विनेशचा राजकारणप्रवेश हा तिच्या आंदोलनाचा अपेक्षित शेवट आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती निश्चितपणे आहे. त्यांच्या आंदोलनादरम्यान हरयाणामधील खाप पंचायतीचा उघड सहभाग पाहण्यात आला होता. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने आणि त्यानंतर तिची त्यापुढची आखणी पाहण्यास मिळाली. हे सारे ती एकटी करू शकणार नाही, इतक्या योजनाबद्ध पद्धतीने केले गेले आहे हेदेखील लक्षात येईल. काँग्रेसने आपल्यासाठी त्यांचा अगदी छान वापर केला. आता त्या राजकीय कारकीर्दीत कशा प्रकारे राजकीय डावपेच यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
राजकारणामध्ये प्रगती करण्यासाठी केरळ काँग्रेसमधील महिलांना काँग्रेसी नेत्यांकडून होणार्या लैंगिक स्वरूपाच्या मागण्या मान्य कराव्या लागतात, असे विधान जाहीरपणे करणार्या केरळ काँग्रेसच्या नेत्या व केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्या सिमी रोज बेल जॉन यांची काँग्रेसने 2 सप्टेंबर रोजी पक्षातून हकालपट्टी केली. त्यांच्या आरोपांची चौकशी करणे दूरच. कुस्ती महासंघाचे अधिकारी महिला पैलवानांशी लैंगिक स्वरूपाचे गैरवर्तन करतात, अशी तक्रार करणार्या विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना हरयाणामध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजे 7 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. अशा परस्परविरोधी बातम्या एकाच आठवड्यात वाचण्यात आल्या. त्यावरून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांबाबत काँग्रेस खरोखर किती जागरूक आहे हे कळू शकते.
विनेश फोगाट व अन्य कुस्तीगीरांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग व अन्य पदाधिकार्यांवर केलेल्या आरोपांबाबतचा लेख ‘सा. विवेक’ने यापूर्वी प्रसिद्ध केला होता. त्यामुळे त्या भागाची पुनरावृत्ती करत नाही. मात्र या आंदोलनादरम्यान हरयाणामधील खाप पंचायतीचा उघड सहभाग पाहण्यात आला होता. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने आणि त्यानंतर तिची त्यापुढची आखणी पाहण्यास मिळाली. हे सारे ती एकटी करू शकणार नाही, इतक्या योजनाबद्ध पद्धतीने केले गेले आहे हेदेखील लक्षात येईल.
ऑलिम्पिकमधून बाद होण्यावरून
विनेशवर झालेली अन्याय्य टीका
ऑलिम्पिकच्या पात्रता चाचण्यांदरम्यान विनेशने ज्या पद्धतीने आपला वजनी गट बदलला, त्याबाबतीत खरे तर तिला जबाबदार धरणे उचित. कारण तिच्या नेहमीच्या 53 किलो गटामध्ये तिला भारतामध्येच नवोदित खेळाडूकडून पराभूत होण्याची वेळ आल्यावर तिने 50 किलो गटातून सहभागी होण्याचा आग्रह धरला. ती चाचणी ज्या पद्धतीने झाली त्यावरून ती मनमानी करत असल्याची टीका तिच्यावर केली गेली. मात्र क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत संभाव्य पदकविजेत्यांसाठी खास विभाग असतो. त्यांनी विनेशने 50 किलो गटातून खेळण्यातून होणारा संभाव्य लाभ ओळखून तिला त्या गटातून खेळणे सुकर होईल असे पाहायला हवे होते, कारण 2019 व 2022 मध्ये तिने 53 किलो गटातून जागतिक स्पर्धांमध्ये कांस्यपदके मिळवत स्वत:ला सिद्ध केलेले आहे. तिला नव्या गटातून खेळवण्यामुळे या गटातल्या एरवीच्या संभाव्य विजेत्यावर तिच्यामुळे अन्याय झाला असे समजण्याचे कारण नव्हते, कारण म्हटले तसे देशाला पदक मिळणे केव्हाही अधिक महत्त्वाचे. शिवाय अंतिम फेरीमध्ये पोहोचत तिने फार मोठा पराक्रम करत या गटातून खेळण्याचा आपला निर्णय योग्य होता, हे सिद्ध केले होते. पहिल्याच फेरीत तिची गाठ आजवर पराभव न पाहिलेल्या जपानी पैलवानाशी होती. तिच्यावर अखेरच्या क्षणी बाजी उलटवल्यानंतर पुढील सामने तिने लीलया जिंकले. पुढे अंतिम फेरीपूर्वी जे घडले, ते जगात अन्यत्रही घडते. ती, तिचे वैयक्तिक प्रशिक्षक आणि भारतीय संघाचे डॉक्टर या सर्वांचे शर्थीचे प्रयत्न केवळ शंभर ग्रॅमनी तोकडे पडले हे दुर्दैवी. यात विनेशने कोणाची फसवणूक करण्याचा कसलाही प्रश्न नव्हता. अंतिम फेरीसाठी पात्र ठरून तो सामना ती अगदी एकतर्फी हरली असती, तरी तिने रौप्य पदक जिंकले म्हणून सार्या देशाने तिला डोक्यावर घेतले असते. तिने नियमांच्या अधीन राहून सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला असल्यामुळे ती अंतिम फेरीचा सामना खेळू शकली नाही, तरी तिला तिच्या हक्काचे रौप्य पदक तरी द्यायलाच हवे होते, हे तर्काला धरून असले तरी ऑलिम्पिकच्या आधी ठरवलेल्या नियमांमुळे ते शक्य झाले नाही. कमी वजनी गटातून खेळताना ते वजन राखण्यासाठी खेळाडूंना अनेकदा अघोरी उपाय योजावे लागतात (जसे विनेशच्या बाबतीत तिच्या शरीरातील थोडे रक्तदेखील काढण्यात आले); त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपला जो नैसर्गिक वजनी गट आहे, त्यातूनच खेळावे, अशी ऑलिम्पिक समितीची भूमिका आहे आणि तिला बाद करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करता येणार नाही, असे ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केले. पदक मिळण्याच्या किंवा न मिळण्याच्या नियमाला आव्हान देता येणे शक्य होते, तेवढे केले गेले. त्याबाबतीत आता फारशा आशा नाहीत.
50 किलो गटाचे सुवर्णपदक जिने जिंकले, त्या अमेरिकी पैलवानाने विनेशला वजन मर्यादेत राखण्यात आलेल्या अडचणींच्या अनुभवातून तिलाही जावे लागते, असे सांगितले. त्यामुळे वजन मर्यादेमध्ये राखण्यात अपयश येण्याची जबाबदारी अंतिमत: विनेश व तिचा चमू यांचीच असली, तरी हे तिच्या बेशिस्तीमुळे घडलेले नाही, हे तिच्यावर टीका करणार्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. तेव्हा खेळापुरते पाहायचे; तर या सर्व घटनाक्रमात विनेशला विनाकारण लक्ष्य केले गेले.
ऑलिम्पिकनंतर राजकारणाकडे स्पष्ट वाटचाल
आता विनेशचे ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीचे व नंतरचे वर्तन कसे होते हे पाहू. आपल्याला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेता येऊ नये, आपण मादक पदार्थांच्या चाचणीत दोषी सापडावे याकरिता प्रयत्न केले जात आहेत, असे सवंग आरोप तिने स्पर्धेपूर्वी; म्हणजे एप्रिलमध्ये केले होते. तिला तिचा प्रशिक्षक नेमता यावा आणि तिचा चमू निवडता यावा यासाठीचे सर्व स्वातंत्र्य भारतीय कुस्ती महासंघाने तिला दिले होते. ऑलिम्पिक समितीकडून तिला स्पर्धेतून बाद केल्यानंतरदेखील तिचे आरोप करणे थांबले नाही. ‘मी पराभूत झाले, कुस्ती जिंकली’ असा अजब आव तिने आणला. त्या वेळी आपली निवृत्ती जाहीर करताना तिने समाजमाध्यमांचा वापर करून जे भले मोठे निवेदन प्रसृत केले, तेदेखील आश्चर्यजनक आणि ठरवून केले गेले हे निश्चित. प्रदीर्घ काळ भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक असलेला पीआर श्रीजेश यानेदेखील ऑलिम्पिकमध्ये सांघिक कांस्यपदक मिळवणारी कामगिरी केल्यानंतर आपल्या कारकीर्दीला साजेशा अशा मार्दवाने आपली निवृत्ती जाहीर केली, त्या वेळी त्याच्या चाहत्यांना खरोखर वाईट वाटले. या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीत पोहोचण्याच्या कामगिरीबद्दल विनेशचे कौतुक असले, तरी स्पर्धेतून बाद होण्याची जबाबदारी तिचीच असूनही तिने जणू स्वत:वर अन्याय झाल्याचा कांगावा केल्याचे पाहणे अजब होते.
भारतात परत आल्यानंतर तिला खाप पंचायतींकडून सुवर्णपदक आणि रोख रक्कम देण्याचा प्रकार अंगावर येणारा होता. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीच्या शंभू सीमेवर ठाण मांडून बसण्याचा तमाशा चालू असलेल्या ठिकाणी भेट देऊन तिने आपली पुढची वाटचाल कशी असेल हे दाखवून दिले. तिचे यामागचे बोलविते धनी हरयाणा काँग्रेसचे भुपिंदर सिंग आणि दीपिंदर सिंग हे हुडा बापलेक आहेत हे उघड गुपित होते. त्यातच सध्या सतत जात-जात असा खेळ खेळत देशात संभ्रमाचे आणि जातीयतेचे वातावरण निर्माण करणार्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट तिने आणि बजरंग पुनिया यांनी घेतली आणि त्यातून सर्व संशय फिटले. हरयाणातील आगामी विधानसभा निवडणुकीत बजरंग पुनिया याला उमेदवारी देण्याची राहुल गांधी यांची इच्छा होती; मात्र त्याच्या बरोबरीने आपल्यालाही उमेदवारी मिळावी, अशी इच्छा विनेशने व्यक्त केल्यावर बजरंग पुनिया याला उमेदवारी नाकारण्यात आली. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेशने आपल्या रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला.
वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये विनेशला तिचे काका महावीर फोगाट यांनी नावारूपाला आणले. ते भाजप समर्थक आहेत. विनेश आणि बजरंग यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा विचार नव्हता; मात्र काँग्रेसने हे कसे घडवून आणले याची आपल्याला कल्पना नाही, असे ते म्हणाले. विनेशचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे तिने 2028च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन नंतर हवे असल्यास राजकारणात पडायला हवे होते, असे त्यांचे मत आहे. विनेश आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेईल, अशी आशा तिच्या आईनेही व्यक्त केली होती. मात्र राजकारणप्रवेशानंतर आता ते शक्य होईल हे संभवत नाही.
आंदोलनामध्ये तिला साथ देणारे साक्षी मलिकसारखे तिचे सहकारी तिच्या राजकारणप्रवेशाबद्दल विचारले असता खांदे उडवून तो तिचा वैयक्तिक निर्णय असल्याचे व आपला तसा विचार नसल्याचे सांगतात. तिने व विनेशने ज्यांना लक्ष्य केले ते भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनी विनेशच्या काँग्रेसप्रवेशानंतर हा काँग्रेसचा डाव असल्याची अपेक्षित प्रतिक्रिया दिली. 2012 मध्ये त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाची सूत्रे हुडांशी झालेल्या मोठ्या संघर्षानंतर स्वत:कडे खेचून आणली होती.
काँग्रेसकडून बळीचा बकरा की हुकमाचा एक्का?
विनेशने कांगावखोरपणा केला असला तरी लैंगिक गैरवर्तन आरोपांमधून निर्माण झालेली सहानुभूती तिच्या बाजूने आहे हे विसरून चालणार नाही. तिने व अन्य पैलवानांनी केलेल्या तक्रारींमधून आता कोठे खालच्या न्यायालयात आरोपनिश्चिती झालेली आहे. तिची सुनावणी होऊन निकाल लागण्यास बराच कालावधी जाईल. त्यामुळे तिने केलेल्या आरोपांवरूनची सहानुभूती किमान तोपर्यंत तिच्या बाजूनेच असेल. तृणमूल काँग्रेसने युसूफ पठाण या माजी क्रिकेटपटूला बंगालमधून लोकसभा निवडणुकीस उभे केले आणि केवळ मुस्लीम असल्याच्या एका आधारावर तो तेथील काँग्रेसचे प्रस्थापित नेते अधीर रंजन चौधरी यांना पराभूत करत निवडून आल्याचे देशाने अलीकडेच पाहिले. विनेशसाठीदेखील तशी अनुकूल परिस्थिती निर्माण केल्याचे स्पष्ट दिसते. शिवाय हरयाणात सध्या चालू असलेली एकूणच सर्वपक्षीय सुंदोपसुंदी पाहता ती निवडून आल्यास आश्चर्य वाटायला नको असे दिसते. तिच्या निमित्ताने हुडांनी तेथे आणखी अनेक मतदारसंघांवर प्रभाव टाकला आहे का हे पाहावे लागेल. तिच्या आक्रस्ताळ्या आंदोलनादरम्यान तिला दिल्लीतील महिला पोलीस ओढत नेत असल्याच्या व्हिडीओंचा तिच्या प्रचारात भरपूर उपयोग केला जाईल यात शंका नाही. तिला ज्या जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे काँग्रेसने घोषित केले आहे, तेथे तिचे सासर आहे. काँग्रेसला गेल्या एकोणीस वर्षांमध्ये तेथे विजय मिळवणे शक्य झालेले नाही. मागच्या निवडणुकीमध्ये जननायक जनता पार्टीचा विजयी उमेदवार आणि दुसर्या क्रमांकावर राहिलेला भाजपाचा उमेदवार यांना मिळालेल्या सुमारे नव्वद हजार मतांच्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवाराला जेमतेम बारा हजार मते मिळाली होती. या पार्श्वभूमीवर तिला तेथून उमेदवारी देण्यामागे तिला बळीचा बकरा बनवून तिच्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा अन्यत्र उठवण्याचा काँग्रेसचा धूर्तपणा आहे की ती हरयाणामध्ये एकूणच घडत असलेल्या जाट मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा घेत काँग्रेसची दुर्दशा दूर करेल हे पाहावे लागेल. तब्बल 92% ग्रामीण मतदार असलेल्या आणि निम्म्यापेक्षा अधिक जाट मतदार असलेल्या या मतदारसंघात विनेशचे जाट-तरुण-महिला असणे फायद्याचे ठरेल, असा काँग्रेसचा हिशोब असणार हे उघड आहे. एखादा हातचा राखून ठेवला असे व्हायला नको म्हणून दिल्लीच्या शंभू सीमेवर रोखून ठेवलेल्या शेतकर्यांना दिल्लीकडे जाण्याच्या आंदोलनासाठी काँग्रेसकडून सक्रिय केले जाईल अशी चिन्हेदेखील आहेत. काँग्रेसप्रवेश केल्या केल्या बजरंगला काँग्रेसने अखिल भारतीय किसान काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनवणे हे त्या दिशेनेच असावे.
विनेशचा राजकारणप्रवेश हा तिच्या आंदोलनाचा अपेक्षित शेवट आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती निश्चितपणे आहे. मात्र तू महिला पैलवानांशी होणार्या लैंगिक गैरवर्तनावरून आंदोलन सुरू केलेस, तर मग केरळ काँग्रेसमध्ये होणार्या महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल तुझे मत काय आहे, हा प्रश्न तेथील निवडणुकीच्या रणधुमाळीत तिला कोणी विचारेल का, हे माहीत नाही.