बदलापूर घटनेनंतर एक योग्य गोष्ट झाली की, पालकांनी आपल्या मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात तक्रार नोंदवली, मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात स्वत:हून आवाज उठवला, त्यासाठी आंदोलनासारखा विधायक मार्ग निवडला. या आंदोलनाला यश येऊन जर चांगले कायदे झाले तर हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल; पण या आंदोलनामागची काळी बाजू कायम आपल्या स्मरणात दुखरी म्हणूनच राहील. अशा घटनांमधून फक्त सहानुभूती देण्यापेक्षा अन्याय घडलेल्या आणि मनातून असुरक्षित असणार्या सर्वच मुलींच्या मनातला ‘आम्हाला सुरक्षित जगू द्या...’ हा आवाज आपण सर्वांनी ऐकला पाहिजे आणि मुलींना सर्वार्थाने सुरक्षित करण्यासाठी स्वत:हून पुढे आलं पाहिजे.
दुदैव असा एकच शब्द सध्या पालकांच्या मनात येतो आहे. मुलीचे पालक असणं दुर्दैवी वाटण्याएवढं समाजातलं वातावरण गढुळलं आहे. अशा गढूळ वातावरणात आपली मुलगी सुरक्षित आहे का? अशा वातावरणात पालकांनी नेमकं काय करायचं? कसं वागायचं? मुलींना शाळेत जाऊ द्यायचं की नाही? जाऊ दिलं तर मुली घरून जशा बाहेर पडल्या आहेत तशाच त्या घरी परत येतील का? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात उभे राहिले ते अनेक ठिकाणी मुलींवर घडलेल्या शारीरिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांमुळे.
रोजच महिला अत्याचारांच्या घटना घडत असतानाच्या काळात, पालक रोजच मुलींना सतर्क करत असताना, रोजच कोणती तरी एक घटना समोर येते आणि पालकांचा धीर नव्याने खचतो. तो धीर खचत असतानाच मुलींना संरक्षण कसं आणि किती देणार, हा प्रश्न पालकांना पडतो आणि त्यांच्या मनात मुली जन्माला घातल्याचं एक अपराधीपण येतं. अर्थातच समाज म्हणून आपण मुलींना सुरक्षा द्यायला, त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहायला कमी पडतो आहोत, हे वास्तव आहे. म्हणूनच या वास्तवाला आपण कसे भिडतो, यावरच पुढच्या काळाची स्त्रीविषयक सगळी मदार अवलंबून आहे.
सध्या साडेचार-सहा वर्षांच्या मुलीही अन्याय-अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यामुळे समाजात आणि विशेषत: पालक वर्गात अस्वस्थता पाहायला मिळते आहे. मुलींच्या बाबतीतली एखादी घटना समोर आली की, पालक पहिला विचार करतात, ‘या जागी माझी मुलगी असती तर?’ या प्रश्नाने त्यांच्या मनात नानाविध विचार उमटतात. बदलापूरची घटना समोर आली आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले? त्यातला सगळ्यात पहिला होता-
* ‘आपल्या समाजात मुली सुरक्षित आहेत का?’ आणि मग एक एक प्रश्न या घटनेच्या संबंधात पालक वर्गातून पुढे आले.
* त्या तरुणाला साफसफाईचं काम कसं दिलं गेलं?
* अनेक शाळांमध्ये साफसफाई करायलाही महिला असतात, मग याच शाळेत मुलींच्या वॉशरूममध्ये तरुणाची नेमणूक कशी केली गेली?
* काम देताना या तरुणाची चौकशी केली गेली का?
* त्याच्या वर्तनाविषयी शाळा प्रशासन आणि व्यवस्थापन इतकं गाफील राहिलं कसं?
* एवढी मोठी घटना घडताना मुलगी वर्गात खूप वेळ आलेली नाही, हे वर्गात शिकवणार्या शिक्षकांच्या लक्षात कसं आलं नाही?
* या व्यक्तीबद्दल तक्रार करूनही जर तो कामावर येतच होता आणि अत्याचार करतच होता, तर मग शालेय व्यवस्थापनाने लक्ष का दिलं नाही?
* शैक्षणिक संस्थेमध्येही जर अशा घटना घडत असतील, तर मुलं ‘सेफ’ कुठे राहतील?
या घटनेच्या निमित्ताने परत एकदा मुलींच्या सुरक्षेचे अनेक मुद्दे परत ऐरणीवर आले आणि या दृष्टीने विचार करण्याची, या सगळ्यावर उपाय शोधण्याची आणि शोधलेला उपाय अमलात आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. यानिमित्ताने शालेय स्तरावर काही गोष्टी करता येतील का याचा विचार करू.
शाळेत अनंत गोष्टी घडत असतात. रोजच अनेक उपक्रम होत असतात. शालेय व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं. तरीही शालेय व्यवस्थापनाने आधी मुलांच्या सुरक्षेला प्राधान्यक्रम दिला पाहिजे. तो देण्यासाठी काय करता येईल याचाही विचार करू.
* एजन्सीमार्फत आलेल्या कामगारांची माहिती, पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे. त्यात जर शालेय व्यवस्थापन फार काळ गुंतून राहू शकत नसेल तर पालक-शिक्षक संघाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी शाळेला करून घेता येतील आणि आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकही ही मदत सहज करतील.
* पालक-शिक्षक संघ शाळेत नियमितपणे सक्रिय असला पाहिजे. शाळेत शिक्षक कमी असल्यास, आपल्याच पालकांना मुलांसाठी बोलावले पाहिजे. बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना बोलावण्यापेक्षा पालकांना बोलावणे सयुक्तिक ठरेल.
* आपल्या शाळेत असणार्या प्रत्येक कर्मचार्याच्या (यात बाई आणि पुरुष दोन्ही येतात) वर्तनावर मुख्याध्यापकांचं संपूर्ण लक्ष असलं पाहिजे.
* सीसीटीव्ही कॅमेरे दिवसरात्र सुरू असले पाहिजेत.
* एजन्सीमार्फत आलेल्या किंवा आपणच निवडलेल्या कामगारांचे प्रशिक्षण वेळोवेळी शालेय व्यवस्थापनाने केले पाहिजे.
* आपण मुलांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलं पाहिजे, याचं भान वेळोवेळी शाळेत कार्यरत असणार्या प्रत्येक व्यक्तीला दिलं पाहिजे.
या पर्यायांचा विचार शालेय व्यवस्थापनाने केला पाहिजे; पण तरी असल्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्या का घडतात याचाही विचार झाला पाहिजे. तरच आपल्याला अनेक गोष्टींच्या मुळाशी जाता येईल आणि काही तरी पर्याय शोधता येतील असं वाटतं आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘लहान वयातल्या मुली या अत्याचाराला बळी का पडतात’ या मुद्द्याचा विचार वारंवार आणि तर्कसंगत व्हायला हवा. आता हा मुद्दा फक्त भावनिक पातळीवर न हाताळता त्याकडे जरा प्रॅक्टिकली पाहायला हवं.
एकूणच मुलींवर बलात्कार होण्याच्या घटना वाढत आहेत. त्याचं स्वरूपही बदललं आहे, हेदेखील लक्षात घ्यायला हवं. ते स्वरूप कसं बदललं? बलात्कार घडण्यामागच्या कारणांचा मागोवा घेताना जेव्हा मुली स्वत:चं संरक्षण करू शकत नाहीत, हे लक्षात आलं तेव्हा मुलींना स्वसंरक्षणासाठी पालकांनी अनेकविध मार्ग उपलब्ध करून दिले. अनेक शाळांनी मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम केलं. त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. ते घेत असताना एकटा पुरुष समोर आला तर आपण काय करायचं याचंच प्रशिक्षण मुलींना मिळालंही. मुली स्वसंरक्षण करायला काही टक्के तरी सक्षम आणि निर्भय झाल्या. असं होत असतानाच मुलींवरच्या अत्याचाराचं स्वरूपच बदललं आणि नुसतं स्वरूप बदललं नाही, तर अत्याचार होऊ शकतो त्या मुलींचं वयही बदललं. या सगळ्यामागे विकृत मानसिकता कशी काम करते आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
वर्षानुवर्षे मुली सॉफ्ट विकृतीला बळी पडत होत्या. या विकृतीला उत्तर म्हणून पालकांनी आणि शाळांनी मुलांना ‘गुड टच बॅडटच’मधून या सॉफ्ट विकृतीपासून स्वत:चा बचाव कसा करायचा हे शिकवलं. काही टक्के मुलांना आणि थोडं वरच्या वयाच्या मुलांना ते समजूही लागलं; पण... अनेकांनी आपल्या विकृतीला वाट देण्यासाठी ज्या मुलांना आपल्या भावनाच व्यक्त करता येत नाहीत, असा एकदम बालगट टार्गेट केला. वय वर्षे अडीच ते पाच. या वयोगटातल्या मुलांना काहीच म्हणजे काहीच कळत नाही, तर दुसरीकडे मोठ्या वयाची सज्ञान मुलं टार्गेट आहेतच; पण त्यांच्यावरच्या अत्याचाराचं स्वरूप बदललं. मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिने पुढे कारवाई करू नये म्हणून तिची हत्या, असा एक नवाच पायंडा पडून गेला आणि सर्वच वयांतल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न परत ऐरणीवर आला. आता हा प्रश्न सतत ऐरणीवर ठेवूनच त्याची वासलात सगळ्या स्तरांतून लागली पाहिजे.
समाजातल्या महिला गटाचा सुरक्षा प्रश्न असा सातत्याने समोर येत राहिला. महिलावर्ग सतत अस्वस्थ राहिल्याने सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत सतत बाधा येत राहील. ती येऊ नये यासाठी आपण समाज म्हणून कसे वागले पाहिजे आणि त्यात शालेय पातळीवर नेमकं काय केलं पाहिजे याचाही विचार करायला हवा. यातून आपल्याला काही गोष्टींची पुनर्रचना करता येणार आहे का? याचाही विचार केला पाहिजे.
* आजही आपल्याकडे पुरुषप्रधान व्यवस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. आजही अनेक कुटुंबांमध्ये ‘तू पुरुष आहेस’ या विधानाला खतपाणी घातलं जातं. या दृष्टीने कौटुंबिक प्रबोधनाची आवश्यकता आहे, ती शालेय पातळीवर करता येईल.
* विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांशी तुटलेला संवाद आणि त्यामुळे मुलांच्या मनात एकंदर स्त्री-पुरुष नात्यांसंबंधात असलेले संभ्रम दूर करता येण्याच्या दृष्टीने मुलांच्या कार्यशाळा सातत्याने घेता येतील.
* आपण म्हणू ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजेच, अशी एक वृत्ती सगळ्याच मुलांमध्ये आढळते. ती वृत्ती लहान वयातच जर योग्य रीतीने हाताळली गेली, तर काही टक्के तरी सामाजिक समस्या कमी व्हायला मदत होईल, यासाठी शाळेबरोबरीनेच विविध स्तरांतून विविध पातळ्यांवर काम झाले पाहिजे.
* मुलींना कमी लेखण्याची आणि त्याचबरोबर तुम्हाला काय कळतं आहे, ही एक भावना मुलांच्या आणि मुलींच्या मनात मूळ धरून असते, ती कमी करण्याची नितांत गरज आहे. यादृष्टीनेही उपक्रम शालेय स्तरावर घेता येतील.
* सेक्स एज्युकेशनची गरज आपण गेली अनेक दशकं मांडतो आहोत, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता केलीच पाहिजे.
* दुसर्याचा आदर करण्याची, समोरच्याचा लिंगनिरपेक्षसन्मान करण्याची सवय मनाला लावता येण्याच्या दृष्टीनेही उपक्रम घेता येतील. गोष्ट, कथाकथन, वक्तृत्व अशा उपक्रमांमधून सातत्याने हा विचार शालेय पातळीवर मुलांसमोर आला पाहिजे.
* शासन आणि शिक्षण विभागाने, शिक्षण मंत्रालयाने या दृष्टीने शाळांना एकमेकांचा सन्मान करण्याचा एक अभ्यासक्रम शालेय स्तरावर अनिवार्य केला पाहिजे.
* मुलांच्या चुकीसाठी शिक्षा न करण्याचा एक घातक नियम आलेला आहे, तिथे पालकांनी केलेला अतिरिक्त हस्तक्षेप या सगळ्याच्या मागे आहे का? याचा आपण व्यक्ती म्हणून शोध घेतला पाहिजे. शिक्षकांनी किंवा कोणत्याही मोठ्या माणसांनी माझ्या मुलाला ओरडता कामा नये, ओरडण्याची कारणं जाणून न घेता आपलं मूल बरोबरच आहे, अशी एक वृत्ती पालकांनी जोपासलेली आहे. मुलांवरचा समाजाचा वचकही कमी झाला आहे, त्यामुळे आपण कसेही वागलो तरी आपल्याला काहीही होणार नाही, असा एक अनाठायी आत्मविश्वास अन्याय करणार्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. त्यामुळे आपण कुणावरही अन्याय करायचा नाही, हे मूल्य आपल्याला शालेय वयातच मुलांना देता आले पाहिजे. त्यासाठी शासन पातळीवर शाळांना ठरवून उपक्रम दिल्यास याने फार मोठा बदल येत्या काही काळात दिसेल.
* अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय? आणि त्याचा वापर कसा करायचा आहे? या संदर्भातलं ज्ञानही मुलांना देण्याची अतिशय मोठी गरज आहे.
* हातात असलेला मोबाइल आणि समोर दिसणारी पॉर्न्स यातून घडत जाणारी मानसिकता याचा विचार करून समाजातल्या सर्वच स्तरांतून मुलांसाठी विविध प्रबोधन वर्ग, यासाठीची विविध सत्रं, वेगवेगळे उपक्रम तातडीने सुरू केले पाहिजेत.
या सगळ्याचा सकारात्मक विचार करूनच आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे; ते जाण्यासाठीच सगळ्यांना मिळून एकत्र प्रयत्न करावा लागणार आहे. त्या बदलासाठी मुलींनीही तितकेच प्रयत्न कोणत्याही गोष्टींना न घाबरता केले पाहिजेत.
काळ बदलला, मुली शिक्षण घ्यायला लागल्या, त्या आर्थिक स्वतंत्र झाल्या, त्या सगळं जग पादाक्रांत करायला लागल्या; पण त्या निर्भय आणि सुरक्षित झाल्या का? हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधलं, तर आपल्याला आपल्या समाजाच्या मूळ धारणांपर्यंत जावं लागेल. काळ बदलला तरी आपण आपल्यामुलांना जबाबदारीचं भान द्यायला विसरलो. या भान न देण्यामुळे आपण कुणाचं तरी आयुष्य आपल्या विकृतीसाठी पणाला लावतो आहोत, हे विसरलो. आपण आपलं सत्त्व विसरलो आणि मुलींना असुरक्षित अशा समाजात ताठ मानेने चालण्याचं तकलादू आव्हान स्वीकारण्याचा ताण द्यायला लागलो. ती मनाने सक्षम झाली आहे का? याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.
समाजाची चौकट मोडून आपण फार व्यक्तिकेंद्री झालो आहोत. त्या व्यक्तिकेंद्री, आत्ममग्न होण्यातून आपण ही वेळ आपल्यावर ओढवून घेतली आहे का? याचा विचार आपण जाणीवपूर्वक आणि तटस्थपणे केला पाहिजे.
आपल्या समोरचे आदर्श काय आहेत? आपण मुलांसमोर काय विचार मांडतो आणि आपण एकूणच व्यक्ती म्हणून काय विचार करतो, या सगळ्याचा परत परत आणि सैद्धान्तिक पातळीवर विचार झाला पाहिजे. या संदर्भात शासनाने ठोस असा पर्याय शिक्षणव्यवस्थेला आणि पर्यायाने समाजाला दिला पाहिजे.
मुलींची सुरक्षा ही कोणत्याही सरकारच्या काळातप्राधान्यक्रमावर असली पाहिजे. अशा वेळी सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि विकृत प्रवृत्ती संपवण्याची तातडीची गरज निर्माण झालेली आहे. अशा घटना जर वाढत असतील आणि मुलींच्या, पालकांच्या मनातली भीती वाढत असेल, समाजाची 50 टक्के जनता यासमाजात स्वतःला असुरक्षित समजत असेल, तर सगळ्याच गोष्टी मुळातून समजून घेऊन त्यावर विधायक काम करण्याची वेळ आताच, ताबडतोब आलेली आहे, हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे.
बदलापूर घटनेनंतर एक योग्य गोष्ट झाली की, पालकांनी आपल्या मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात तक्रार नोंदवली, मुलींवर झालेल्या अन्यायाविरोधात स्वत:हून आवाज उठवला, त्यासाठी आंदोलनासारखा विधायक मार्ग निवडला. या आंदोलनाला यश येऊन जर चांगले कायदे झाले तर हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल; पण या आंदोलनामागची काळी बाजू कायम आपल्यास्मरणात दुखरी म्हणूनच राहील. अशा घटनांमधून फक्त सहानुभूती देण्यापेक्षा अन्याय घडलेल्या आणि मनातून असुरक्षित असणार्या सर्वच मुलींच्या मनातला ‘आम्हाला सुरक्षित जगू द्या...’ हा आवाज आपण सर्वांनी ऐकला पाहिजे आणि मुलींना सर्वार्थाने सुरक्षित करण्यासाठी स्वत:हून पुढे आलं पाहिजे.