नभासारिखे रूप या राघवाचे।

23 Aug 2024 15:28:38
vivek
देवाविषयी करुणा, उत्कटता, तळमळ, अनुताप, वैराग्य इत्यादी आत्मनिष्ठ भावनांच्या आविष्कारामुळे रामदासस्वामींनी लिहिलेल्या ‘करुणाष्टकां’ना भावपूर्ण करुण आत्मशोधक काव्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. ‘करुणाष्टकां’ची संख्या पुष्कळ आहे; तथापि त्यातील काही निवडक ‘करुणाष्टकां’चा परिचय करून देण्याचा प्रयत्न या लेखमालिकेतून होणार आहे.
  
समर्थांचे कार्य व कर्तृत्व अफाट आहे. लोक समर्थांना एक बुद्धिवादी संत म्हणून ओळखतात. असे असले तरी समर्थांची वागणूक कठोर नव्हती. त्यांच्या अंत:करणात करुणेचा, मायेचा पाझर होता. त्यामुळे आत्मनिष्ठ अशी ’करुणाष्टके’ स्वामींनी लिहिली आहेत. ती त्यांनी त्यांच्या साधक अवस्थेत रचली असावीत. देवाविषयी करुणा, उत्कटता, तळमळ, अनुताप, वैराग्य इत्यादी आत्मनिष्ठ भावनांच्या आविष्कारामुळे त्यांनी लिहिलेल्या ‘करुणाष्टकां’ना भावपूर्ण करुण आत्मशोधक काव्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
 
आध्यात्मिक साधनेच्या काळात साध्याजवळ पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याचा साधकाला अंदाज करता येत नाही. साधकाच्या मनाची अवस्था अस्थिर व तरल असते. ईश्वरी साध्यासाठी आपण अनेक गोष्टी मागे सोडल्या आणि साध्य तर अजून दूर आहे, अशी हुरहुर मनाला असते. या परिस्थितीत मागे फिरता येत नाही आणि पुढची वाटचाल किती करायची बाकी आहे ते समजत नाही. तेव्हा अशा वेळी आराध्यदैवतालाच या संभ्रमावस्थेतून सोडवण्याची विनंती करावी लागते. त्याचाच आधार असतो. त्यामुळे एका ठिकाणी समर्थ श्रीरामालाच म्हणतात की,
 
आधार तुझा मज मी विदेसीं।
सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी॥
 
स्वत:ला हीन, दीन, दास, अज्ञानी समजल्याशिवाय श्रद्धा दृढ होत नाही. यासाठी रघुनायकाला श्रद्धापूर्वक विनवणी करावी लागते. आपली मागणी त्याला मागावी लागते. अशी मागणी स्वामींनी ‘रघुनायेका मागणे हेचि आता’ या ‘करुणाष्टका’त केली आहे. त्यावर सविस्तर विवरण पाहू.
 
उदासीन हे वृत्ति जिवीं धरावी।
अती आदरें सर्व सेवा करावी।
सदा प्रीति लागो तुझे गुण गाता।
रघुनायेका मागणे हेचि आता।
 
स्वामींचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम असल्याने स्वामी जीवाला उपदेश करीत आहेत की, माझ्या वृत्तीत अनेक भावभावनांचा खेेळ चाललेला आहे. त्याला आवर घालण्यासाठी उदासीन वृत्ती धारण करणे आवश्यक आहे. उदासीन याचा अर्थ निराश असा नाही. उदासीन म्हणजे कशातही गुंतून न राहता किंवा अनासक्त होऊन अलिप्तपणे राहणे. वृत्ती उदासीन ठेवायची तर तिला कोठे तरी चांगल्या कामातही गुंतून ठेवले पाहिजे. त्यासाठी अत्यंत आदरपूर्वक तुझी सेवा करण्यात काळ व्यतीत केला पाहिजे; परंतु तुझी सेवा करीत असतानाही तुझ्या भक्तिप्रेमासाठी मला अशी बुद्धी दे की, माझी वाचा सतत तुझे गुणगान करीत राहील. काया, वाचा, मनाने मला सतत तुझ्या जवळ राहू दे. तुझे गुण गात असताना सदोदित तुझ्यावर माझे प्रेम असू दे. तू गुणांचा सागर आहेस. तेव्हा तुझे गुणगान करताना प्रेम उत्पन्न होईल. हे रघुनायका, आता तुझ्याकडे माझे हेच मागणे आहे. रघुनायका, तू गुणसंपन्न तसाच रूपसंपन्नही आहेस. तेव्हा माझी आणखी एक इच्छा पुरी कर.
 
तुझे रुपडे लोचनीं म्या पहावें।
तुझे गुण गाता मनासी रहावें।
उठो आवडी भक्तिपंथेचि जाता।
रघुनायेका मागणे हेचि आता॥2॥
 
 
सगुण भक्तीत देवाचे रूप पाहिल्यावर भक्ताचे अंत:करण प्रसन्न होते. त्यामुळे देवाचे सुंदर रूप आपण पाहावे, अशी भक्ताची अपेक्षा असते. ‘स्वामी’ या श्लोकात लडिवाळपणे ‘तुझे रुपडे’ असा शब्दप्रयोग करतात. त्यात भगवंताविषयी आदर व जवळीक साधली जाते. भक्ताला भगवंताच्या आनंदित करणार्‍या रूपाचे आकर्षण असते. त्यामुळे भक्त येथे आपल्या लोचनांनी रामाची देखणी प्रसन्न मुद्रा पाहावी, अशी इच्छा व्यक्त करीत आहे. मनाच्या श्लोकांतही स्वामींनी रामाच्या रूपाचे जागोजाग वर्णन केले आहे. त्यातील पुढील वर्णन समर्थांनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने केले आहे.
 
 
‘नभासारिखे रूप या राघवाचे। मनीं चिंतिता मूळ तुटे भवाचे।’
 
 
आपल्या वृत्तीचे संसारातील मूळ तोडून टाकण्यासाठी राघवाचे प्रसन्नचित्त रूप पाहाणे अगत्याचे आहे. म्हणून ‘तुझे रुपडे’ मी डोळ्यांनी पाहावे अशी इच्छा भक्त व्यक्त करीत आहे. हे रामा, तुझ्या रूपाप्रमाणेच तुझे गुणही मन आनंदित करणारे आहेत. रामाच्या अंगी असलेल्या विविध गुणांचा परिचय ‘रामचरित’ वाचताना होतो. तसेच रामाचे गुणगान करीत असताना एका वेगळ्या आनंदाची, सात्त्विकतेची अनुभूती येते. ग.दि. माडगूळकरांच्या ‘गीतरामायणा’तील प्रासादिक गीते ऐकताना याची प्रचीती श्रोत्यांना येते. अशा वेळी अंत:करण भरून येते. काही प्रसंगी डोळ्यांतून अश्रुधारा येऊन अष्टसात्त्विक भाव जागे होतात. ते सामर्थ्य रामकथेत, गुणवर्णनात आणि गुणगायनात आहे. यासाठी स्वामी सांगत आहेत की, ‘तुझे गुण गाता मनासी रहावें’ यातूनच राघवाचा भक्तिपंथ पुढे जात असतो. अशा भक्तिपंथाची आवड उत्पन्न व्हावी, असे मागणे स्वामी रघुनाथाजवळ करीत आहेत. आपले आराध्यदैवत सहजपणे प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर भक्तिपंथाने जावे लागते. मनाच्या श्लोकात स्वामींनी असाच अभिप्राय प्रगट केला आहे. स्वामी मनाला सांगत आहेत की, ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’. त्याचे कारण ते स्पष्ट करतात की, ‘तरी श्राहरी पाविजेतो स्वभावे’. भक्तिमार्गाने गेल्यास तुला भगवंताचे दर्शन, भगवंतप्राप्ती सहजपणे होऊ शकते, असे स्वामींच्या सांगण्याचा आशय आहे. त्यासाठी तुझी भक्ती मनोभावे व्हावी, ही माझ्या मनातील इच्छा आहे. हे माझे तुझ्याकडे मागणे आहे.
 
 
मनी वासना भक्ती तुझी करावी।
कृपाळूपणे राघवे पुरवावी।
वसावे मज अंतरी नाम घेता।
रघुनायेका मागणे हेचि आता॥3॥
 
 
हे भगवंता, माझ्या मनातील प्रापंचिक वासना तू दूर कर. फक्त तुझी भक्ती मी करावी, ही वासना, कामना मात्र माझ्या मनात कायम ठेव. तुझ्या भक्तीसाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे; पण ते काही जमत नाही. मला वाटते त्यासाठी तुझे साहाय्य असल्याशिवाय तुझी भक्ती करता येणार नाही. तेव्हा तुझ्या भक्तीसाठी मी तुझ्या मदतीची मागणी करीत आहे. तू कृपाळू आहेस, असे सर्व जण सांगतात. तेव्हा तू कृपाळू होऊन माझ्या मनात तुझ्या भक्तीविषयीची आस पूर्ण कर. तुझे नाम मी अंत:करणात साठवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मी सतत नामस्मरण करीत आहे; पण ते मनात साठत नाही, कारण ते खूप वरवरचे आहे, हे माझ्या लक्षात आले आहे. ‘जिथे नाम तेथे राम’ असे म्हणतात; पण तरीही नाम आणि राम दोघेही अंत:करणात पोहोचत नाहीत. त्यासाठी माझे असे मागणे आहे की, ‘हे रामा, मी नाम घेत असताना तू माझ्या अंत:करणात वस्तीला येऊन राहा. तसे झाले तर माझे नामस्मरण वरवरचे न होता ते अंत:करणाच्या गाभ्यापर्यंत जाईल आणि अंत:करणात तुझी वस्ती झाल्याने मर्कटासारख्या या सांसारिक वासना तेथून पळ काढतील. रघुनायका, हेच मागणे मी आता तुझ्याकडे करीत आहे. तू कृपाळूपणे माझी मागणी पूर्ण कर.’
 
 
‘रघुनायेका मागणे हेचि आता’ ही शेवटची ओळ असलेले ‘करुणाष्टक’ एकंदर नऊ कडव्यांचे आहे. पैकी तीन कडव्यांचे विवरण आपण पाहिले. त्यापुढील भाग नंतरच्या लेखात पाहता येईल. ‘करुणाष्टके’ नावावरून ती आठ कडव्यांची असावीत असे वाटले तरी स्वामींच्या लिखाणाच्या ओघात कधी ती दशकेसुद्धा होऊन जातात; पण त्यातील करुणभाव, भक्ती बदलत नाही.
Powered By Sangraha 9.0