कोकणात संघ रुजला त्यामध्ये अनेक स्वयंसेवकांचे योगदान आहे. त्याचपैकी एक होते ते म्हणजे तळकोकणातील प्रताप देवराम केनवडेकर! घरची कोणतीही संघाची पार्श्वभूमी नसताना केनवडेकर यांनी आपला व्यवसाय संभाळून तळकोकणात संघविस्तार केला. संघाच्या अनेक जबाबदार्या पार पाडल्या आहेत. अशा अनेक स्वयंसेवकांमुळे आज संघ शंभरीत प्रवेश करत आहे. देवराम केनवडेकराच्या आठ अपत्यांतील प्रताप हे तिसरे अपत्य होते. जन्म सावंतवाडीत दि. 13 ऑगस्ट 1944 ला झाला. सावंतवाडीतच दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. मोठ्या कुटुंबात प्रत्येकाने कमाई करावी, ही गरजच असते. शिक्षण थांबवून अर्थार्जनासाठी यांची रवानगी मालवणला झाली, हाच त्यांच्या आयुष्यातील खर्या अर्थाने वळण देणारा प्रवास ठरला... मालवणमधूनच प्रचारक म्हणून बाहेर पडलेले राजाभाऊ भोसले यांचा परिसस्पर्श झाला आणि प्रतापराव संघमय झाले. त्यानंतर हळूहळू सर्व केनवडेकर कुटुंब संघाचे झाले आणि आता तो वारसा पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचला आहे. अशा या संघसमर्पित प्रतापराव देवराम केनवडेकर यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेखप्रपंच...
मागील पन्नास वर्षांतील सिंधुदुर्गातील, विशेषतः मालवणातील संघकाम व संघ कार्यकर्ते यांच्यावर प्रतापराव यांच्या छाप आहे. असे विधान करणे धाडसाचे होईल. कारण संघकार्य हे एकट्या व्यक्तीचे कार्य नाही; त्यामुळेच घडलेला कार्यकर्ता एका व्यक्तीमुळे घडला, असे म्हणणे योग्यही नाही; पण डॉ. सुभाष मधुकर दिघे, श्रीधर काळे, गोखले सर, शेवडे सर, गणेश माणगावकर, पद्मनाभ झांट्ये, विलास हडकर अशी असंख्य कार्यकर्त्यांची मांदियाळी आहे, की ज्यांनी पुढे जाऊन तालुका, जिल्हा, विभाग व प्रांताचीही संघ जबाबदारी पेलली. अशांना सुरुवातीला प्रत्यक्ष संघकाम बघता आले प्रतापरावांसोबत राहूनच.
प्रतापरावांचे लौकिक शिक्षण जेमतेमच होते. अनेक शारीरिक शिक्षणप्रमुखांकडे नसलेले शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमातील कौशल्य त्यांच्याकडे संघ शिक्षा वर्ग न होताच होते. शाखा चालवण्याचे मुख्य शिक्षकाचे कसब त्यांच्याकडे होतेच; पण खेळ घेणे हा त्यांचा विशेष हातखंड्याचा विषय होता. 100-100 तरुणांचे सांघिकही ते हाताळत असत. घोष हा त्यांच्या आवडीचा विषय होता. जुन्या मालवणकरांना आजही प्रतापराव केनवडेकर म्हटल्यावर लीलया- घोषदंड हाताळत घोष पथकासमोर चालणारा रुबाबदार गणवेशधारी प्रतापच आधी समोर येतो.
नित्य स्वयंसेवक घोषवाद्य वाजवणारा व्हावा यासाठीही त्यांचे प्रयत्न असत. मालवण शाखेचा पहिला घोष उभा राहिला तो प्रतापरावांच्या प्रयत्नातून. तळजाई शिबीर, खर्चातील शिल्लक रकमेतून पहिली वाद्ये खरेदी केली गेली. इ.स. 2000 पर्यंत सातत्याने मालवणचे संचलन संघोषच झाले. एका अर्थाने प्रतापरावांमुळे सर्व केनवडेकर स्वयंसेवक झाले. तसेच त्यांच्याचमुळे त्यांचे बंधूसुद्धा घोषवादक झाले.
इ. दहावीपर्यंत शिक्षण मुंबईतच घेतलेली कु. इंदू चिखलकर सौ. शुभदा बनून प्रतापरावांची सहचारिणी बनली दि. 21 मे 1971 ला. मुंबईकर असून दूर कोकणात मालवणसारख्या तुलनेत लहान गावात त्या स्थायिक झाल्या. संघ कार्यकर्त्याची बायको होणे, ही सोपी गोष्ट नाही. दोन-दोन वेळा सलग जेवायला घरी न येणारा नवरा अचानक चार जणांना घेऊन उशिरा रात्री घरी येतो आणि यांनाही जेवायचे आहे सांगतो, तेव्हा त्या माऊलीची काय अवस्था होत असेल याची केवळ कल्पनाच करणे शक्य आहे. त्यातही गाव मालवणसारखे आणि 1970-80 चा कालावधी. म्हणजे संध्याकाळी सात-साडेसातनंतर एक दुकान उघडे सापडणे अशक्य. कोल्हापूरहून मालवणला येणारी शेवटची एसटी बस- लाल गाडी तेव्हा मालवण स्टँडला पोहोचायची जवळपास रात्री 12 वाजता. प्रांत कार्यालयातून - मोतीबागेतून किंवा कोल्हापूर, कणकवलीतून येणारा एखादा स्वयंसेवक - कार्यकर्ता जर त्या गाडीतून उतरला तर पोटाला आधार आणि झोपेला निवारा म्हणून प्रतापरावांचेच घर असायचे. रात्री 12 लाही या माऊलीने काही न बोलता डाळभात करून वाढावा आणि मगच त्याने अंथरुणाला पाठ टेकवावी, ही प्रथाच जणू होती.
नव्वदच्या दशकात ’सिंधुदुर्ग’ जिल्हा शासकीय स्तरावर निर्माण झाला तरीही संघरचनेत मूळ रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग-सावंतवाडी जिल्हा या नावाने अस्तित्वात होता. शासन स्तरावर याचे नामकरण सिंधुदुर्ग झाले. त्या वेळचे जिल्हा कार्यवाह होते कै. अरविंदराव रानडे. यांच्या मालवण प्रवासात त्यांनी प्रतापरावांवर जबाबदारी सोपवली, की तळजाई, पुणे येथे होणार्या प्रांतस्तरीय शिबिरात मालवणमधून एक पूर्ण बस गेली पाहिजे. त्या वेळची संघकार्य स्थिती पाहाता ही फार अवघड स्थिती होती; पण पद्मनाभ झांट्ये, डॉ. दिघे, गोखले सर, शेवडे सर, श्रीधर काळे, गीरसागर सर अशांना कार्यप्रवण करत त्यांनी लक्ष्य साध्य केले. तेव्हा महाशिबिरातून संघदर्शन घडवलेल्या साठ जणांपैकी अनेकांना प्रतापरावांचे झपाटलेपण आजही आठवते.
संघकाम करत असताना एक कार्यक्रम यशस्वी केला, की स्वाभाविकच आणखी मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी त्याच कार्यकर्त्याना दिली जाते. हेतू दोन- एक म्हणजे मोठा कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि दुसरे असे कार्यकर्ते घडावेत.
इथेही तेच घडले. प्रतापराव आणि त्यांच्या मालवणकर सहकार्यांनी तळजाई शिबिरासाठीची आपली जबाबदारी पार पाडली. त्यानंतर जिल्हा शिबिराचे यजमानपद मालवणकडे चालून आले. सिंधुदुर्ग जिल्हा शिबीर इतिहासातील एक भव्य शिबीर म्हणून आजही अनेकांच्या लक्षात आहे. ’रेकोबा, वायरी, मालवण’ येथील शिबीर. उभारणी प्रमुख त्यावेळी पद्मनाम झांट्ये आणि व्यवस्थाप्रमुख प्रतापराव केनवडेकर होते. रेकोबा हायस्कूलची परवानगी असो वा 945 जणांचे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यापर्यंत प्रतापरावांचे कार्यकर्ता कौशल्य केवळ अभूतपूर्व होते...
प्रतापराव उत्तम आचारी होते. मा. सरकार्यवाह हो. वे. शेषाद्री यांच्या मालवण प्रवासात स्थानिक पदार्थ ’धोंडास’ स्वतः बनवून त्यांनी सरकार्यवाह यांना खायला घातला होता. तसेच शेषाद्रीजींनी करपोळीसह तो अतिशय आवडीने खाल्ला होता.
शारीरिक कार्यक्रम, व्यवस्थात्मक काम यात कौशल्य असलेला हा देवदुर्लभ कार्यकर्ता वक्ता म्हणूनही प्रभावी होते. अनेक विषयांचा स्वतःचा अभ्यास असल्यामुळे उत्तम विचारमांडणी ते करू शकत; पण सहज गप्पा, चर्चा यातून ते संघ अधिक रंजकपणे मांडत. याचमुळे असेल कदाचित; पण त्यांचे दुकान हा गप्पांचा अड्डाच असे. संपर्क- परिचय- मैत्री- स्वयंसेवक-कार्यकर्ता हा क्रम त्यांच्या एकदम अंगवळणी पडलेला होता. गावात नवीन आलेल्या कोणाचीही पहिली भेट प्रतापराव केनवडेकर यांच्या चप्पल दुकानातच होत असे. अनेक गरीब गरजूंना प्रतापराव मोफत चप्पल देत असत. दुकानात असताना येणार्या-जाणार्या मालवणकरांशी रंजक गप्पा मारत संघ समजावून सांगण्याचे त्यांचे काम चालूच असायचे. यातून अख्ख्या मालवणशी त्यांचे नाते जोडलेले होते. गप्पातून संघ ते समजावून देऊ शकत होते, उत्कृष्ट विषय मांडणीदेखील करीत होते. तरीही विविध जागी बौद्धिक विषय मांडणीलाही विविध व्यक्तींची रचना करत असत. गोखले सरांना बौद्धिकासाठी त्यांनी किती ठिकाणी आपल्या गाडीवरून फिरवले असेल याची गणनाच नाही. फक्त शाखा आणि संघकार्यातच नाही; अनेक संस्था, शाळा यातूनही बौद्धिक कार्यक्रमांची आखणी त्यांनी अनेक वेळा केली. दिनविशेष लक्षात घेत तशा कथा किंवा विषय मांडणीसाठी केनवडेकर घेऊन जात होते, अशी आठवण आजही गोखले सर सांगतात.
उच्चशिक्षित नसतानाही सर्वांनी वाचते व्हावे यासाठीचे त्यांचे प्रयत्न शिवाजी वाचन मंदिररूपाने आज मालवणकरांसमोर आहेत. राजाभाऊ भोसले यांच्या पिताजींनी स्थापन केलेले आणि आज शंभरी पार केलेले शिवाजी वाचन मंदिर एक काळ प्रतापराव केनवडेकर यांनी तेव्हाचे बौद्धिक प्रमुख मारुतीराव खोत यांच्यासह घराघरांतून वर्गणी गोळा करत चालू ठेवले होते. बौद्धिक विषय आणि एकूणच संघकाम याबाबत प्रतापरावांवर मा. दामुअण्णा दाते, मा. बाबाराव भिडे, आ. शिवरायजी तेलंग, दुर्गानंद नाडकर्णी, राजाभाऊ भोसले आदींचा पगडा होता. बाबाराव किंवा दामुअण्णा यांनी बैठकीत एखादा विषय मांडला की तंतोतंत तसाच मालवणला व्हावा, हा त्यांचा प्रयत्न असे.
मालवणमधून प्रचारक म्हणून बाहेर पडलेल्या राजाभाऊ भोसले यांचे घर, त्यांची मातोश्री यांची काळजी मालवणमधील स्वयंसेवकांनीच घेतली पाहिजे, ही जाणीव प्रतापराव नकळत करून देत असत.
सहजता आणि साधेपणा हा त्यांचा सर्वत्रच गुणविशेष राहिला आहे. याचे वारंवार दर्शन घडले आहे. संघकामात मोठ्या जबाबदार्या पेलायला लागल्यावर; तसेच व्यवसायात नाव कमावल्यावरचा एक प्रसंग आहे. एकदा शाखावेशात प्रतापराव कोणासाठी तरी बस स्थानकावर उभे होते. बाहेरगावच्या बसमधून एका आजीबाईंना प्रवास करायचा होता. त्या हमालाची वाट पाहात होत्या. प्रतापराव दिसताच त्यांनी लगेच त्यांना सामान टपावर चढवायला सांगितले. कंडक्टर गडबड करत असल्याने आजी बसमध्ये जाऊन बसल्या आणि नंतर खिडकीतून ’या’ हमालाला त्याची हमाली देण्यासाठी हाक मारू लागल्या. वस्तुस्थिती समजताच त्या खजील झाल्या; पण प्रतापराव सामान बसवर चढवून केव्हाच आपल्या मार्गाला लागले होते. यातून त्यांचे साधेपणा दिसून येतो.
महाराष्ट्रात सामाजिक समरसता मंचाचे काम सुरू झाल्यावर सिंधुुदुर्ग जिल्ह्यातून या कामासाठी दिल्या गेलेल्या पहिल्या कार्यकर्त्यांत प्रतापराव होते. काही काळ समरसता मंच जिल्हा संयोजक अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती. सर्व ज्ञाती सहभागी करणारा पहिलाच कार्यक्रम त्यांनी मालवण शहरातच योजला तो सत्यनारायण महापूजेचा. एकवीस दाम्पत्य एकवीस ज्ञातींतील त्यांनी त्यासाठी तयार केली. सर्वांचे एकत्र सहभोजनही स्वाभाविकपणे झाले.
मंदिरप्रवेश हा कोकणातील काही ठिकाणी अजूनही समस्येचा विषय आहे. त्या वेळी तर आणखी गंभीर विषय होता. मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या मंदिरात सर्वच ज्ञातींना प्रवेश मिळावा यासाठी प्रतापराव यांनी पुढाकार घेतला होता.
श्रीमद् शंकराचार्य यांच्या मालवणातील आगमनप्रसंगी त्यांची पाद्यपूजा प्रतापराव व शुभदा वहिनी यांच्या हस्ते झाली होती. शंकराचार्य व त्यांचे सोवळेओवळे लक्षात घेता तथाकथित निम्न ज्ञातीत जन्मलेल्या प्रतापराव यांना ही संधी मिळेल का, याबाबत शंका प्रगट केली जात होती. तिथेही संघविचाराने ठाम असलेले प्रतापराव कार्यकर्त्यांनी अनुभवले.
जर मला अशी संधी मिळाली नाही, तर अजून जोमाने संघकार्य करण्याची आवश्यकता आहे एवढेच मी म्हणेन, असे त्यांचे विधान होते.
अयोध्येतील राम मंदिरसंदर्भातील जनजागृतीच्या सर्वच अभियानात त्यांनी मनापासून सहभाग घेतला. सर्व अभियाने मालवण तालुक्यात यशस्वी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पू. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात तालुक्यात 17 गावी शाखा लागणे यामागे त्यांची योजकता होती. त्याच वर्षी तालुक्यातील साठपैकी 45 गावांत रक्षाबंधन कार्यक्रमही त्यांच्याच प्रवासचक्रामुळे होऊ शकले.
नंतरच्या काळात महाराष्ट्रात निघालेली फुले आंबेडकर विचारयात्रा- मालवणातही या यात्रेचे एकाच वेळी दोन स्थानी पूर्ण यशस्वी कार्यक्रम प्रतापराव केनवडेकर यांच्यामुळे झाले होते.
प्रतापराव केनवडेकर यांनी संघ जबाबदार्या स्वीकारल्या आणि यशस्वीपणे पार पाडल्या. तशाच अन्य संस्थांतही ते सक्रिय राहिले. तिथेही सोपवलेल्या जबाबदारीला त्यांनी पूर्ण न्याय दिला. काही वर्षे त्यांच्या ज्ञातीसंस्थेचे- चर्मकार समाजाचे जिल्हा अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. दलित योजनांचा फायदा आमचा समाज घेत नाही आणि त्यामुळे समाजाची प्रगती होत नाही, असे त्यांचे म्हणणे असे.
प्रतापराव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष पददेखील सांभाळले होते. तसे ते जिल्हा व्यापारी संघाचे संस्थापक सदस्यदेखील होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांचे विक्री कर आयुक्तांशी उत्तम संबंध होते. विक्री कर विषयातील व्यापारी वर्गाची भीती घालवण्यासाठी त्यांनी त्या संदर्भातील शिबिरांची आखणी केली होती. व्यापार्यांच्या हक्काविषयी त्यांनी जागृती केलीच; पण व्यापार्यांच्या जबाबदार्या व कर्तव्ये याविषयीदेखील ते आग्रही होते. अन्न भेसळ, तसेच वजन मापे याविषयी कायद्यांचे पालन करण्यासाठी ते आग्रही राहात. व्यापारी कुटुंबे एकत्र यावीत यासाठी त्यांच्याही कौटुंबिक सहलींचे ते आयोजन करीत. जिल्हा व्यापारी वार्षिक संमेलन स्थानाला मरणोत्तर त्यांचे नाव देऊन त्यांच्या व्यापारीविषयक उत्तम कार्याचा गौरव जिल्हा व्यापारी संघाने केला आहे.
समाजकार्यात सक्रिय राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या घरात या कार्याविषयी अनास्था किंवा राग राहतो असा अनेक वेळा अनुभव येतो; पण प्रतापराव यांचे वेगळेपण येथेही उठून दिसणारे. प्रतापराव-शुभदा दाम्पत्याला चार अपत्ये. दोन मुलगे- विजय व विद्याधर आणि दोन कन्या- विनंती व रंजिता. सर्वच विविध सामाजिक कार्यांत आजही अग्रेसर आहेत. मुलांनी राजकारणात पडू नये, असा त्यांचा आग्रह होता. आज विजय केनवडेकर एका शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत व वडिलांचा चप्पल दुकानाचा व्यवसाय अधिक जोमाने चालवत आहेत. विद्याधर केनवडेकर पत्रकार व संगणक व्यावसायिक आहेत. विनंती स्वतः डॉक्टर झाल्या व डॉक्टर पतीसह गोव्यात वैद्यकीय सेवा देत आहेत. रंजिता क्लासेस चालवतात आणि नगरसेवक पतीच्या राजकीय वाटचालीतील भागीदार आहेत. सौ. शुभदा वहिनी प्रतापराव यांच्या सहवासाने असंख्य कार्यकर्त्यांच्या माता-भगिनी झाल्याच; पण नंतर प्रत्यक्ष राष्ट्र सेविका समिती कार्यातही कार्यरत झाल्या.
अशा अष्टपैलू प्रतापराव यांचे देहावसान दि. 28 ऑगस्ट 2002 रोजी झाले. त्यांच्या निधनाला वीस वर्षे होऊन गेली तरीही किती तरी कुटुंबांत आजही त्यांची आठवण काढली जाते. संघकामात आणि कार्यकर्त्यांना त्यांची आठवण होणे तुलनेत स्वाभाविकच म्हटले पाहिजे; पण कुटुंबातील अन्य सदस्य, विशेषतः माता-भगिनी त्यांची आठवण काढतात यात त्यांच्या आयुष्याचे सार्थक आहे असे वाटते.