क्रीडारसिक आणि खेळाडू दर चार वर्षांनी होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. 2024 ची ही ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होत आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचे खेळ पाहणे ही पर्वणी असते, तशीच या खेळांमध्ये मानवतेच्या मूल्यांचे, त्यातील भावभावनांचे अनोखे दर्शन यानिमित्त घडत असते. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अशाच काही उल्लेखनीय घटना आपण ह्या लेखात पाहू या.
ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे फक्त खेळ खेळणं आणि पदक मिळवणं इतकंच नाही. अनेक देशांतील खेळाडू एकाच ठिकाणी येऊन इतके सगळे खेळ खेळत असतात, त्यामुळे अशा बर्याचशा गोष्टी ऑलिम्पिक नगरीत घडत असतात ज्या आपल्याला आनंद देऊन जातात किंवा थक्क करतात. खेळाडूंचं खेळातील कौशल्य महत्त्वाचं आहेच; पण एक माणूस म्हणूनही त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांसमोर समोर येतं.
खिलाडूवृत्ती
स्पेनची कॅरोलिना मरीन महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या हे बिंग जियाओविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळत होती. मरीन सामना जिंकेल असं वाटत असतानाच तिचा गुडघा दुखावला. वेदना असह्य झाल्या आणि रडत रडत मरीन मैदानातून बाहेर गेली. ह्यामुळे चीनच्या खेळाडूचा अंतिम फेरीत प्रवेश झाला. तो सामना जगज्जेत्या अॅन से यंगविरुद्ध होता. बिंग जियाओ अॅनकडून पराभूत झाली. रौप्य पदक स्वीकारण्यासाठी पोडियमवर गेलेल्या चीनच्या हे बिंग जियाओच्या हातात छोटासा स्पॅनिश ध्वजही होता. हा ध्वज केवळ मरीनबरोबरच्या सामन्याची आठवण कायमस्वरूपी जतन करण्यासाठी होता आणि त्यातून एक प्रकारे तिने मरीनबद्दलचा आदरच दर्शवला होता. ह्या छोट्याशा कृतीने तिने जगभरातील क्रीडारसिकांना मोठा आनंद दिला. स्वतः मरीननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं कौतुक केलं. खिलाडूवृत्ती आणि प्रतिस्पर्ध्याचा आदर करणे हेच तर खेळ शिकवतो.
झीयिंगची स्वप्नपूर्ती
जन्माने चिनी, पण नंतर चिलीला स्थायिक झालेली एक खेळाडू झीयिंग झेंग. तिची आई टेबल टेनिस प्रशिक्षक होती, त्यामुळे त्याच खेळाची गोडी लागून, पुढे अनेक स्पर्धा जिंकून झीयिंग चीनच्या राष्ट्रीय संघात दाखलही झाली. त्यानंतर खेळाच्या नियमात एक बदल करण्यात आला, त्यानुसार खेळाची रॅकेट (पॅडल) दोन रंगांची झाली. दोन्ही बाजूंना वेगवेगळे रंग असल्यामुळे प्रतिस्पर्ध्याने मारलेल्या चेंडूचा वेग आणि स्पिन ओळखणं शक्य होणार होतं. झीयिंगला हा बदल अजिबात मानवला नाही. तिला नैराश्य आलं आणि ऐन विशीत तिने खेळातून निवृत्ती घेतली. पुढे ती चिलीमध्ये स्थायिक झाली. काही काळासाठी तिथल्या स्थानिक लहान मुलांना तिने खेळाचं प्रशिक्षण दिलं; मात्र पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करून ती खेळापासून पूर्णपणे दूर गेली. कोविड काळात जग अक्षरशः ठप्प झालं होतं, करायला काही काम नव्हतं. अशा परिस्थितीत ती पुन्हा एकदा ह्या खेळाकडे ओढली गेली, स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळायला लागली आणि चिली देशाकडून ह्या वर्षी तिने ऑलिम्पिक पदार्पण केलं. झीयिंग पहिल्याच फेरीत पराभूत झाली; पण लहानपणी पाहिलेलं तिचं स्वप्न मात्र अशा प्रकारे साकार झालं 58व्या वर्षी!
12 वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या संघसहकार्यांबरोबर सुवर्ण जिंकणारा हॅरी
अश्वारोहण (equestrian) अंतर्गत अनेक प्रकारचे वैयक्तिक आणि सांघिक खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात. ह्या खेळात विशीतले तरुण ते अगदी पन्नाशी-साठीकडे झुकलेले वरिष्ठ खेळाडूही समाविष्ट असतात. ह्याच खेळात एक गमतीशीर योगायोग पाहायला मिळाला. 2012 मध्ये 13 वर्षांच्या हॅरीने वडील पीटर चार्ल्स ह्यांना सांघिक उडी (equestrian-team jumping) प्रकारात सुवर्ण पदक जिंकताना पाहिलं आणि आपणही हाच खेळ खेळायचा असं ठरवून टाकलं. वडिलांच्याच इच्छेनुसार गोल्फ खेळणारा हॅरी त्यानंतर मात्र अश्वारोहण शिकू लागला. बरोबर 12 वर्षांनी 2024 मध्ये हाच हॅरी पोडियमवर उभा होता, गळ्यात सुवर्ण पदक घालून. गमतीचा भाग हा, की हॅरीबरोबर असलेले दोन्ही खेळाडू 2012 मध्ये त्याच्या वडिलांबरोबर ग्रेट ब्रिटनच्या संघात होते. असे योगायोग फारच दुर्मीळ असतात.
खेळाडू आई
आई होणं हा बाईचा पुनर्जन्म असतो, असे म्हणतात. अनेक शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरातून तिला जावं लागतं. लहान बाळापासून दूर राहणं ही तर शिक्षाच वाटू शकते. खेळाडू स्त्रियांची अवस्था कशी होत असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता. अशीच नव्याने आई झालेली काही दिवसांपूर्वी पोडियमवर दिसली. स्किट नेमबाजीतलं रौप्य पदक मिळवणारी एम्बर रटर. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकस्थळी असताना तिला कोविड झाला आणि त्यामुळे स्पर्धेत भाग घेता आला नाही. एप्रिल 2024 मध्ये तिने बाळाला जन्म दिला. तीन महिन्यांचं बाळ घरी ठेवून ती पॅरिसमध्ये दाखल झाली, खेळली आणि रौप्य पदक जिंकलीही. स्पर्धा संपण्याआधी तिचा पती छोट्या बाळाला घेऊन पॅरिसमध्ये हजर झाला होता. एक आई म्हणून आणि एक नेमबाज म्हणूनही एम्बरसाठी हे ऑलिम्पिक संस्मरणीय ठरलं असेल ह्यात शंकाच नाही. असे आदर्श समोर ठेवण्याची आज गरज आहे. काही मिळवायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. नंतर मिळालेल्या यशाने सगळ्याची भरपाई होते.
तलवारबाजी खेळात नाडा हेझ या सात महिन्यांच्या गरोदर स्त्रीने भाग घेतला होता. पहिल्या फेरीत जिंकल्यानंतर तिने ही बातमी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली.
ऑलिम्पिक नगरीतले प्रेमवीर
चीनच्या मिश्र दुहेरी बॅडमिंटन संघाने सुवर्ण पदक पटकावलं. ह्या जोडीतील हुअंग किओंग ह्या महिला खेळाडूच्या आयुष्यात त्याच निमित्ताने आणखी एक गोड क्षण आला. लिऊ यूचेन ह्या पुरुष दुहेरीत खेळणार्या खेळाडूने तिला थेट हिर्यांची अंगठी देत लग्नासाठी विचारलं. ह्या दोघांमध्ये ओळख, मैत्री आणि प्रेम हे खूप आधीपासूनच असल्यामुळे हुअंगने अर्थातच ती अंगठी स्वीकारली. अशा वेळी कॅमेरे तर सज्ज असतातच, त्यामुळे जोडीने फोटो काढण्याचा कार्यक्रमही पार पडला.
इटलीच्या जीआनमार्को तांबेरी ह्या जगज्जेत्या उंच उडी खेळाडूने पत्नीला उद्देशून लिहिलेली पोस्टही ह्यादरम्यान खूप गाजली.स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान सिएन नदीतून बोटीने जात असताना त्याची वेडिंग रिंग पाण्यात पडली होती.
शेवटी पुन्हा एकदा थोडंसं खेळांबद्दल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत अनेक स्पर्धा विक्रम, जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत. काही खेळाडूंनी आपापल्या खेळातील दबदबा कायम राखण्यात यश मिळवलं आहे, तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. काहींच्या नशिबी दुखापतीने स्पर्धेबाहेर जाणं लिहिलेलं होतं. दुखापत हा खेळाडूंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही; पण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा मागील चार वर्षांत घेतलेली अविश्रांत मेहनत वाया गेलेली असते, शिवाय पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत आपण टिकू की नाही, ही चिंता खेळाडूंना सतावत असते. इथे त्यांच्या मानसिक क्षमतेचा खर्या अर्थाने कस लागतो.
आपला दबदबा कायम राखणार्या खेळाडूंमधील एक नाव डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन. बॅडमिंटन सेमिफायनलमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने त्याच्याविरुद्ध चांगली झुंज दिली, मात्र ह्या डॅनिश खेळाडूने त्याच्यावर मात केली, अंतिम फेरीचं आव्हानही सहज पार करत सलग दुसरं ऑलिम्पिक सुवर्ण पटकावलं.
कोरीयन संघाने तिरंदाजी खेळातील आपलं वर्चस्व ह्याही वर्षी दाखवून दिलं.
नकाशावर जेमतेम दिसणारे अनेक छोटे देश तेथील खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे पदक तक्त्यात दिसू लागले. सेंट ल्युसिया ह्या छोट्याशा देशातील ज्युलियन अल़्फ्रेंडने 100 मीटर शर्यतीत तिच्याहून प्रसिद्ध असलेल्या खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला.
डोमिनिका हा आणखी एक छोटासा देश, त्याच देशाच्या थिआ लाफॉड ह्या खेळाडूने तिहेरी उडीत सुवर्ण पदक जिंकले.
फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ह्या दोन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यामुळे विजेतेपदापासून दूर राहिलेली जस्मिन पाओलीनी ह्या स्पर्धेत मात्र बाजी मारून गेली. पुरुष गटात पुन्हा एकदा नोवाक जोकोविक आणि कार्लोस अल्काराज एकमेकांसमोर उभे ठाकले. ह्या वेळी जोकोविकने बाजी मारली.
पुरुषांची 100 मीटर स्पर्धा वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिली. नोआ लाईम्स आणि जमैकाचा थॉमसन ह्या दोघांनी एकच वेळ नोंदवली आणि अखेर फोटो फिनिशच्या मदतीने विजेता शोधावा लागला. कुणाचं पाऊल रेषेपलीकडे सर्वात आधी पडलं ह्यापेक्षा कुणाचा कमरेवरचा भाग (torso) रेषेपलीकडे दिसतो हे इथे महत्त्वाचं असतं. ह्या नियमाने नोआ लाईम्स विजेता ठरला. पावलाचा विचार केला तर थॉमसन पुढे दिसत होता.
अमेरिकेन जिम्नॅस्ट सिमोन बाईल्सने तब्बल तीन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावत आपल्या चाहत्यांना खूश केलं. तिच्या नावावर आत्तापर्यंत एकूण 11 ऑलिम्पिक पदके आणि 30 जागतिक स्पर्धेतील पदके आहेत. दुखापतीमुळे काही काळ खेळापासून दूर गेलेल्या सिमोनने 2023 मध्ये पुन्हा जिम्नॅस्टिक सरावाला सुरुवात केली आणि ह्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. जिद्द, चिकाटी आणि हार न मानण्याची वृत्ती हे तिच्या व्यक्तिमत्त्वातील खास गुण आहेत.
ऑलिम्पिक 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अशा आणखी अनेक गोष्टी तिथे नक्कीच घडणार आहेत. मोबाइल आणि टीव्हीच्या माध्यमातून खेळांचं थेट प्रक्षेपण पाहणं सहज शक्य आहे, त्यामुळे शेवटी एकच सांगेन, ऑलिम्पिक बघा, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या, इतरांच्या खेळाचा आनंद लुटा!
विनेश फोगट अपात्र
भारतासाठी दुर्दैवी घटना
विनेशने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे. स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकाचं वजन दोन्ही दिवशी त्यांच्या वजनश्रेणीतच असणं आवश्यक असतं.
ऐन वेळेस विनेश फोगट हिला अपात्र ठरविणे, ही भारतासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकार आणि संपूर्ण देश आम्ही तिच्या सोबत राहू, असे विनेश हिला आश्वस्त केले आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विनेशला उद्देशून म्हणाले, “भारताला तुझा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणास्थान आहेस. आजचा हा धक्का वेदनादायक आहे. माझा उद्वेग शब्दांत व्यक्त करता येणार नाही. चिकाटी म्हणजे काय, याचं तू उत्तम उदाहरण आहेस. तू कायमच आव्हानांचा नेटाने सामना केला आहेस. अधिक जोमाने परत ये! आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.”