महाभारतातील संदर्भ आणले म्हणजे ते भाषण अभ्यासपूर्ण होत नाही. हिंदू प्रतीकांचा चुकीचा अर्थ लावणारे भाषण करून हिंदू समाजाला संभ्रमात टाकता येत नाही. हे राहुल गांधी यांना कळणे अवघड असल्यामुळे आपण अशी टीका करून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरतो आहोत, असाच अहंकार त्यांच्या बेजबाबदार वर्तनातून दिसला. त्याच वेळी समोरचे परिपक्व आणि प्रौढ नेतृत्व या मर्कटलीलांना कंटाळून कपाळावर हात मारून घेते तेव्हा सन्माननीय सदस्यांनाही हे चाळे पाहून हसावे की रडावे? हेसुद्धा कळेनासे होते. सांविधानिक पदाचे यापुढे आणखी किती अवमूल्यन हा बिलंदर विरोधी पक्षनेता करणार हे पाहात राहणे एवढेच जनतेच्या भाळी आले आहे.
सनातन भारतीय संस्कृतीने आपल्याला काही चिरंतन जीवनमूल्ये दिली आहेत. ही जीवनमूल्ये आपल्याला जीवनात वाटचाल करताना दिशादर्शक ठरतात; पण आज देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेता या जबाबदारीच्या पदावर विराजमान झालेले राहुल गांधी यांचा भारतीय संस्कृतीशी दूरान्वयानेही कोणताच संबंध आलेला नाही आणि या मातीतील अस्सल संस्कार त्यांच्यावर झालेले नाहीत ही गोष्ट त्यांचे एकंदर वर्तन पाहता आपल्या लक्षात येते. यामुळेच या पदाची गरिमा एखादी व्यक्ती कशी पार रसातळाला नेऊन ठेवतो याचेच उदाहरण भारतीय जनतेला पाहायला मिळाले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर दीर्घकाळ सत्ता राबविण्याचा अनुभव असलेल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यावर अभ्यासपूर्ण भाषण करून त्यामधील त्रुटी आणि उणिवा समोर आणणे आवश्यक होते; पण संसदेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सनातन भारतीय संस्कृती सांगते - जाति न पूछो साधु की, पूछ लिजीए ज्ञान। मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान॥ पण संसदेत अर्थसंकल्प मांडला जाईपर्यंत त्याची गोपनीयता अबाधित राहावी यासाठी त्याच्याशी संबंधित मंडळी उर्वरित जगाशी आपला संपर्क तोडून घेतात. त्या वेळी त्या सर्वांना हलवा खायला देऊन त्यांचे तोंड गोड करण्याची प्रथा आधीपासून आहे. आपल्या गोपनीयतेच्या परंपरेचे ते कसे कसोशीने पालन करतात याची उदाहरणेही निर्मला सीतारामन यांनी उत्तरादाखल केलेल्या आपल्या भाषणात दिली. ती पाहता या सर्व मंडळींची कर्तव्यनिष्ठ देशभक्त हीच जातकुळी असायला हवी; पण अनुराग ठाकूर यांनी परखडपणे विचारले ते वास्तव लक्षात घेता ज्यांना आपलीच जात कोणती हे माहीत नाही ती मंडळी जातीय जनगणनेचा आग्रह धरून प्रत्येक गोष्टीत जातपात शोधण्याचा शहाजोगपणा करतात हे राहुल गांधी यांच्या वागण्यातून स्पष्ट झाले.
अर्थसंकल्प कशासोबत खातात याची कल्पना नसल्यामुळेच की काय, राहुल गांधी यांनी केवळ हलवा खाण्याचे चित्र देशाच्या संसदेत झळकावले आणि देशाचा हलवा वाटप करणार्या म्हणजेच अर्थसंकल्प तयार करणार्या टीममध्ये अनुसूचित जातीजमातीचे तसेच अन्य मागासवर्गीय - ओबीसी - किती होते? असा असंबद्ध प्रश्न विचारला. केवळ खळबळ माजविणे एवढाच त्यांचा हेतू नव्हता; पण यापुढे केवळ जातीपातीच्या ध्रुवीकरणाचेच राजकारण आपण खेळणार आहोत हेच त्यांनी सूचित केले. त्यांचा अंतस्थ हेतू हा हिंदू समाज जातपात विसरून एकत्रितपणे कधीच उभा ठाकू नये हाच आहे. संघटित झालेला हिंदू हा भाजपाचा मतदार आहे आणि केवळ आपल्या जातीपुरताच विचार करणारा हिंदू समाजघटक हा आपला मतदार आहे किंवा तसे समीकरण मांडल्यास त्याला आपल्याकडे खेचता येईल आणि निवडणुकीत विजय मिळविता येईल, असा त्यांचा खोडसाळ विचार आहे. तोच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना जातीय जनगणना हवी आहे. संपूर्ण देशहिताचा आणि समाजहिताचा विचार या मंडळींसाठी गौण आहे. छायाचित्र दाखवून शासकीय कर्मचार्यांची जात चव्हाट्यावर मांडणार्या राहुल गांधी यांच्यावर अनुराग ठाकूर यांनी टीका करताच आपल्या मित्राची पाठराखण करणार्या अखिलेश यादव यांनी जात विचारू नका, असा सज्जड दम भरायलाही मागेपुढे पाहिले नाही. मग जातपात न विचारता जातीय जनगणना करण्याचा कोणता कार्यक्रम अखिलेश यादव यांच्या इंडी आघाडीकडे आहे, अशी शंकासुद्धा कुणी उपस्थित करायला नको. मात्र राहुल गांधी जेव्हा जातीवाचक उल्लेख करतात तो केवळ सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी व अन्य कुणीही त्यात ढवळाढवळ करू नये, असा विरोधकांचा दावा आहे. शासकीय कर्मचार्यांनी आपले कर्तव्य बजावताना जातीपातीचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन आचरण केले पाहिजे हेच समाजाला आणि संविधानालाही अपेक्षित आहे; पण संविधानाचा ‘स’देखील ज्याला कळत नाही अशा शपथ घेण्यापुरते आणि भाजपाविरोधात नौटंकी करण्यापुरतेच हातात संविधान झळकविणार्या राहुल गांधी यांच्यासारख्या विरोधी पक्षनेत्याने या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा चंगच बांधलेला आहे, हे निश्चित!
भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांना ऐतिहासिक न मानणार्या काँग्रेसी राहुल गांधींना मात्र महाभारताचे अगाध ज्ञान आहे. जे सभागृहातही उपस्थित नाहीत असे उद्योजक आणि सामाजिक संघटनेचे प्रमुख यांची नावे कौरव पक्षातील महारथी म्हणून सांगत असताना चक्रव्यूहाचा उल्लेख जाणुनबुजून पद्मव्यूह असा करून भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळावर शरसंधान करण्याचा पराक्रम राहुल गांधी यांनी केला. तसे पाहिले तर त्यांना आपल्या पिताश्रींचा उल्लेख करून चक्रव्यूहाला ’राजीव-व्यूह’ असेही संबोधता आले असते की! राजीव म्हणजे कमळच की!! ओढूनताणून महाभारतातील संदर्भ आणले म्हणजे ते भाषण अभ्यासपूर्ण होत नाही. हिंदू प्रतीकांचा चुकीचा अर्थ लावणारे भाषण करून हिंदू समाजाला संभ्रमात टाकता येत नाही. हे राहुल गांधी यांना कळणे अवघड असल्यामुळे आपण अशी टीका करून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरतो आहोत, असाच अहंकार त्यांच्या बेजबाबदार वर्तनातून दिसला. त्याच वेळी समोरचे परिपक्व आणि प्रौढ नेतृत्व या मर्कटलीलांना कंटाळून कपाळावर हात मारून घेते तेव्हा सन्माननीय सदस्यांनाही हे चाळे पाहून हसावे की रडावे? हेसुद्धा कळेनासे होते. सांविधानिक पदाचे यापुढे आणखी किती अवमूल्यन हा बिलंदर विरोधी पक्षनेता करणार हे पाहात राहणे एवढेच जनतेच्या भाळी आले आहे.