केरळमधील वायनाडमध्ये 30 जुलैला भूस्खलन झाले. 350 पेक्षा अधिक जणांचा जीव गमावला आहे, तर किमान तीन गावे उद्ध्वस्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी प्रशासनासोबत मदतकार्यासाठी धावून येतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक! वायनाडमध्येही मृत व्यक्तींना शोधणे, भोजन शिबिरांची स्थापना, सर्व काही गमावलेल्या लोकांसाठी आश्रयस्थान उभारणे आणि आपल्या आप्तजनांची ओळख पटविण्यासाठी कुटुंबीयांना मदत करणे यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुर्दैवाने यामध्ये दोन स्वयंसेवकांना मरणही पत्करावे लागले आहे. या मदतकार्याविषयी माहिती देणारा लेख...
केरळमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक विनाशकारी भूस्खलनापैकी एका भूस्खलनाची नोंद 30 जुलै रोजी झाली. त्यामुळे 358 पेक्षा अधिक जणांचा जीव गेला, तर किमान तीन गावे उद्ध्वस्त झाली. वैदिरी तालुक्यातील मुंडक्काई, चूरलमला आणि अट्टमला या गावांमधून वाहणार्या इरुवळिंजी नदीमुळे ही आपदा उद्भवली. नंतर ही नदी चालियार नदीला जाऊन मिळते. इथून जवळच असलेल्या मलप्पुरम जिल्ह्यातील पोतूकल्लू येथे चालियार नदीमध्ये 26 मृतदेह आणि मृत शरीरांचे असंख्य अवयव सापडले. याशिवाय एक सरकारी माध्यमिक व्यवसाय विद्यालय (व्होकेशनल स्कूल) भूस्खलनामुळे गाडले गेले.
केरळमधील वायनाड येथील भूस्खलनामुळे मृत्यूंची संख्या शनिवारी 358 वर पोहोचली. राडारोडा आणि पडझड झालेल्या घरांखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी बचाव पथके डीप सर्च रडारचा उपयोग करून अथकपणे काम करत आहेत. अजूनही 200 पेक्षा अधिक व्यक्ती गायब आहेत. बचावकार्याचा हा पाचवा दिवस असून भारतीय लष्कर, केरळ पोलीस आणि आणीबाणीच्या सेवासंस्थांद्वारे बचावकार्य चालविण्यात येत आहे. खासगी शोध आणि बचावसंस्था तसेच स्वयंसेवकांचे त्यांना सहकार्य लाभत आहे. सतत कोसळणार्या मुसळधार पावसाने केरळला झोडपून काढले असून आजवरचा विक्रमी पाऊस केरळमध्ये नोंदविण्यात आला आहे. वायनाड जिल्ह्यातील तीन विनाशकारी भूस्खलनाआधी 24 तासांमध्ये राज्यात 372 मिलिमीटर एवढ्या प्रचंड पावसाची नोंद झाली.
राजकीय आणि पर्यावरणाच्या उलथापालथीमध्येसुद्धा बचावकार्य जोमात सुरू आहे. या आव्हानात्मक काळात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी लक्षणीय प्रमाणात दिलासा देण्याचे काम केले आहे. एनडीआरएफच्या पथकांच्या बरोबरीने काम करत या स्वयंसेवकांनी मृत व्यक्तींना शोधणे, भोजन शिबिरांची स्थापना करणे सर्व काही गमावलेल्या लोकांसाठी आश्रयस्थान उभारणे आणि आपल्या प्रियजनांची ओळख पटविण्यासाठी कुटुंबीयांना मदत करणे यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वायनाडमधील विनाशकारी भूस्खलनानंतर जवळपासच्या भागातील शेकडो स्वयंसेवक मदतकार्याला हातभार लावण्यासाठी पुढे सरसावले. संकटग्रस्त समुदायाला आधार देण्यामध्ये त्यांच्या समर्पित कार्याचा मोठा वाटा आहे. या आपदाग्रस्त लोकांची सुरक्षा आणि क्षेमकल्याण यांची हमी देण्यासाठी ते अथक काम करत आहेत.
जखमी व्यक्तींना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवक सुरक्षित वाहतूक करत आहेत, जेणेकरून त्यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत. तसेच ते रस्त्यावरील राडारोडा काढण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे तातडीच्या वाहनांना दुर्गम आणि संकटग्रस्त भागांमध्ये अधिक त्वरेने पोहोचणे शक्य होत आहे. रुग्णालयांमध्ये ते जखमी व्यक्तींना खाद्यपदार्थ आणि अन्य आवश्यक वस्तू पुरवत आहेत.
सेवा भारतीचे फिरते अंत्यसंस्कार केंद्र
भूस्खलनामुळे मोठ्या संख्येने मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था लावण्यासाठी सेवा भारतीने आपले ’चिताग्नी’ हे फिरते अंत्यसंस्कार केंद्र तैनात केले आहे. या आपत्तीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी या फिरत्या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. केरळमधील अनेक गरीब कुटुंबांसाठी पारंपरिकरीत्या अंत्यसंस्कार करणे अत्यंत आव्हानात्मक असते. मर्यादित जागा आणि संसाधन यामुळे विशेषतः छोट्या भूभागात राहणार्या लोकांसाठी तेथे चिता रचणे आवाक्याबाहेरचे असते. लोकसंख्येची मोठी घनता आणि पावसाळ्यातील पूर यामुळे या अडचणी अधिकच वाढतात.
सेवा भारतीच्या फिरत्या अंत्यसंस्कार केंद्राचे ख्रिश्चन समुदायानेही स्वागत केले आहे. त्यांनाही चर्चच्या जमिनीवर धार्मिक विधी करून अंत्यसंस्कार करण्यात नेहमीच अडचण येते.
रा. स्व. संघाचे कोट्टायम विभाग संघचालक आणि मीनाचील नदी खोरे हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर पी. चिदंबरम यांच्या दूरदृष्टीतून चिताग्नीचा जन्म झाला. या नावीन्यपूर्ण प्रणालीत नारळाच्या करवंटीचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो आणि त्यातून प्रत्यक्ष ज्वाला निर्माण होत नाहीत. घराच्या लहानशा अंगणातही सुलभतेने अंत्यसंस्कार करता यावेत अशा रीतीने तिची रचना करण्यात आली आहे. याच्या उंच जाणार्या धुराच्या नळकांड्यामुळे आजूबाजूच्या व्यक्तींनाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येते. चिताग्नी हा सेवाकार्यांमधील सर्वाधिक मानवतावादी आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पांपैकी एक आहे. या भयंकर आपदेतून वायनाड जिल्हा सावरत असताना संघ आणि अन्य स्वयंसेवी संघटनांच्या उपस्थिती व मदतीमुळे तेथील लोकांना आशेचा किरण लाभला आहे.
चर्चच्या प्रमुखांकडून कौतुक
सेवा भारतीच्या या शिस्तबद्ध आणि निःस्वार्थी कार्याचे कौतुक अगदी चर्चच्या प्रमुख पदाधिकार्यांनीही केले आहे. ख्रिश्चियन सर्व्हिस इन्स्टिट्यूशन (सीएसआय) होली इमॅन्युअल चर्चचे विकार फादर पी. व्ही. चेरियन यांनी सेवा भारतीचे तोंडभरून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे ही संस्था संघ परिवाराबद्दल सकारात्मक मत व्यक्त करण्याबद्दल ओळखली जात नाही. मात्र या वेळेची परिस्थिती वेगळी आहे. फादर चेरियन म्हणाले, मला सेवा भारतीचे खूप कौतुक वाटते. ही शिस्तबद्ध काम करणारी संघटना आहे. पूर्वी तिच्याबद्दल माझे मत वेगळे होते; परंतु त्यांच्या शिस्तबद्ध कामाने मला प्रभावित केले आहे. त्यांच्याशी संबंध आल्याचा मला आनंदच आहे. एवढेच नव्हे तर, सेवा भारतीचे स्वयंसेवक आमच्या चर्चमध्ये राहात आहेत. त्यांच्या वस्तू ठेवण्यासाठी व त्यांची वाहने लावण्यासाठी आम्ही जागा देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे, असेही चेरियन यांनी सांगितले.