बापूराव कुलकर्णी 9423508979
‘सा. विवेक’ आणि ‘एकता’ मासिकाचे ज्येष्ठ प्रतिनिधी चंद्रशेखर तथा चंदू ओक यांचे दि. 11 जुलै 2024 रोजी पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाची 75 वर्षे त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. ते रा. स्व. संघात गेली 60 वर्षे कार्यरत होते. संघाचा स्वयंसेवक कसा असावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला. ते अत्यंत शांत, संयमी आणि सतत कार्यमग्न असत. संघाचे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले, अनेकांना मदत केली; पण कुठेही त्याचा गर्व त्यांच्या वागण्यात नव्हता. ‘सा. विवेक’ आणि ‘एकता’ मासिक यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत संपर्क साधत काम केले. त्यांच्या कार्याविषयीच्या काही आठवणी लेखरूपात देत आहोत.
पूर्व भागात रममाण झालेला अत्यंत तळमळीचा ज्येष्ठ कार्यकर्ता.’
वरील प्रत्येक शब्द कै. चंदू ओकला पुरेपूर लागू आहे. संघकार्यात न कंटाळलेला चंदू ओक होता. पूर्व भागात अनेक स्वयंसेवक संघकामासाठी आले, स्थिरावले. काही वर्षे संघकार्य केले आणि परत आपापल्या परिसरांत परतले, अशी अनेक नावे माझ्या समोर आहेत. मात्र चंदू ओक तब्येत नीट असेपर्यंत याच परिसरात ठिय्या मांडून बसला होता आणि संघकार्य करीत होता.
माझा आणि चंदू ओकचा संबंध 1977 साली आला. मीही पूर्व भागातच म्हणजे पुण्यातील रास्ता पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठेतच संघाचे काम करत होतो. आणीबाणी उठल्यानंतर मला नाना, भवानी, गणेश पेठेत म्हणजे नगर क्रमांक नऊमध्ये काम करावयास शहर कार्यवाहांनी सांगितले. 1977 च्या आधीपासूनच चंदू या परिसरात संघाची मार्कंडेय शाखा चालवायचा. सदाशिव पेठेतून-शिवाजी मंदिर शाखेतून त्याला या परिसरात संघाच्या कामासाठी पाठवले होते आणि तेसुद्धा वयाच्या 17-18 वर्षांचे असताना. त्या वेळेपासून या अत्यंत खडतर भागात न कंटाळता हा तळमळीचा कार्यकर्ता संघकार्यासाठी घट्ट पाय रोवून उभा होता.
संघकार्याला पुण्याच्या पूर्व भागात मुळातच विरोध होता. ’बामणांचा संघ’, ’गांधीवध करणारा संघ’ अशा शेलक्या शब्दांत हिणवले जात असे; परंतु चंदू कधी डगमगला नाही आणि शाखा चालवायचे ईप्सित कार्य चंदूने कधी सोडलेही नाही. सध्याची जी तरुण पिढी या परिसरात संघकार्यात कार्यरत आहे, ते सर्व त्या वेळेचे बाल, शिशू स्वयंसेवक आहेत. काही जण साठाव्या वर्षात पदार्पण करत आहेत.
या परिसरात एक त्रिमूर्ती कार्यरत होती. त्यात कै. रमेश बोंद्रे हे प्रभात शाखा चालवायचे. बोंद्रे यांना मदतीला भाऊ, बापू पाटणकर, बंडोपंत अनासपुरे अधूनमधून येत असत; परंतु नगर कार्यवाह या नात्याने कै. रमेश बोंद्रे प्रमुख असत. ते नारायण पेठेतून येत असत.
चंदू ओक आणि विजय इट्टम हे सायंशाखा चालवायचे. तेथील लोकांची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. हा परिसर विडी कामगार वस्तीचा म्हणून ओळखला जातो. एका खोलीतला संसार, संसारही तुलनेने मोठा; परंतु पालक असलेला हा वर्ग संघाशी जोडलेला होता. बरेच जण प्रभात शाखेत येत असत. म्हणूनच तळजाईच्या प्रांताच्या शिबिराला 155 तरुण उपस्थित होते. अनेक जण कापड दुकानात लक्ष्मी रोडला कामाला होते. अनेक जण छोटे छोटे व्यवसाय करत होते. तरीही तीन दिवस वेळ काढून शिबिराला आले होते.
असाच एक बालांचा कार्यक्रम रास्ता, सोमवार, मंगळवारच्या नगर 10 च्या साहाय्याने 650 बालांच्या गणवेशातील उपस्थितीत नाना पेठेतील अहिल्याश्रमात (महात्मा फुले हायस्कूल) बाल दिनाच्या दिवशी पार पडला. नाटककार बाल साहित्यिक कै. भालबा केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कै. बाबाराव भिडे, कै. दादा किराड आणि ग्राहक पंचायतीचे अखिल भारतीय प्रमुख असलेले कै. बिंदुमाधव जोशी गणवेशात उपस्थित होते. कै. बिंदुमाधव जोशी 1953 ते 1956 पर्यंतच्या काळात कसबा पेठेतून संघकामासाठी येत असत.
हा सर्व बाल मेळावा गुणात्मक, संघटनात्मक, प्रात्यक्षिकात्मक आणि व्यवस्थात्मक यशस्वी झाला. कै. माननीय बाबाराव भिडे यांनी कार्यकर्त्यांची पाठ थोपटली. कै. बाबांकडूनच आम्हा कार्यकर्त्यांना असे ऐकताना स्फुरण चढत असे आणि आनंद गगनात मावेनासा होत असे.
आजही 2 डिसेंबर 1979 चा या बालमेळाव्याचा रविवार आम्ही विसरू शकत नाही. कारणही तसेच होते. याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाच्या मुख्य शिक्षकापासून ते वक्ते, वैयक्तिक परिचय, सांघिक पद्य, आभार सगळेच बालकांनी केले होते. याचा बाल साहित्यिक मा. केळकर यांनाही विलक्षण आनंद झाला होता. त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे पूर्ण शहरभर कार्यक्रमाची चर्चा झाली.
“गेली 40 वर्षे मधुमेहासारख्या व्याधीने व्याधिग्रस्त असतानाही आपल्या नित्य कामात, संपर्कात, स्वयंसेवक घडवण्यात त्याने कधी कंटाळा केला नाही. असे कार्यकर्ते उभे करणे हेच संघाचे यश आहे. असा हा कष्टाळू, निष्ठावान, तळमळीचा कार्यकर्ता पुन्हा उभा करणे हे आताच्या पिढीचे काम आहे आणि तीच त्याला खरी श्रद्धांजली असे म्हणता येईल. ”
संघाला आधाराचे असे दादा किराड यांचे एकमेव घर विडी कामगारांची वस्ती या परिसरात होती आणि प्रत्येकाच्या घरात बाल स्वयंसेवक होते. तरुणांची मार्कंडेय प्रभात शाखा आणि बाल-शिशूंची सायं शाखा येथे चालत असे. हीच शाखा चालवण्यासाठी विजय इट्टम यांच्याबरोबर चंदू ओक दंड घेऊन सायकलवर येत असे. आपल्याला संघाची शाखा चालवण्यास येथे पाठवले आहे याची पुरेपूर जाणीव त्याला होती. त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागेल याची कल्पनाही त्याला होती. त्यामुळे वेळीअवेळी तो या परिसरात येत असे. दोघे घरोघरी जात असत. आज जे 45 ते 60 वर्षांचे तरुण संघ स्वयंसेवक आहेत, हे त्या वेळचे बाल स्वयंसेवक होते. एका शाखेतून नऊ शाखा चंद्रशेखर ओक, विजय इट्टम आणि चंद्रशेखर कुलकर्णी (वकील आणि सध्याचे मा. संघचालक पर्वती भाग) या कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. संघाच्या नित्य कामातून, जबाबदारीतून त्यांना (चंदू ओक) मोकळे केले तरीही त्यांनी या परिसराशी आपला संपर्क कायम ठेवला. विडी कामगारांना बचतीची सवय लागावी म्हणून त्याने पोस्टाची बचत खाती उघडून दिली. ही 250 खातीच त्याच्या कामाची साक्ष देतात. चंदू उत्तम मराठी व इंग्रजी टायपिंग करत असे. संघाच्या कार्यक्रमाची निमंत्रणे, पुणे शहराचे संघाचे मराठी टायपिंग तो वेळ काढून करत असे.
तसेच चंदू ओक गणेश पेठ, नाना, भवानी पेठ येथे गणेश नगर किंवा नगर क्र. 9 मध्ये नगर कार्यवाह म्हणून काम करत होता. विजय इट्टम हे काही काळानंतर नगर सहकार्यवाह म्हणून आले. घराघरांत त्यांचे संबंध होते. अग्निहोत्री, अनिल गोटे, संजय बोडके, शंभू दंडगे, उतम कारमपुरी, विजय इट्टम, बंकटलालजी मुंदडा, राजेंद्रजी लुंकड, देवय्या काचर्ला, पासकंठी बंधू, राजू गांधी, शंकर अनमल, चनमल, बबलू आहेप, सुरेश मददैल, भारत चील्का, दशरथ यन्नम, अरुण मुदिगोंडा, गंगाधर कौडा, माधव उर्डी, ओम पद्मा, राजू जाधव, विलास गीते अशा अनेक घरांमध्ये त्यांची चांगली ओळख होती. चंद्रशेखर कुलकर्णी याची विस्तारक म्हणून या घरात सहजपणे जेवणाची सोय त्यांनी करून दिली. या सर्व घरांत काहींची परिस्थिती बेताचीच होती तरीही घासातील घास काढून जेवणाची व्यवस्था या घरांमध्ये होत होती आणि यामागे चंदू ओकचे त्या घराशी असलेले अनेक वर्षांचे प्रेमाचे, स्नेहाचे संबंध कारणीभूत होते. चंद्रशेखर कुलकर्णी त्याच्या घरी सदाशिव पेठ येथेदेखील जेवायला जात असे. चंदूची मुले सुहास व सुधीर तेव्हा लहान होती. त्यांना खेळवण्याचे काम वहिनींचा स्वयंपाक होईपर्यंत चंद्रशेखर कुलकर्णी करीत असे. या गणेशनगरातील सर्व कार्यकर्त्यांच्या घरी त्याचा परिचय करून देण्याचे काम चंदूने केले. अत्यंत सहजपणे संघाचे काम करण्याची हातोटी त्याच्याजवळ होती. तो उत्तम वक्ता होता असे नाही; परंतु सहज गप्पागोष्टी करणे, घरातील सर्वांची चौकशी करणे, हे त्याचे काम होते.
त्या काळात पूर्व भागात संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याने आणि मुस्लीम वस्ती असल्याने काहीशी दहशत होती, कार्यकर्ते उभे राहत नव्हते. अशी कोंडी झालेली असताना चंद्रशेखर कुलकर्णी याला चंदूबरोबर काम करण्यास सांगितले गेले. रोज सकाळ-संध्याकाळ वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रम व बैठका असतील अशा वेळी सायकलवरून तो नगरात गल्लीबोळांमध्ये फिरत असे. घराघरांमध्ये जाऊन संपर्क करीत असे.
संघाच्या कामाची यशस्वी कार्यपद्धती म्हणजे चंदू ओक याचे जीवन होय. अत्यंत शांत स्वभावाचा व प्रकृतीचा चंदू अनेक वर्षे गणेश नगरमध्ये काम करत होता. आज या भागातील अनेक कार्यकर्ते प्रांत स्तरावर, भाग स्तरावर, महानगर स्तरावर त्याच्या त्या काळी केलेल्या कामामुळे उभे राहिलेले आहेत. कोणतीही प्रसिद्धी नाही, सत्कार नाहीत, मोठ्या पदावर नियुक्ती नाही; परंतु त्यांनी जो जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे त्यावर अनेक कार्यकर्ते तयार होत राहतील.
अनेक वर्षे प्रतिकूल वातावरणात चंदू चिवटपणे सतत काम करीत होता. नंतर तो अनेक वर्षे ‘साप्ताहिक विवेक’, ‘एकता’ मासिकाची वर्गणी गोळा करणे यासाठी नियमितपणे काम करीत होता. हे काम त्याने या परिसरात नित्य नैमित्तिक संपर्क राहावा म्हणून स्वत:हून स्वीकारले होते.
मी (बापू कुलकर्णी) व तो दोघे मिळून या नगरात सतत काम करीत होतो. नगराची बैठक झाल्यावर मी दगडूशेठ हलवाई मंदिराच्या जवळ कराची स्वीटमध्ये किंवा सोमवार पेठ कैलास डेअरीमध्ये दूध पिण्यासाठी सर्वांना घेऊन जात असे. सर्वांशी गप्पागोष्टी, अनेक विषय, अनेक प्रश्न, अनेक गोष्टींवर चर्चा अशा अनौपचारिक कार्यक्रमांत होत असत. कार्यकर्त्यांच्या जीवनाला यातूनच दिशा मिळत होती. कार्यक्रम होत होते, ठरत होते. नवनवीन स्वयंसेवक जोडले जात होते. त्या काळात नऊ ठिकाणी शाखा सुरू झाल्या होत्या. डुल्या मारुती, कामगार मैदान, घसेटी पूल, घोडमळा, दादा किराड यांच्या घराच्या मागे, नवा वाडा, अरुणा चौक, मुकुंदराव दुबल यांच्या घरासमोर शाखा भरत असत. डुल्या मारुती शाखेवर तर मुस्लीम, ख्रिस्ती मुलेही येत असत व संस्कृत सुभाषिते पाठ म्हणून दाखवून सर्वांची मने जिंकणारे कार्यक्रम होत असत.
प्रदीप सबनीस, अतुल अग्निहोत्री, अनिल गोटे याच शाखेतील स्वयंसेवक आहेत. अॅड. चंद्रशेखर दत्तात्रय कुलकर्णी (मा. संघचालक पर्वती भाग) यांनासुद्धा चंदू ओकमुळे बरेच काही शिकता आले. 1985-86 दोन वर्षे या नगरात काम करताना त्याची खूप मोठी मानसिक जडणघडण झाली, ती चंदूमुळेच. तसेच चंद्रशेखर कुलकर्णी प्रचारक जाणार म्हटल्यावर त्यांनी 1987 साली नगराचा शुभेच्छा समारंभ केला होता. किराडांच्या वाड्यामध्ये कौटुंबिक स्वरूपाचा हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी झाला होता. अनेक माता-भगिनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी प्रेमाने निरोप देत होत्या. चंदू डोळे भरून हे दृश्य मूकपणे बघत होता. नंतरदेखील या नगरातून उत्तम कारमपुरी हा सोलापूर येथे प्रचारक म्हणून गेला होता व त्याने चांगले काम तिथे केले आहे. असे अनेक कार्यकर्ते पडद्याच्या मागे राहून चंदू ओकने उभे केले. चंद्रशेखर कुलकर्णी प्रचारक म्हणून काम करून आल्यानंतरदेखील सहकार नगर येथे जाऊन चंदू त्याला भेटत होता. तसेच ‘विवेक’ आणि ‘एकता’ची वर्गणी घेऊन जात होता.
शेवटच्या काळात चंदूला दुचाकी चालवणे अशक्य झाल्यावर तो रिक्षाने सर्वत्र फिरत असे. कोथरुड, सहकार नगर, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी अशा सर्व भागांत फिरून सर्वांशी संपर्क करीत होता आणि वर्गणी गोळा करीत होता .
गेली 40 वर्षे मधुमेहासारख्या व्याधीने व्याधिग्रस्त असतानाही आपल्या नित्य कामात, संपर्कात, स्वयंसेवक घडवण्यात त्याने कधी कंटाळा केला नाही. गेली 20 वर्षे तर रोज इन्शुलिन घ्यावे लागत होते. अॅडमिट असण्यापूर्वी इमारतीची लिफ्ट बंद असतानाही 40 पायर्या उतरणे व चढणे त्याने करून हिंदू साम्राज्य उत्सव चुकवला नाही, हीच त्याची संघाची शेवटची प्रार्थना!
आणि असे कार्यकर्ते उभे करणे हेच संघाचे यश आहे. असा हा कष्टाळू, निष्ठावान, तळमळीचा कार्यकर्ता पुन्हा उभा करणे हे आताच्या पिढीचे काम आहे आणि तीच त्याला खरी श्रद्धांजली असे म्हणता येईल. गेली 30 वर्षे तो ‘सा. विवेक’ आणि ‘एकता’ मासिकाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. ‘
सा. विवेक’ आणि ‘एकता’ मासिकाचे वर्गणीदार त्याने वाढवले होते आणि प्रतिकूल परिस्थितीत वेळ काढून, वेळप्रसंगी आर्थिक झळ सोसून अत्यंत निष्ठेने हे काम तो करत होता.
खूप आठवणी आहेत; पण मर्यादा आहेत.
एवढेच म्हणावेसे वाटते...
’कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती!’
सहलेखक - विजय इट्टम व
अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी