श्रीकांत - ‘मी पळून जाऊ शकत नाही, केवळ लढू शकतो.’

विवेक मराठी    05-Aug-2024   
Total Views |
Srikanth (2024) - Movie Reviews
अंध व्यक्तींमध्ये नैराश्याचे (डिप्रेशन) प्रमाण व तीव्रता सामान्य व्यक्तींपेक्षा बर्‍याच अधिक असतात. येथे मात्र उत्साहाचा व इच्छाशक्तीचा मेरुमणी असलेल्या एका अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला दर्शन घडते की, त्याच्याकडे पाहून आपल्यालाच त्याचा हेवा वाटावा! ‘श्रीकांत’सारख्या उत्तम चित्रपटाकडून धडधाकट लोकदेखील प्रेरणा घेऊ शकतील, असे खात्रीपूर्वक म्हणता येते.
 
अंध व्यक्तींच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित होत आले आहेत. मात्र अंध व्यक्तीला चित्रपटात कसे सादर करायचे हे डोळस व्यक्तींनाही अगदी प्रथमपासून समजले आहे असे नाही. कालानुरूप त्यांच्या सादरीकरणातही सुधारणा झाली आहे. ‘जगाच्या पाठीवर’ या अतिशय सुंदर चित्रपटातील अंध व्यक्तिरेखा पाहिल्यावर आज आश्चर्य वाटते, कारण डोळ्यांची सतत उघडझाप केल्याचे दाखवले की, ती अंध व्यक्ती झाली, अशी सहजसाधी समजूत त्या काळात होती. अंध व्यक्तींची भूमिका असलेले चित्रपट सहसा रहस्यमय किंवा विनोदी अशा प्रकारचे असतात. मात्र त्यांच्या जगण्याचा मागोवा घेणारे चित्रपट अपवादानेच आढळतात.
 
 
कोणत्याही प्रकारचे अपंगत्व किंवा व्यंग असलेल्या व्यक्तीची टिंगलटवाळी होणे, हे जगभरात सर्वत्र प्रथमपासूनच प्रचलित आहे. मानवाधिकारांबाबतची जाणीव जसजशी प्रगत होत गेली, तसे त्यात फरक पडत गेला. मात्र अशी जागृती बव्हंशी समाजातील वरच्या थरातच झाल्याचे आढळते. शिवाय मुळातच सहृदयी असलेल्या व्यक्ती यास अपवाद. त्यामुळे अपंगत्वाकडे आजही सर्वसाधारणपणे तुच्छतेने पाहिले जाते. काहीच दिसू न शकण्यामुळे येणारे नैराश्याचे (डिप्रेशन) प्रमाण आणि त्याची तीव्रता सामान्य व्यक्तींमधील प्रमाणापेक्षा बरीच अधिक असते. त्यामुळे शारीरिक क्षमतांवरील मर्यादेबरोबरच मानसिक समस्या हादेखील अंधत्वाशी निगडित समस्यांचा प्रमुख गाभा आहे. अन्य अनेक प्रकारच्या अपंगत्वांच्या तुलनेत अंधत्व हा जगण्यावर सर्वाधिक मर्यादा टाकणारा प्रकार आहे, याबाबत फारसे दुमत व्हायचे नाही असे वाटते.
 
 
‘श्रीकांत’ या चित्रपटामध्ये सत्यकथेवर आधारित शारीरिक मर्यादा आणि मानसिक समस्या या दोन्हींचा विचार करणारी यशोगाथा सांगितली आहे. आंध्रच्या मछलीपट्टणम जिल्ह्यामध्ये गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले मूल अंध असल्याचे लक्षात आल्यावर अपेक्षेप्रमाणे सर्वांवरच आकाश कोसळते. घरात कुत्रे शिरले तरी याला कळणार नाही, याला जगवून काय करणार, असा ‘व्यावहारिक’ प्रश्न शेजारीपाजारी त्याच्या वडिलांना विचारतात. त्याला जगवण्याऐवजी उशीच्या मदतीने त्याला संपवलेले बरे, असा सल्लाही देतात. मात्र आईवडिलांच्या मनात वेगळे असते. त्याच्या वयाच्या आठव्या वर्षीच ते त्याला हैदराबादमधील अंध मुलांसाठीच्या निवासी शाळेत दाखल करतात, कारण ग्रामीण शाळेमध्ये त्याला आवश्यक सोयी मिळणे शक्य नसते. शाळेतील मुलांकडून केली जाणारी टिंगल आणि प्रसंगी छळ या सार्‍याचा सामना त्याला लहानपणापासूनच करावा लागतो. आयुष्यभर असाच संघर्ष करायचा आहे हे त्याला समजू लागते. मात्र हा संघर्ष केवळ सभोवतालच्या व्यक्तींशीच नसून एकूणच व्यवस्थेशी आहे, हे वास्तव त्याला पदोपदी जाणवू लागते. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट आपण अंध असल्याकारणाने नाकारली असेल तर ती मिळवायचीच, असा त्याचा स्वभाव बनतो. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात जाताना अंध विद्यार्थ्याला विज्ञान शाखा निवडता येणार नाही, असा नियम, पुस्तकांची अनुपलब्धता, सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येणार्‍या अडचणी, त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्यासाठीची शिक्षकांची अनिच्छा अशा अडचणींमधून तो जो मार्ग काढत जातो, तो भविष्यामध्ये अन्य अंध विद्यार्थ्यांसाठी पुढील अडचणी सोडवण्यास मदत करणारा ठरणार असतो, कारण वर ज्या असंवेदनशील व्यवस्थेच्या आव्हानांचा उल्लेख केला आहे, त्या व्यवस्थेला आता त्यापैकी किमान काही प्रश्नांची तरी उत्तरे मिळू लागलेली असतात. त्यातही व्यवस्थेची ही आव्हाने दुहेरी असतात. अंध व्यक्तींच्या क्षमतांची कल्पनाच नसल्यामुळे त्यातून त्यांच्या समस्यांबाबत निर्माण होणारी तुच्छतेची भावना आणि काही मदत करावी असे वाटले तरी यापूर्वी तसे घडलेले नसल्यामुळे अपेक्षित बदल नक्की कसा घडवायचा याबाबतचा संभ्रम, अशी ही दुहेरी आव्हाने.
 
Srikanth (2024) - Movie Reviews 
अंध व्यक्तींना डोळ्यांनी दिसत नसले तरी त्यांच्यासाठीच्या शाळांमध्ये चालू असलेला भ्रष्टाचार त्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. शिवाय ही अंध मुले असल्यामुळे त्यांचा आवाज दाबणे सोपे; मनमानी करत त्यांना शाळेतून हाकलून देणे सोपे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जमेल तसे चांगले काम करणारी आणि त्याला समजून घेणारी देविका ही एक विलक्षण शिक्षिका त्याला भेटते. शिक्षणाच्या पलीकडे जाऊन श्रीकांतला त्याच्या पुढच्या वाटचालीत मदत करण्याची तिची तयारी असते. म्हणूनच मग श्रीकांतला अकरावीमध्ये विज्ञान शाखा घेण्यास नकार देणार्‍या महाविद्यालयाविरुद्ध न्यायालयीन लढाई लढण्यात ती पुढाकार घेते आणि त्याला त्या शिक्षणाचा हक्क मिळवून देते. पुढे काही मोजके चांगले मित्र भेटतात. त्यांच्या निर्हेतुक मैत्रीची याला मदत होते. त्याच्या अंध असण्याचा गैरफायदा घेणार्‍यांपासून आणि त्याला त्रास देणार्‍यांपासून आपण पळून जाऊन जाऊन तरी कोठे जाणार, त्यापेक्षा त्यांचा सामना केलेलाच बरा, हे त्याला स्वत:ला अगदी लहानपणी मनोमन कळलेले असते. त्यामुळे ‘मी पळून तर जाऊ शकत नाही, लढू मात्र शकतो’ हे त्याच्या जगण्याचे सूत्र बनते आणि तो या जगासमोर ताठ कण्याने उभा राहू शकतो.
 
 
बारावी पूर्ण करताना व्यवस्थेशी पुन्हा नव्याने लढावे लागणार, या विचाराने तो अस्वस्थ होतो. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस पुन्हा त्याच त्या कारणाने याला प्रवेश नाकारतात. कदाचित पुढे आयआयटीसाठी प्रवेश मिळाला असता, तर देशातील अग्रणी शिक्षणसंस्था असलेल्या आयआयटीने त्याला नाकारले नसते, काही विशिष्ट माध्यमातून त्याच्यासाठी योग्य ती सोय केली गेली असती, अशी आशा बाळगायला हरकत नसती. मात्र गाडे अडले ते आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेचे खास प्रशिक्षण घेण्यावरच. त्यामुळे आयआयटीत शिकणे दूरच राहिले. भारतात अशाच अडचणी येत राहणार, या कल्पनेने तो नाउमेद व्हायला लागतो. त्यामुळे देविका त्याच्या पदवीच्या शिक्षणासाठी म्हणजे थेट बारावीनंतरच त्याच्यासाठी अमेरिकी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि आश्चर्य म्हणजे या प्रयत्नांना यश मिळते. केवळ अंध असल्याचे कारण देत काही तरी करून दाखवण्याची इच्छा असलेल्या या मेहनती व हुशार विद्यार्थ्याला संधी नाकारल्या जाण्याच्या भारतातील सततच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्याला अमेरिकेतील अनेक प्रख्यात विद्यापीठांमध्ये मोफत शिक्षणासाठी प्रवेशाचा देकार मिळतो. यातून आपल्याकडच्या शिक्षणव्यवस्थेबद्दल बरेच काही बोलता येऊ शकते. केवळ श्रीकांतबाबतच नव्हे; तर समाजाच्या विविध थरांतील गुणी विद्यार्थ्यांना पारखून त्यांना गरजेप्रमाणे आवश्यक असे स्वतंत्र प्रशिक्षण देणारी यंत्रणा आपल्याकडे आहे का, या गहन प्रश्नाचे उत्तर आपणच शोधायला हवे.
 श्रीकांत जेव्हा मला देशाचा पहिला दृष्टिहीन राष्ट्रपती बनायचे आहे, असे आत्मविश्वासपूर्ण उत्तर देतो, तेव्हा राष्ट्रपती चांगलेच प्रभावित होतात. आजदेखील आपण आपल्या या इच्छेवर ठाम आहोत, असे श्रीकांत सांगतो.
 
 
शाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम उपस्थित असतात. भविष्यात तुम्हाला काय व्हायचे आहे, असा वरवर साधा वाटणारा प्रश्न ते उपस्थित विद्यार्थ्यांना विचारत असतात. आपल्यात काहीच कमतरता नाही यावर ठाम विश्वास असलेला श्रीकांत जेव्हा मला देशाचा पहिला दृष्टिहीन राष्ट्रपती बनायचे आहे, असे आत्मविश्वासपूर्ण उत्तर देतो, तेव्हा राष्ट्रपती चांगलेच प्रभावित होतात. आजदेखील आपण आपल्या या इच्छेवर ठाम आहोत, असे श्रीकांत सांगतो.
 
 
श्रीकांतची शालेय वर्षे त्याची शिक्षिका देविका मार्गी लावते. भारतात परतल्यावर काही पर्यावरणपूरक प्रकल्प उभे करण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या सुदैवाने त्याला रवि मंथा हा भला गुंतवणूकदार आणि भागीदार भेटतो. श्रीकांतमधला सच्चेपणा ओळखून त्याचे उद्योग उभा करण्याचे स्वप्न तो पूर्ण करतो. त्याच्या ‘बोलांट इंडस्ट्रीज’चे कर्नाटक आणि तेलंगणमध्ये नैसर्गिकरीत्या विघटन होईल अशा रिसायकल्ड पॅकेजिंग उत्पादनाचे चार कारखाने आहेत. विशेष म्हणजे या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी दिव्यांग लोकांना प्राधान्य दिले जाते. अंधांनी फार तर उदबत्त्या वळाव्यात किंवा मेणबत्त्या बनवाव्यात, या समजाला श्रीकांतने निश्चयाने यशस्वीपणे तडा दिला. आता त्याच्या उद्योगामध्ये टाटांचीही भागीदारी आहे. आपल्या आयुष्यावर चित्रपट काढला जाण्यास श्रीकांत नाखूश होता. त्याला त्यासाठी रविनेच तयार केले.
 
 
उद्योग उभा राहिल्यावर श्रीकांत वाहवत जाऊ लागतो. त्यातच त्याच्या अंधत्वाचे भांडवल करू पाहणार्‍या काही व्यक्ती त्याच्या संपर्कात येतात. देविका व रवि असे दोघेही त्याला त्याबाबत सावध करू पाहतात. मात्र अति आत्मविश्वासात हरवलेला श्रीकांत त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र अगदी मोक्याच्या वेळी त्याला त्याच्या या खर्‍या हितचिंतकांचा सावधतेचा इशारा लक्षात येतो व त्याची गाडी पुन्हा मार्गावर येते.
Srikanth (2024) - Movie Reviews
 
श्रीकांतच्या भूमिकेशी राजकुमार राव पूर्णपणे एकरूप झाला आहे. प्रेमकथांचे नेहमीचे दळण दळणे टाळून त्याने केलेली ‘न्यूटन’ या चित्रपटातील भूमिका फार प्रभावी होती. अंध व्यक्तीची लकब त्याने या चित्रपटात अतिशय सुंदर पद्धतीने पकडली आहे. अंध व्यक्तीच्या नसीरुद्दीन शहा यांनी ‘स्पर्श’मध्ये आणि अल पचिनो यांनी ‘सेंट ऑफ ए वुमन’ या चित्रपटांमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांचा आपल्यावर प्रभाव होता. याखेरीज आपण स्वत: श्रीकांतबरोबर बराच वेळ घालवून ही भूमिका साकारण्याबाबत आपल्या ज्या शंका होत्या त्यांचे समाधान करून घेतल्याचे तो सांगतो. अपंगाची व्यक्तिरेखा साकारण्याची ही आपली पहिलीच वेळ असल्यामुळे आणि त्यातही ही चरित्रात्मक भूमिका असल्यामुळे आपल्याला बरेच परिश्रम घ्यावे लागले, असे तो सांगतो. त्याच्या शिक्षिकेच्या भूमिकेतील ज्योतिकाकडे पाहून ती त्याच्या पाठीशी सदैव उभी राहील असाच विश्वास वाटतो. रविची भूमिका करणार्‍या शरद केळकर याची ही कदाचित आजवरची सर्वात महत्त्वाची भूमिका असावी. चित्रपटाचा विषय कळल्यावर त्याने ती केवळ एकशे एक रुपये मानधन घेऊन केल्याचे वाचले.
 
 
श्रीकांतचे जन्मापासूनचे अंधत्व आणि त्यातून येणार्‍या मर्यादांवर त्याने निर्धाराने केलेली मात, हा चित्रपटाचा गाभा आहे. ब्रेल लिपीमधील पुस्तकांमुळे अंध व्यक्तींची मोठी सोय होते हे खरेच; मात्र अनेकदा या लिपीतील पुस्तकांचा आकार फार मोठा बनत असल्यामुळे त्यांच्या निर्मितीवर आणि वापरावर आपोआपच मर्यादा येतात. आता पुस्तके ‘ऐकण्याचे’ तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याचबरोबर अंध व्यक्तींसाठीच्या काळ्या चष्म्यात एक चांगला कॅमेरा व एक प्रोसेसर बसवून त्यात त्या व्यक्तीच्या परिचयाच्या व्यक्तींच्या काहीशे प्रतिमा साठवून ठेवण्याची आणि समोरच्या व्यक्तीचा चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान वापरून त्यापैकी कोणती व्यक्ती आपल्या समोर आहे, याची आगाऊ माहिती अंध व्यक्तीला देण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. याचबरोबर रस्त्यात येणार्‍या अडथळ्यांची माहितीही त्या व्यक्तीला देण्याची सोय त्यात आहे. याचा उपयोग पुस्तके ऐकण्यासाठी आणि समोरचे फलक वाचण्यासाठीदेखील करता येतो. मात्र अशा उपकरणाची सध्याची किंमत सामान्य अंध व्यक्तींना झेपण्यापलीकडची; म्हणजे दोन लाख रुपयांच्या आसपास आहे. अशी उपयोगी उत्पादने सर्वांना परवडतील अशा पद्धतीने बनवण्यात भारतीय उद्योजक पटाईत आहेत. वार्धक्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे ऐकायला कमी येणार्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडतील अशी आणि बॅटरी दीर्घकाळ टिकेल अशी कर्णयंत्रे बनवणे हेदेखील आव्हान सध्या आहे, कारण अशी यंत्रे दोन्ही कानांमध्ये वापरल्यास मेंदूकडे जाणारा संदेश व्यवस्थित सिंक्रोनाइझ होतो, असे तज्ज्ञ सांगतात. या सार्‍यातील व्यावहारिक अडचणींमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबाशी संवाद साधू शकत नाहीत आणि मानसिकदृष्ट्या एकटे पडतात, हा अनुभव घरोघरी आहे. अनेक शारीरिक वैगुण्यांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास एकूणच बराच वाव आहे. स्टार्टअपची, म्हणजे नवउद्योजकांची संस्कृती देशात रुजू पाहात आहे. त्यांच्याकडून या दिशेने पावले उचलली जातील, अशी आशा बाळगण्यास हरकत नसावी. हा चित्रपट श्रीकांत बोल्लाची यशोगाथा असली तरी देशाच्या अनेक भागांमध्ये अंध किंवा अन्य प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना पुरेशा सोयी उपलब्ध होत नाहीत, हे वास्तव आहे. श्रीकांतने तर व्यवस्थेशी झगडून आपला मार्ग शोधला; आता सरकारमधील ‘डोळस’ धोरणकर्त्यांनी समाजातील अशा व अन्य अनेक घटकांना विकासाची फळे नाकारली जाणार नाहीत याची खातरजमा करायला हवी.
 
Srikanth (2024) - Movie Reviews 
अतिशय आवश्यक अशा विषयावरील हा सुंदर चित्रपट असल्यामुळे त्यातील वैगुण्यांमध्ये फार खोलवर जाण्याची गरज नाही. तरीही चित्रपटात मसाला पेरण्याचा झालेला प्रयत्न आणि काही गाळलेले महत्त्वाचे तपशील या गोष्टी खटकतात. चित्रपटात दाखवले असले तरी त्याच्या वडिलांनी त्याला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला नव्हता असे दिसते. उलट आईवडिलांचा आपल्याला जन्मापासून चांगला पाठिंबा होता, असे श्रीकांत स्वत: सांगतो. तो अमेरिकेत असताना त्याची फेसबुक प्रोफाइल भारतातील वीरा स्वाती या मुलीने पाहिली आणि ती त्याच्याकडे आकृष्ट झाली. तेव्हापासून ती त्याच्या संपर्कात राहिली आणि श्रीकांत अमेरिकेतून भारतात परतल्यावर त्या दोघांनी लग्न केले. चित्रपटात या भागाचे कथानक व त्याचे स्वरूप विनाकारण बदलले आहे. शिक्षिका देविका त्याला विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढतानाचे प्रसंग ओढूनताणून रंगवले आहेत. मुळात ही सारी लढाई त्याला न्यायालयात हजर राहावे न लागता त्याच्या वकिलाने लढली. शिवाय ही प्रक्रिया चालू असतानाच त्याला कळले की, चिन्मयानंद मिशनचे हैदराबादमधील चिन्मय विद्यालय अंध विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेला प्रवेश देते. त्याने तेथे प्रवेश घेतला. त्या शाळेने मोकळ्या मनाने त्याचे स्वागत केले. तेथील एकूणच वातावरण आपल्याला सांभाळून घेणारे असल्याचे तो सांगतो. त्याच्या वर्गशिक्षिकेने तर त्याच्या मदतीसाठी विविध स्पर्शाकृती (Tactile Diagrams) बनवण्यातही पुढाकार घेतला. राज्य शिक्षण मंडळ अंध विद्यार्थ्यांबाबत असंवेदनशील असताना याच देशातील कोणी तरी त्याबाबत पुढाकार घेतला; एवढेच नाही तर त्याच्या गरजानुरूप त्याला मदत केली, हा महत्त्वाचा तपशील गाळला गेला आहे. शिवाय राजकुमार राव त्या वयाचा शोभत नसल्यामुळे त्या वयोगटासाठी आणखी एक किशोर अभिनेता निवडायला हवा होता. संगीत हा या चित्रपटाचा फारच कच्चा दुवा आहे.
 
 
चित्रपट भावुकपणात वाहून जाणार नाही याचबरोबर प्रेक्षकांना श्रीकांतबद्दल दया वाटणार नाही याची दक्षता घेत सुमित पुरोहित आणि जगदीप सिधू या लेखकद्वयीने चित्रपटाचे कथानक रचले आहे. तुषार हिरानंदानी यांचे दिग्दर्शन त्यास पूरक आहे.
 
 
वर उल्लेख केल्याप्रमाणे अंध व्यक्तींमध्ये नैराश्याचे (डिप्रेशन) प्रमाण व तीव्रता सामान्य व्यक्तींपेक्षा बर्‍याच अधिक असतात. येथे मात्र उत्साहाचा व इच्छाशक्तीचा मेरुमणी असलेल्या एका अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला दर्शन घडते की, त्याच्याकडे पाहून आपल्यालाच त्याचा हेवा वाटावा! ‘श्रीकांत’सारख्या उत्तम चित्रपटाकडून धडधाकट लोकदेखील प्रेरणा घेऊ शकतील, असे खात्रीपूर्वक म्हणता येते. या चित्रपटावर आधारित एखादा लघुपट चित्रपट केंद्र सरकारच्या ‘स्किल इंडिया’ प्रकल्पाचा ब्रँड अँबॅसेडर बनू शकतो.