बांगलादेशचा धडा

16 Aug 2024 12:37:54
आपले भविष्य आणि सुरक्षितता आपण कोणत्या प्रकारचे सरकार सत्तेवर आणतो त्याच्या गुणवत्तेवर आणि प्रतिबद्धतेवर अवलंबून असते. लोकसभा निवडणुकांत या मायावी मुखंडांचा डाव थोडक्यात हुकला; पण आता आगामी विधानसभा निवडणुकांत जनतेला भूलथापा मारून सत्ता काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे पार धुळीत मिळवण्याचा विचार सुज्ञ मंडळींनी केला पाहिजे. बांगलादेशने दिलेला हाच धडा आहे.
 
vivek
 
भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि तेथील पंतप्रधान शेख हसिना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. मात्र लागलीच तेथे हिंदूविरोधी हिंसाचाराचा आगडोंब उसळला, हा काही निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. आता तेथे अंतरिम सरकार आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा बहाल करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मात्र तेथील पोलीस महानिरीक्षक मोहम्मद इस्लाम सांगतात की, हिंसाचारात किमान 49 पोलीस ठार झाले व अनेक जखमी झाले. पोलीस पुन्हा कामावर येण्यास घाबरत असल्यामुळे कर्मचार्‍यांची कमतरता जाणवत आहे. जेथे हिंसक आंदोलकांनी पोलिसांनाही सोडले नाही तेथे सामान्य हिंदू नागरिकांवर किती बाका प्रसंग गुदरला असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. किती हिंदू यात ठार झाले, किती जखमी झाले, किती लोकांच्या मालमत्ता लुटण्यात आल्या आणि आगीच्या हवाली करण्यात आल्या, किती महिलांवर बलात्कार आणि त्यांची निर्दय कत्तल झाली याची आकडेवारी समोर येणे बाकी आहे. तेथील हिंदू मंदिरांचीही तोडफोड करून त्यांना आगी लावण्यात आल्या आहेत. सरकारविरोधातील असंतोषाने हिंदूंविरोधी हिंसाचाराचे उग्र रूप कसे धारण केले, याचा शोध घेण्याची आणि तेथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला न्याय मिळवून देण्याची खरी आवश्यकता आहे.
 
हिंदूंनी ढाका व चितगाव येथे तीव्र निदर्शने केल्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात हिंदूंशी संवाद साधला; पण ही वरवरची मलमपट्टी म्हणावी लागेल. आम्ही अपयशी ठरलो तर टीका करा, असे आवाहन त्यांनी केले. मुसलमान, हिंदू, बौद्ध ही आपली ओळख नसून ’मानव’ हीच आपली ओळख आहे, असा दिखाऊ मानवतेचा उमाळा युनूस यांनी याप्रसंगी आणला. हिंदूंचा एवढा नरसंहार झाल्यानंतर विद्यमान प्रमुख म्हणून हिंदू समाजाच्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी मानवतेचा मुखवटा घालून जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार होय. इतके दिवस दानवांनी थैमान घातले तेव्हा हा मानवतावादी दृष्टिकोन कोठे परागंदा झाला होता?
 
पुन्हा हेच युनूस वंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या लाडक्या कन्येची देशातून हकालपट्टी घडविल्यानंतर, त्यांचे पुतळे फोडून मग मुजिबुर यांच्या भूतकाळातील हत्याकांडाची स्मृती म्हणून 15 ऑगस्ट रोजी ’राष्ट्रीय शोक दिवस’ पाळण्याची घोषणा शहाजोगपणे करतात. खरे तर भारताला शत्रुस्थानी मानणार्‍यांनी खुनशीपणे भारताच्या स्वातंत्र्य दिनालाच हे हत्याकांड केले होते. देशबांधवांना धीर आणि विश्वास देण्याचे कर्तव्य समोर असताना युनूस यांना भारतविरोधच आठवतो, हे दुर्दैव! येथे हे लक्षात घ्यावे की, पंतप्रधान मोदी यांनी 14 ऑगस्ट 2021 रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्याची घोषणा केली होती. देशाच्या फाळणीची वेदना, तेव्हा हिंदूंनी केलेला संघर्ष आणि त्यात बलिदान झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण याबाबत जागरण घडवून नवीन पिढीने बोध घ्यावा, अशी यामागची भूमिका आहे. बांगलादेशातील घटनाक्रम आपल्याला दर्शवितो की, तेथील हिंदू समाज आज दुर्दैवाने या फाळणीकाळातील यातना प्रत्यक्ष जगत आहे. फाळणीच्या वेळी त्या भागातील हिंदू भारतात आले नाहीत, कारण तेव्हाच्या भारतीय नेतृत्वाने त्यांच्या हितरक्षणाची ठाम भूमिकाच घेतली नव्हती. निर्वासित होण्यापेक्षा नाइलाजाने हिंदू आहे त्या परिस्थितीत तेथेच राहिले; पण त्यामुळे त्यांचे हाल आणि हलाखी संपली नाही. सातत्याने हिंसा करत हिंदूंची लोकसंख्या घटविण्याचा एककलमी कार्यक्रम बांगलादेशात राबविला गेला. खच्चीकरण झालेल्या हिंदूंमध्ये कधी एकवटून जुलमाविरुद्ध उभे राहण्याचे बळच राहिले नाही. संघटित आणि सामर्थ्यसंपन्न झाल्यावाचून आपली दुष्टचक्रातून सुटका होणार नाही, ही जागृती त्यांच्यात आली नाही.
 
भारतातील मुस्लीम समाज कोणत्याही भागात संख्येने कितीही का असेना तो याबाबत कायम जागृत व आग्रही असतो. महाराष्ट्रातीलच उदाहरण पाहा. मुंबईत मूठभर अल्पसंख्याक जेव्हा उबाठा सेनेला मतदान करतात तेव्हा वक्फ बोर्डावर ठोस भूमिका घेण्याऐवजी संसदेतून उबाठा सेना खासदारांचे पलायन का झाले? याचा जाब विचारण्यासाठी थेट मातोश्रीवर मोर्चा काढण्यात आला; पण बांगलादेशसारख्या देशात ज्याच्या संविधानाने तो सेक्युलर देश असल्याचे अभिवचन दिले आहे व हिंदू आणि बौद्ध समाजाला उपासना स्वातंत्र्य प्रदान केले आहे, तेथे हिंदूंची केवळ ससेहोलपट आणि दुर्दशा आहे, याचे धगधगते वास्तव आज जगापुढे आले आहे. आता हिंदू समाजाची संख्या इतकी नगण्य झाल्यावर तेथील संसदेत दहा टक्के जागा आरक्षित करा, ही मागणी तिथे जोर धरत आहे.
 
या सगळ्या घटनाक्रमातून मिळणारा धडा केवळ बांगलादेशातील हिंदूंनीच शिकणे आवश्यक नाही, तर भारतीय हिंदू समाजाने त्याचा योग्य तो बोध घेतला पाहिजे. बांगलादेशात जे घडले ते भारतात घडेल आणि भारतीय पंतप्रधानांना येथून पळ काढावा लागेल, असे अकलेचे तारे तोडणारे असोत किंवा महाराष्ट्रात मणिपूर घडेल तसेच हे सरकार उलथून टाका, असे आवाहन करणारे ‘पॉवर’बाज नेते असोत, हे केवळ नामधारी हिंदू कशाच्या जोरावर बरळतात याचा सुज्ञ जनतेने विचार करावा. भारतात लोकशाही आहे व जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपला कार्यक्रम जनतेसमोर ठेवून त्याच्या आधारावर मत मागणे, हा सर्वमान्य शिरस्ता आहे. तसे असताना, राजकारणाचा राजमार्ग सोडून देशातील कायदा व सुव्यवस्थेला नख लावण्याचे उपद्व्याप करणार्‍यांना राजकारणी कसे म्हणावे?
 
जी जिहादी कीड पोसण्यासाठी हे हिंदू मुखंड आज आपले बुद्धिचातुर्य वापरत आहेत आणि हिंदू समाजात फाटाफूट घडवून आणत आहेत, त्यांनी भविष्यात हा डाव आपल्यावरच उलटू शकतो याची जाणीव ठेवावी. हिंसा घडविताना जे जिहादी आपल्याच जातीधर्माच्या आणि रक्ताच्या, देशातील सर्वोच्च पदावरील महिलेची अंतर्वस्त्रे फडकवीत उन्माद साजरा करतात, वंगबंधू शेख मुजिबुर रहमान आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्यावर आघात करताना जराही कचरत नाहीत, अशा जिहादींसाठी या मुखंडांची ओळख आता व नंतरही फक्त एक ’हिंदू’ म्हणजेच ’काफीर’ अशीच राहणार आहे. त्यामुळे हा जिहादी भस्मासुर त्यांनी चेतविला, तर पंतप्रधान मोदींसारख्या देशभक्तांना नव्हे, तर या मुखंडांनाच येथून पळ काढण्याची नौबत येऊ शकते. कदाचित तसा पळ काढण्याचीसुद्धा या मुखंडांची तयारी असावी. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेने या ’मायावी’ मारिचांच्या मागे लोभाने धावण्यात काहीच हशील नाही हे समजले पाहिजे. आपले भविष्य आणि सुरक्षितता आपण कोणत्या प्रकारचे सरकार सत्तेवर आणतो त्याच्या गुणवत्तेवर आणि प्रतिबद्धतेवर अवलंबून असते. लोकसभा निवडणुकांत या मायावी मुखंडांचा डाव थोडक्यात हुकला; पण आता आगामी विधानसभा निवडणुकांत जनतेला भूलथापा मारून सत्ता काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे पार धुळीत मिळवण्याचा विचार सुज्ञ मंडळींनी केला पाहिजे. बांगलादेशने दिलेला हाच धडा आहे.
Powered By Sangraha 9.0