‘शिक्षण विवेक’ तपपूर्ती एका चळवळीची

30 Aug 2024 18:04:09
shikshan vivek
‘शिक्षण विवेक’ ही चळवळ आहे; आज या चळवळीचे एक तप पूर्ण होत आहे. ही चळवळ चांगले बदल रुजवण्याची आहे. या चळवळीने मातृभाषा वापराचा आग्रह, वाचनसंस्कृती, पर्यावरण रक्षणाची चळवळ अंकातून, उपक्रमांमधून आणि स्पर्धांमधून सातत्याने रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेक सकारात्मक बदल घडत आहेत.
9 ऑगस्ट 2012 रोजी ‘शिक्षण विवेक’ मासिक प्रकाशित व्हायला सुरुवात झाली त्याला आता बारा वर्षे पूर्ण झाली. विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यात मैत्रभाव साधण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहून ‘विवेक’ समूहाच्या मूळ तत्त्वांशी सुसंवादी राहत ‘शिक्षण विवेक’ दर महिन्याला हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. अगदी कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांना रमवण्यात, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना विविध माध्यमांतून सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्नही ‘शिक्षण विवेक’च्या माध्यमातून झाला.
 
 
दर वर्षी मुलांच्या अनुषंगाने विषय घेऊन त्या दृष्टीने अंकाची मांडणी करणे आणि ती करत असतानाच विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांना लेखनासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी मुलांच्या अनुषंगाने विषय देणे, चित्र काढण्याला आणि विविध प्रकारचे खेळ तयार करण्याला त्यांना उद्युक्त करणे आणि ते सर्व साहित्य दर महिन्याला अंकात घेणे, असा दर महिन्याच्या अंकाचा प्रवास ठरून गेलेला असला तरी विषय आणि मांडणीतलं वैविध्य राखलं तरच विद्यार्थी अंक वाचतात, हे कळल्यावर मुलांसाठी अधिक आकर्षक तरी अर्थपूर्ण साहित्य देण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण केला जातो. आता तर विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांना लेखनप्रवृत्त करून विचार मांडत नाहीत, तर लेखनाचे विविध प्रकार लीलया हाताळतात. त्यात खूपच वैविध्य असते. फरक ओळखा, मार्ग शोधा, साहसी खेळ, भाषिक खेळ, स्वत:चे विविध विषयांवरचे अनुभव, पुस्तक परीक्षण असं विविध प्रकारांतलं लेखन साहित्य मुलं दर महिन्याला पाठवतात आणि त्यातले वैविध्य तर फारच बोलके असते. ‘शिक्षण विवेक’च्या अंकाची मुखपृष्ठं तर आता मुलांचीच असतात. इतके हे कसलेले चित्रकार ‘शिक्षण विवेक’ला लाभलेले आहेत.
 
 
अंकासोबतच विविध उपक्रम आणि स्पर्धांमधून मुलांना स्वत:तल्या क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने सतत गुंतवून ठेवण्यात, मोबाइलपासून दूर ठेवण्यात आणि स्वत:च्या करीअरच्या दृष्टीने मार्ग शोधण्यात ‘शिक्षण विवेक’ मदत करतो. त्यातूनच ‘आपल्याला अमुक एका दिशेने प्रवास करायला सोपे पडले’ अशी सांगणारी ‘शिक्षण विवेक’ मासिकाच्या वाचकांची एक पिढी तयार झालेली आहे.
 

shikshan vivek 
 
मुलांमध्ये क्षमता विकसित करताना शिक्षक आणि पालक यांचा महत्त्वाचा सहभाग असतो आणि त्यांच्या सहभागातूनच मुलांचा विकास होत असतो, हे मूल्य रुजवून आपण त्यातून अनेक गोष्टी साध्य करू शकू. कुटुंब, शाळा, समाज आणि देश यांच्या विकासात मुलांचा या दृष्टीने झालेला प्रवास अत्यंत महत्त्वाचा असतो, हा विचार रुजवण्यातही या वर्षांत यश आलेले आहे; हे अंक, स्पर्धा आणि उपक्रमांमधले वाढलेले सहभाग स्पष्ट करतात.
 
 
‘स्पर्धा’ हा आजच्या जगाचा कानमंत्र आहे. स्पर्धा असेल तर त्याला उदंड यश मिळतंच मिळतं असा अनुभव असण्याच्या काळात, ‘शिक्षण विवेक’ वर्षभरात साधारण सहा स्पर्धा घेतं. त्यामागचा उद्देशही कौशल्य विकसन हाच असतो. त्या दृष्टीनेच त्याचा प्रचार-प्रसार केला जातो आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळतो. रोख रकमेशिवाय मुलांना त्यांच्या स्पर्धेतून आनंद मिळावा, त्यासाठी तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन मिळावं आणि या स्पर्धांच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर कुटुंबात चर्चा व्हावी आणि परस्परांमध्ये सुसंवाद साधला जावा; तसेच आपल्या पाल्याचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? त्यांच्याबरोबर सलोखा राहावा, एकमेकांच्या कुटुंबांशी परिचय व्हावा आणि सजग वातावरण निर्माण व्हावे, हीदेखील अपेक्षा स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त केली जाते आणि पालकही या सगळ्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद देतात, त्यातून सकारात्मक वातावरण तयार व्हायला मदत होते.
 
 
वाचनसंस्कृती रुजवणे, असलेल्या वाचनसंस्काराला अधिक प्रोत्साहन देणे, आपल्यात अभिवाचन करण्यासाठीचं आवश्यक कौशल्य आहे की नाही हे लक्षात घेणे, त्या दृष्टीने आपल्यातलं अभिवाचनाचं कौशल्य वाढवणे यासाठी गेली तीन वर्षे वर्धापन दिनानिमित्त ‘शिक्षण विवेक’तर्फे काव्य अभिवाचन स्पर्धा आयोजित केली जात आहे. या तीनही वर्षांत या स्पर्धेने सकारात्मक प्रगती केलेली आहे. तीनही वर्षे या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. पहिल्या वर्षी 345 गटांनी नोंदणी आणि सादरीकरणं केली. दुसर्‍या वर्षी 440 गटांनी नोंदणी आणि सादरीकरणं केली. तर या म्हणजे तिसर्‍या वर्षी पुण्यातल्या केंद्रांवर 556 गटांनी नोंदणी करून सादरीकरणं केली. या वर्षी पुण्याबाहेरच्या शाळांनीही उत्साहात प्रतिसाद दिला आणि शालेय स्तरावर काव्य अभिवाचनाची स्पर्धा घेऊन धडाका उडवून दिला. पुण्याबाहेर साधारण शालेय स्तरावरही घेतलेल्या स्पर्धेचा आकडा पावणेदोनशेच्या घरात जाणारा आहे.
 

shikshan vivek 
 
‘या स्पर्धेने वाचनसंस्कृती रुजवायलाच नाही तर तिचा विकास करायलाही हातभार लावला’ असा अभिप्राय पालक आनंदाने देतात. ग्रंथालयातून पुस्तकांची मागणी होते, स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेल्या विषयांची सादरीकरणे पालक घरगुती, सोसायटीच्या कार्यक्रमात ठेवतात आणि ‘शिक्षण विवेक’ला कळवतात, तेव्हा या स्पर्धेने वाचनसंस्कृती जोपासण्याच्या या चळवळीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा आनंद होतो. या वर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने कुटुंबाने आपापल्या गटात सादरीकरणं करून बक्षीस मिळवल्याचा अनुभवही घेता आला. त्या वेळी या पालकांनी दिलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या होत्या. ‘या वेळी आम्ही तिघांनी भाग घेतला आणि गेला महिनाभर आम्ही फक्त ‘कविता’ या विषयावरच बोलत होतो. त्यामुळे आमचा वेळ मजेत गेला आणि आम्हाला कविता एवढी आवडते हेही कळलं.’ ही प्रतिक्रिया ‘शिक्षण विवेक’च्या एकूणच चळवळीला पुढे नेण्यासाठी साहाय्यभूत ठरेल अशी खात्री आहे.
 
 
‘शिक्षण विवेक’ आयोजित स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये अंध, मूकबधिर मुलांनी सहभागी होणं आणि त्यांनी आत्मविश्वासाने सादरीकरणं करणं हाही एक महत्त्वाचा भाग वाटतो. एकीकडे दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणताना त्यांच्यासाठी सगळ्या वेगळ्या व्यवस्था निर्माण केल्या जातात आणि तुम्ही वेगळे आहात, हे नकळतपणे त्यांना सांगितलं जातं; पण या स्पर्धांमध्ये दिव्यांग व्यक्तींना वेगळं न काढता सगळ्या मुलांबरोबर एकत्र स्पर्धेत सहभाग नोंदवायला सांगितला जातो आणि त्या मुलांनाही ही गोष्ट फार आनंदाची असते. त्यांच्या शिक्षकांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रियाही अत्यंत महत्त्वाच्या असतात. ‘आमच्या मुलांना व्यासपीठ मिळावं यासाठी आम्हाला इथे काहीही धडपड करावी लागत नाही. दिव्यांग मुलांना तुम्ही सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागवता हे शिक्षक म्हणून आम्हाला आनंददायी असतं,’ हे शिक्षक आवर्जून सांगतात.
 

shikshan vivek 
 
खरं तर ‘शिक्षण विवेक’च्या स्पर्धा या विद्यार्थी-शिक्षक आणि पालक यांच्यासाठी असतात. ‘पपेट सादरीकरण’, ‘नाट्यछटा’, ‘सांगू का गोष्ट?’, ‘कथाकथन’ या स्पर्धेत तर पालक स्वत: लेखक होतात, उत्तम उत्तम गोष्टी लिहितात, विद्यार्थी ते सादर करतात. पालकांची सादरीकरणंही अतिशय उत्तम असतात. विविध साहित्य प्रकारच्या लेखन स्पर्धेने उत्तम गोष्टी लिहिणारे लेखक जसे तयार झाले, तशीच उत्तम सादरीकरणं करणारी मुलंही तयार झालेली आहेत.
 
 
अंकासाठी लिहिताना, स्पर्धेसाठी तयारी करताना विषय निवडणे, त्याबद्दलचा विचार करणे, स्वत: सगळी तयारी करणे आणि त्यातून उन्नत होत राहणे, आपल्याला अमुक एक गोष्ट आवडते आणि ती आवडत असताना आपल्याला प्रयत्न आणि मेहनत करावी लागणे, असा एक विचार यानिमित्ताने मुलांच्या मनावर ठसत राहतो. गेल्या बारा वर्षांतला मुलांच्या लेखनात झालेले बदलही लक्षात येत राहतात.
 
 
‘शिक्षण विवेक’ ही चळवळ आहे; चांगले बदल रुजवण्याची चळवळ. या चळवळीने मातृभाषा वापराचा आग्रह, वाचनसंस्कृती, पर्यावरण रक्षणाची चळवळ अंकातून, उपक्रमांमधून आणि स्पर्धांमधून सातत्याने रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेक सकारात्मक बदल घडत असल्याचा विचार वाचकांनीही बोलून दाखवला. अशी चळवळ अधिक बहरण्यासाठी, या चळवळीसाठी ती अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आपल्या वाचकांची एक पिढी तयार होते आहे. ही पिढी तयार होत असतानाच या चळवळीचे आधारस्तंभही हीच पुढची पिढी असेल अशी खात्रीही आहे. त्यात सगळे संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, विद्यार्थी-शिक्षक आणि पालक अत्यंत सकारात्मक योगदान देत आहेत, ही आनंदाची बाब आहे.
Powered By Sangraha 9.0