युनूस, हिलरी आणि जॉर्ज सोरोस

16 Aug 2024 12:41:10


Bangladesh violence
दक्षिण आशियातील सर्व प्रदेशांत अशांतता माजवून एक वेगळा प्रदेश निर्माण करण्याचे हे दीर्घकाळाचे डावपेच आहेत. त्यामागे अमेरिकेतल्या काही संघटना आहेत. बांगलादेशात जे घडले त्यातून या कारस्थानाचा पत्ता लागतो. यासाठी त्यांना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना त्यांच्या मार्गातल्या अडसर वाटत होत्या आणि म्हणूनच अमेरिकेतल्या काही कटकर्त्यांनी त्यात लक्ष घालून त्यांना हटवले. त्यांना बांगलादेशच्या सूत्रधारपदी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस हवे होते, तेही त्यांनी घडवून आणले. यामागे नक्की काय कट-कारस्थान आहे? हे कोणते नेते घडवून आणत आहेत? याबाबत माहिती देणारा लेख.
काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याला स्वप्न पडले की, महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती; पण ती झाली नाही. अशा नेत्यांना आपल्यामुळे देश आणि महाराष्ट्र कसा वाचला, हे नेहमीच सांगायचे असते आणि त्यामुळे स्वप्नेही त्यांना तशीच पडतात. मणिपूर घडवायचा म्हणजे महाराष्ट्रात दंगली होऊ द्यायच्या आणि त्या दंगलींवर आपली पोळी भाजून घ्यायची हे ते तंत्र. त्याच वेळी नेमके बांगलादेशात तिथल्या सत्तेच्या विरोधात कारस्थान शिजत होते. बोलाफुलाची गाठ ही अशी पडली. महाराष्ट्रात मणिपूरची तयारी मात्र काही राजकारण्यांनी केलेली असल्याचा संशय दुसर्‍या एका नेत्याने बोलून दाखवला. मग मणिपूरचा विषय मागे पडला. त्यानंतर त्यांना बांगलादेश मिळाला. मग त्यांच्यातलेच काही नेते म्हणू लागले, भारताचा बांगलादेशही बनेल. म्हणजे यांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पळवून लावायची सुप्त इच्छा असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. ते पळून जाणार्‍यांतले नाहीत हा भाग निराळा; पण ते घडावे अशी मात्र या राजकीय विरोधकांची इच्छा आहे, हा भाग निराळा. खरे कारस्थान पुढेच आहे. दक्षिण आशियाचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर काय दिसते ते पाहू. म्यानमार आणि आपली ईशान्येची राज्ये, आसाम, त्रिपुरा, बांगलादेश, काश्मीरचा चीनने व्यापलेला अक्साई आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तान यांच्यातल्या सरहद्दींचे अंतर हे सगळे लक्षात घेतले तर चित्र काय आढळते? तर या सर्व प्रदेशांत अशांतता माजवून एक वेगळा प्रदेश निर्माण करण्याचे हे दीर्घकाळाचे डावपेच आहेत. त्यामागे अमेरिकेतल्या काही संघटना आहेत. बांगलादेशात जे घडले त्यातून या कारस्थानाचा पत्ता लागतो. त्यांना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना त्यांच्या मार्गातल्या अडसर वाटत होत्या आणि म्हणूनच अमेरिकेतल्या काही कटकर्त्यांनी त्यात लक्ष घालून त्यांना हटवले. त्यांना बांगलादेशच्या सूत्रधारपदी नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस हवे होते, तेही त्यांनी घडवून आणले. बांगलादेशचा प्रशासक हा नोबेल पारितोषिक विजेता आहे म्हटल्यावर सर्व जगाची हसिना हटल्याबद्दलची हळहळ संपुष्टात येईल, ही त्यांची अटकळ होती. त्यानुसारच सर्व घडले आहे.
 
 
थोडक्यात, जे मतदानातून घडू शकले नाही ते त्यांनी हिंस्र मार्गांनी घडवून आणले आहे. शेख हसिना यांना देश सोडून जायला अवघी 45 मिनिटे देण्यात आली आणि जर तसे घडले नाही, तर जे काही घडेल त्यास त्यांना सामोरे जावे लागेल, असे धमकावण्यातही आले. शेख हसिना यांच्या खुनाचे आजवर 19 प्रयत्न झाले आहेत, हे लक्षात घेता त्यांना देश सोडायला भाग पाडणारे लष्करी अधिकारीच त्यांच्या खुनाच्या कटात असल्याचे कदाचित ऐकायला मिळाले असते. त्या भारताकडे निघाल्या तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही, असे वाटत होते; पण त्यांनीच स्वत: आपण राजीनामा दिल्याचे जाहीर केलेले असल्याने त्यावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा. त्यांनी राजीनामा कोणाच्या हातात दिला हे मात्र गूढ आहे. बांगलादेशात ज्या मुहम्मद युनूस यांच्या हातात तात्पुरती सत्ता देण्यात आलेली आहे ते काही दिवसांपूर्वी न्यायालयात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोषी ठरले आहेत. ते जामिनावर असतानाच अमेरिकेचे काही प्रतिनिधी हसिना यांना येऊन भेटले आणि त्यांनी युनूस यांच्यामागे फार लचांड लावू नका, असे त्यांना बजावले होते, हे विसरता येणार नाही.
 
 
Bangladesh violence
 युनूस हे हिलरी क्लिटंन यांच्या अतिशय जवळचे
 
आता हा घटनाक्रम कसा आहे ते पाहू. मुहम्मद युनूस हे बांगलादेशातल्या या उठावाच्या वेळी देशाबाहेर होते. युनूस हे हिलरी क्लिटंन यांच्या अतिशय जवळचे. सर्व जगात उपद्व्यापी असे ज्यांचे वर्णन केले जाते ते 94 वर्षांचे गृहस्थ आणि हंगेरियन-अमेरिकन उद्योजक जॉर्ज सोरोस आणि हिलरी क्लिटंन यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे सार्‍या जगाला माहीत आहेत. सोरोस हे त्यांना आर्थिक मदत करत असतात. सोरोस आणि मुहम्मद युनूस यांचे संबंधही मैत्रिपूर्ण आहेत. सोरोस यांनी या वर्षी भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘रस’ घेतला होता आणि त्याचे रसपान अनेक राजकीय नेत्यांनी केलेले होते, अशी चर्चाही आहे. सोरोस यांच्या भेटीगाठीही बाहेरच्या देशात भारतातल्या काही राजकारण्यांनी घेतल्याची माहिती आहे. म्हणूनच असेल बहुधा नरेंद्र मोदींनी जाहीररीत्या या कारस्थानाची पाळेमुळे उखडून टाकू, असे सांगितले होते. काही वर्षांपूर्वी सोरोस, युनूस, अमर्त्य सेन हे एका व्यासपीठावर होते, हा काही योगायोग नव्हता हेही लक्षात घेतले पाहिजे.
 
 
 
मुहम्मद युनूस आणि 13 जण यांना 12 जून 2024 रोजी ढाक्यात खास न्यायालयाने दोषी ठरवले होते. हे प्रकरण त्यांच्या भ्रष्टाचाराचे होते. त्यांनी ग्रामीण टेलीकॉममधल्या कामगार कल्याण निधीमधून 20 लाख डॉलर एवढ्या रकमेचा भ्रष्टाचार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. युनूस यांना ‘मायक्रो फायनान्सिंग’साठी नोबेल मिळाल्याचा डंका सर्वत्र पिटला गेला. त्यामुळे बांगलादेशातली गरिबी जरी दूर झालेली नसली तरी मुहम्मद युनूस गबर झाले. त्यांच्या ग्रामीण टेलीकॉम कंपनीचे ग्रामीण फोन या बांगलादेशातल्या सर्वात मोठ्या मोबाइल कंपनीत 34 टक्के भागभांडवल आहे. शेख हसिना यांनी युनूस यांचा भ्रष्टाचार म्हणजे कामगारांचे रक्त पिण्याचाच प्रकार असल्याचे म्हटले होते. युनूस यांना सहा महिन्यांची शिक्षा होताच जागतिक पातळीवरल्या अनेक नेत्यांनी ही शिक्षा अवाजवी असल्याची टीका केली होती. या नेत्यांमध्ये बिल क्लिटंन, हिलरी क्लिटंन, बराक ओबामा यांचाही समावेश होता. शेख हसिना यांच्याबरोबर युनूस यांचे संबंध चांगले नसल्याने त्यांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले, असेही सांगायला त्यांनी कमी केले नाही. या सगळ्यांचे युनूस यांच्याबरोबर अतिशय मधुर संबंध राहिले आहेत, हे अमेरिकेच्या सीनेट समितीचे तेव्हाचे अध्यक्ष चार्ल्स इ. ग्रासली यांनी अमेरिकेचे तेव्हाचे परराष्ट्रमंत्री रेक्स डब्ल्यू. टिलेरसन (2017-2018) यांना लिहिलेल्या पत्रात केलेला गौप्यस्फोट सर्वात महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे होते. त्यांनी म्हटले होते की, बराक ओबामांच्या कारकीर्दीत परराष्ट्रमंत्री असणार्‍या हिलरी क्लिटंन यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर दबाव आणून युनूस यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्यावेत, असे त्यांना बजावले होते. या संबंधांची कारणे उघड करताना ग्रासली यांनी ‘क्लिटंन ग्लोबल इनिशिएटिव्ह’ या संस्थेला अडीच लाख डॉलर एवढ्या रकमेची मदत युनूस यांनी केल्याचे नमूद केले होते. त्याचबरोबर युनूस यांनी क्लिटंन फाऊंडेशनला पन्नास हजार डॉलरची मदत दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. याच्या बदल्यात हिलरी क्लिटंन यांनी युनूस यांच्या उद्योग व्यवसायास एक कोटी 30 लाख डॉलरची मदत दिली. 2011 मध्ये बांगलादेश सरकारने युनूस यांना ग्रामीण बँकेच्या संचालक मंडळावरून कमी केले. त्या वेळी सरकारने युनूस यांनी काही कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर हिलरी क्लिटंन यांनी शेख हसिना यांना भेटायला अमेरिकेच्या राजदूतास पाठवून दिले. हिलरी आणि परराष्ट्र खात्यातले आणखी एक अधिकारी चेरी मिल्स यांनी शेख हसिना यांना युनूसविरोधात तुमची पावले मागे घेतली गेली नाहीत, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असे धमकावायलाही मागेपुढे पाहिले नव्हते. अमेरिकेच्या राजदूतानेही हसिना यांना अनेक ईमेल्स पाठवून त्यांच्यावर दबाव आणल्याचे सिद्ध झाले आहे.
 
 
हसिना यांचे चिरंजीव साजिब अहमद ऊर्फ साजिब वाजेद हे अमेरिकेत असतात. त्यांची एक कंपनी अमेरिकेत काम करते. त्यांनी 2010 ते 2012 या दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकार्‍यांची अनेकदा भेट घेतली. ज्या ज्या वेळी ते भेटले त्या त्या वेळी अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या या अधिकार्‍यांनी युनूस यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली विनाकारण गोवले जात असल्याची त्यांच्याकडे तक्रार केली. ‘तुम्ही जर बर्‍या बोलाने युनूस यांच्यावरील आरोप मागे घ्यायला तुमच्या मातोश्रींना सांगितले नाहीत, तर तुमच्या कंपनीची लेखा परीक्षा ‘इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस’मार्फत करायचा आदेश देऊ,’ असे त्यांना धमकावायलाही त्यांनी कमी केले नाही. (या इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसने 2023 या एका वर्षात 4.7 ट्रिलियन डॉलर एवढी कमाई केली आहे. अमेरिकेच्या एकूण उत्पन्नाच्या 96 टक्के एवढी ती आहे.) याचाच अर्थ एका युनूस यांच्यासाठी त्यांचा जीव किती तळमळत होता हे स्पष्ट व्हावे. युनूस यांचे अमेरिकेबरोबरचे संबंध कसे होते किंवा कसे आहेत हे स्पष्ट करणारा हा पुरावा आहे. शिवाय त्यांचे सीआयए या गुप्तचर संस्थेशी संबंध कसे होते हेही बांगलादेशात उघडपणे बोलले गेले आहे. त्यांना नोबेल देण्यामागेही यातल्याच काही लोकांचा हात आहे, असेही सांगितले जाते.
 
Bangladesh violence
 
शेख हसिना यांना आपल्याविरुद्ध कारस्थान रचले जात असल्याची कुणकुण लागली होती. त्यासाठी त्यांनी 24 मे रोजी 14 राजकीय पक्षांची बैठक ढाक्यात गणभवन या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावली होती, तेथे त्यांनी आपल्याला पंतप्रधानपदावरून दूर करण्याचे कारस्थान शिजवले जात असल्याबद्दलची माहिती त्यांना दिली होती. प्रत्यक्षात त्यांना त्या पदावरून दूर केल्यानंतर त्यांनी या कारस्थानात अमेरिकेचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोटही केला. बांगलादेशातल्या निवडणुकीपूर्वी आपल्याला एक गोरी व्यक्ती (अमेरिकेची प्रतिनिधी) येऊन भेटली होती आणि तिने आपल्याला काही गोष्टी तुम्ही अमलात आणल्या, तर तुमची निवडणूक व्यवस्थित पार पडेल आणि तुम्ही पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर विराजमान व्हाल, असे सांगितले होते. त्यात प्रामुख्याने पूर्व तिमोरसारखा एक ख्रिश्चन प्रांत बनवायला त्याने सांगितले होते. (इंडोनेशियाच्या एके काळच्या या प्रदेशात सध्या 99.53 टक्के ख्रिश्चन राहतात.) बांगलादेशातला छत्तोग्राम आणि म्यानमारचा काही भाग जोडून हा नवा प्रदेश बनावा, असे त्याचे म्हणणे होते. त्याची पहिली पायरी म्हणून बंगालच्या उपसागरात सेंट मार्टिन बेटावर एक हवाई धावपट्टी बनवायची मागणीही त्याने केली होती. याहीपुढे त्याने जाऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या असाव्यात, की ज्यामुळे त्या म्हणाल्या, की माझे वडील शेख मुजिबूर रहमान यांच्याप्रमाणेच आपल्यालाही मृत्यू येईल, अशी दाट शक्यता आहे. शेख मुजिबूर रहमान यांच्याविरुद्ध झालेल्या लष्करी उठावात त्यांना आणि त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला ठार करण्यात आले होते. त्यांच्या दोन मुली केवळ वाचल्या, कारण त्या देशाबाहेर होत्या. या मुलींपैकी एक अर्थातच शेख हसिना या होत.
 

Bangladesh violence 
 
निवडणुकीनंतर शेख हसिना या पंतप्रधान बनल्या. त्यापाठोपाठ लगेचच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. बांगलादेशाच्या क्रांतियुद्धात आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या मुलाबाळांसाठी आरक्षण दिले जात होते. ते पुढेही तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत चालू राहिले. ते शेख हसिना यांच्याच सरकारने रद्द केले. इतक्या वर्षांनंतर हे असे आरक्षण ठेवणे हे योग्य नसल्याचे त्यांचे आणि त्यांच्या पक्षातल्यांचे मत बनले. ते रद्द झाले, तर ते बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा चालू केले. विद्यार्थी त्याविरोधात चवताळून उठले आणि रस्त्यावर आले. हे सगळे अगदी ठरवून केल्यासारखे झाले. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्या आणि बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया या तुरुंगात होत्या. बांगलादेशात मुहम्मद युनूस यांची राजवट सुरू होताच त्या सुटल्या; पण त्यापूर्वी त्यांचा चिरंजीव तारिक रहमान हा तिसर्‍या देशात जाऊन पाकिस्तानच्या आयएसआय अधिकार्‍यांना भेटला होता. तो बांगलादेशात ‘इंडिया आऊट’ चळवळ चालविणारा नेता आहे. बांगलादेशातल्या जमात ए इस्लामीची आघाडीची एक संघटना हिफाजत ए इस्लाम आहे. तिचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असतो. हसिना देशाबाहेर पडताच हिंदूंच्या विरोधात जो हिंसाचार झाला, त्यात आतापर्यंत पाचशेवर लोक मारले गेले आहेत. त्यात ही संघटना आघाडीवर होती. या संघटनेच्या नेत्यांना अमेरिकेच्या दूतावासात काम करणारे प्रमुख अनेकदा भेटत असतात हे विसरता येणार नाही. हिंदूंच्या विरोधात झालेल्या आंदोलनात जे मारले गेले त्यांच्याविषयी युनूस यांनी कोरडी सहानुभूतीही दाखवलेली नाही; पण शेख हसिना यांच्याविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात जो पहिला विद्यार्थी नेता मारला गेला, त्या अबू सय्यीद याच्या घरी रंगपूरला मुहम्मद युनूस जाऊन आले, हेही न दुर्लक्ष करता येण्याजोगे. हसिना यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारा 26 वर्षीय विद्यार्थी नेता नाहिद इस्लाम हा मुहम्मद युनूस यांचा आता सहकारी आहे.
Powered By Sangraha 9.0