राहुल गांधी जिच्यावर आगपाखड करतात ती रा. स्व. संघ ही संघटना व्यक्तिनिर्माणाच्या कार्याची शतकपूर्ती करण्याच्या उंबरठ्यावर जरी असली आणि हजारो प्रकारच्या सेवाकार्यांचा डोंगर जरी संघाच्या आत्मविलोपी कार्यकर्त्यांनी उभा केला असला तरी आपल्या कामाची प्रसिद्धी करून हार-तुरे अथवा पुरस्कार मिळविण्याकडे संघाचा मुळीच कल नसतो. याची कल्पना असल्यामुळेच याचा गैरफायदा घेऊन राहुल गांधींसारखे नेते समाजात भ्रम पसरविण्याचा पुरेपूर प्रयास करतात. येनकेनप्रकारेण सत्तासंपादनाचा हेतू साध्य करण्याच्या नादात आपण किती चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत आहोत याचे भान त्यांना उरत नाही.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौर्यात काही अशोभनीय वक्तव्ये केली आहेत. देशभरात वावरतानाही ते अशाच प्रकारची वक्तव्ये करीत असतात, ती त्यांची निवडणुकांना धरून असलेली राजकीय विषयसूची असल्यामुळे त्या भाषणांची तशी संभावना करता येऊ शकते; पण विदेशात जाऊन आपला देश, देशवासीय आणि देशाचे नेतृत्व यांच्यावर अवास्तव टीका करणे, हे देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणूनही अश्लाघ्य समजले जावे. येथे तर ते देशातील एका दीर्घ इतिहास असलेल्या पक्षाचे नेते नव्हे, तर संसदेतील विरोधी पक्षनेता आहेत. आपला देश, देशवासीय आणि देशाचे नेतृत्व यांची प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग त्यांनी कोणत्या कुहेतूने चालविला आहे, हे राजकीय अभ्यासकांना सहज कळू शकते; पण विदेशातील सर्वसामान्य जनतेत अपप्रचार करून देशातील आम नागरिकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा कावा उघड करणे, हे देशहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. बर्याचदा राहुल गांधी यांच्या वाचाळपणाची संभावना ‘बालिश बहु वायफळ बडबडला’ अशा प्रकारे करण्यात येते. कारण मागे ते एकदा असेही म्हणाले होते की, मी भारतसुंदरींची यादी तपासून पाहिली, मात्र त्यात एकही दलित, आदिवासी अथवा ओबीसी महिला नव्हती. राहुल गांधी यांना अशा स्पर्धांचे निकष माहीत नाहीत का? विरोधी पक्षनेता अशा जबाबदारीच्या पदावर आल्यानंतरची त्यांची अशाच प्रकारची भाषणे आणि तीही विदेशात जाऊन केलेली असतील तर ती खचितच हसण्यावारी नेण्याची गोष्ट नव्हे. यापुढे अशी बेताल वक्तव्ये करणार्या राहुल गांधी यांची ‘हास्यास्पद राजकीय पुढारी’ या ओळखीऐवजी ‘कारस्थानी राजकीय नेता’ ही वास्तव ओळख सर्वदूर पोहोचविणे भाग आहे.
असे काय म्हणाले राहुल गांधी?
- भारतीय राजकारणात प्रेम, आदर आणि नम्रता या मूल्यांचा अभाव निर्माण झाला आहे.
- भारताला बेरोजगारीची समस्या सोडवायची असेल तर उत्पादन क्षेत्राला चालना देण्याची गरज आहे. भारताकडे मुबलक कौशल्ये आहेत; परंतु व्यावसायिक प्रशिक्षणाची वानवा आहे. ज्यांच्याकडे कौशल्ये आहेत अशा व्यक्तींना दूर लोटले जात आहे.
- भारत हा एकाच विचाराचा देश आहे, असे रा. स्व. संघाचे म्हणणे आहे; पण भारत हा विविध विचारांचा सन्मान करणारा देश आहे, असे आमचे म्हणणे आहे.
- रा. स्व. संघाला भारतच कळलेला नाही. हा अनेक राज्यांचा संघ आहे. यात एकसारखेपणा नसून बरीच विविधता आहे.
राहुल गांधी हे सर्व काही त्यांच्याकडे योग्य माहिती नसल्यामुळे किंवा गैरसमजापोटी म्हणत आहेत अशी मुळात परिस्थिती नाही. त्यांचे राजकारण केवळ ‘निवडणूक’ या एकाच ध्रुवाभोवती फिरत असल्यामुळे केवळ तोच तारा समोर ठेवून ते आपली वक्तव्ये करीत असतात. आपल्याला लोकांना आपल्या बाजूने वळवता येत नसेल, तर मग लोकांच्या मनात भ्रम निर्माण करावा, हे सूत्र त्यांनी अंगीकारले आहे. त्यामुळे मग ते सोपी वाक्ये सांगत विचारांचे सुलभीकरण करतात. उदा. एखादा पगडी घातलेला माणूस आणि पगडी न घातलेला माणूस तेवढ्याच आदरास पात्र आहेत. तमिळ, तेलुगु आणि मल्याळम या फक्त भाषा नाहीत. त्या त्यांच्यासोबत आपला इतिहास, संस्कृती, संगीत, भोजन, नृत्य घेऊन येतात. तुमच्या थाळीत वाढलेला भात आणि वरण यांच्याइतकेच भाजीचेही महत्त्व आहे. तुम्ही तिला कमी लेखू शकत नाही. महाभारतात अंगठा कापलेल्या एकलव्याची कथा आहे. ही कथा भारतात लाखो लोकांच्या बाबतीत दररोज घडत आहे. वरवर पाहता ही निरुपद्रवी वाटणारी वाक्ये श्रोते आणि वाचक यांचा बुद्धिभेद करणारी आहेत. पुढे ते असेही सांगतात की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींची प्रतिमा आणि त्यांनी निर्माण केलेली भीती पूर्णपणे नष्ट झाली आहे. मग ते पुन्हा प्रश्न उपस्थित करतात- भारतात शीख व्यक्तीला पगडी, कडे परिधान करण्याची परवानगी मिळेल का? गुरुद्वारात जाता येईल का? यासाठी आपण लढाई लढत असल्याचा ते दावा करतात. ज्या काँग्रेसने शिखांचा नरसंहार घडवून त्यांना भयभीत केले होते, त्याच काँग्रेसच्या नेत्याने असा दावा करणे कोणालाच पटणारे नाही, शिवाय जर मोदींचे भय आणि प्रभाव पूर्णपणे इतिहासजमा झाला आहे, तर ही लढाई ते कोणाच्या विरोधात लढत आहेत?
राहुल गांधी जिच्यावर आगपाखड करतात ती रा. स्व. संघ ही संघटना व्यक्तिनिर्माणाच्या कार्याची शतकपूर्ती करण्याच्या उंबरठ्यावर जरी असली आणि हजारो प्रकारच्या सेवाकार्यांचा डोंगर जरी संघाच्या आत्मविलोपी कार्यकर्त्यांनी उभा केला असला तरी आपल्या कामाची प्रसिद्धी करून हार-तुरे अथवा पुरस्कार मिळविण्याकडे संघाचा मुळीच कल नसतो. याची कल्पना असल्यामुळेच याचा गैरफायदा घेऊन राहुल गांधींसारखे नेते समाजात भ्रम पसरविण्याचा पुरेपूर प्रयास करतात. येनकेनप्रकारेण सत्तासंपादनाचा हेतू साध्य करण्याच्या नादात आपण किती चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत आहोत याचे भान त्यांना उरत नाही. पंतप्रधान कोणत्याही पक्षातून आलेले असोत, ते संपूर्ण देशाचे आणि देशवासीयांचे, त्यात विरोधी पक्षनेताही आला, पंतप्रधान असतात; पण यावर राहुल गांधी यांचा विश्वास नाही. नेहमीच देशविघातक व्यक्ती आणि संघटना यांच्यावर प्रेमाची पखरण करताना, सच्ची राष्ट्रप्रेमी संघटना असलेल्या संघावर सांविधानिक पदावरील ही व्यक्ती बेजबाबदारपणे कसे लांच्छन लावू शकते? ती त्याने आपल्या कर्तव्यभावनेशी केलेली प्रतारणा असते. जेव्हा सर्वांचा आदर, सर्वांप्रति प्रेम आणि नम्रता अशा उदात्त मूल्यांचा तुम्ही गवगवा करायला उभे ठाकता तेव्हा एखाद्या देशभक्त संघटनेच्या बाबतीत बेजबाबदार विधाने करून राहुल गांधी आपल्याच भूमिकेला छेद देत नाहीत का? पण निवडणूक-सत्तासंपादन-निवडणूक एवढेच खुजे राजकारण करायचे ठरल्यावर हा प्रश्नही निरर्थक ठरतो.
काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता असताना शिक्षणव्यवस्था कशी एकाच विचारधारेची बटीक बनवून ठेवली होती, हा इतिहास राहुल गांधी विसरले आहेत. कौशल्य प्रशिक्षण व व्यवसायाधारित प्रशिक्षण देण्यासाठी इतकी वर्षे सत्ता उपभोगणार्या काँग्रेसचे हात कोणी बांधून ठेवले होते का? बेरोजगारीची समस्या निर्माण करण्यास काँग्रेसच्याच चुकीच्या धोरणांनी हातभार लावलेला नाही का? वेगवेगळ्या भाषाभगिनींमध्ये आणि भिन्न भाषा बोलणार्या समाजात दुरावा काँग्रेसनेच निर्माण करून आपली पोळी भाजलेली नाही का? मात्र आपले नाकर्तेपण पांघरूण घालून लपवायचे आणि दुसर्यांबाबत सतत गरळ ओकायची, असे कुकर्म करून वर नम्रतेची भाषा बोलायची, हे ढोंग राहुल गांधी यांच्यासारख्या आपमतलबी कोत्या मनोवृत्तीच्या नेत्यालाच उत्तम जमू शकते. याचेच दर्शन राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन घडविले आहे.