‘ढ’ नावाचे प्रांजळ आत्मकथन

05 Jul 2024 14:27:54
• पुस्तकाचे नाव - ढ
• लेखक - दीपक भागवत
• प्रकाशक - रावा प्रकाशन, कोल्हापूर
• किंमत - रु. 335
 
 
 
 
मराठी साहित्यविश्वाचा महत्त्वाचा विभाग म्हणजे आत्मकथन होय. ‘मी कसा जगलो आणि या जगण्यातून मी काय साध्य केले’ हे सांगण्याचा प्रयत्न ‘आत्मकथन’ या साहित्य प्रकारातून होत असतो. आपल्या दुःखवेदनेचे अस्तर उघडून दाखवत भविष्याचा वेध घेणारी अनेक आत्मकथने मराठी साहित्यात प्रकाशित झाली आणि गाजलीसुद्धा. या आत्मकथनाच्या मालिकेत नव्याने दाखल झालेले आत्मकथन म्हणजे दीपक भागवत यांनी लिहिलेले ‘ढ’ हे पुस्तक. ‘ढ’ या आत्मकथनातून दीपक भागवत यांनी आपल्या बालपणापासून ते सेवानिवृत्तीनंतरच्या कालखंडातील घटना/प्रसंग मांडत आपला जीवनप्रवास अधोरेखित केला आहे. असे असले तरी आपले नाव, गावाचे नाव काल्पनिक ठेवले आहे; पण अन्य वर्णने आणि व्यक्तीचा उल्लेख लक्षात घेता कोल्हापूर परिसरातील घटना/प्रसंग या आत्मकथनातून समोर येतात. त्यामुळे आपोआपच वाचक त्या वातावरणात जातो.
 
 
book
 
लेखक बाल स्वयंसेवक आहे. वडील संघ स्वयंसेवक. वडिलांकडे संघाची जबाबदारी होती, सामाजिक प्रतिष्ठा होती. नित्य शाखेचा स्वयंसेवक यापलीकडे लेखक स्वतःला ढ समजतो. शालेय शिक्षणात फारशी गती नसलेला लेखक नववीपर्यंत ग्रेस मार्क मिळवून पास होत जातो; पण नववीच्या परीक्षेत नापास होतो. टवाळ मित्रामुळे शिक्षा होते. अशा वेळी बहीण, मामा मदतीला येतात आणि लेखकाला धीर देतात. याच काळात लेखक संघाच्या ओटीसीला जातो. ओटीसीचा त्याच्या जीवनावरचा प्रभाव सांगताना लेखक म्हणतो, साडेतीन ते पाच वाजेपर्यंत ’बौद्धिक’ असे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक, अभ्यासक, अनुभवी बोलत असत. प्रचारक बी.एस्सी., एम.एस्सी., एल.एलबी., इंजिनीअर, डॉक्टर असायचे. त्यांच्या क्षेत्रातले गोल्ड मेडलिस्ट असायचे; पण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशासाठी संघाला समर्पित केलेलं असायचं. आपल्या बौद्धिकात ते ऐतिहासिक महापुरुषांच्या, वीरांच्या, संतांच्या गोष्टी सांगून देशाची महानता, देशाची समृद्ध परंपरा सांगत असत. प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेलं स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपलीच आहे, हे पटवून देत असत. ’परम् वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्रम!’ हे आपलं ध्येयमात्र आहे, असं ते सांगत असत. त्या वयात तितकं कळत नसे; पण नंतर एकेका गोष्टीचं महत्त्व उलगडत गेलं.
 
 
तर अशा पद्धतीने संघातून संस्कार घेणारा लेखक महाविद्यालयीन जीवनात अभाविपचे काम करतो. त्याचबरोबर लेखन कला आत्मसात करून विविध माध्यमांतून लेखन प्रकाशित करतो. विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी विविध ठिकाणी प्रवास करतो. या संघटनेमुळे आयुष्यभराचे मैत्र जपणारे अनेक जिवलग मिळतात.
 
 
याच काळात देशात आणीबाणी जाहीर होते. लेखकाच्या वडिलांना मिसा कायद्याखाली अटक होते. कोल्हापुरात लेखकही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आणीबाणीविरुद्ध आंदोलनात सहभागी होतो. लेखकाला शिक्षा होते. काही दिवस शिक्षा भोगून लेखक पुन्हा समाजजीवनात सक्रिय होतो. आणीबाणी संपल्यावर लेखकाचे वडीलही परत येतात.
 
 
बाल स्वयंसेवक ते विद्यार्थी कार्यकर्ता या प्रवासात अनेक संघ प्रचारक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा जवळचा संबंध येतो आणि त्यातून ढ माणूस सजग आणि सहृदयी होत जातो. सामाजिक जीवनात नावलौकिक प्राप्त होतो. अशातच वडिलांचे आजारपण उद्भवते. मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागते. तेव्हा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जी मदत करतात, ती खूप भावुकपणे लेखक मांडतो. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेली जबाबदारी आणि त्यासाठी करावे लागलेले प्रयत्न व कष्टाचा पाढाही लेखक वाचतो आणि ठायीठायी संघ पाठीशी कसा उभा राहिला हेही प्रांजळपणे सांगतो.
 
 
संघातील ज्येष्ठ कार्यकर्ते लेखकाला एका शाळेत नोकरी लावतात. आधी काही काळासाठी असलेली ही नोकरी पुढे कायम होते. बी.ए.बी.एड.पर्यंत शिक्षण घेतलेला लेखक शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग करून आपले कौशल्य सिद्ध करतो.
 
 
निवृत्तीनंतर लेखकाला पुन्हा नवे जग खुणावत राहते. आध्यात्मिक क्षेत्रातील रुची त्याला प्रवचनकार म्हणून मान्यता मिळवून देते. कायम ग्रेस मार्क मिळवून नववीपर्यंत शाळा शिकणारा लेखक आपल्या पुढील जीवनात सघन आयुष्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करतो आणि तसे जगतोही. या जगण्यातून प्रकट होणारी आत्मीयता, सामाजिक भान आणि आपल्या गुणांचा विकास करण्याची ऊर्मी यांचा सुरेख मेळ या आत्मकथनातून समोर येतो. त्याचबरोबर संघशक्तीचा अनुभवही या आत्मकथनातून येत राहतो. त्यामुळे हे आत्मकथन केवळ व्यक्तीचे न राहता विचारांचे आणि समूह व्यवहाराचे होते.
Powered By Sangraha 9.0