थांबवू या ही घसरण

23 Aug 2024 13:26:42
 
 Badlapur
भौतिक प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरणे अत्यावश्यक आहेच; पण तसे होताना त्याच्या दुष्परिणामांना आळा घालण्याबाबतही पुरेसा व सखोल विचार व कृती व्हायला हवी. आपल्या घरात वाढणारे मूल, मग ते मुलगा असो वा मुलगी... त्याच्या अभ्यासाची वा करीअरची काळजी घेतानाच, ते समाजाप्रति संवेदनशील असलेले, माणूस म्हणून प्रत्येकाचा आदर करणारे असायला हवे. ही गोष्टही ‘फास्ट ट्रॅक’वर घेणे, ही आजची गरज आहे. 
बदलापूरच्या शाळेत घडलेली दुर्दैवी घटना आणि ती गांभीर्याने घेण्यात शालेय प्रशासन - पोलीस यंत्रणा यांनी केलेले दुर्लक्ष, त्यानंतर पालकांच्या आणि सर्वसामान्यांच्या संतापाचा झालेला उद्रेक आपण सर्वांनी विविध वृत्तवाहिन्यांवर पाहिला, त्याविषयीच्या बातम्या वाचल्या. आणखी काही दिवस तरी या संदर्भातल्या बातम्या गांभीर्याने वाचल्या जातील, त्यावर हिरिरीने दोन्हीकडून बाजू मांडली जाईल. याहून गंभीर वा दखल घेण्याजोगे समाजात एखादे काही घडत नाही तोवर मीडिया आणि सर्वसामान्य नागरिक त्यात रस घेतील. कटू वाटले तरी हे सत्य आहे. हे स्वीकारून आणि हा विषय निव्वळ बातमीचा म्हणून सोडून देण्यातला नाही याची खूणगाठ बांधून आपण पुढे गेलो तर ते सर्वांसाठी हिताचे काही घडेल हे लक्षात घेऊ. 2012 साली नवी दिल्ली इथे घडलेल्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर महिला संघटनांनी केलेल्या आंदोलनांमुळे कायदेही कडक झाले. तपास यंत्रणा गतिमान करण्याचे आदेश निघाले आणि तरीही त्यानंतर स्त्रीवर होणार्‍या अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसलेला नाही. अगदी कोवळ्या वयातल्या मुलीही अत्याचाराला बळी पडत आहेत.
 
 
म्हणूनच या विषयात सर्व स्तरांवर सावधानता बाळगण्याची गरज आहे. लहान मुलांसाठी घरानंतर दुसरी विश्वासाची जागा असते ती त्याची शाळा. त्याच्या मनाला-व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी म्हणून तिचे अनन्यसाधारण महत्त्व असते. तेव्हा, घराबाहेरचे जगही आपल्यासाठी सुरक्षित आहे अशी आश्वस्तता मिळेल असे वातावरण शाळेत असावे, अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. मुले मग ती बालवाडीतली असोत वा मोठ्या वर्गातली, ती जोवर शाळेच्या आवारात असतात तोवर त्यांची जबाबदारी शाळेवर असते. याचे भान ठेवून शाळेतल्या सर्व व्यवस्था असाव्यात आणि त्याबाबत संबंधित शिक्षकांमध्ये जाणीव-जागृती करण्यात यावी, त्यांना या संदर्भातले शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात यावे. तसे झाले तरी कित्येक संभाव्य धोके टळू शकतात. बदलापूरमधील दुर्दैवी घटनेनंतर सर्व शाळांनी याचा गांभीर्याने आणि अग्रक्रमाने विचार करायला हवा. शाळेत घडलेली एक दुर्दैवी घटना जशी पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबीयाच्या आयुष्याला झळ पोहोचवते तसे शाळेचेही लवकर भरून न येणारे नुकसान होते. शाळा उभारणीसाठी अनेक पिढ्यांनी दिलेले योगदान क्षणार्धात मातीमोल होते. त्याचबरोबर, शाळेत पाठवण्यात जर उद्या पालकांना धोका वाटला आणि मुलांना भय वाटले तर त्याचा केवढा गंभीर परिणाम पुढच्या पिढ्यांवर होईल, याचाही विचार करायला हवा.
 
 
इतक्या संवेदनशील विषयावर पालकांनी केलेल्या आंदोलनात संधिसाधू राजकारण्यांनी बेमालूमपणे मिसळलेले त्यांचे रंग अनेकांच्या लक्षात आले असतील. वास्तविक ही वेळ राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून मानवतेच्या दृष्टिकोनातून बाधित कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची, त्यांना धीर आणि अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्याचे बळ देण्याची असते. कोणत्याही विचारधारेच्या राजकीय नेत्याने असेच करणे अपेक्षित असते. इथे तसे झाले नाही. विरोधी पक्षाला सत्ताधार्‍यांना घेरण्याच्या अनेक संधी असतात. तशा विषयांच्या यादीत या घटनेचा झालेला अंतर्भाव हे दुर्दैव आहे. राजकारणी; मग ते कोणत्याही विचारधारेचे का असेनात, असे समाजाला हादरवणारे विषय हाताळताना त्यांनी किमान हे भान बाळगावे, ही अपेक्षा आहे. ते त्यांच्यातल्या माणुसकीचे, संवेदनशीलतेचे द्योतक असते.
 
 
राजकारणात वावरणारी ही माणसे कुठल्याही परग्रहावरून आलेली नाहीत. या समाजातच त्यांची घडण होत असते, असे आपण म्हणत असतो. हे मान्यच. मात्र ते मान्य केले की त्याला जोडून एक गंभीर मुद्दा पुढे येतो. ही माणसे आपल्या समाजाचाच एक भाग असल्याने, समाजाचे कसे व किती वेगाने, कोणकोणत्या स्तरावर अधःपतन होते आहे ते अशी घटना अधोरेखित करते.
 
 
 
घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत चीड, संताप, हताशा, निराशा दाटून येणे हे कोणत्याही संवेदनशील व्यक्तीबाबत शक्य आहे. मात्र या भावनांचे तीव्र आवेग ओसरल्यानंतर तरी, ’समाजाची अतितीव्र उतारावरून होत असलेली घसरण’ यावर आपण गांभीर्याने विचार करायला हवा. त्यासाठी आपापल्या स्तरावर होता होईल तितके योगदान द्यायला हवे.
 
 
पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यात देशभरातल्या बहुतेक पोलीस ठाण्यांत होणारी अक्षम्य हयगय हे वर्तमानातले एक ’न्यू नॉर्मल’ वाटावे अशी स्थिती आहे. ती कशातून उद्भवली? ज्यासाठी आपण मासिक वेतन घेतो ते काम इमानेइतबारे करावे, ही अगदी मूलभूत अपेक्षाही अनेक पोलीस स्थानकांत का पूर्ण होत नाही? नोकरीमुळे मिळालेला अधिकार, हाती आलेली सत्ता आणि पैसा यामुळे आपण कशासाठी आहोत याचे भान सुटत असावे का? सामाजिक जीवन सुरळीत चालावे म्हणून अनेक व्यवस्था अस्तित्वात आलेल्या आहेत. त्या व्यवस्थांमध्ये असलेली माणसे याच समाजाचा एक भाग आहेत. तरीही ही माणसे समाजाप्रति इतकी असंवेदनशील, कर्तव्यच्युत का होतात? गेंड्यालाही शरम वाटावी असे कोणते कातडे त्यांनी पांघरलेले असते? पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा अक्षम्य तर आहेच; पण त्यांच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
 
 
अष्टौप्रहर बातम्यांच्या शोधात भान हरपलेल्या वृत्तवाहिन्यांकडूनही जबाबदारीचे वार्तांकन अपेक्षित होते. माहिती देऊन आपण समाजाला सजग करत आहोत, की प्रकरण अधिक चिघळण्यासाठी मदत करत आहोत याचा विचार फारच मोजक्या वाहिन्यांनी केला.
 
 
ज्यांचे मन एखाद्या कोमल फुलाइतके कोवळे आहे आणि भावविश्व अतीव निरागस, अशा वयोगटातल्या दोन चिमुकल्यांवर असा अनवस्था प्रसंग ओढवतो तेव्हा या व्यवस्थांइतकीच समाज म्हणून आपली पातळी किती झपाट्याने घसरते आहे याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी. एखादा गंभीर अपराध घडण्यामागे सकृद्दर्शनी काही व्यक्तीच गुंतलेल्या दिसत असल्या तरी ती घटना अनेक गुंतागुंतींचा परिणाम असते.
 
 
कुटुंबव्यवस्था हे भारतीय समाजाचे एकक आहे. ती भक्कम पायावर उभी आहे म्हणून कितीही हादरे बसले तरी आपला समाज पुन्हा उभा राहतो, असे म्हटले जाते. मात्र हे गृहीतक तपासून पाहण्याची आता वेळ आली आहे, असे खेदाने आणि जबाबदारीने नमूद करायला हवे. घर म्हणजे केवळ चार भिंती आणि छप्पर नाही, तर वाढीसाठी निरोगी, निकोप वातावरण आणि मनमोकळा संवाद जिथे आहे ते घर. आजची बहुतांश घरे संवाद हरवलेली आणि प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाइलमुळे एकमेकांपासून मनाने कोसो दूर असलेल्या माणसांची घरे आहेत. भौतिक प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरणे अत्यावश्यक आहेच; पण तसे होताना त्याच्या दुष्परिणामांना आळा घालण्याबाबतही पुरेसा व सखोल विचार व कृती व्हायला हवी. आपल्या घरात वाढणारे मूल, मग ते मुलगा असो वा मुलगी... त्याच्या अभ्यासाची वा करीअरची काळजी घेतानाच, ते समाजाप्रति संवेदनशील असलेले, माणूस म्हणून प्रत्येकाचा आदर करणारे असायला हवे. ही गोष्टही ‘फास्ट ट्रॅक’वर घेणे, ही आजची गरज आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0