पर्धेची पाहिजे तितकी दखल घेतली नाही. सोशल मीडियावर काही प्रमाणात उत्साह दिसून आला; पण तिथेही सेलिब्रिटी खेळाडूंकडून निराशा झाली. सचिन तेंडुलकरसारखे काही अपवाद वगळता या मोठ्या नावाजलेल्या खेळाडूंनी पॅरालिम्पिककडे पूर्णपणे पाठ फिरवल्यासारखं वाटलं. बहुतांश ऑलिम्पिक खेळाडूंनीही पॅरालिम्पिक खेळाडूंकडे दुर्लक्षच केलं. ऑलिम्पिक असो अथवा पॅरालिम्पिक, हे खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करत असतात, त्यामुळे सर्वांना समान वागणूक मिळावी, ही त्यांची अपेक्षा चुकीची नाही. ऑलिम्पिक सुरू झाल्यावर क्रिकेटला नावे ठेवणारे सामान्य लोक असोत किंवा इतर खेळांना क्रिकेटच्या तुलनेमध्ये भारतात फारसा लोकाश्रय मिळत नाही, असं म्हणणारे काही खेळाडू असोत, पॅरालिम्पिकबद्दल बोलण्यात यापैकी कुणीच पुढाकार घेतल्याचं दिसलं नाही. खरं तर शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक अशा सगळ्याच आघाड्यांवर लढत हे खेळाडू प्रचंड मेहनत करून जिद्दीने खेळत असतात, पुढे जात असतात, त्यामुळे त्यांचं पुरेसं कौतुक होत नसेल तर ही गोष्ट नक्कीच चुकीची आहे.
 
 
सरकारकडून मात्र सर्वच खेळाडूंना पुरेशा सोयीसुविधा पुरवल्या जातील याची काळजी घेतली जात आहे. विविध योजनांमधून या खेळाडूंना आर्थिक मदतही दिली जात आहे, शिवाय त्यांच्या प्रशिक्षणासाठी देशपरदेशामध्ये शिबिरे राबवली जात आहेत. ऑलिम्पिकप्रमाणेच अनेक पॅरालिम्पिक खेळाडूदेखील ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतून पुढे आल्याचे दिसेल. शाळा आणि महाविद्यालयीन स्तरांवर आयोजित होणार्‍या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना शिष्यवृत्तीची सोय करण्यात आली आहे आणि याचाच परिणाम हळूहळू दिसून येत आहे. टोकियोनंतर काही खासगी कंपन्यांनीदेखील पॅरा खेळाडूंचं प्रायोजकत्व स्वीकारल्याचं दिसून येत आहे आणि हा अतिशय सकारात्मक बदल आहे. क्रीडारसिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. शक्य त्या मार्गाने आपण या खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खेळ आणि खेळाडूंची जितकी जास्त चर्चा होईल तितकी ती खेळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. खेळ बघणारे प्रेक्षक वाढले तर आपोआपच खासगी वाहिन्याही थेट प्रक्षेपणासाठी पुढे येतील. पॅरिसमधील भारताचे हे यश या सर्व सकारात्मक बदलांची नांदी ठरेल, हीच अपेक्षा आहे. सर्वच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन, पदकविजेत्यांचे विशेष अभिनंदन आणि प्रशिक्षक व अन्य सर्व मदतनीस/सहकार्‍यांना विशेष धन्यवाद. ह्या सर्वांच्या योगदानामुळेच एक यशस्वी पॅरालिम्पिक स्पर्धा आपल्याला अनुभवता आली. जे ह्या अनुभवांपासून वंचित राहिले आहेत त्यांनी जरूर जिओ सिनेमावर पॅरालिम्पिक हायलाइट्स बघावेत. तुमचं क्षेत्र कोणतंही असो, प्रेरणा नक्की मिळेल.
 
 
(वरील माहितीमध्ये खेळाडूंच्या नावासमोर कंसात लिहिलेली वेगवेगळी अक्षरे आणि आकडे हे त्यांचं वर्गीकरण आहे. दिव्यांग खेळाडू त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार वेगवेगळ्या गटांत खेळत असतात.)