@अॅड. प्रसन्न विश्वंभर मालेकर 9881690558
भारतीय मूर्तिशास्त्र हे रूपकात्मक असल्याने मंत्रकोशातल्या निदान खंडाप्रमाणे देवतेच्या प्रत्येक आयुधाचा एक विशेष असा अर्थ असतो. उपासना सगुण रूपात करायची असल्यास देवतादेखील साकार रूपात समोर असणे आवश्यक ठरते आणि म्हणूनच गणेशाचीदेखील अनेक प्रकारची ध्यान वर्णने प्रचलित आहेत.
केवळ हिंदू अथवा वैदिकच नव्हे, तर भारतातील सर्वच उपासना परंपरांमध्ये गणपती या देवतेला अग्रपूजेचा मान दिलेला पाहायला मिळतो.
विघ्ननिवारक अशा गणपतीची अनेक मूर्तिवर्णनं असली तरी प्रत्येक संप्रदायाप्रमाणे त्याची रूपे, आभूषणे, वस्त्र यामध्ये फरक आढळून येतो. भारतीय मूर्तिशास्त्र हे रूपकात्मक असल्याने मंत्रकोशातल्या निदान खंडाप्रमाणे देवतेच्या प्रत्येक आयुधाचा एक विशेष असा अर्थ असतो. त्यामुळे देवतेचे ध्यान हे त्या देवतेच्या मंत्रात्मक स्वरूपाचे प्रत्यक्ष प्रगटीकरण मानले जाते, तर यंत्र हे त्या देवतेच्या स्वरूपाचे आरेखनात्मक स्वरूप मानले जाते. एकूणच देवता मंत्र आणि यंत्र एकरूप मानल्या जातात. त्यामुळे कुठल्याही देवतेची उपासना करताना उपासकाला मंत्राबरोबरच त्या देवतेचे ध्यान माहीत असणे अगत्याचे ठरते, कारण उपासना सगुण रूपात करायची असल्यास देवतादेखील साकार रूपात समोर असणे आवश्यक ठरते आणि म्हणूनच गणेशाचीदेखील अनेक प्रकारची ध्यान वर्णने प्रचलित आहेत.
सगळ्यात आधी गणपती ही सर्व संप्रदायांची देवता मानली जात असल्याने वर म्हटल्याप्रमाणे संप्रदायभेदाने गणपतीची आयुधेदेखील बदलत असतात. शैव संप्रदायामध्ये शिवाप्रमाणे त्रिशूल, परशुधारी गणपती पूजला जातो तसेच वैष्णव संप्रदायामध्ये शंखचक्रधारी गणेशदेखील पूज्य मानला जातो. शाक्त तंत्रामध्ये गणपतीचे स्वतंत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत त्यामध्ये गणेशाचे श्रीयंत्राप्रमाणेच यंत्रावरतीदेखील पूजन केले जाते. श्रीविद्येमधला गणपती हा दशभुज आणि वल्लभागणेश म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसामान्य भक्तांच्या गणेशाचे उपनिषद म्हणून प्रसिद्ध असलेल्या अथर्वशीर्षामध्ये गणेशाच्या मूर्तीचे जे वर्णन येते ते म्हणजे रक्त वर्ण अर्थात लाल रंगाची कांती असणारा, रक्त वस्त्र म्हणजे लाल रंगाची वस्त्रे नेसणारा आणि रक्तगंधानुलेपनम म्हणजे लाल रंगाच्या गंधाचा अर्थात रक्तचंदनाचा लेप लावलेला अशा त्याच्या स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर ‘एकदंतम चतुर्हस्त पाशअंकुश धारीणम्’ म्हणजे एकदंत अर्थात एक दात असणारा, चार हातांचा, चारी हातांमध्ये पाश, अंकुश, रद म्हणजे दात आणि वरद मुद्रा दर्शवणारा अशा स्वरूपाचा गणपती पूज्य मानला आहे. आपल्याकडे वरद मुद्रेऐवजी सर्वत्र मोदक घेतलेला हात पाहायला मिळतो. मोदक हे ब्रह्मरसाचे प्रतीक मानले जाते.
श्रीविद्येमधील वल्लभागणपती या स्वरूपामध्ये गणपती हा ललिता महा त्रिपुरसुंदरीच्या कुमार कामेश्वराकडे पाहण्यातून प्रगट झाला व त्याने भंडासुरप्रेरित विघ्नयंत्राचे निवारण केले, अशी कथा सांगितली जाते.
त्यामुळे त्याचे स्वरूपवर्णन करताना त्याच्या हातामध्ये म्हाळुंग उसाचे धनुष्य, गदा, शंख, चक्र, त्रिशूल, भाताच्या लोंब्या, सोंडेमध्ये रत्नकलश अशा स्वरूपाबरोबरच एक हात मांडीवर बसलेल्या सिद्धिलक्ष्मीच्या कमरेभोवती आलिंगन मुद्रेत दर्शवला जातो. या हातातील उसाच्या धनुष्याबद्दलचा एक उल्लेख चिंचवडकर देव परंपरेतील धरणीधर महाराजांच्या पदात ‘तुझा अपराधी मी खरा आहे ईक्षुचापधरा’ या ओळीत येतो. याचा अर्थ गणरायाच्या हातातील उसाच्या धनुष्याचे प्रतीक हे सर्वमान्य मानले जाते.
गणपतीचे श्रीतत्त्वनिधीप्रमाणे 32 प्रकारचे ध्यानवर्णन सांगितले असून त्यामध्ये बाल गणपती, तरुण गणपती, अरुण गणपती, शक्ती गणपती याच्याबरोबर उच्चिष्ठ गणपती हेदेखील ध्यान सांगितले आहे. उच्च गणपती हा गणेशाच्या वामाचारी तांत्रिक पूजेचा प्रकार असून त्याचे विधिनियम सर्वसामान्य नाहीत. त्यामुळे त्याची पूजा प्रगट रूपात शक्यतो केली जात नाही.
गणपती ही अग्रपूज्य देवता असल्याकारणाने अलीकडे उत्सवाच्या निमित्ताने घडवल्या जाणार्या मूर्तींच्या हातात कारागीर आपापल्या प्रथेप्रमाणे आयुधे देत असतात; पण वास्तविक दात, पाश, अंकुश व मोदक ही मुख्य चार आयुधे. त्यानंतर दात, परशू, पाश आणि मोदक, तर तिसरा क्रम हा दात, अंकुश, परशु, मोदक असादेखील आहे, त्यामुळे दुर्गेप्रमाणेच गणपतीच्या हातातील आयुधांमध्येही प्रचंड असे वैविध्य दिसून येते.
काही ठिकाणी बालगणपतीच्या रूपामध्ये गणेशाच्या हातात विविध फळे असावीत, असेही सांगण्यात आलेले आहे.
गणपती हा आपल्या दृष्टीने एकच वाटत असला तरी गणेशपुराण, मुदगलपुराण यांच्या मतानुसार विष्णूप्रमाणेच गणेशाचेही अनेक अवतार झालेले आहेत. या प्रत्येक अवतारामध्ये त्याचे वाहन, आयुधे निरनिराळी आहेत. चार युगांमध्ये गणेशाचे चार अवतार मानले जातात त्यापैकी कलियुगामध्ये गणेश धूम्रवर्ण रूपाने उत्तीर्ण होतील असे मानले जाते.
भारतातल्या प्रमुख उपासना संप्रदायांपैकी एक असणार्या गणपती संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे भारतात अनेक ठिकाणी प्रचलित असून महाराष्ट्रातील मोरगाव हे भूस्वानंद पीठ मानले जाते. मोरगावमध्ये गणपतीबरोबरच त्याच्या सर्व परिवार देवतांच्याही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये अगदी शमी, मंदार, दूर्वा यांच्याबरोबरच मूषकापर्यंतच्या सर्व देवता आहेत.
मूर्तिशास्त्र हे मागे म्हटल्याप्रमाणे रूपकात्मक आहे. गणपतीचे गजवदन हे त्याच्या विलक्षण स्मृतीचे, मोठे कान हे त्याच्या बहुश्रुतपणाचे, सूक्ष्म दृष्टी हे त्याच्या सूक्ष्म निरीक्षणाचे, सोंड हे त्याच्या द्रष्टेपणाचे, तर लंबोदर हे त्याच्या क्षमाशीलतेचे प्रतीक मानले जाते. हे सर्व धारण करणारा हा गणपती गणेशभक्तांचे सदैव कल्याण करत असतो आणि म्हणूनच त्याला मंगलमूर्ती म्हणूनदेखील ओळखले जाते.
- लेखक मंदिर व मूर्तिशास्त्र अभ्यासक आहेत.