संविधान जागरात सहभागी होऊ

09 Aug 2024 16:00:38
आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली. तरी ते सर्वसामान्य नागरिकांना खर्‍या अर्थाने कळले नाही. उलट संविधानाच्या संदर्भात गैरसमज मात्र पसरविले जातात. या पार्श्वभूमीवर संविधान जागर समितीने ‘संविधान जागर यात्रा 2024’ आयोजित केली असून महाड येथे 9 ऑगस्ट रोजी या यात्रेचा शुभारंभ होईल व 8 सप्टेंबर रोजी चैत्यभूमी, दादर-मुंबई येथे या यात्रेची सांगता होईल.
samvidhan
 
मागील काही वर्षांपासून आपल्या देशात ’संविधान खतरे में’ अशा घोषणा देत सामाजिक जीवन अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर अशा घोषणा आणि वक्तव्यांना ऊत आला आहे. कोणत्याही प्रकारचे पुरावे न देता असे बेछूट आरोप करून सामाजिक जीवनात अस्वस्थता निर्माण करून काही मंडळी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विषय केवळ राजकीय नसून आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा तो एक भाग आहे. काहीही करून देशात बंडाळी माजावी आणि लोकशाही खिळखिळी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असून संविधानाविषयी गैरसमज निर्माण केले जात आहेत. विशेषतः अनुसूचित जाती व जमातीमध्ये अनेक अफवा पसरवून त्यांना भ्रमित केले जाते आहे. या अफवा म्हणजे, आरक्षण बंद करणार, संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करणार, आपल्याला पुन्हा गुलाम करणार, या आणि अशा अनेक अफवा पसरवून सामाजिक व राजकीय क्षेत्रांत ताणतणाव निर्माण करण्यात येत आहेत. यामागे केवळ भाजपाचा विरोध हाच हेतू आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातीतील काही सजग व्यक्तींनी पुढाकार घेऊन संविधान जागर समिती स्थापन केली आहे. या वर्षी आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभर संविधान अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर संविधानाच्या संदर्भात निर्माण केले गेलेले भ्रम आणि अफवा दूर करण्यासाठीही व्यापक जनसंपर्क केला जाणार आहे. संविधान जागर समितीने आपला कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार पुढील काळात व्यापक प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ‘संविधान जागर यात्रा 2024’ हा होय. भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्ये यासंबंधी सर्वसामान्य माणसांशी संवाद करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील राष्ट्रीय समाज निर्माण करणे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याविषयी सजगता निर्माण करून संविधानप्रेमी समाज निर्माण करणे, हा या यात्रेचा उद्देश आहे. आज आपण पाहतो, की शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने पुरोगामित्वाचा डिंडोरा पिटणारे लोक संविधानासंबंधी गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराशी घेणेदेणे नसून जातीय राजकारण आणि जातवादाला प्रोत्साहन देण्यासाठी ही मंडळी सक्रिय झाली असून संविधानाच्या संदर्भात अफवा पसरवून ते सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच संविधानाच्या संदर्भात अनेक खोट्या अफवा जोरदारपणे प्रसारित करण्यात आल्या आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही त्या जोरदारपणे पसरवल्या जातील.
 
स – संविधानाचा
या पुस्तकातून राज्यघटना स्वतः आपल्या निर्मितीची कथा मुलांना सांगणार आहे.
भावी पिढीतील संविधानाचे जे रक्षक आहेत, पालक आहेत म्हणजे आजची जी पिढी आहे यांच्यापर्यंत संविधान हा विषय पोहोचावा हा या मागील हेतू आहे.
5वी ते 10वीच्या मुलांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक…
आपली प्रत आजच नोंदवा.
₹50.00
https://www.vivekprakashan.in/books/of-the-constitution/
 
  
 
हे लक्षात घेऊन संविधान जागर समितीने संविधान जागर यात्रा 2024 आयोजित केली असून महाड येथे 9 ऑगस्ट रोजी या यात्रेचा शुभारंभ होईल व 8 सप्टेंबर रोजी चैत्यभूमी, दादर-मुंबई येथे या यात्रेची सांगता होईल. एक महिना चालणार्‍या या संविधान जागर यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून होणार असून जिल्हास्थानी जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहेत. या यात्रेदरम्यान चवदार तळे, किल्ले रायगड, पतितपावन मंदिर, शाहू महाराज स्मारक, महात्मा फुले स्मारक, लहुजी साळवे स्मारक, दीक्षाभूमी, काळाराम मंदिर, चैत्यभूमी अशा अनेक सामाजिक प्रेरणा केंद्रांना भेटी देण्यात येणार आहेत.
 
 
या संविधान जागर यात्रेत स्व. खासदार दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड, माजी खासदार व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बाळासाहेब साळुंके यांचे पुत्र काश्यप साळुंके, सरसेनापती सिदनाक यांचे बारावे वंशज मिलिंद इनामदार हे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर वाल्मिक निकाळजे (प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा अनुसूचित मोर्चा), नितीन मोरे (संस्थापक, जय भीम आर्मी), धम्मपाल मेश्राम (प्रदेश प्रवक्ते), योजना ठोकळे (सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन दिल्ली), स्नेहा भालेराव (मुंबई उपाध्यक्ष), संजय कांबळे (जय भीम सेना महाराष्ट्र), क्षितिज टेक्सास गायकवाड (विश्वस्त, ऐतिहासिक धम्म भूमी ट्रस्ट पुणे), राजू माने (प्रदेश सचिव अनुसूचित मोर्चा), शरद कांबळे (मुंबई अध्यक्ष, अनुसूचित मोर्चा), मिलिंद नाखले (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय बौद्ध संघ), आकाश अंभोरे (फुले, शाहू, आंबेडकरी कार्यकर्ता महाराष्ट्र), डॉ. विजय मोरे (प्रदेश संघटक भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी) इत्यादी मान्यवर या यात्रेसोबत प्रवास करणार आहेत. यासोबतच माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोळे, नागसेन पुंडगे (भाजपा प्रदेश सचिव), ज्येष्ठ विचारवंत विजय गव्हाणे (बारामती) हे मान्यवर ही या यात्रेत सहभागी होणार आहेत.
 
 
आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली. तरी ते सर्वसामान्य नागरिकांना खर्‍या अर्थाने कळले नाही. उलट संविधानाच्या संदर्भात विविध भ्रम आणि अफवा मात्र सर्वदूर पसरलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संविधान जागर समितीने आयोजित केलेल्या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रहिताचे विचार, त्यांची राष्ट्रीय भूमिका व राष्ट्रवादाचे विचार घरोघरी पोहोचवण्यात येणार आहेत. समाजात मुद्दामहून निर्माण केलेले भ्रम, गैरसमज, अफवा दूर करण्यासाठी या संविधान जागर यात्रेची मदत होणार आहे. तेव्हा चला, संविधान जागर यात्रेत सहभागी होऊ या.
प्रतिनिधी
Powered By Sangraha 9.0