पशुगणना पशुसंवर्धन विस्ताराचे एक साधन

05 Jul 2024 12:09:24
डॉ. व्यंकटराव घोरपडे - 9325227033
पशुगणना ही दर पाच वर्षांनी केली जाते. यामध्ये पशुधनांची संख्या, प्रकार आणि स्थान याबाबत आकडेवारी (डाटा) गोळा करण्यासाठी मदत होते. ही आकडेवारी पशुसंवर्धन विभागात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि विकासाचा मागोवा घेण्यासाठी वापरली जाते.
vivek
पशुगणना ही देश किंवा प्रदेशातील पशुधन आणि कुक्कुटपालन यांची संपूर्ण गणना असते. पशुधनांची संख्या, प्रकार आणि स्थान याबाबत आकडेवारी (डाटा) गोळा करण्यासाठी नियमित अंतराने, विशेषतः दर पाच वर्षांनी केली जाते. हा डाटा पशुसंवर्धन विभागात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि विकासाचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो.
 
 
सन 1919-20 पासून देशात पशुगणना सुरू झाली. ओघानेच राज्यातदेखील 1920 पासून सुरुवात झाली. सुरुवातीला हे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडे होते. 1978 मध्ये जी बारावी पशुगणना झाली तेव्हापासून प्रथमच ही पशुगणना पशुसंवर्धन विभागाकडे सोपवण्यात आली. 2007 मध्ये 18वी पशुगणना पूर्ण झाली. पुढे सन 2012 मध्ये 19वी पशुगणना व 2017 मध्ये 20वी पशुगणना करण्यात आली होती. दर पाच वर्षांनी आपल्या देशामध्ये ही पशुगणना नियमित केली जाते; पण कोविडमुळे दोन वर्षे सदर पशुगणना पुढे गेल्यामुळे आता सन 2024 मध्ये 21 वी पशुगणना सुरू होत आहे.
 
 
नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने विज्ञान भवनात 21व्या पशुगणनेच्या पूर्वतयारी व धोरणनिश्चितीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग ऊर्फ लालन सिंह व सोबत राज्यमंत्री प्राध्यापक एस. पी. बघेल आणि जॉर्ज कुरियनदेखील हजर होते. सदर कार्यशाळेत पशुगणनेसाठी विकसित केलेले मोबाइल अ‍ॅपचेदेखील अनावरण करण्यात आले. सदर 21वी पशुगणना सप्टेंबर 24 ते डिसेंबर 24 या कालावधीत होणार असून सदर कार्यशाळेत एकूण पद्धती, मार्गदर्शक तत्त्वे, मोबाइल अ‍ॅपचे अनावरण यासह 21 व्या पशुगणनेसाठी भारताच्या रजिस्टर जनरल यांनी मान्यतादेखील दिली.
 
 
या पशुगणनेमध्ये देशातील एकूण पशुधनाच्या 16 प्रजाती व कुक्कुटपक्षी यांची जातनिहाय, वय, लिंग आणि त्यांचा वापर याबाबत गणना केली जाणार आहे. यामध्ये जवळजवळ एकूण 221 वेगवेगळ्या पशुधनांतील जातींची नोंदणी केली जाणार आहे. विशेषतः देशी गाईंचीदेखील नोंदणी या माध्यमातून होणार आहे. मुळातच राज्यातील देशी गाईंचे दूध उत्पादन कमी असल्यामुळे या माध्यमातून चांगल्या दूध देणार्‍या गाईंची जर नोंदणी झाली, तर त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यामध्ये आनुवंशिक सुधारणा घडवून राज्यातील देशी गाईंचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे.
 
 
सुरुवातीला ही पशुगणना ग्रामसेवक करत असत. त्या वेळी मोठाले फॉर्म असायचे. त्यामध्ये कृषी अवजारांसह मत्स्य व्यवसायासाठी वापरत असलेल्या जाळ्या व इतर संलग्न वस्तूंचीदेखील गणना केली जायची. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर असणारे सांख्यिकी साहाय्यक व पशुधन विकास अधिकारी हे मदत व मार्गदर्शन करून सदर अहवाल तयार करून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे व तेथून राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्तालयात व पुढे राज्याचा एकूण गोषवारा हा केंद्राकडे पाठवला जाई. मग देशातील सर्व राज्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो पुस्तकरूपाने केंद्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत असे. सर्व राज्यांचा अहवाल उपलब्ध होईपर्यंत वेळ जातो आणि मग एकत्रित अहवाल प्रसिद्ध व्हायला वेळ लागतो. मधल्या काळात ग्रामसेवक मंडळींनी सदर पशुगणना करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे अलीकडे सदर पशुगणना ही स्वतंत्रपणे प्रगणक नेमून केली जाते. त्यांना प्रशिक्षणदेखील दिले जाते. तरीदेखील अनेक चुका घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वेळा जनावरांच्या प्रजाती ओळखण्यात चुका होतात. त्यामुळे पशुधनाची नेमकी संख्या न मिळता कमीजास्त होते. उदाहरणच द्यायचे झाले तर अठराव्या पशुगणनेदरम्यान सांगली जिल्ह्यात जवळजवळ 100-125 उंटांची संख्या दाखवण्यात आली होती. तसाच प्रकार मागील पशुगणनेत उत्तर प्रदेशमध्ये याक या प्राण्याची संख्या 9000 दाखवण्यात आल्याचे केंद्रीय पशुसंवर्धन सचिव अलका उपाध्याय यांनी 25 जून 2024 रोजीच्या विज्ञान भवनातील कार्यशाळेत नमूद केले होते. जे प्राणी त्या भागात नाहीत त्याची नोंद चुकीने किंवा निष्काळजीने होऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी या 21 व्या पशुगणनेत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ही प्रणाली अधिक सोपी केली आहे.
 
vivek 
21 व्या पशुगणनेची सुरुवातदेखील नियोजनबद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र असा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामध्ये जून 24 ते जुलै 24 मध्ये अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत पायलट सर्व्हे करण्यात येणार आहे. जुलै 24 ते ऑगस्ट 24 दरम्यान सर्व देशभरात राज्यातील संबंधित कर्मचारी, अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करून सप्टेंबर 24 ते डिसेंबर 24 मध्ये राज्यभरातून प्रत्यक्ष पशुगणना करण्यात येईल. नंतर जानेवारी 25 मध्ये सर्व राज्यांशी चर्चा करून आकडेवारीबाबत आढावा घेण्यात येईल आणि मग फेब्रुवारी 25 ते मार्च 25 मध्ये सर्व महत्त्वपूर्ण आकडेवारी जाहीर करण्याचे निश्चित केले आहे. या सर्व प्रक्रियेत एकूण सहा लाख साठ हजार गावे, 89 हजार शहरांमधून ही गणना केली जाणार आहे. त्यासाठी प्रगणक हे देशातील 270 दशलक्ष कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन ही माहिती संकलित करणार आहेत. हे सर्व काम ऑनलाइन पद्धतीने कागदविरहित होणार आहे.
या सर्व पशुगणनेतून देशातील निश्चित पशुधनाची व कुक्कुटपालनांची आकडेवारी समोर येणार आहे. सोबत त्यांच्या प्रजाती व जाती यांचे वय, लिंग आणि कुटुंबासाठी होणारा वापर समजल्यामुळे देशातील पशुधन आणि पशुसंवर्धनातून उदरनिर्वाह करणार्‍या सर्व कुटुंबांचा आर्थिक आणि सामाजिक स्तरदेखील या माध्यमातून पुढे येणार आहे. या पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील व्यावसायिक व परसातील कुक्कुट पक्षी यांची संख्या उपलब्ध होणार आहे. सोबतच भटकी जनावरे व भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्या माध्यमातून त्यांची नर-मादी अशी आकडेवारीदेखील आपल्याला उपलब्ध होईल. त्याचबरोबर पशुसंवर्धनामध्ये महिलांचा सहभाग हादेखील आपल्याला कळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोशाळांमध्ये असलेल्या जनावरांची संख्या उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून गोशाळांसाठीचे धोरण आखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल यात शंका नाही.
 
 
देशातील अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचे साधन हे पशुधन आणि पशुसंवर्धनाच्या माध्यमातून होत असते. दूध, अंडी आणि मांस यातून सकस आहार त्याचबरोबर या माध्यमातून आर्थिक विकास व रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होणार आहे. पशुगणनेमुळे अनेक पशुरोगांचे नियंत्रण करणे सोपे होईल. पशुधनाचे उत्पादन कळल्यामुळे त्याबाबतीत निश्चित धोरणदेखील आखता येईल, आयात-निर्यात ठरवता येईल. या माध्यमातून भूमिहीन, शेतमजूर यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनादेखील आखण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून समोर येणारी आकडेवारी पशुसंवर्धन विभागासह देशातील अनेक मंत्री कार्यालयांना आपापल्या योजना सादर करण्यासाठी उपयोगी होणार आहे. निती आयोग, वेगवेगळ्या संशोधन संस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र सांख्यिकी विभाग (यूएनएसडी), जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ), खाद्य व कृषी संस्था (एफएओ) सारख्या संस्थांनादेखील हा डाटा (विदा) उपयोगी पडणार आहे. त्यामुळे याचे महत्त्व खूप मोठे आहे. सर्व संबंधितांनी यासाठी पूर्ण योगदान देऊन निश्चित आकडेवारी समोर येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रगणकांचे प्रशिक्षण हा सर्वात महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे. यांना योग्य पद्धतीचे प्रशिक्षण आणि त्यांना योग्य पद्धतीची प्रेरणा मिळाल्यास हे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकते. यासाठी जिल्हा पशुगणना अधिकारी, प्रभारी अधिकारी, त्याचबरोबर पर्यवेक्षक यांनी योग्य पद्धतीने नियमित प्रगणकांच्या कामावर लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवल्यास योग्य पद्धतीने आकडेवारी उपलब्ध होण्यास काही अडचण येणार नाही. विशेषतः शहरी भागामध्ये नेमण्यात येणारे प्रगणक हे पशुसंवर्धनाशी संबंधित नसू शकतात, त्यामुळे त्यांना योग्य पद्धतीचे प्रशिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. एकूणच सर्वांच्या मनामध्ये आपण एक राष्ट्रीय काम करत आहोत, त्या माध्यमातून फार मोठे काम आपल्या हातून घडणार आहे याची जाणीव करून दिल्यास निश्चितपणे एकविसाव्या पशुगणनेतून निश्चित आकडेवारी समोर येईल ज्याचा वापर हा गावपातळीपासून देशपातळीपर्यंत पूर्ण विधायक कामासाठी होऊन सर्वांची आर्थिक, सामाजिक उन्नती होण्यासाठी मदत होईल.
लेखक सांगली येथील पशुसंवर्धन विभागाचे
सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त आहेत.
Powered By Sangraha 9.0