.
ऑलिम्पिक विजेते काही आकाशातून पडत नाहीत, ते घडवावे लागतात आणि हा मार्ग सोपा नसतो. गेली काही वर्षे ‘खेलो इंडिया’अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन मुलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ह्या स्पर्धांमधील विजेत्यांना शिष्यवृत्तीही मिळते. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
27 जुलैला सुरू झालेले ऑलिम्पिक खेळ 11 ऑगस्ट ह्या दिवशी अधिकृत समारोप सोहळ्याने संपन्न झाले. ह्या समारोप सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि हॉकीपटू श्रीजेश भारताचे ध्वजवाहक होते.
भारतीय संघात एकूण 117 खेळाडू सामील होते आणि मिळालेल्या पदकांची संख्या आहे 6. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 7 पदके होती. ह्या वेळी आपला देश दोन आकडी संख्या पार करेल, अशी एक वेडी आस क्रीडारसिकांना लागली होती, मात्र आपण त्या आकड्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. हे ऑलिम्पिक अनेक बर्यावाईट कारणांनी लक्षात राहणार आहे.
यशवंत खेळाडू
भारताच्या नेमबाजी संघात एकूण 21 खेळाडू होते. मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्निल कुसाळे ह्या तिघांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. ह्यामध्ये मनू भाकरने एकेरी आणि सरबज्योतबरोबर मिश्र सांघिक स्पर्धेत अशी दोन पदके पटकावून सर्वात यशस्वी भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंच्या यादीत मानाचं स्थान मिळवलं.
2008 पासून कुस्ती खेळात किमान एक पदक मिळण्याची परंपरा अमन सेहरावतच्या कांस्य पदकाने सुरू राहिली. अमन भारताचा आत्तापर्यंतचा ऑलिम्पिक पदक मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.
पुरुष हॉकी संघाकडून सुरुवातीला पदकाची अपेक्षा फारशी नव्हती, मात्र स्पर्धा सुरू झाली आणि भारतीय संघाने सातत्याने चांगली कामगिरी करून दाखवली. ग्रुप फेर्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला दिलेला धक्का आणि बेल्जियमला दिलेली चांगली लढत ह्यामुळे भारत अंतिम फेरी गाठेल अशी शक्यता वाटू लागली. उपांत्य फेरीत थोडक्यात पराभव पत्करावा लागला आणि शेवटी कांस्य पदकासाठी सामना खेळावा लागला. ह्या वेळी मात्र संघ विजयी ठरला आणि टोकियोपाठोपाठ पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्यपदक मिळालं. भारताचा अनुभवी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश ह्याने आधीच आपली निवृत्ती जाहीर केली होती. कांस्यपदकाने त्याच्या कारकीर्दीची अखेर झाली. श्रीजेशचं भारतीय हॉकीसाठी असलेलं योगदान अनन्यसाधारण आहे, त्यामुळे पुढील काही काळ त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल.
नीरज चोप्रा हा भारताचा हुकमी एक्का आहे. टोकियोत त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. त्यामुळे याही वेळी त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. नीरजने पॅरिसमध्ये रौप्यपदक पटकावलं. दोन ऑलिम्पिकदरम्यान विविध डायमंड लीग्ज, दोन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, आशियाई स्पर्धा इत्यादी अनेक महत्त्वाच्या स्पर्धा होऊन गेल्या. नीरजने ह्या प्रत्येक स्पर्धेत पदक मिळवून भारताचा झेंडा कायम फडकत ठेवला आहे. ह्या पार्श्वभूमीवर त्याचं रौप्यपदक काहींना नाराज करून गेलं आणि त्यात भर म्हणून पाकिस्तानचा खेळाडू सुवर्णपदक जिंकला. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तो दिवस नीरज चोप्राचा नव्हताच. सहापैकी पाच वेळा त्याची भालाफेक चुकीच्या प्रकारे झाली होती. एकमेव अचूक फेकीने त्याने रौप्यपदक पटकावलं. ह्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने तब्बल दोन वेळा भाला 90 मीटरच्या पलीकडे फेकला होता. हीच गोष्ट नीरजला अजून साध्य होत नाहीये. येणार्या काळात नीरजची कामगिरी आणखी उंचावत जाईल अशी आशा करू या. सुवर्णपदक हुकल्यामुळे त्याची महानता अजिबात कमी होत नाही, हे निर्विवाद सत्य आहे.
चौथ्या स्थानी राहिलेले खेळाडू
दुहेरी पदक संख्येचं स्वप्न हे अगदीच अशक्यप्राय नक्कीच नव्हतं. ह्या स्पर्धेत सहा पदके मिळाली; पण तितकेच स्पर्धक चौथ्या स्थानी राहिले आणि त्यांचं कांस्यपदक दूर गेलं.
नेमबाजीमध्ये अर्जुन बबुता, मनू भाकर, अमनजीतसिंग नरुका-महेश्वरी चौहान ही मिश्र सांघिक जोडी अशी एकूण तीन पदके थोडक्यात हुकली. तिरंदाजीमध्ये धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत ही मिश्र सांघिक जोडी चौथ्या क्रमांकावर राहिली. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनला पदकाची संधी होती, मात्र आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये खेळणारा लक्ष्य पदकापासून थोडक्यात दूर राहिला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी मीराबाई वेटलिफ्टिंगमध्ये ह्या वेळी चौथ्या स्थानी राहिली.
ऑलिम्पिकमध्ये एखादं पदक जिंकणे आणि पदकाजवळ जाऊन शेवटी पराभव पत्करणे ह्यातील फरक ह्या खेळाडूंना आता अगदी व्यवस्थित समजला असेल.
जिंकणारे खेळाडू लक्षात राहतात, हरलेले काही दिवसांत विस्मृतीत जातात. बरेचसे खेळाडू वयाचा विचार करता पुढचं ऑलिम्पिक खेळू शकतील असे आहेत. ह्या वेळी आलेल्या अपयशातून धडा घेऊन पुढील ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न आवश्यक आहेत. अपयश यशामध्ये बदलणार्या मनू भाकरचं उदाहरण सर्वांसमोर आहेच.
कटू आठवणी
निशा दहिया 68 किलो वजन गटातील कुस्ती खेळाडू आहे. पहिल्या सामन्यात तिने सहज विजय मिळवला आणि दुसर्या सामन्यातही दमदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर मनगट आणि खांदा दुखावल्यामुळे तिला प्रतिकार करण्याची ताकदच उरली नाही. इथे निशाचं खरंच कौतुक करावं लागेल, की ती याही परिस्थितीत खेळायला उभी राहिली. अखेर कोरीयन खेळाडूकडून निशा पराभूत झाली.
50 किलो वजन गटाच्या कुस्तीत अंतिम फेरीत सहजपणे प्रवेश केलेली विनेश फोगट वजन चाचणीत दिसलेल्या जास्त वजनाने स्पर्धेतून बाद झाली. तिच्या अपात्रतेचा मुद्दा देशात मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. स्पर्धेचे नियम जाचक असल्याबद्दल अनेक आजी-माजी देशी-परदेशी खेळाडूंनी आवाजही उठवला. नियमांवर भविष्यात पुनर्विचार नक्कीच होऊ शकतो, मात्र स्पर्धा सुरू असताना ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आपण निवडलेल्या वजन गटाशी संबंधित सर्व बाबींची अंमलबजावणी करणे, ही सर्वस्वी खेळाडू आणि त्याच्या मदतनीसांची जबाबदारी असते, ती झटकून चालणार नाही.
वाढीव 100 ग्रॅम्समुळे अंतिम फेरीत पोहोचलेला खेळाडू अपात्र ठरणे हे नक्कीच निराशाजनक आहे.
दोन वेळची कनिष्ठ गटातील जागतिक विजेती असलेल्या अंतिम पांघलनेही आधी स्वतःच्या खेळाने आणि त्यानंतर वर्तणुकीने निराश केलं. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अगदीच एकतर्फी पराभव तिने स्वीकारला, ही बाब खेळाचा भाग म्हणून एक वेळ सोडून देता येईल, मात्र त्यानंतर तिच्यावर झालेली नियमभंगाची कारवाई काहीशी संतापजनक होती. स्वतःच्या ओळखपत्रावर तिने तिच्या बहिणीला ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाठवलं आणि तिथे सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं होतं. पहिल्या फेरीतील सामना संपल्यानंतर अंतिम तिची बहीण आणि प्रशिक्षक राहत असलेल्या हॉटेलमध्ये गेली आणि तिथून तिने बहिणीला स्वतःचं सामान आणण्यासाठी पाठवलं होतं. ह्या घटनेनंतर तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधून हद्दपार करण्यात आलं. ह्या प्रकरणात पुढे काही कारवाई होणार की नाही ह्याबद्दल ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही.
भारताचे क्रीडा भविष्य
पुढील ऑलिम्पिकपर्यंत आता चार वर्षांचा अवधी आहे. वर्तमानातील चुका भविष्यात होणार नाहीत ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ऑलिम्पिक जवळ आल्यावर दोन गोष्टी ठरलेल्या असतात, पहिली म्हणजे क्रिकेटशी तुलना करणे आणि दुसरी आहे आपली अफाट लोकसंख्या आणि मिळणारी मोजकीच पदके ह्या आकड्यांची तुलना. सोशल मीडियावर केल्या जाणार्या चर्चेने जर परिस्थिती बदलत असती तर एव्हाना भारत सगळ्याच क्षेत्रांत जगात अग्रस्थानी पोहोचला असता. फक्त टीका करण्यापेक्षा आपण खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काय करू शकतो, हाही विचार लोकांकडून अपेक्षित आहे.
केवळ ऑलिम्पिक ते ऑलिम्पिक स्पर्धा बघणारे जेव्हा नीरजसारख्या खेळाडूवर टीका करतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते.
ह्या स्पर्धेत महिला टेबल टेनिस खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली, त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील, त्याच वेळी पुरुष संघ मात्र सपशेल अपयशी ठरला. अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताला पदकांची अपेक्षा नसतेच; पण काही चांगले निकाल ह्या वेळी पाहायला मिळाले ज्यामध्ये 3000 मीटर स्पर्धेत अविनाश साबळे अंतिम फेरी खेळला, पुरुषांच्या 4400 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सीझन बेस्ट कामगिरी नोंदवली. उर्वरित बहुतांश खेळाडू हे पात्रता फेरीच्या टप्प्यावरच बाद झाले. अॅथलेटिक्समध्ये भारताची मजल सध्या तरी आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांपुरती मर्यादित आहे आणि इथे सुधारणेला खूप वाव आहे.
जलतरण, नौकानयन, ज्युडो, तलवारबाजी असे अनेक खेळ अजूनही बाल्यावस्थेत आहेत असं वाटतं. ह्याच खेळांमध्ये आशिया पातळीवर काही प्रमाणात यश मिळतं; मात्र जिथे खरी स्पर्धा असते अशा ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत मात्र आपले खेळाडू सहभागापुरतेच असतात; पण हळूहळू हेही चित्र पालटेल. भारतीय सैन्यदलाकडून नौकानयनसारख्या खेळांकडे विशेष लक्ष पुरवलं जात आहे, त्यामुळे उज्ज्वल भविष्याची आशा बाळगायला हरकत नाही.
आपल्याकडे अजूनही क्रीडासंस्कृती अस्तित्वात नाही. खेळण्यासाठी स्वतःहून मुलांना प्रोत्साहन देणार्या पालकांची संख्या खूप कमी आहे. ऑलिम्पिक विजेते काही आकाशातून पडत नाहीत, ते घडवावे लागतात आणि हा मार्ग सोपा नसतो.
गेली काही वर्षे ‘खेलो इंडिया’अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन मुलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. ह्या स्पर्धांमधील विजेत्यांना शिष्यवृत्तीही मिळते. आत्ताचे बरेचसे नवोदित खेळाडू ‘खेलो इंडिया’तूनच पुढे आले आहेत. सातत्याने चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंना पुढे 'TOPS' (Target Olympic Podium Scheme) अंतर्गत सर्व प्रकारचं साहाय्य केलं जातं. देशपरदेशात विविध सराव शिबिरे आयोजित होतात, काही खेळाडूंना त्यांच्या मागणीनुसार परदेशी प्रशिक्षकही पुरवला जातो. इतक्या मदतीनंतरही जर खेळाडू पदक मिळवू शकणार नसेल तर त्याचा दोष सरकार किंवा क्रीडा संघटनांना देता येणार नाही. अनेक खासगी कंपन्याही खेळाडूंना सर्वतोपरी साहाय्य करत आहेत. खेळाडूंनाही आतास्वतःच्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज आहे. ऑलिम्पिक पात्रता मिळवली म्हणजे खूप काही साध्य केलं, असं काहींना वाटतं; पण चार-चार ऑलिम्पिकमध्ये खेळल्यानंतरही नेहमीचंच रडगाणं असेल तर त्या अनुभवाचा उपयोग काय? झालेल्या चुकांमधून सर्वच खेळाडू धडा घेतील आणि आताच्या पदकविजेत्यांकडून प्रेरणा घेऊन 2028च्या ऑलिम्पिकमध्ये काही तरी चांगले बदल घडवून दाखवतील, अशी आशा करू या.
पदकविजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वांनाच त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!