प्रा. संध्या केळकर लिखित, संपादित ’चित्र सौंदर्य - बोध आणि विचार’ या पुस्तकात कलानिर्मिती प्रक्रिया अतिशय सोपी करून सांगितली आहे. हे पुस्तक कलासाधक व कलारसिकांनादेखील विचारप्रवृत्त करेल. समाजात विविध कला, कलाकार व कलाकृतींविषयी जाणीव निर्माण करून कलासाक्षरता घडवून आणणे, हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय व पाश्चिमात्य चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृतींच्या आधारे त्यांनी कलावैशिष्ट्ये व सौंदर्याचे महत्त्व विशद केले आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक येथील एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या चित्रकला विभागात प्रा. संध्या केळकर यांनी 30 वर्षे कला अध्यापनाचे कार्य केले. या कलाशिक्षणाच्या अनुभवातून त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढली. हे संचित इतरांना उपयुक्त ठरावे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. स्वतः चित्रकर्ती असल्याने विद्यार्थिदशेपासून आलेल्या समस्या, त्यावर केलेली मात, अनेकांकडून मिळालेले मार्गदर्शन, स्वतःची कला वाटचाल, त्याच वेळी एका कलाशिक्षकाच्या नजरेतून केलेले अवलोकन यांचे अनुभूतीपूर्ण सार म्हणजे ’चित्र सौंदर्य - बोध आणि विचार’ हे पुस्तक ठरावे. मनोगतात लेखिका म्हणते की, चित्रकलेचे शिक्षण घेताना नेमके सौंदर्य चित्रातून उतरविण्याचे हमखास तंत्र शिकून आत्मसात करणे गरजेचे असते. कलेचे शिक्षण घेताना विविध टप्पे काळजीपूर्वक अभ्यासावे. चित्रकाराचा खरा परिचय त्याच्या कलाकृतीतून होतो. म्हणून प्रत्येक कलाकृती नावीन्यपूर्ण, परिपूर्ण असेल असा प्रयत्न असावा, असे सांगून लेखिकेने पाश्चिमात्य व भारतीय सौंदर्यविचारांचा, साम्य-भेदांचा ऊहापोह केला आहे. आम्हाला चित्र समजत नाहीत, या सार्वत्रिक आरोपाला उत्तर देताना चित्र कसे बघावे याची मांडणी लेखिका करते.
ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रेय पाडेकर अभिप्राय संदेशात म्हणतात की, कलासाक्षरता विकसित झाली, तर कलारसिक व कलाआस्वादक यांच्यात एक नाते निर्माण होईल. त्यासाठी हे पुस्तक प्रेरणा देते. संस्कार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष व ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात, कलेची व्याख्या किंवा परिभाषा पाठ करून कलानिर्मिती करता येत नाही. निर्मिती, आस्वाद ही सहज प्रक्रिया आहे. पुस्तकात लेखिकेने चित्रकलेबरोबरच साहित्य, काव्य, संगीत, नाट्य, शिल्प यांची सांगड घालून विविध उदाहरणे दिली आहेत. ती वाचकांचे प्रबोधन करतील. सामान्यत: चित्रकलेचे विद्यार्थी सहसा थिअरीचा कंटाळा करतात. त्यांनी या पुस्तकाचा अभ्यास केला तर त्यांची पायाभूत विचारसरणी पक्की होईल. अधिकृत पाठ्यपुस्तकाची जागा हे पुस्तक घेईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. प्रा. केळकर यांनी सौंदर्यानुभव, विविध ललितकलांचा परस्परसंबंध, चित्रभाषा व तिचे सौंदर्य, चित्र संयोजन, षडांग सिद्धांत अर्थात चित्ररचनेचे तत्त्व, भारतीय विचारधारा आणि सौंदर्यपूर्ण कलानिर्मिती, भारतीय कलांच्या रचनेतील सौंदर्यविचार, सौंदर्यविषयक समकालीन विचारधारा, अनेक पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांच्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. ते लिहिताना विषयच क्लिष्ट असल्याने काही ठिकाणीदुर्बोधता येणे अपरिहार्य ठरते. तो दोष लेखिकेला देता येणार नाही.
ज्येष्ठ चित्रकार (कै.) रवि परांजपे लेखिकेचे सासरे, गुरू! त्यांनी चित्रकला व अन्य कला विकृतीकरणाच्या विरोधात सडकून टीका करणारे लेखन केले होते. कलेतील सौंदर्यमीमांसादेखील त्यांनी सातत्याने केली. त्यांचा वारसा संध्याताईंनी पुढे नेला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अधिक उठावदार असायला हवे होते. प्रत्येक प्रकरणात अनेक सुंदर कृष्णधवल चित्रे दिली आहेत. त्यांच्यामुळे विषय कळायला, सुस्पष्ट व्हायला निश्चितच मदत होते. शेवटी 24 रंगीत चित्रांची पाने असून त्यातील चित्रे आकाराने मोठी असायला हवी होती, तर त्यातील तपशील, बारकावे वाचकाला अधिक भावले असते. खूप कमी चित्रकार लिहितात. संध्याताईनी चांगले पाऊल उचलले आहे. त्यात पुढे वाटचाल करावी.