सनदी सेवा उत्तीर्ण होणारी भारतातील पहिली महिला
(17 जुलै 1927-17 सप्टेंबर 2018)
अॅना राजम मल्होत्रा यांनी 1951 मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशाच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी बनून इतिहासात आपले नाव नोंदवले. सनदी सेवेचं क्षेत्र महिलांसाठी नाही, त्यामुळे लग्नानंतर तुम्हाला नागरी सेवेत ठेवू शकणार नाही, असं तिला नुसतंच सांगण्यात आलं नाही, तर तिच्या नियुक्तिपत्रातही तसा उल्लेख करण्यात आला. पण ती खमकी होती, तिनं त्या नियमाला आव्हान दिलं, ती लढली आणि जिंकली.
ती ख्रिश्चन, तो पंजाबी हिंदू, दोघंही आपापल्या क्षेत्रात अत्युच्च स्थानी. ती सनदी सेवेत रुजू झालेली पहिली भारतीय स्त्री आणि न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू संगणकीय बंदराची निर्माती, तर ते 1985 ते 1990 अशी पाच वर्षे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळलेले सनदी अधिकारी. दोघंही आपल्या देदीप्यमान कारकीर्दीमुळं पद्मभूषण सन्मानानं गौरवले गेलेले. दोघंही सनदी सेवेच्या एकाच तुकडीतले. दोघंही दीर्घकाळ एकमेकांच्या प्रेमात; पण आपल्या आंतरधर्मीय लग्नाचे पडसाद समाजात कसे उमटतील या चिंतेत आणि त्यामुळेच प्रेमात पडूनही पंचवीस वर्षं लग्नाची वाच्यताही न करता स्वतंत्र राहिलेले. त्यांचा जन्म 1926 सालचा आणि तिचा 1927 सालचा. त्यामुळे येती दोन वर्षं ही उभयतांच्या जन्मशताब्दी वर्षाची.
तिचं नाव अॅना राजम मल्होत्रा तर ते राम नारायण मल्होत्रा. ती दक्षिणेतली, तर ते उत्तर भारतातले. तिचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातला. तिघे भाऊ आणि दोघी बहिणी असं त्यांचं आई-वडिलांव्यतिरिक्तचं पंचकोनी कुटुंब. कोझिकोडेच्या मलबार ख्रिश्चन विद्यापीठामधून पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ती चेन्नई विद्यापीठात दाखल झाली आणि इंग्रजी विषयात पदव्युतर पदवी प्राप्त केल्यानंतर तिनं नागरी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निश्चय मनाशी केला. पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी 1951 साली ती नागरी सेवा परीक्षा उत्तीर्णदेखील झाली.
सनदी सेवेत रुजू होणारी अॅना ही पहिलीच महिला होती. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कायदा-सुव्यवस्था राखण्याची अवघड जबाबदारी ती एकटी महिला कशी सांभाळू शकेल, या प्रश्नानंच तत्कालीन व्यवस्थेनं तिला सेवा स्वीकारण्यापासून परावृत्त करण्याचे भरपूर प्रयत्न केले. भारताचे माजी गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी हे तेव्हा तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते. नोकरीत असेपर्यंत तुला लग्न करता येणार नाही, अशी अट त्यांनी तिला घातली, सनदी सेवेचं क्षेत्र महिलांसाठी नाही, त्यामुळे लग्नानंतर तुम्हाला नागरी सेवेत ठेवू शकणार नाही, असं तिला नुसतंच सांगण्यात आलं नाही, तर तिच्या नियुक्तिपत्रातही तसा उल्लेख करण्यात आला.
पण ती खमकी होती, तिनं त्या नियमाला आव्हान दिलं, ती लढली आणि जिंकली. तिनं राजगोपालाचारी यांच्याशी वाद घातला आणि संधी तर देऊन बघा, असं विनवत सर्व प्रकारच्या शारीरिक चाचण्यांना सामोरं जायची तयारी दर्शवली. घोडेस्वारी, रायफल आणि पिस्तूल शूटिंग तिनं आत्मसात केलंच; परंतु निवड समितीनं विदेश सेवेत किंवा केंद्रीय सेवेत रुजू व्हा, असं सांगितल्यानंतरही ते न जुमानता तिनं प्रशासकीय सेवेतच राहण्याचा निश्चय कायम ठेवला.
सनदी सेवेत रुजू झाल्यानंतर दोन पंतप्रधान आणि सात मुख्यमंत्र्यांबरोबर तिनं काम केलं. 1982 च्या दिल्लीत भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची ती प्रभारी होती. तेव्हाच्या मद्रास आणि मैसूर राज्यांच्या सीमेलगत असलेल्या होसूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून ती रुजू झाली. पुढे आयुष्यभर तिनं पुरुष सहकार्यांसोबतच काम केलं. ती होसूरमध्ये रुजू झाली तेव्हा तिथे वीजदेखील पोहोचलेली नव्हती. तिनं तिथल्या नागरिकांची समस्या वेगळ्या पद्धतीनं मांडायचा पवित्रा धारण केला. होसूरच्या नागरिकांना मद्रास राज्यात राहावं असं वाटत असेल आणि तशी सरकारचीही इच्छा असेल तर त्यांना वीज दिली पाहिजे, असा आग्रह तिनं धरला आणि तो मान्य झाला.
तस्करांच्या टोळीशी दोन हात करण्याची जबाबदारी होसूरमध्ये असतानाच अॅनावर सोपवण्यात आली. अॅनाही मोठी धाडसाची, ती चालकाला आणि एका सहकार्याला बरोबर घेऊन एकटीच गेली. साधं खरचटूही न देता तिनं त्या तस्करांना पकडलं. एका महिलेनं असं धाडस करावं याचं तिच्या वरिष्ठाला भय वाटलं आणि त्यानं तिला स्व-संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देऊ केलं. होसूरमधल्या एका खेड्यात घुसणार्या सहा बेभान जंगली हत्तींना आवरण्याची जबाबदारीही तिच्यावर आली आणि अतिशय ‘शांत’चित्त राहून एकाही हत्तीवर गोळी झाडण्याची वेळ येऊ न देता तिनं तो प्रश्न हाताळला.
ग्रेस ही तिची धाकटी बहीण. ती आता अमेरिकेतच असते; पण ती दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत भारतात येत असे आणि कोचीमध्ये दोघी एका बंगल्यात राहत असत. तिनं सांगितलेला एक किस्सा सामान्य नोकरांविषयी अॅनाला वाटणारी कणव दर्शवणारा आहे. कोचीला तिच्या घरी झाडलोट करण्यासाठी एक स्त्री येत असे. तिला हे काम पोटासाठी करावं लागत होतं; परंतु ती मॅथेमॅटिक्स घेऊन बीएस्सी झालेली होती आणि तिनं राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. यशस्वी उमेदवारांमध्ये तिचं नावही होतं; पण तिला नोकरीची संधी मिळत नव्हती. अॅनानं वरिष्ठांकडे तिचा प्रश्न लावून धरला, तेवढ्यात निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच थांबलं; पण जून 2016 मध्ये त्या महिलेला नोकरी मिळाली आणि अॅनाचे प्रयत्न सफल झाले.
निवृत्तीनंतर काही काळ लीला व्हेन्चर लिमिटेड या हॉटेल व्यवसायातील कंपनीशी ती संचालक या नात्याने संबंधित होती. कृष्णन नायर हे त्या व्यवसायाचे संस्थापक. राम नारायण मल्होत्रा गेल्यानंतर कृष्णन नायरच तिची काळजी घेत. ते गेल्यानंतरही त्यांची पत्नी आणि तिच्यानंतर त्यांची मुलं अॅनाची देखभाल करत. अॅना गेल्यानंतर ग्रेस भारतात पोहोचायला पाच दिवस लागणार होते. इतका काळ आपल्याला शवपेटीत ठेवू नये, अशी सक्त ताकीद अॅनानं देऊन ठेवली होती, त्यामुळे अॅनाचा मदतनीस सुजत दामोदर यानं तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या अस्थींचं रामेश्वरमध्ये रीतसर विसर्जनही केलं.
राम नारायण एक वर्षानं मोठे, अॅना केंद्र सरकारात सचिव, तर राम नारायण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, परंतु पद्मभूषण मिळालं अॅनाला आधी 1989 साली आणि राम नारायण यांना एक वर्ष नंतर 1990 साली..