सालुमारदा थिमक्का

05 Aug 2024 15:42:18
बीबीसीच्या 100 प्रभावी पर्यावरणवादी महिलांपैकी एक
(8 जुलै 1911)
 
Saalumarada Thimmakka 
 
वयाच्या 113 व्या वर्षी थिमक्का या बहुधा जगातल्या सर्वात वृद्ध अशा निसर्गप्रेमी गणल्या जातील. दरमहा मिळणारं तुटपुंजं पेन्शन एवढीच काय ती त्यांची आवकेची बाजू. भौतिक अभिलाषा नसल्यानं त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जीव असेपर्यंत झाडं-निसर्ग-पर्यावरण यासाठी कष्ट उपसत राहणं हेच त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे.
कर्नाटकमधल्या कोडूर गावात राहणारं थिमक्का आणि चिक्कय्या हे एक सामान्य गरीब जोडपं. यातला चिक्कय्या गुरं राखणारा, तर थिमक्कास्वतःच्या वीतभर आकाराच्या शेतात राबणारी. त्या शेत-तुकड्यात राबून जे काही मिळायचं त्यातून उभयतांचं पोट जेमतेम भरायचं. थिमक्काचा जन्म रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावात एका गरीब कुटुंबात झाला. तिनं शाळेचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. गावातल्या खाणीत खडी वाहण्याचं काम थिमक्का लहानपणापासून करायच्या. अगदीच लहान वयात तिचं चिक्कय्या नावाच्या गुराख्याशी लग्न झालं. लग्नाला बरीच वर्षं होऊनही या जोडप्याला मूलबाळ झालं नव्हतं; पण मूल झालं नाही याचं दुःख करत न बसता, या जोडप्यानं कुटुंबात आणि घरात आलेलं रितेपण संपवण्याचा अनोखा मार्ग शोधून काढला.
 
 
हा मार्ग होता झाडांचं पालकत्व स्वीकारण्याचा. हुलिकल गावातून कोडूरला अनेक जण नोकरीनिमित्तानं जायचे. या रस्त्यावर एकही झाड नसल्यानं त्यांना रखरखत्या उन्हात प्रवास करावा लागायचा. त्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा उजाड मार्ग उजवायचा, त्या रस्त्यावर सावल्या देणारे वृक्ष उभे करायचे, असा विचार या दोघांनी केला आणि झाडातच मूल असल्याचा आनंद शोधला. त्यासाठी झाडं लावणं गरजेचं होतं; पण साधी रोपं विकत घेण्यासाठी लागणारे पैसेही थिमक्का आणि चिक्कय्याकडे नव्हते. दोघंही हिंमत हरणारे नव्हते. गावात मोठ्या संख्येत असलेल्या वडाच्या झाडांकडे दोघांचं लक्ष गेलं आणि त्यांनी वडाच्या फांद्या तोडून त्यापासून कलमं तयार केली, त्याशिवाय त्यांच्या गावात वडाची रोपंही भरपूर होती, ती त्यांनी काढली आणि त्यांचं महामार्गालगत प्रत्यारोपण सुरू केलं.
 
 
हुलिकल आणि कोडूरदरम्यानच्या महामार्ग क्रमांक 94 वर, 45 किलोमीटरच्या अंतरात या जोडप्यानं वडाची 384 रोपं लावली.घरापासून इतक्या दूर अंतरावर, जवळ पाण्याचा स्रोत नसताना ही झाडं जगवणं हेच मोठं आव्हान होतं; पण एखादे आई-बाप आपल्या पोटच्या पोरासाठी जेवढं करतील, तेवढं आणि तितकंच या दोघांनी झाडांसाठी केलं. डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन रोज भल्या पहाटे तीन-चार किलोमीटर अंतरावरच्या या झाडांसाठी दोघं घराबाहेर पडायचे, नियमित पाणी घालायचे. रोपांची मुळं सशक्त होईपर्यंत, म्हणजे सलग दहा वर्षं त्यांनी हे पाणी द्यायचं काम एखाद्या व्रतानुसार केलं.
हे व्रत सुरू असतानाच पोटापाण्यासाठी शेती सुरूच होती. त्यातून मिळणारा पैसा झाडांभोवती संरक्षक लोखंडी जाळी लावण्यासाठी त्यांनी वापरला. झाडं जोमानं वाढू लागताच दुसर्‍या वर्षापासून त्यांनी झाडांची संख्या वाढवत नेली. आज इतक्या वर्षांनंतर या महामार्गावर भलेथोरले वटवृक्ष उभे आहेत. याशिवाय त्यांनी लावलेली आठ हजार आणखी झाडं आहेत ती वेगळीच. मुलं कुणी मोजतं का, असं म्हणणार्‍या थिमक्का आणि चिक्कय्यानं आपली ही मुलं कधीच मोजली नाहीत; पण त्यांच्या या अभिनव उपक्रमाची चर्चा सर्वदूर होऊ लागताच, शासनानंच एका उपक्रमांतर्गत या झाडांची मोजणी केली. थिमक्का आणि चिक्कय्या यांनी लावलेल्या या वडाच्या झाडांच्या लाकडाची थेट किंमत आज काही कोटी रुपये भरेल, पण त्याशिवाय या वातावरणात वाढलेलं ऑक्सिजनचं प्रमाण, कमी झालेली जमिनीची धूप, भूजल पातळीत झालेली वाढ याचे पर्यावरणाला पूरक फायदे इतके आहेत, की त्याची अप्रत्यक्ष किंमत आणखी काही कोटींमध्ये जाऊन पोहोचेल.
1991 साली चिक्कय्या गेले, थिमक्का एकट्याच राहिल्या. वयाची ऐंशी पार केलेल्या थिमक्का यांना एकटीनं हे काम पुढे नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारनं त्यांनी लावलेली सर्व झाडं जगविण्याचं काम आता आपल्याकडे घेतलं आहे. थिमक्कांनी वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्यानंतर आपलं काम झाडांपुरतंच सीमित न ठेवता पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठी गावाचा हौद बांधण्याकडे वळवलं. 1911 साली जन्मलेल्या थिमक्का आज अवघ्या 113 वर्षांच्या आहेत. सालूमरदा हे थिमक्कांच्या नावामागे लावलं जाणारं विशेषण आहे. कानडी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ एका रांगेत लावलेली झाडं असा आहे.
आयुष्यात कधीही शाळेची पायरी न चढलेल्या थिमक्कांवर कर्नाटक राज्याच्या प्राथमिक शालेय पुस्तकात एक धडा आहे. त्यांच्या कार्यानं प्रेरित होऊन अमेरिकेतील एका संस्थेनं तिचं नाव, ‘थिमक्काजरिसोर्सेस फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन’ असं ठेवलं आहे. थिमक्काना आजवर वनमित्र, वृक्षप्रेमी, वृक्षश्री, निसर्गरत्न अशा अनेक नावांनी बहुमानित करण्यात आलं असलं तरी त्यांच्या कार्याचा खरा गौरव झाला आहे, तो केंद्र सरकारच्या 2019 सालच्या पद्मश्री या बहुमानानं. बीबीसीनं जगभरातील 100 प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत त्यांचा अंतर्भाव केला आहे, तर आठ हजारांपेक्षा अधिक झाडं लावून त्यांचं उत्तम संगोपन केल्याबद्दल राष्ट्रीय नागरी सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे.
वर्षाला सरासरी 15 ते 20 झाडं थिमक्का आणि चिक्कय्यांनी लावली. सलग साठ वर्षं ते दोघं हे काम करत राहिले. घरात अठराविसे दारिद्य्र असतानाही सतत काही तरी पेरणं, निपजणं आणि आकाराला आणणं हेच त्यांनी धन मानलं आणि तीच त्या जोडप्याची दानतही राहिली. मूलबाळ नसल्याच्या दुःखावरचा उतारा म्हणून या जोडप्यानं हा मार्ग स्वीकारला, ज्यानं ते स्वतःच शांतावले असं झालं नाही, तर या महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रत्येकाला ही शांतीची आणि हिरवाईची अनुभूती प्राप्त झाली.
थिमक्का सांगतात, प्रत्येक व्यक्तीनं मानवजातीच्या भल्यासाठी आपल्या पश्चात काही तरी सोडून जायला हवं. स्वतःच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या कारणानं पोकळी निर्माण झाली असेल, तर एखादं झाड लावा, ते वाढवा, जगवा, निसर्गाच्या जवळ जा, पर्यावरणाचं संवर्धन करा. वयाच्या 113 व्या वर्षी थिमक्का या बहुधा जगातल्या सर्वात वृद्ध अशा निसर्गप्रेमी गणल्या जातील. दरमहा मिळणारं तुटपुंजं पेन्शन एवढीच काय ती त्यांची आवकेची बाजू. भौतिक अभिलाषा नसल्यानं त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जीव असेपर्यंत झाडं-निसर्ग-पर्यावरण यासाठी कष्ट उपसत राहणं हेच त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. त्यांना उदंड शुभेच्छा!!
Powered By Sangraha 9.0