हरियाणाचे रण - कोण जिंकणार...

विवेक मराठी    24-Aug-2024
Total Views |
election commission of india
सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हरियाणामध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. यंदाही राज्यात मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात असले, तरी या वेळी निवडणुकीत छोट्या पक्षांची भूमिका फार महत्त्वाची आहे.
आरएलडी, आप, बसपा, सपा, जेजेपी काँग्रेसचा सुपडा साफ करणार... अथवा... एचसीएल (हुड्डा, छिल्लर, लठवाल) फॉर्म्युला भाजपाला पराभूत करणार...
 
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हरियाणामध्ये राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. यंदाही राज्यात मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये असल्याचे मानले जात असले, तरी या वेळी निवडणुकीत छोट्या पक्षांची भूमिका फार महत्त्वाची आहे.
 
हरियाणात काय होणार?
 
हरियाणामध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. मात्र, हा मार्ग खडतर आहे. 2014 मध्ये भाजपाने पूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन केले. 2019 मध्ये भाजपाचे थोडक्यात बहुमत हुकले. त्यामुळे ’जेजेपी’सोबत युती करून सरकार स्थापन करावे लागले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच जेजेपी-भाजपा युती तुटली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा 10 वरून 5 वर आल्या. नुसत्या जागाच कमी झाल्या नाही, तर भाजपाची मतांची टक्केवारी 53 टक्क्यांवरून 46 टक्क्यांवर आली, तर काँग्रेसची मतांची टक्केवारी 29 टक्क्यांवरून 43 टक्क्यांवर गेली. जननायक पार्टी आणि लोकदल हे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांच्या कुटुंबातील पक्ष आहेत. यामुळे जाट मतदारांचा या दोन्ही पक्षांकडे कल अधिक आहे.
 
 
भाजपाचे सोशल इंजिनीअरिंग
 
हरियाणामध्ये सुमारे 22% मतदार हे जाट समाजाचे आहेत. या मतांचे अधिकाधिक विभाजन व्हावे, असा भाजपाचा प्रयत्न असेल, कारण लोकसभा निवडणुकीत शेतकर्‍यांनी भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. शेतकरी वर्ग हा प्रामुख्याने जाट समाजाचा आहे. जाट आंदोलन, शेतकरी वर्गातील नाराजी, लष्करातील अग्निवीर योजनेमुळे निर्माण झालेला असंतोष भाजपाला त्रासदायक ठरला होता. जाट, दलित आणि मुस्लीम समाज काँग्रेसच्या बाजूने एकवटलेला बघायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहिल्यास भाजपाला सत्ता कायम राखण्यात अडचण येऊ शकते. असे असले तरी गुरुग्रामजवळील नूह परिसरात बृज मंडल जलाभिषेक यात्रेदरम्यान धर्मांध, जिहादी मुस्लीम तरुणांच्या टोळक्याने केलेली दगडफेक, बेबंद हिंसाचार, जाळपोळ यामुळे हिंदू मतदार कमालीचा जागरूक झाला आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाने हरियाणात आपली रणनीती बदलली आहे. भाजपाने प्रत्येक समाजाला सामावून घेण्यासाठी काही बदल केले आहेत. भाजपाने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या जागी ओबीसी असलेले नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी ब्राह्मण चेहरा मोहनलाल बडोली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रभारी सतीश पुनिया हे जाट समाजातील आहेत.
 
 
काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी
 
हरियाणातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भूपेंद्र सिंग हुड्डा हे केंद्रस्थानी आहेत. त्याशिवाय, कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला हे नेतेदेखील मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. मात्र, पक्षात दोन गट पडले आहेत. एक गट भूपेंद्र हुड्डा व दीपेंद्र हुड्डा यांचा आहे आणि दुसरा गट कुमारी सेलजा आणि सुरजेवाला यांचा आहे. अलीकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत ही दुफळी दिसून आली.
 
 
कुमारी सेलजा यांनी थेट प्रदेशाध्यक्ष उदयभान यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला. सभेत एकाच गटाच्या लोकांना बोलावून प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला. सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना मध्यस्थी करावी लागली. त्याच वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ’हरियाणा मांगे हिसाब’ या नावाने पदयात्रा काढत आहेत; परंतु यामध्ये कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला सहभागी झाले नाहीत. त्यांनी आपापले वेगळे मोर्चे काढले. राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना हा वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे.
 
 
दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे सहावे जावई चिरंजीव राव यांनी उपमुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकला आहे. अद्याप तिकीट जाहीर झालेले नसताना हा अजब दावा करण्यात आला आहे. अति-आत्मविश्वास काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.
 
आम आदमी स्वबळावर
 
आम आदमी पार्टीने 2024 ची लोकसभा निवडणूक इंडिया आघाडीसोबत लढवली. काँग्रेसला यश मिळाले; परंतु आम आदमी पार्टी मात्र भोपळा फोडू शकली नाही. ’आप’ने आता या वेळी राज्यातील सर्व 90 जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. हरियाणात ’आप’ला पक्ष मजबूत आहे आणि भाजपा सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी भावना आहे, असा ’आप’चा गोड गैरसमज आहे.
 
 
जाट कुठे जाणार
 
जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे जाट समाजातील प्रमुख चेहरा आहेत. गेल्या विधानसभेपूर्वीच दुष्यंत चौटाला यांनी आपल्या कौटुंबिक पक्ष ’इंडियन नॅशनल लोकदला’तून बाहेर पडून स्वतःचा पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) स्थापन केला होता. 2019 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 10 जागा जिंकून जेजेपी ’किंगमेकर’ म्हणून उदयास आला आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. मार्च 2024 मध्ये भाजपाने सुमारे साडेचार वर्षांनी ’जेजेपी’सोबतची युती तोडली. या वेळी जेजेपी विधानसभा निवडणुकीत कोणासोबत युती करणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
 
 
आयएनएलडी + बसपा
 
 
भाजपा आणि काँग्रेसव्यतिरिक्त ’आयएनएलडी’ हा हरियाणातील प्रादेशिक पक्ष आहे, ज्याकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याची ताकद आहे. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या नेतृत्वाखाली ’आयएनएलडी’ला ग्रामीण भागात मजबूत प्राबल्य आहे. ’आयएनएलडी’ने मायावतींच्या बसपासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. ही युती भाजपा आणि काँग्रेसला पर्याय म्हणून तिसरी आघाडी तयार करत आहे. राज्यात इंडियन नॅशनल लोकदल 53, तर बसपा 37 जागांवर निवडणूक लढवणार आहे. हरियाणातील काही भागांत बसपाला दलित मतदारांचे भक्कम मताधिक्य आहे, तर काही भागांत आयएनएलडीला जाट समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ही युती काँग्रेस आणि भाजपापुढे कडवे आव्हान उभे करणार यात तिळमात्र शंका नाही.
 
 
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतही तिरंगी-चौरंगी लढती झाल्या असल्या तरी खरी लढत ही भाजपा आणि काँग्रेसमध्येच झाली होती. विधानसभेचे गणित वेगळे असते. यामुळे तिरंगी लढतीचा कोणाला फायदा होतो हेसुद्धा महत्त्वाचे असेल. आम आदमी पक्षाच्या (आप) प्रवेशाने राजकीय समीकरण बदलू शकते. याशिवाय, दुष्यंत चौटाला यांचा ’जननायक जनता पार्टी’ (जेजेपी), अभय सिंह चौटाला यांचा ’इंडियन नॅशनल लोकदल’ (आयएनएलडी), गोपाल कांडा यांची ’हरियाणा लोकहित पार्टी’ (एचएलपी), मायावतींची बहुजन समाज पार्टी (बसप), हे कमी वाटावे की काय म्हणून अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीनेदेखील मुस्लीम-यादवबहुल उत्तर प्रदेशला लागून असलेल्या पूर्व हरियाणातील 20 जागा लढवण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष भाजपा आणि काँग्रेसला घाम फोडणार हे निश्चित.
 
 
हरियाणातील एकूणच राजकीय हाणामारी बघता, भाजपाप्रणीत युती निसटते का होईना पण बहुमत मिळवेल, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे.
 
- पूनम पवार